त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले नॉर्वेमध्ये
काही वर्षांआधी, पन्नाशीच्या जवळ आलेले रोआल आणि एल्सेबेथ हे दांपत्य बॅर्गन या नॉर्वेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरात आरामदायक जीवन जगत होते. ते त्यांची मुलगी इसाबेल आणि मुलगा फाबीयॉन यांच्यासोबत मिळून मंडळीतल्या कार्यांत विश्वासूपणे सहभागी होत असत. रोआल वडील म्हणून तर एल्सेबेथ पायनियर म्हणून सेवा करत होती. आणि इसाबेल व फाबीयॉन उत्तम प्रचारक होते.
पण, सप्टेंबर २००९ मध्ये या कुटुंबाने काही तरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक आठवड्यासाठी दुर्गम भागात जाऊन प्रचार करण्याचे ठरवले. म्हणून रोआल, एल्सेबेथ व फाबीयॉन, जो तेव्हा १८ वर्षांचा होता नॉर्डकिनला गेले. नॉर्डकिन हा आर्क्टिक वृत्ताच्या वर असलेल्या फिनमार्क प्रदेशातील द्वीपकल्प आहे. या दुर्गम भागातील कोएलेफज्योर या खेड्यात प्रचार कार्य करण्यासाठी इतर बंधुभगिनीसुद्धा आले होते. त्यांच्यासोबत मिळून त्यांनी प्रचार कार्य केले. रोआल सांगतात: “या खास कार्यात हा सबंध आठवडा घालवता यावा म्हणून मी माझ्या कामाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करू शकलो याचं मला खूप समाधान वाटत होतं.” पण नंतर त्याच आठवड्यात रोआल काहीसा बेचैन झाला. असे काय घडले होते?
एक अनपेक्षित प्रश्न
रोआल सागंतात: “अचानक फिनमार्क या प्रदेशात पायनियर म्हणून सेवा करणारा मारीयो यानं आम्हाला लाक्सएल्व येथील २३ प्रचारकांनी बनलेल्या मंडळीला मदत करण्यासाठी तिथं राहायला जाण्याची तुमची तयारी आहे का असं विचारलं?” या अनपेक्षित प्रश्नामुळे रोआल थक्क झाले. ते म्हणतात: “जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा विचार एल्सेबेथ आणि मी यापूर्वी केला होता. पण आमची मुलं मोठी झाल्यानंतर आम्ही तसं करणार होतो.” दुर्गम भागात प्रचार करत असतानाच्या या थोड्या दिवसांतही रोआल हे पाहू शकले की लोकांना यहोवाविषयी शिकून घेण्याची इच्छा आहे. त्यांना आताच मदतीची गरज होती, नंतर नाही. ते आठवून सांगतात: “मारीयोनं विचारलेला प्रश्न माझ्या मनाला बोचत राहिला आणि यामुळं कित्येक दिवस मला झोपच लागली नाही.” नंतर मारीयो रोआलला व त्याच्या कुटुंबाला लाक्सएल्वला घेऊन गेला जे कोएलेफज्योरच्या दक्षिणेला सुमारे २४० किमी अंतरावर होते. रोआल व त्याच्या कुटुंबाने स्वतः तेथील लहानशी मंडळी पाहावी अशी मारीयोची इच्छा होती.
लाक्सएल्वमध्ये असलेल्या दोन वडिलांपैकी आन्ड्रेयास यांनी पाहुण्यांना तेथील परिसर व राज्य सभागृह दाखवले. मंडळीतल्या बंधुभगिनींनी त्यांचे प्रेमळपणे स्वागत केले आणि राज्याशी संबंधित कार्याला हातभार लावण्यासाठी जर रोआल व एल्सेबेथ त्यांच्या मुलांसह येथे आले तर त्यांना खूप आनंद होईल असे ते म्हणाले. आन्ड्रेयास हसून म्हणाले की त्यांनी रोआल व फाबीयॉन यांच्यासाठी आधीपासूनच नोकरीच्या मुलाखतीचीही व्यवस्था केली आहे! आता रोआल व त्यांचे कुटुंब काय करणार?
कोणता निर्णय घ्यावा?
“मला इथं यायची इच्छा नाही,” अशी फाबीयॉनची पहिली प्रतिक्रिया होती. तो ज्यांच्यासोबत लहानाचा मोठा झाला होता त्या मंडळीतल्या जवळच्या मित्रांना सोडून अशा लहान शहरात राहण्याचा विचार त्याला मुळीच आवडला नाही. शिवाय त्याचे इलेक्ट्रिशियन बनण्याचे प्रशिक्षण अद्यापही पूर्ण झाले नव्हते. पण इसाबेलला (जी तेव्हा २१ वर्षांची होती) या प्रदेशात सेवा करण्यासंबंधी विचारले गेले तेव्हा ती म्हणाली: “असंच काहीतरी करण्याची माझी पूर्वीपासून इच्छा होती!” पण मग ती म्हणते: “मी जेव्हा यावर जास्त विचार करू लागले, तेव्हा माझ्या मनात अशा प्रकारचे प्रश्न येऊ लागले, ‘असं करणं खरोखरच योग्य ठरेल का? मला माझ्या मित्रमैत्रिणींची आठवण येईल का? की मी माझ्या मंडळीतच राहावं, जिथं सगळ्या सोयी-सुविधा आहेत?’” या आमंत्रणाप्रती एल्सेबेथने कशी प्रतिक्रिया दाखवली? ती म्हणते: “मला वाटलं जणू यहोवानं आमच्या कुटुंबाला एक नेमणूक दिली आहे, पण नुकत्याच दुरुस्त केलेल्या आमच्या घराबद्दल आणि गेल्या २५ वर्षांत आम्ही ज्या गोष्टी गोळा केल्या होत्या त्यांचाही मी विचार करू लागले.”
तो खास आठवडा संपल्यानंतर रोआल व त्यांचे कुटुंब बॅर्गनला परतले. पण २,१०० किमी दूर असलेल्या लाक्सएल्वमधील त्यांच्या ख्रिस्ती बंधुभगिनींचा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता. एल्सेबेथ म्हणते: “मी अनेकदा यहोवाला प्रार्थना केली आणि तिथं भेटलेल्या मित्रमैत्रिणींना फोटो पाठवण्याद्वारे व अनुभव सांगण्याद्वारे मी त्यांच्या संपर्कात राहिले.” रोआल म्हणतात: “लाक्सएल्वला सेवा करायला जाण्याआधी मला विचार करायला थोडा वेळ हवा होता. शिवाय तिथं जाणं व्यावहारिक दृष्टीनं शक्य होईल का याचाही विचार मला करायचा होता. आम्ही घरखर्च कसा चालवणार? मी अनेकदा यहोवाला प्रार्थना केली आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांशी व अनुभवी बांधवांशी बोललो.” फाबीयॉन सांगतो: “मी याविषयी जितका जास्त विचार करू लागलो तितकीच जास्त मला जाणीव होऊ लागली की तिथं न जाण्याचं कोणतंही रास्त कारण माझ्याकडे नव्हतं. मी वारंवार यहोवाला प्रार्थना केली, आणि तिथं जाण्याची इच्छा हळूहळू माझ्या मनात रुजू लागली.” इसाबेलविषयी काय? तिथे जाण्यासाठी स्वतःला तयार करण्याकरता तिने पायनियर सेवा सुरू केली. सहा महिने पायनियर सेवा केल्यानंतर, आणि या काळादरम्यान वैयक्तिक बायबल अभ्यासात बराच वेळ खर्च केल्यानंतर आपण त्या नवीन ठिकाणी जाण्यास तयार आहोत असे तिला वाटले.
ध्येय गाठण्यास पावले उचलली
प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची इच्छा कुटुंबातील प्रत्येक सदस्यात वाढत गेली, तसतशी त्यांनी त्यांची ध्येये गाठण्यास पावले उचलली. रोआल एक चांगल्या पगाराची नोकरी करत होते जी त्यांना खूप आवडायची. त्यांनी कामातून एक वर्षाची रजा मागितली. पण त्यांच्या मालकाने त्यांना दोन आठवडे काम व सहा आठवडे सुट्टी असे अर्धवेळ काम करण्याविषयी विचारले. रोआल म्हणतात: “यामुळं माझा पगार खूप कमी झाला, पण खर्च चालवण्यासाठी तो पुरेसा होता.”
एल्सेबेथ सांगते: “माझ्या पतीनं मला लाक्सएल्वमध्ये घर शोधण्यास आणि बॅर्गन येथील आमचं घर भाड्यानं देण्यास सांगितलं. यात खूप वेळ गेला आणि खूप प्रयत्नही करावा लागला. पण आम्ही यशस्वी ठरलो. काही काळानंतर मुलांना अर्धवेळेची नोकरी मिळाली. जेवणाचा व प्रवासाचा खर्च उचलण्यासाठी ते आमची मदत करतात.”
इसाबेल म्हणते: “आम्ही जिथं गेलो ते शहर लहान असल्यामुळं माझ्यासमोर एक मोठं आव्हान होतं; ते म्हणजे पायनियर या नात्यानं
स्वतःचा सांभाळ करण्यासाठी एक नोकरी शोधणं. कधीकधी वाटायचं की मला काम मिळणारच नाही.” तरीही, मिळेल ती अर्धवेळेची नोकरी स्वीकारून इसाबेल आपला खर्च भागवू शकली. पहिल्या वर्षी तिने ९ वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. फाबीयॉनबद्दल काय? तो म्हणतो: “माझा इलेक्ट्रिशियनचा अभ्यास पूर्ण करण्याकरता मला कोणाच्यातरी हाताखाली अद्यापही काम करण्याची गरज होती. ते मी लाक्सएल्वमध्ये करू शकलो. नंतर मी परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि मला इलेक्ट्रिशियन म्हणून अर्धवेळ नोकरी मिळाली.”इतरांनी आपली सेवा कशी वाढवली?
मारेलियस व त्याची पत्नी केसीया यांनासुद्धा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची इच्छा होती. मारेलियस जो आता २९ वर्षांचा आहे, तो म्हणतो: “अधिवेशनात पायनियर सेवा करण्याविषयी दिलेली भाषणे व मुलाखती ऐकल्यामुळं मला माझी सेवा आणखी वाढवण्याची प्रेरणा मिळाली.” पण केसीयासाठी, जी आता २६ वर्षांची आहे, आपल्या कुटुंबापासून दूर जाण्याचा विचार हा एक मोठा अडथळा होता. ती म्हणते: “प्रियजनांपासून दूर राहण्याचा विचार मला खूप भीतिदायक वाटायचा.” शिवाय घराचे हफ्ते भरण्यासाठी मारेलियस पूर्णवेळेची नोकरी करत होता. तो म्हणतो: “यहोवाच्या मदतीमुळं आणि बदल करण्यास मदत मिळावी म्हणून सतत केलेल्या प्रार्थनेमुळं आम्ही प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकलो.” सर्वात प्रथम ते बायबल अभ्यास करण्यात जास्त वेळ घालवू लागले. मग त्यांनी त्यांचे घर विकले, नोकरी सोडली, आणि ऑगस्ट २०११ मध्ये उत्तर नॉर्वेत असलेल्या ऑल्टा शहरात राहायला गेले. तेथे गेल्यावर पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी व स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मारेलियस अकाउंटंट म्हणून तर केसीया एका दुकानात काम करत आहे.
तिशीतल्या क्नुट आणि लीसबेट या दांपत्याने राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्यांचे अनुभव इयरबुकमध्ये वाचले. हे अनुभव त्यांच्या मनाला स्पर्शून गेले. लीसबेट म्हणते: “हे अनुभव वाचल्यावर परदेशात जाऊन सेवा करण्याचा विचार आम्ही करू लागलो. पण मी असं करण्यास कचरत होते कारण माझ्यासारखी साधारण व्यक्ती असं करू शकते की नाही याची शंका मला होती.” तरीही त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी काही पावले उचलली. क्नुट म्हणतात: “आम्ही आमचं घर विकलं आणि पैसे वाचवण्यासाठी माझ्या आईसोबत राहू लागलो. नंतर परदेशात जाऊन सेवा करण्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही बॅर्गनमध्ये असलेल्या एका इंग्रजी मंडळीसोबत सहवास करू लागलो. तिथं आम्ही लीसबेटच्या आईसोबत राहिलो.” लवकरच क्नुट व लीसबेट एका दूरच्या ठिकाणी अर्थात युगांडा, जेथे राज्य प्रचारकांची जास्त गरज होती तेथे जाण्यास तयार झाले. वर्षातून दोन महिने ते नॉर्वेला येऊन नोकरी करतात. अशा रीतीने वर्षातील बाकीचे महिने युगांडामध्ये राहून पूर्णवेळ प्रचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे असतात.
“परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा”
यहोवाच्या सेवेसाठी स्वेच्छेने पुढे आलेल्या या सर्व बंधुभगिनींची सेवा यशस्वी ठरली का? रोआल म्हणतात: “बॅर्गनच्या तुलनेत या दुर्गम भागात एक कुटुंब या नात्यानं आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतो. एकमेकांसोबतचं आमचं नातं अधिक घट्ट झालं आहे. मुलांना आध्यात्मिक प्रगती करताना पाहणं हा एक आशीर्वादच आहे. शिवाय भौतिक गोष्टींबाबतचा आमचा दृष्टिकोन फार बदलला आहे. त्या आम्हाला आधी जितक्या महत्त्वाच्या वाटायच्या तितक्या आता वाटत नाहीत.”
एल्सेबेथला दुसरी भाषा शिकण्याची गरज भासली. का? लाक्सएल्व मंडळीच्या क्षेत्रात कारसयोक या गावाचा समावेश होतो जिथे सामी लोकांची वस्ती आहे. हे नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि रशियाच्या उत्तर भागांतील स्थानिक लोक आहेत. या लोकांना राज्याचा संदेश सांगता यावा म्हणून एल्सेबेथने सामी भाषा शिकण्यासाठी एक कोर्स केला. आता तिला ती भाषा थोडीफार बोलता येते. तिच्या या नव्या क्षेत्राबद्दल तिला कसे वाटते? ती म्हणते: “मी सहा बायबल अभ्यास संचालित करते. मी खूप आनंदानं इथं सेवा करत आहे!”
फाबीयॉन आता एक पायनियर व सेवा सेवक आहे. तो सांगतो की त्याने आणि इसाबेलने त्यांच्या नवीन मंडळीतील अशा तीन किशोरवयीन मुलामुलींना मदत केली ज्यांना मंडळीतील कार्यांत अधिक भाग घेण्यासाठी प्रोत्साहनाची गरज होती. आता ते तिघेही सेवाकार्यात आवेशाने भाग घेत आहेत. खरेतर, त्यांच्यापैकी दोन जणांचा बाप्तिस्मा झाला आहे आणि मार्च २०१२ मध्ये त्यांनी सहायक पायनियर म्हणून सेवा केली. यांपैकी एकीने फाबीयॉन आणि इसाबेलचे खूप आभार मानले. कारण ती सत्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली होती. पण या दोघांच्या मदतीमुळे ती पुन्हा “सत्यात बळकट होऊ लागली.” फाबीयॉन म्हणतो: “तिनं जेव्हा हे म्हटलं तेव्हा मला खरोखरच भरून आलं. इतरांना मदत केल्यानं खरंच खूप आनंद होतो!” इसाबेल सांगते: “या नेमणुकीत मी खरोखरच ‘परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव’ घेतला.” (स्तो. ३४:८) ती पुढे म्हणते: “शिवाय, इथं सेवा करताना खूप मजा येते!”
मारेलियस व केसीया आता एक साधे जीवन जगत आहेत पण त्यांचे जीवन खूप अर्थपूर्ण बनले आहे. हे दोघे ऑल्टा मंडळीसोबत सहवास करतात जिथे आता ४१ प्रचारक आहेत. मारेलियस म्हणतो: “मागे वळून पाहिल्यावर कळतं की आमचं जीवन आता किती बदललं आहे. हे पाहून खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. आम्ही पायनियर म्हणून इथं यहोवाची सेवा करत आहोत याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. यापेक्षा समाधानदायक गोष्ट आणखी काहीही असू शकत नाही.” केसीया म्हणते: “मी यहोवावर आणखी जास्त भरवसा ठेवण्यास शिकले आहे, आणि त्यानं आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. नातेवाइकांपासून दूर राहत असल्यामुळं त्यांच्यासोबत आम्ही जो वेळ घालवतो तो आणखी मौल्यवान लेखण्यास मला मदत मिळाली आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल मला कधीच पस्तावा झाला नाही.”
युगांडामध्ये क्नुट आणि लीसबेट यांचे कसे काय चालले आहे? क्नुट सांगतो: “नव्या वातावरणाशी व संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पाणी व वीज टंचाई, पोटाचे विकार यांसारख्या समस्यांचा सामना केव्हाकेव्हा करावा लागतो; पण इथं आम्हाला हवे तितके बायबल अभ्यास आम्ही संचालित करू शकतो!” लीसबेट म्हणते: “आमच्या घरापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर अशी क्षेत्रं आहेत जिथं लोकांनी राज्याचा संदेश कधीच ऐकलेला नाही. तरी जेव्हा आम्ही तिथं जातो, तेव्हा आम्हाला लोक बायबलचं वाचन करताना दिसतात आणि त्यांना बायबलमधून शिकवण्याची विनंती करतात. अशा नम्र लोकांना बायबल शिकवल्यामुळं जो आनंद होतो त्याची तुलना कशासोबतही करता येणार नाही.”
आपला पुढारी येशू ख्रिस्त याने जे प्रचार कार्य सुरू केले ते आता पृथ्वीच्या कित्येक भागांत सुरू असल्याचे पाहून त्याला किती आनंद होत असेल! खरेच, “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्याची येशूने दिलेली आज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेण्यास देवाच्या प्रत्येक सेवकाला मनापासून आनंद होतो.—मत्त. २८:१९, २०.