शांती—हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही!
शांती—हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही!
“अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.” —१ करिंथ. १५:२८.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
पुढील वचनांच्या पूर्ततेचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
१. मोठ्या लोकसमुदायातील लोकांना कोणती आशा आहे?
एका न्यायी व दयाळू राजाचे शक्तिशाली सरकार हजार वर्षांच्या काळादरम्यान आपल्या प्रजेसाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? “मोठ्या संकटातून,” म्हणजे ज्याद्वारे सध्याच्या दुष्ट जगाचा समूळ अंत होईल, त्यातून बचावणाऱ्या एका मोठ्या लोकसमुदायातील असंख्य लोक भविष्यात अनेक अद्भुत घटना घडताना पाहतील.—प्रकटी. ७:९, १४.
२. मागील ६,००० वर्षांदरम्यान मानवांनी कोणत्या गोष्टी अनुभवल्या आहेत?
२ मानवी इतिहासाच्या ६,००० वर्षांदरम्यान, मानवांनी स्वतःवर राज्य करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यामुळे मानवांना अनेक दुःखे व वेदना भोगाव्या लागल्या आहेत. बायबलमध्ये कितीतरी काळाआधी असे सांगितले होते: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उप. ८:९) आज आपण काय पाहतो? युद्धे व बंड यांव्यतिरिक्त गरिबी, रोगराई, पर्यावरणाचा नाश, वातावरणातील बदल आणि इतर अनेक गोष्टी आज घडत आहेत. सरकारांनी इशारा दिला आहे की आपण जर आपली सध्याची बेपर्वाईची मानसिकता बदलली नाही, तर याचे भयंकर परिणाम होतील.
३. हजार वर्षांच्या शासनादरम्यान काय घडेल?
३ मशीही राज्याचा राजा येशू ख्रिस्त व त्याच्या १,४४,००० सहराजांच्या शासनाखाली, देवाचे राज्य प्रगतिशीलपणे मानवांचे व त्यांच्या घराचे म्हणजेच या पृथ्वी ग्रहाचे झालेले नुकसान भरून काढेल. हजार वर्षांच्या शासनादरम्यान, यहोवा देवाने दिलेल्या या दिलासादायक वचनाची पूर्तता होईल: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यश. ६५:१७) पण, अद्याप अदृश्य असलेल्या कोणत्या अद्भुत घटना भविष्यात घडणार आहेत? आपण देवाच्या भविष्यसूचक वचनाच्या साहाय्याने, अद्याप “अदृश्य” असलेल्या अद्भुत गोष्टींची एक झलक पाहू या.—२ करिंथ. ४:१८.
ते घरे बांधतील आणि द्राक्षमळे लावतील
४. आज अनेक जण कशा परिस्थितीत राहत आहेत?
४ आपले स्वतःचे एक घर असावे, आणि तेथे आपण आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित व निर्धास्त राहावे, असे आपल्यापैकी कोणाला वाटणार नाही? पण आजच्या जगात, राहण्यासाठी स्वतःचे एक घर मिळवणे ही एक गंभीर समस्या आहे. शहरे लोकांनी खचाखच भरलेली आहेत. अनेकांना शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये आणि जुन्या किंवा घाणेरड्या इमारतींमध्ये राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी स्वतःचे एक घर असणे हे केवळ एक स्वप्न आहे.
५, ६. (क) यशया ६५:२१ आणि मीखा ४:४ यातील भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण होतील? (ख) आपण तो आशीर्वाद कसा मिळवू शकतो?
५ देवाच्या राज्य शासनादरम्यान, आपले स्वतःचे घर असण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होईल. कारण यशयाद्वारे असे भाकीत करण्यात आले होते: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.” (यश. ६५:२१) पण, तेव्हा केवळ स्वतःचे घर असण्याची इच्छाच पूर्ण केली जाईल का? नाही. कारण, आजही काही लोक त्यांच्या स्वतःच्या घरात राहतात; काही तर भल्या मोठ्या घरात किंवा आलिशान महालात राहतात. पण, आर्थिक उलथापालथींमुळे आपण आपले घर गमावून बसू किंवा आपल्या घरात चोर-दरोडेखोर घुसतील अशी भीती त्यांना नेहमी सतावत असते. देवाच्या राज्यात परिस्थिती किती वेगळी असेल! मीखा संदेष्ट्याने असे लिहिले: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
६ ही अद्भुत आशा लक्षात ठेवून आपण काय केले पाहिजे? अर्थातच, आपल्या सर्वांनाच राहण्यासाठी घर हवे आहे. तरीसुद्धा, आताच आपल्या स्वप्नातले घर मिळवण्यासाठी झटण्याऐवजी, आणि कदाचित त्यासाठी मोठे कर्ज घेण्याऐवजी, यहोवाने दिलेल्या वचनावर लक्ष केंद्रित करणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का? येशूने स्वतःबद्दल काय म्हटले होते त्याची आठवण करा: “खोकडांस बिळे व आकाशातल्या पाखरांस घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५८) जगातील सर्वात श्रीमंत माणसाजवळही नसेल, इतके सुंदर घर बांधण्याची किंवा विकत घेण्याची क्षमता व सामर्थ्य येशूजवळ होते. पण, त्याने तसे का केले नाही? स्पष्टच आहे, की देवाच्या राज्याला पहिले स्थान देण्यापासून परावृत्त करेल असे कोणतेही विकर्षण येशू टाळू इच्छित होता. भौतिक गोष्टींवर लक्ष लावण्याऐवजी किंवा त्यांविषयी चिंता करण्याऐवजी, आपण येशूचे अनुकरण करून देवाच्या राज्याशी संबंधित गोष्टींवर लक्ष लावू शकतो का?—मत्त. ६:३३, ३४.
“लांडगा व कोकरू एकत्र चरतील”
७. यहोवाने सुरुवातीला मानवांना पशू-पक्ष्यांसंबंधी कोणती आज्ञा दिली होती?
७ सृष्टीची रचना करताना यहोवाने सर्वात शेवटी पृथ्वीवरील त्याची सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे मानवांची निर्मिती केली. यहोवाने त्याच्या कुशल कारागिराला म्हणजे त्याच्या ज्येष्ठ पुत्राला त्याच्या विशिष्ट उद्देशाविषयी सांगितले: “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवितील.” (उत्प. १:२६) अशा रीतीने, देवाने आदाम व हव्वा यांना आणि पर्यायाने सर्व मानवांना आज्ञा दिली की त्यांनी सर्व पशू-पक्ष्यांवर अधिकार चालवावा.
८. आज पशू-पक्षी कशा प्रकारे वागतात?
८ सर्व पशू-पक्ष्यांवर अधिकार चालवणे आणि त्यांच्यासोबत शांतीने राहणे मानवांना खरोखर शक्य आहे का? अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांवर, जसे की कुत्रा, मांजर यांवर प्रेम करतात. पण, जंगली जनावरांबद्दल काय? एक अहवाल म्हणतो: “ज्या वैज्ञानिकांनी जंगली जनावरांच्या सान्निध्यात राहून त्यांचा अभ्यास केला आहे त्यांना असे दिसून आले आहे की सर्व सस्तन प्राण्यांमध्ये भावना असतात.” अर्थातच, प्राण्यांना जेव्हा घाबरवले जाते तेव्हा ते भयभीत होतात किंवा हिंस्र बनतात. पण, काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे, प्राणी कोमल भावना दाखवण्यास सक्षम असतात का? तो अहवाल पुढे म्हणतो: “सस्तन प्राणी आपल्या पिलांचे संगोपन करताना त्यांचा सर्वात मोठा गुण—कोमलता दाखवण्याची प्रचंड क्षमता प्रदर्शित करतात.”
९. पशू-पक्ष्यांविषयी आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करू शकतो?
९ म्हणून, मानवांमध्ये व प्राण्यांमध्ये शांती असेल हे आपण बायबलमध्ये वाचतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटू नये. (यशया ११:६-९; ६५:२५ वाचा.) का नाही? जलप्रलयानंतर नोहा आणि त्याचे कुटुंब तारवातून बाहेर आले तेव्हा यहोवाने त्यांना जे सांगितले होते त्याची आठवण करा: “पृथ्वीवरील सर्व पशू, . . . यांना तुमचे भय व धाक राहील.” या भीतीमुळे प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करता येणार होते. (उत्प. ९:२, ३) यहोवाने सुरुवातीला जी आज्ञा दिली होती ती पूर्ण व्हावी म्हणून तो प्राण्यांमधील भीती काही प्रमाणात काढून टाकू शकत नाही का? (होशे. २:१८) पृथ्वीवर जगण्यासाठी जे सर्व लोक बचावतील ते भविष्यात खरोखर किती आनंददायक काळाचा उपभोग घेतील!
“तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील”
१०. मानवांच्या डोळ्यांतून अश्रू वाहणे सर्वसामान्य का आहे?
१० शलमोनाने “ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलुमांचे” निरीक्षण केले, तेव्हा त्याने दुःख व्यक्त करत असे म्हटले: “पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.” (उप. ४:१) आजही परिस्थिती तशीच आहे, किंवा त्याहूनही वाईट आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ज्याने अश्रू गाळले नाहीत असा आपल्यापैकी कोण आहे? हे खरे आहे, की कधीकधी ते अश्रू आनंदाचे असतात. पण, सहसा आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा या आपल्या हृदयातील वेदनांचे प्रतिबिंब असतात.
११. बायबलमधील कोणता वृत्तान्त खासकरून तुमच्या मनाला भिडला आहे?
११ बायबलमध्ये वाचायला मिळणाऱ्या अनेक हृदयस्पर्शी व भावुक दृश्यांची आठवण करा. सारा १२७ वर्षांची असताना मरण पावली तेव्हा “अब्राहाम तिजसाठी शोक व विलाप करण्यास आला.” (उत्प. २३:१, २) नामीने जेव्हा तिच्या दोन विधवा सुनांचा निरोप घेतला, तेव्हा “त्या हेल काढून रडू लागल्या,” आणि “मग पुनः त्या हेल काढून रडू लागल्या.” (रूथ १:९, १४) हिज्किया राजा जेव्हा आजारी पडला होता व त्याचा मृत्यू अटळ आहे असे त्याला वाटत होते तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली आणि तो “मनस्वी रडला.” यहोवाने त्याचे अश्रू पाहिले व त्याला बरे केले. (२ राजे २०:१-५) आणि ज्या वृत्तान्तात पेत्र येशूला नाकारतो तो वृत्तान्त वाचून आपल्यापैकी कोणाचे हृदय भरून येत नाही? पेत्राने कोंबड्याचे आरवणे ऐकले तेव्हा “तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.”—मत्त. २६:७५.
१२. देवाचे राज्य कशा प्रकारे मानवजातीची खऱ्या अर्थाने सुटका करेल?
१२ आपल्या जीवनात लहान-मोठ्या दुःखद घटना घडत असल्यामुळे आपल्याला सांत्वनाची व सुटकेची अत्यंत गरज आहे. देवाचे राज्य हजार वर्षांच्या शासनादरम्यान आपल्या प्रजेसाठी हेच तर करणार आहे! बायबल सांगते: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटी. २१:४) देवाने शोक, रडणे व कष्ट नाहीसे करण्याचे वचन दिले आहे; त्यासोबतच त्याने मानवजातीच्या शेवटल्या शत्रूला म्हणजे मृत्यूला नाहीसे करण्याचे वचन दिले आहे, ही खरोखरच अद्भुत गोष्ट नाही का? पण, हे सर्व कसे घडणार आहे?
“कबरेतील सर्व . . . बाहेर येतील”
१३. आदामाने पाप केले तेव्हापासून कशा प्रकारे मृत्यूने मानवांवर प्रभाव पाडला आहे?
१३ आदामाने पाप केले तेव्हापासून मृत्यूने एका राजाप्रमाणे मानवजातीवर राज्य केले आहे. मृत्यू हा आजपर्यंत मानवांचा अजेय शत्रू राहिला आहे. त्याच्या तावडीतून कोणीही पापपूर्ण मनुष्य सुटू शकलेला नाही, आणि त्यामुळे मानवांना मोठ्या प्रमाणात दुःख व वेदना भोगाव्या लागल्या आहेत. (रोम. ५:१२, १४) खरेतर, “मरणाच्या भयाने” लाखो लोक “आयुष्यभर दास्याच्या बंधनात” राहतात.—इब्री २:१५.
१४. मृत्यूला नाहीसे केले जाईल तेव्हा काय घडेल?
१४ “शेवटला शत्रू” म्हणजे मृत्यू “नाहीसा केला जाईल” त्या काळाविषयी बायबलमध्ये सांगितले आहे. (१ करिंथ. १५:२६) यामुळे ज्यांना फायदा होईल अशा दोन गटांचा उल्लेख करता येईल. आता जिवंत असलेल्या मोठ्या लोकसमुदायाला, जगाच्या नाशातून बचावून प्रतिज्ञा केलेल्या नवीन जगात जाणे शक्य होईल, जेथे ते सदासर्वकाळ जगतील. दुसरीकडे पाहता, ज्या कोट्यवधी लोकांवर याआधीच मृत्यूने झडप घातली आहे त्यांचे पुनरुत्थान केले जाईल. मोठ्या लोकसमुदायातील लोक पुनरुत्थान झालेल्या या कोट्यवधी लोकांचे स्वागत करतील तेव्हा किती आनंद व हर्ष अनुभवायला मिळेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? बायबलमध्ये असलेल्या पुनरुत्थानाच्या वृत्तान्तांचे जवळून परीक्षण केल्यास, पुनरुत्थान होईल तो काळ कसा असेल याची एक झलक आपल्याला मिळू शकते.—मार्क ५:३८-४२; लूक ७:११-१७ वाचा.
१५. तुमची एखादी प्रिय व्यक्ती पुन्हा जिवंत होईल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल?
१५ आताच वाचलेल्या वृत्तान्तांतील, ते “अत्यंत आश्चर्यचकित झाले,” तसेच ते “देवाला गौरवीत म्हणाले” या वाक्यांशांचा विचार करा. त्या पुनरुत्थानांच्या प्रसंगी तुम्ही तेथे उपस्थित असता, तर कदाचित तुम्हालाही असेच वाटले असते. खरेच, पुनरुत्थानाद्वारे आपल्या प्रिय जनांना पुन्हा जिवंत होताना पाहिल्यावर आपल्या मनात अद्भुत आनंद व हर्ष निर्माण होईल. येशूने म्हटले: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहा. ५:२८, २९) आपल्यापैकी कोणीही याआधी असे घडताना पाहिलेले नाही; ही नक्कीच अद्याप “अदृश्य” असलेल्या सर्वात अद्भुत घटनांपैकी एक असेल.
“देव सर्वांना सर्वकाही” होईल
१६. (क) अद्याप अदृश्य असलेल्या आशीर्वादांविषयी आपण मोठ्या उत्साहाने का बोलले पाहिजे? (ख) करिंथमधील ख्रिश्चनांना प्रोत्साहन देण्यासाठी पौलाने काय म्हटले?
१६ या कठीण दिवसांत जे लोक यहोवाला विश्वासू राहतील त्यांच्यासमोर किती उज्ज्वल भविष्य आहे! भविष्यात मिळणारे अद्भुत आशीर्वाद अद्यापही अदृश्य आहेत. असे असले, तरी आपण त्या आशीर्वादांवर मनन केल्यास, ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि सध्याच्या जगातील क्षणभंगुर गोष्टींमुळे विचलित होण्याचे टाळण्यास आपल्याला मदत मिळेल. (लूक २१:३४; १ तीम. ६:१७-१९) तर मग, कौटुंबिक उपासनेदरम्यान, सहविश्वासू बंधुभगिनींसोबत सहवास करताना, आणि आपल्या बायबल विद्यार्थ्यांसोबत व आस्थेवाईक लोकांसोबत चर्चा करताना आपल्याला असलेल्या अद्भुत व उज्ज्वल आशेविषयी आपण मोठ्या उत्साहाने बोलू या. असे केल्यास या गोष्टी आपल्या मनात व हृदयात पक्क्या बसतील. प्रेषित पौलाने त्याच्या सहविश्वासू बांधवांना याच प्रकारे प्रोत्साहन दिले. त्याने त्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी घडणाऱ्या घटनांविषयी विचार करण्यास मदत केली. १ करिंथकर १५:२४, २५, २८ (वाचा.) या वचनांत असलेल्या पौलाच्या शब्दांचा पूर्ण अर्थ काय होतो याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा.
१७, १८. (क) मानव इतिहासाच्या सुरुवातीला यहोवा कशा प्रकारे “सर्वांना सर्वकाही” होता? (ख) शांती व ऐक्य पुनःस्थापित करण्यासाठी येशू काय करेल?
१७ हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी जीवन कसे असेल हे सांगताना, “देव सर्वांना सर्वकाही” होईल असे पौलाने म्हटले. हे वर्णन अगदी योग्य आहे. पण, त्याचा काय अर्थ होतो? एदेन बागेतील त्या काळाचा विचार करा, जेव्हा आदाम व हव्वा परिपूर्ण होते व ते यहोवाच्या शांतिमय व ऐक्यात असलेल्या विश्वव्यापी कुटुंबाचा भाग होते. त्या वेळी या विश्वाचा सार्वभौम शासक यहोवा त्याच्या सर्व सृष्टीवर, म्हणजे देवदूतांवर व मानवांवर थेट शासन चालवायचा. ते वैयक्तिक रीत्या यहोवाशी संवाद साधू शकत होते, त्याची उपासना करू शकत होते, आणि त्याचे आशीर्वाद मिळवू शकत होते. तो “सर्वांना सर्वकाही” होता.
१८ सैतानाच्या प्रभावात येऊन मानवांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध बंड केले तेव्हा हे ऐक्य भंग झाले. असे असले, तरी हे ऐक्य पुनःस्थापित करण्यासाठी, मशीही राज्य १९१४ पासून प्रगतिशील पावले उचलत आहे. (इफिस. १:९, १०) हजार वर्षांच्या शासनादरम्यान, सध्या “अदृश्य” असलेल्या अद्भुत गोष्टी खऱ्या होतील. मग “शेवट” होईल, म्हणजे ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन संपुष्टात येईल. त्यानंतर काय घडेल? येशूला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” देण्यात आलेला असला, तरी तो महत्त्वाकांक्षी नाही. यहोवाचे स्थान बळकावण्याचा त्याचा मुळीच हेतू नाही. तो नम्रपणे “देवपित्याला राज्य सोपून देईल.” तो आपल्या खास पदाचा व अधिकाराचा “देवपित्याच्या गौरवासाठी” वापर करेल.—मत्त. २८:१८; फिलिप्पै. २:९-११.
१९, २०. (क) देवाच्या राज्याचे सर्व प्रजाजन यहोवाच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार करतात की नाही हे ते कशा प्रकारे दाखवू शकतात? (ख) आपल्यासमोर कोणती अद्भुत आशा आहे?
१९ तोपर्यंत, त्या राज्य शासनाखाली असणाऱ्या पृथ्वीवरील प्रजेला परिपूर्ण करण्यात आलेले असेल. ते येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतील आणि नम्रपणे व स्वेच्छेने यहोवाचे सार्वभौमत्व स्वीकारतील. असे करण्याची त्यांची मनस्वी इच्छा आहे हे ते शेवटल्या परीक्षेतून यशस्वी रीत्या बाहेर पडण्याद्वारे दाखवू शकतील. (प्रकटी. २०:७-१०) त्यानंतर, सर्व बंडखोरांना, ज्यांत मानवांचा व देवदूतांचा समावेश होतो, कायमचे नाश केले जाईल. तो किती आनंदाचा व उल्हासाचा काळ असेल! यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे सर्व सदस्य आनंदाने त्याची स्तुती करतील; आणि तो “सर्वांना सर्वकाही” असेल.—स्तोत्र ९९:१-३ वाचा.
२० देवाचे राज्य लवकरच ज्या अद्भुत गोष्टी घडवून आणणार आहे त्यांमुळे प्रेरित होऊन तुम्ही आपले लक्ष देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यावर केंद्रित कराल का व त्यासाठी मेहनत कराल का? सैतानाचे हे जग जी खोटी आशा व सांत्वन देते त्यामुळे विकर्षित होण्याचे तुम्हाला टाळता येईल का? यहोवाच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा देण्याचा व त्याचे समर्थन करण्याचा तुमचा निर्धार तुम्हाला आणखी दृढ करता येईल का? असे करण्याची तुमची मनस्वी इच्छा आहे हे तुमच्या कृतींवरून दिसू द्या. असे केल्यास, हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही, शांती व समृद्धी अनुभवण्याचा विशेषाधिकार तुम्हाला मिळेल!
[अभ्यासाचे प्रश्न]
[११ पानांवरील चित्रे]
राजा या नात्याने आपली नेमणूक पार पाडल्यावर, येशू नम्रपणे त्याच्या पित्याला राज्य सोपवेल