Privacy Settings

To provide you with the best possible experience, we use cookies and similar technologies. Some cookies are necessary to make our website work and cannot be refused. You can accept or decline the use of additional cookies, which we use only to improve your experience. None of this data will ever be sold or used for marketing. To learn more, read the Global Policy on Use of Cookies and Similar Technologies. You can customize your settings at any time by going to Privacy Settings.

व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“कॉलपोर्टरचं काम मला दिवसेंदिवस आणखी जास्त आवडू लागलं आहे”

“कॉलपोर्टरचं काम मला दिवसेंदिवस आणखी जास्त आवडू लागलं आहे”

आमच्या संग्रहातून

“कॉलपोर्टरचं काम मला दिवसेंदिवस आणखी जास्त आवडू लागलं आहे”

सन १८८६ मध्ये, मिलेनियल डॉन, खंड १ या पुस्तकाच्या शंभर प्रती अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया राज्यातील ॲलिगेनी शहरात असलेल्या बायबल हाउस येथून इलिनॉय राज्यातील शिकागो येथे पाठवण्यात आल्या. या पुस्तकाचे नवीन खंड तेथील पुस्तकांच्या दुकानांत वितरित करायची चार्ल्स टेझ रस्सल यांची इच्छा होती. धार्मिक पुस्तके वितरित करणाऱ्‍या अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीने, मिलेनियल डॉन वितरित करण्यास होकार दिला होता. पण पुस्तके पाठवल्याच्या दोन आठवड्यांनंतर, शंभरची शंभर पुस्तके बायबल हाउसला परत पाठवण्यात आली.

त्याचे झाले असे, की तेथील एक प्रसिद्ध धर्मप्रचारक त्याच्या पुस्तकांसोबत मिलेनियल डॉनचे खंड ठेवलेले पाहून अतिशय संतापला होता. तो रागाने वितरकाला म्हणाला, की जर ही पुस्तके अशीच प्रदर्शनासाठी राहिली, तर मी आणि माझे इतर लोकप्रिय धर्मप्रचारक मित्र, आमची पुस्तके दुसऱ्‍या वितरकाला देऊ. नाइलाजाने त्या वितरकाने मिलेनियल डॉनच्या प्रती परत पाठवल्या. या पुस्तकांविषयीची जाहिरात वर्तमानपत्रांत देण्यात आली होती. पण, त्या पुस्तकांचा विरोध करणाऱ्‍यांनी जाहिरातीचे करार रद्द करण्यासही वर्तमानपत्रांना भाग पाडले. तर मग, सत्य शोधणाऱ्‍या लोकांपर्यंत ही नवीन प्रकाशने कशी पोचणार होती?

याचे एकच उत्तर होते, कॉलपोर्टर्स. * १८८१ मध्ये झायन्स वॉच टॉवरने बायबल साहित्य पूर्ण-वेळ वितरित करतील अशा १,००० प्रचारकांची आवश्‍यकता आहे असे आवाहन केले होते. त्या वेळी, कॉलपोर्टर्सची संख्या तीनशेच्या आसपास असली, तरी त्यांनी सत्याचे बी छापील स्वरूपात व्यापक प्रमाणात पसरवले. १८९७ पर्यंत मिलेनियल डॉनच्या जवळजवळ १० लाख प्रती वितरित करण्यात आल्या होत्या; आणि या कार्यात कॉलपोर्टर्सचा मोठा वाटा होता. टेहळणी बुरूजच्या प्रत्येक वर्गणीच्या किंवा वितरित केलेल्या पुस्तकांच्या मोबदल्यात मिळणाऱ्‍या लहानशा अनुदानांवरच यांपैकी अनेक जणांचे गुजराण व्हायचे.

हे साहसी कॉलपोर्टर कोण होते? काहींनी किशोरवयात, तर इतरांनी उतारवयात कॉलपोर्टरचे कार्य सुरू केले होते. यांपैकी अनेक जण अविवाहित होते किंवा मुले नसलेली विवाहित दांपत्ये होती; पण, कित्येक कुटुंबेही या कार्यात सहभागी झाली. सामान्य कॉलपोर्टर सहसा दिवसभर, तर साहाय्यक कॉलपोर्टर दिवसातून एक किंवा दोन तास कार्य करायचे. प्रकृतीमुळे किंवा परिस्थितीमुळे सर्वच जण कॉलपोर्टर म्हणून कार्य करू शकत नव्हते. पण, जे या कार्यात भाग घेऊ शकत होते त्यांना, १९०६ मध्ये भरलेल्या एका अधिवेशनात सांगण्यात आले, की या कार्यासाठी त्यांनी “खूप शिकलेले, किंवा अतिशय प्रतिभाशाली, किंवा बोलण्यात निपुण असणे” गरजेचे नाही.

पृथ्वीवरील जवळजवळ सर्वच खंडांत सामान्य लोकांनी असामान्य कार्य केले. एका बांधवाने म्हटले, की त्याने सात वर्षांत अंदाजे १५,००० पुस्तके वितरित केली. तरीपण, त्याने म्हटले, की “मी पुस्तक विक्रेता होण्यासाठी नव्हे, तर यहोवाविषयी व सत्याविषयी साक्ष देण्यासाठी कॉलपोर्टरचं कार्य हाती घेतलं.” कॉलपोर्टर जेथे कोठे गेले तेथे सत्याचे बी मुळावले आणि बायबल विद्यार्थ्यांचे समूह झपाट्याने वाढू लागले.

कॉलपोर्टर्स हे केवळ फेरीवाले पुस्तक विक्रेते आहेत असे म्हणून चर्चचे पाळक त्यांची थट्टा करायचे. १८९२ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात असे म्हटले होते: “केवळ मोजकेच लोक त्यांना प्रभूचे खरे प्रतिनिधी म्हणून ओळखतात, किंवा त्या सन्मानाची कदर करतात जो प्रभू त्यांना त्यांच्या नम्रतेमुळे आणि स्वार्थत्यागामुळे देतो.” हो, कॉलपोर्टर्सपैकी एका बहिणीने म्हटले की हे कार्य वाटते तितके सोपे नव्हते. धडधाकट पाय आणि सायकली हेच कॉलपोर्टर्सच्या दळणवळणाचे प्रमुख साधन होते. पुस्तकांकरता ज्या लोकांकडे पैसे नसायचे त्यांना कॉलपोर्टर्स जेवणाच्या बदल्यात पुस्तके द्यायचे. दिवसभर क्षेत्रात काम करून थकलेले, भागलेले पण आनंदी प्रचारक आपापल्या तंबूंमध्ये किंवा भाड्याने घेतलेल्या खोल्यांकडे परत यायचे. काही काळानंतर, कॉलपोर्टर वॅगनचे आगमन झाले. ही घरासारखा उपयोग करता येण्याजोगी एक गाडी होती आणि त्यामुळे खूप वेळ व पैसा वाचायचा. *

१८९३ मध्ये शिकागोमध्ये एक अधिवेशन भरले होते. तेव्हापासून अधिवेशनांत कॉलपोर्टर्ससाठी खास सत्रे आयोजित केली जाऊ लागली. या सत्रांत अनुभव सांगितले जायचे, प्रचाराची विविध तंत्रे वापरण्याच्या पद्धती सुचवल्या जायच्या आणि व्यवहारोपयोगी सल्ला दिला जायचा. प्रचार कार्यात खूप परिश्रम घेणाऱ्‍यांना बंधू रस्सल यांनी एकदा आग्रह केला होता, भरपूर न्याहारी करा, दहाच्या सुमारास पेलाभर दूध प्या, आणि एखाद्या दिवशी बाहेर खूप गरमी असेल, तर आईस्क्रीम सोडा घ्या.

प्रचार कार्यासाठी जोडीदाराच्या शोधात असलेले कॉलपोर्टर्स अधिवेशनात पिवळी रिबिन लावायचे. नवीन कॉलपोर्टर जास्त अनुभवी कॉलपोर्टर्ससोबत कार्य करायचे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची नक्कीच गरज होती. कारण, एकदा एका नवीन कॉलपोर्टरने पुस्तकांविषयी एका स्त्रीला सांगताना घाबरून असे म्हटले होते: “तुम्हाला ही पुस्तकं नको ना?” आनंदाची गोष्ट म्हणजे, त्या स्त्रीने पुस्तके घेतली आणि नंतर आपली एक बहीण बनली.

एका बांधवाला असा प्रश्‍न पडला: ‘मी माझा सध्याचा फायद्याचा व्यवसाय करत राहून कॉलपोर्टर कार्याकरता दरवर्षी १,००० डॉलर (अमेरिकन) दान द्यावं, की स्वतः एक कॉलपोर्टर बनावं?’ त्यांना सांगण्यात आले, की यांपैकी काहीही केले तरी प्रभूला आवडेल, पण प्रभूच्या कामात स्वतःला वाहून घेतले तर जास्त आशीर्वाद मिळतील. मेरी हाइंड्‌स या बहिणीच्या मते कॉलपोर्टरचे कार्य “जास्तीत जास्त लोकांचे भले करण्याचा सर्वोत्तम मार्ग होय.” आणि लाजाळू ॲल्बर्टा क्रॉस्बीने असे म्हटले: “कॉलपोर्टरचं काम मला दिवसेंदिवस आणखी जास्त आवडू लागलं आहे.”

आज, अनेक आवेशी कॉलपोर्टर्सची मुले व नातवंडे, तसेच इतर बंधुभगिनी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आवेशाने पूर्ण-वेळच्या प्रचार कार्यात त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. तुम्हाला कॉलपोर्टर्सचा किंवा पायनियरांचा वारसा लाभला नसेल, तर तुम्ही स्वतःच आपल्या कुटुंबात याची सुरुवात करण्यास काय हरकत आहे? तुम्हालादेखील पूर्ण-वेळचे प्रचार कार्य दिवसेंदिवस आणखी जास्त आवडू लागेल.

[तळटीपा]

^ परि. 5 १९३१ नंतर, “कॉलपोर्टर” हे नाव बदलून “पायनियर” असे करण्यात आले.

^ परि. 8 कॉलपोर्टर वॅगनविषयी तपशीलवार माहिती पुढील एका अंकात येईल.

[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]

त्यांनी “खूप शिकलेले, किंवा अतिशय प्रतिभाशाली, किंवा बोलण्यात निपुण असणे” गरजेचे नाही

[३१ पानांवरील चित्र]

कॉलपोर्टर ए. डब्ल्यू. ओसे, घानामध्ये १९३० च्या सुमारास

[३२ पानांवरील चित्रे]

वर: कॉलपोर्टर्स एडिथ कीन आणि गरट्रूड मॉरिस, इंग्लंडमध्ये १९१८ च्या सुमारास; खाली: अमेरिकेत स्टॅन्ली कॉसाबूम आणि हेन्री नॉन्कीस, पुस्तके वितरित केल्यानंतर रिकामे खोके घेऊन