व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासघात शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!

विश्‍वासघात शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!

विश्‍वासघात शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!

“आम्ही पवित्रतेने [“एकनिष्ठेने,” NW], नीतीने व निर्दोषतेने . . . वागलो.”—१ थेस्सलनी. २:१०.

हे मुख्य मुद्दे शोधा:

दलीला, अबशालोम आणि यहूदा इस्कर्योत यांच्या विश्‍वासघाती कृत्यांवरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

योनाथान आणि पेत्र यांनी दाखवलेल्या एकनिष्ठेचे अनुकरण आपण कसे करू शकतो?

आपण कशा प्रकारे आपल्या विवाहसोबत्याला व यहोवाला कायम एकनिष्ठ राहू शकतो?

१-३. (क) शेवटल्या काळाचे एक चिन्ह कोणते आहे, आणि त्यात काय समाविष्ट आहे? (ख) आपण कोणत्या तीन प्रश्‍नांची उत्तरे पाहणार आहोत?

 दलीला, अबशालोम आणि यहूदा इस्कर्योत या तिघांमध्ये कोणती गोष्ट समान आहे? ते सर्व जण विश्‍वासघाती होते. दलीलाने तिच्यावर प्रेम करणाऱ्‍या शमशोन शास्त्याला दगा दिला. अबशालोमाने त्याच्या पित्याचा, दावीद राजाचा विश्‍वासघात केला. तर यहूदाने त्याच्या प्रभूचा, ख्रिस्त येशूचा विश्‍वासघात केला. या सर्वांची विश्‍वासघातकी कृत्ये इतरांकरता खूप कष्टदायक ठरली. पण, आपण या विषयावर चर्चा का करत आहोत?

विश्‍वासघात हा आजच्या काळात सर्वात जास्त आढळणाऱ्‍या दुर्गुणांपैकी एक असल्याचे आधुनिक काळातील एका लेखिकेने सांगितले. हे अपेक्षितच आहे. या जगाच्या अंताविषयीचे चिन्ह देताना येशूने असे म्हटले: “पुष्कळ जण . . . एकमेकांस धरून देतील.” (मत्त. २४:३, १०) येथे धरून देणे असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ “विश्‍वासघाताने किंवा बेइमानीने शत्रूच्या हवाली करणे” असा होतो. अशा बेइमानीच्या कृत्यांवरून ठळकपणे दिसून येते की आज आपण शेवटल्या काळात जगत आहोत. पौलाने म्हटले, की या काळात लोक “विश्‍वासघातकी” असतील. (२ तीम. ३:१, ४) कथा-कादंबऱ्‍यांमध्ये व चित्रपटांमध्ये विश्‍वासघातकी कृत्ये रोमांचक असल्याचे दाखवले जात असले, तरी वास्तविक जीवनात अशा कृत्यांमुळे इतरांना त्रास व दुःख सोसावे लागते. होय, अशी कृत्ये शेवटल्या काळाची चिन्हे आहेत.

इतरांचा विश्‍वासघात केलेल्यांची गतकाळातील काही उदाहरणे बायबलमध्ये आपल्याला सापडतात. आपण या उदाहरणांवरून काय शिकू शकतो? इतरांप्रती एकनिष्ठ राहिलेल्यांपैकी कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण आपण करू शकतो? आणि आपण कोणाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली पाहिजे? पाहू या.

गतकाळातील इशारेवजा उदाहरणे

४. दलीलाने कशा प्रकारे शमशोनाचा विश्‍वासघात केला, आणि ते कृत्य इतके निंदनीय का होते?

सर्वात प्रथम आपण दुष्ट दलीलाचे उदाहरण पाहू या, जिच्या प्रेमात शास्ता शमशोन पडला होता. पलिष्ट्यांविरुद्धच्या युद्धात देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याची शमशोनाची इच्छा होती. दलीला शमशोनावर खरोखर प्रेम करत नाही हे कदाचित पलिष्ट्यांच्या पाच सरदारांनी पाहिले असावे. त्यामुळे, शमशोनाच्या अफाट शक्‍तीचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तिला मोठी लाच देऊ केली. लोभी दलीलाने त्यांच्याकडून लाच घेतली, पण शमशोनाच्या शक्‍तीचे रहस्य जाणून घेण्याचे तिचे प्रयत्न तीनदा फसले. त्यानंतर ती त्याच्यावर रोज दडपण आणू लागली व त्याच्याजवळ हट्ट करू लागली. शेवटी, तिच्या “रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला.” म्हणून त्याने तिला सांगितले की त्याचे केस कधीच कापण्यात आलेले नाहीत; केस कापल्यास त्याची शक्‍ती नाहिशी होईल. * हे जाणून घेतल्यावर, दलीलाने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले व त्याचे केस कापवून घेतले आणि त्याला त्याच्या शत्रूंच्या हवाली केले. (शास्ते १६:४, ५, १५-२१) तिचे ते कृत्य किती निंदनीय होते! केवळ लोभापोटी तिने तिच्यावर प्रेम करणाऱ्‍या माणसाचा विश्‍वासघात केला.

५. (क) अबशालोमाने कशा प्रकारे दाविदाचा विश्‍वासघात केला, आणि यावरून त्याच्याबद्दल काय दिसून आले? (ख) अहिथोफेलाच्या विश्‍वासघाताबद्दल दाविदाला कसे वाटले?

आता आपण दगाबाज अबशालोमाचे उदाहरण पाहू या. महत्त्वाकांक्षेने पेटलेल्या अबशालोमाने त्याच्या वडिलाचे म्हणजे दावीद राजाचे राजासन बळकावण्याचा निश्‍चय केला. सर्वात आधी त्याने इस्राएल लोकांना खोटी आश्‍वासने देऊन, त्यांच्याबद्दल आपुलकी असल्याचे ढोंग करून, त्यांची खुशामत केली व त्यांची “मने हरण केली.” त्याला त्यांच्याबद्दल व त्यांच्या गरजांबद्दल खरोखर आस्था आहे असे दाखवण्यासाठी तो त्यांना मिठी मारायचा व त्यांचे चुंबन घ्यायचा. (२ शमु. १५:२-६) अबशालोमाने दाविदाचा भरवशालायक सल्लागार अहिथोफेल याचे मनही स्वतःकडे वळवले. अहिथोफेलाने दाविदाला दगा दिला आणि तोदेखील बंडाळीत सामील झाला. (२ शमु. १५:३१) या विश्‍वासघाताचा दाविदावर कसा प्रभाव पडला याचे वर्णन त्याने स्तोत्र ३ आणि ५५ मध्ये केले आहे. (स्तो. ३:१-८; स्तोत्र ५५:१२-१४ वाचा.) अबशालोमाने त्याच्या महत्त्वाकांक्षी कारस्थानाद्वारे आणि यहोवाने नियुक्‍त केलेल्या राजाविरुद्ध षडयंत्र रचण्याद्वारे देवाच्या सार्वभौमत्वाप्रती त्याला मुळीच आदर नसल्याचे दाखवले. (१ इति. २८:५) सरतेशेवटी अबशालोमाचा बंड फसला, आणि दावीद यहोवाचा अभिषिक्‍त या नात्याने राज्य करू लागला.

६. यहूदाने कशा प्रकारे येशूचा विश्‍वासघात केला, आणि यहूदा हे नाव कोणासाठी रूढ झाले?

आता दगाबाज यहूदा इस्कर्योताने ख्रिस्तासोबत काय केले याचा विचार करा. येशूने आपल्या १२ प्रेषितांसोबत त्याचा शेवटचा वल्हांडण साजरा केला त्या वेळी त्याने त्यांना असे सांगितले: “मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” (मत्त. २६:२१) नंतर त्याच रात्री गेथशेमाने बागेत येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना असे सांगितले: “पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” लगेच, कटात सामील असलेल्या इतरांसोबत यहूदा तेथे आला आणि त्याने “येशूजवळ येऊन, गुरुजी, सलाम, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.” (मत्त. २६:४६-५०; लूक २२:४७, ५२) यहूदाने एका निर्दोष जिवाचा विश्‍वासघात केला. त्याने येशूला शत्रूंच्या हाती दिले. आणि या लोभी यहूदाने ते कशासाठी केले? तर केवळ ३० चांदीच्या नाण्यांसाठी! (मत्त. २७:३-५) तेव्हापासून यहूदा हे नाव विश्‍वासघाती व्यक्‍तीसाठी, खासकरून जी मैत्रीचे सोंग घेऊन इतरांचा विश्‍वासघात करते अशा व्यक्‍तीसाठी रूढ झाले. *

७. (क) अबशालोम व यहूदा आणि (ख) दलीला यांच्या उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळाले?

या इशारेवजा उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळाले? अबशालोम व यहूदा या दोघांनीही यहोवाच्या अभिषिक्‍ताचा विश्‍वासघात केल्यामुळे त्यांचा लज्जास्पद रीत्या अंत झाला. (२ शमु. १८:९, १४-१७; प्रे. कृत्ये १:१८-२०) दलीला हिचे नाव विश्‍वासघात व खोटे प्रेम या गोष्टींसोबत कायमचे जोडले गेले आहे. (स्तो. ११९:१५८) आपणही जर एखाद्या महत्त्वाकांक्षेने पेटलेलो असू किंवा लोभ करण्याकडे आपला कल असेल, तर आपण अशा प्रवृत्तींचा प्रतिकार केला पाहिजे, कारण यामुळे आपण यहोवाची कृपापसंती गमावून बसू शकतो. बेइमानीसारख्या निंदनीय गुणाचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत या तिघांच्या उदाहरणांवरून खरोखरच आपण एक जोरदार धडा शिकतो.

एकनिष्ठ राहिलेल्यांचे अनुकरण करा

८, ९. (क) योनाथानाने दाविदाला एकनिष्ठेचे वचन का दिले? (ख) आपण योनाथानाचे अनुकरण कसे करू शकतो?

बायबलमध्ये, एकनिष्ठ राहिलेल्यांचीही बरीच उदाहरणे आढळतात. त्यांपैकी दोन उदाहरणे आपण पाहू या आणि त्यांपासून आपण काय शिकू शकतो हेही पाहू या. सर्वात आधी आपण दाविदाप्रती एकनिष्ठ राहिलेल्या एका मनुष्याविषयी पाहू या. तो मनुष्य होता योनाथान; शौल राजाचा ज्येष्ठ पुत्र. शौलानंतर कदाचित योनाथानच राजा बनला असता. पण, यहोवाने मात्र इस्राएलचा पुढचा राजा होण्यासाठी दाविदाला निवडले होते. योनाथानाने देवाच्या या निर्णयाप्रती आदर दाखवला. त्याने दाविदाला आपला शत्रू मानले नाही किंवा त्याच्याविषयी ईर्ष्या केली नाही. उलट, त्याचे “मन दाविदाच्या मनाशी . . . जडले” आणि त्याने दाविदाला एकनिष्ठेचे वचन दिले. त्याने दाविदाला आपली राजसी वस्त्रे, तलवार, धनुष्य व आपला कमरबंद देऊन त्याचा सन्मान केला. (१ शमु. १८:१-४) योनाथानाने दाविदाच्या “हाताला . . . बळकटी” देण्यासाठी जमेल ते सर्व केले. इतकेच काय, तर शौलापुढे दाविदाचे समर्थन करण्यासाठी त्याने स्वतःचा जीवही धोक्यात घातला. योनाथानाने दाविदाला “तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार,” असे म्हणून त्याच्याप्रती एकनिष्ठा दाखवली. (१ शमु. २०:३०-३४; २३:१६, १७) त्यामुळे, योनाथानाच्या मृत्यूनंतर दाविदाने आपले दुःख व प्रेम व्यक्‍त करण्यासाठी एक विलापगीत लिहिले हे समजण्याजोगे आहे.—२ शमु. १:१७, २६.

कोणाला एकनिष्ठ राहावे याविषयी योनाथानाच्या मनात काहीच शंका नव्हती. तो या विश्‍वाच्या अधिपतीच्या म्हणजे यहोवाच्या पूर्णपणे अधीन होता आणि त्याने देवाचा अभिषिक्‍त असलेल्या दाविदाला आपला पूर्ण पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे आजदेखील, मंडळीत जरी आपल्याला एखादा विशेषाधिकार मिळाला नसला, तरीदेखील मंडळीमध्ये पुढाकार घेण्यासाठी ज्या बांधवांना नियुक्‍त करण्यात आले आहे त्यांना आपण पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.—१ थेस्सलनी. ५:१२, १३; इब्री १३:१७, २४.

१०, ११. (क) पेत्र येशूला एकनिष्ठेने का जडून राहिला? (ख) आपण कशा प्रकारे पेत्राचे अनुकरण करू शकतो, आणि यामुळे आपल्याला कोणती प्रेरणा मिळाली पाहिजे?

१० एकनिष्ठेच्या बाबतीत आणखी एक चांगले उदाहरण आहे पेत्राचे. त्याने येशूला एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले होते. येशू लवकरच आपले रक्‍त व शरीर बलिदानाच्या रूपात अर्पण करणार होता. त्याच्या या बलिदानावर विश्‍वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर देण्यासाठी त्याने त्याबद्दल दृष्टान्त रूपात सांगितले. येशूचे शब्द ऐकून त्याच्या शिष्यांपैकी अनेकांना धक्का बसला आणि ते त्याला सोडून गेले. (योहा. ६:५३-६०, ६६) तेव्हा येशू आपल्या १२ प्रेषितांकडे वळून म्हणाला: “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” तेव्हा पेत्राने त्याला उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आणि आम्ही विश्‍वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.” (योहा. ६:६७-६९) याचा अर्थ, येशू देणार असलेल्या बलिदानाबद्दल त्याने नुकतेच जे म्हटले होते ते पेत्राला पूर्णपणे समजले होते का? कदाचित नाही. तरीसुद्धा, देवाच्या अभिषिक्‍त पुत्राला एकनिष्ठ राहण्याचा पेत्राचा निर्णय ठाम होता.

११ पेत्राने असा तर्क केला नाही, की येशूचे नक्कीच कोठेतरी चुकत आहे, आणि त्याला वेळ दिल्यास तो आपले शब्द परत घेईल. उलट, पेत्राने नम्रपणे हे मान्य केले, की “सार्वकालिक जीवनाची वचने” येशूजवळच आहेत. त्याचप्रमाणे आज, “विश्‍वासू” कारभाऱ्‍याकडून येणाऱ्‍या आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांतील एखाद्या मुद्द्‌याचा अर्थ आपल्याला समजत नाही किंवा तो मुद्दा आपल्या विचारसरणीत बसत नाही तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? आपल्या दृष्टिकोनानुसार त्या मुद्द्‌यात बदल केला जाईल अशी अपेक्षा करण्याऐवजी आपण त्याचा अर्थ समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे.लूक १२:४२ वाचा.

तुमच्या विवाहसोबत्याला एकनिष्ठ राहा

१२, १३. वैवाहिक जीवनात विश्‍वासघाताचा कशा प्रकारे शिरकाव होऊ शकतो, आणि वयाचे कारण सांगून अशा प्रकारच्या आचरणाला योग्य का ठरवता येत नाही?

१२ विश्‍वासघात कोणत्याही प्रकारचा असला, तरी ते एक निंदनीय कृत्य आहे. अशा कृत्यामुळे ख्रिस्ती कुटुंबातील किंवा मंडळीतील शांती व एकता भंग होऊ नये म्हणून आपण जपले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवून, आता आपण पाहू या, की कशा प्रकारे आपण आपल्या विवाहसोबत्याप्रती व देवाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवून शकतो.

१३ विवाहबाह्‍य संबंध ठेवणे हा एक अतिशय भयंकर स्वरूपाचा विश्‍वासघात आहे. यामध्ये एक व्यक्‍ती आपल्या विवाहसाथीदाराला प्रामाणिक न राहता दुसऱ्‍या व्यक्‍तीवर लक्ष केंद्रित करते. यामुळे निर्दोष विवाहसोबत्याला अचानक वाऱ्‍यावर सोडले जाते; त्याचे जीवनच उद्‌ध्वस्त होते. पूर्वी एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या दोन जणांमध्ये असे का घडते? सहसा, विवाहसोबती जेव्हा भावनिक रीत्या एकमेकांपासून दुरावतात तेव्हा याची सुरुवात होते. समाजशास्त्राच्या प्राध्यापिका गॅब्रीएला टूर्नाटूरी सांगतात, की जेव्हा विवाहसोबती आपले वैवाहिक बंधन मजबूत करण्याकडे दुर्लक्ष करू लागतात तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात विश्‍वासघाताचा शिरकाव होतो. काही वयस्कर व्यक्‍तींच्या बाबतीतही असे घडले आहे. उदाहरणार्थ, एका ५० वर्षीय गृहस्थाने ज्याच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत, दुसऱ्‍या एका स्त्रीकडे आकर्षित होऊन आपल्या विश्‍वासू पत्नीला घटस्फोट दिला. काही जण कदाचित म्हणतील, की या वयात असे घडते. पण, वयाचे कारण सांगून अशा प्रकारच्या आचरणाला योग्य ठरवता येत नाही. हा विश्‍वासघातच आहे. *

१४. (क) वैवाहिक जीवनातील विश्‍वासघाताविषयी यहोवाला कसे वाटते? (ख) विवाहसोबत्याचा विश्‍वासघात करण्याविषयी येशूने काय म्हटले?

१४ जे लोक बायबलमध्ये सांगितलेल्या कारणाशिवाय आपल्या विवाहसोबत्याला सोडतात अशांबद्दल यहोवाला कसे वाटते? आपल्या देवाला “सूटपत्राचा तिटकारा आहे” आणि जे विवाहसोबत्याशी दुर्व्यवहार करून त्याचा त्याग करतात अशांचा त्याने जोरदार शब्दांत धिक्कार केला आहे. (मलाखी २:१३-१६ वाचा.) विश्‍वासघाताबद्दल येशूलादेखील यहोवासारखेच वाटते. येशूने शिकवले की एक व्यक्‍ती आपल्या निर्दोष विवाहसोबत्याला सोडून देऊन, जणू काही घडलेच नाही असे वागू शकत नाही.—मत्तय १९:३-६,  वाचा.

१५. विवाहसोबती कशा प्रकारे एकमेकांप्रती आपली एकनिष्ठा आणखी मजबूत करू शकतात?

१५ तर मग, विवाहसोबती एकमेकांना एकनिष्ठ कसे राहू शकतात? देवाचे वचन म्हणते: “तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या [किंवा नवऱ्‍याच्या] ठायी हर्षित ऐस,” आणि “तुझी बायको [किंवा नवरा] जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव.” (नीति. ५:१८; उप. ९:९, पं.र.भा.) जसजसे पती-पत्नीचे वय वाढत जाते तसतसा दोघांनीही आपला नातेसंबंध शारीरिक रीत्या व भावनिक रीत्या आणखी मजबूत करण्याचा प्रयास केला पाहिजे. याचा अर्थ, त्यांनी एकमेकांकडे लक्ष दिले पाहिजे, एकमेकांच्या सहवासात वेळ घालवला पाहिजे आणि एकमेकांच्या आणखी जवळ आले पाहिजे. त्यांनी आपला विवाह आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी विवाहित दांपत्यांनी एकत्र मिळून बायबलचा अभ्यास केला पाहिजे, नियमितपणे एकत्र मिळून सेवेत गेले पाहिजे आणि यहोवाच्या आशीर्वादांसाठी एकत्र मिळून प्रार्थना केली पाहिजे.

यहोवाला एकनिष्ठ राहा

१६, १७. (क) कुटुंबात व मंडळीत देवाप्रती आपल्या एकनिष्ठेची परीक्षा कशी होऊ शकते? (ख) बहिष्कृत नातेवाइकांसोबत सहवास न करण्याच्या यहोवाच्या आज्ञेचे पालन केल्याने चांगले परिणाम मिळू शकतात हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१६ मंडळीतील काहींनी गंभीर पापे केली आहेत आणि त्यांनी “विश्‍वासात खंबीर व्हावे” म्हणून त्यांना “कडकपणे” ताडन देण्यात आले आहे. (तीत १:१३, १४) काही जणांच्या बाबतीत पाहिल्यास, त्यांच्या आचरणामुळे त्यांना मंडळीतून बहिष्कृत करावे लागले. अशा प्रकारच्या ताडनामुळे ज्यांना चांगले “वळण लागले” त्यांना आपले आध्यात्मिक आरोग्य परत मिळवण्यास मदत मिळाली आहे. (इब्री १२:११) आपल्या एखाद्या नातेवाइकाला किंवा जवळच्या मित्राला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले असेल, तर काय? अशा वेळी आपण त्या व्यक्‍तीला एकनिष्ठ राहू, की देवाला, याची परीक्षा होऊ शकते. बहिष्कृत केलेल्या कोणत्याही व्यक्‍तीसोबत आपण संबंध ठेवू नये अशी आज्ञा यहोवाने दिली आहे. आपण या आज्ञेचे पालन करणार की नाही हे यहोवा पाहत असतो.—१ करिंथकर ५:११-१३ वाचा.

१७ बहिष्कृत केलेल्या व्यक्‍तीशी सहवास न करण्याच्या यहोवाने दिलेल्या आज्ञेचे कुटुंबातील सदस्य एकनिष्ठेने पालन करतात तेव्हा जे फायदे मिळतात त्याचे केवळ एक उदाहरण पाहा. एका तरुणाला मंडळीतून बहिष्कृत करून दहापेक्षा जास्त वर्षे झाली होती. त्या सबंध काळादरम्यान, त्याच्या आईवडिलांनी आणि चार भावांनी त्याची “संगत” धरली नाही. त्या तरुणाने आपल्या कुटुंबाला भेटण्या-बोलण्याचा काही वेळा प्रयत्नही केला, पण कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याच्याशी कोणताही संबंध न ठेवण्याविषयी ठाम होते. ते देवाला एकनिष्ठ राहिले. त्याला मंडळीत परत घेण्यात आल्यावर, त्याने म्हटले की त्याला नेहमीच कुटुंबासोबत सहवास करावासा वाटायचा, खासकरून तो रात्री एकटा असायचा तेव्हा. पण, त्याने हे मान्य केले, की जर त्याच्या कुटुंबाने थोड्या वेळासाठीही त्याच्यासोबत सहवास ठेवला असता, तर तेवढ्यानेही त्याचे समाधान झाले असते. पण, त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याच्याशी जरादेखील संपर्क न ठेवल्यामुळे त्यांच्या सहवासाची त्याला अतिशय ओढ वाटू लागली. आणि यहोवासोबत त्याचा नातेसंबंध पुन्हा स्थापित करण्याची त्याला प्रेरणा मिळण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. बहिष्कृत नातेवाइकांसोबत सहवास न करण्याच्या यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा तुम्हाला मोह होतो, तेव्हा या उदाहरणाचा विचार करा.

१८. एकनिष्ठ राहिल्यामुळे मिळणाऱ्‍या फायद्यांचे व विश्‍वासघात केल्यामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांचे परीक्षण केल्यावर, तुम्ही काय करण्याचा दृढ निश्‍चय केला आहे?

१८ आपण एका विश्‍वासघातकी, बेइमान जगात राहतो. पण, ख्रिस्ती मंडळीत आपल्याला एकनिष्ठ व्यक्‍तींची अनेक उदाहरणे सापडतात ज्यांचे अनुकरण आपण करू शकतो. त्यांच्या जीवनक्रमाद्वारे जणू ते असे म्हणत असतात: “आम्ही एकनिष्ठेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्‍याविषयी तुम्ही साक्षी आहा, व देवही आहे.” (१ थेस्सलनी. २:१०) तर मग, आपणही सर्व जण देवाला व एकमेकांना नेहमी एकनिष्ठ राहू या.

[तळटीपा]

^ परि. 4 खरेतर, शमशोनाची शक्‍ती त्याच्या केसांमध्ये नव्हती. तर नाजीर म्हणून शमशोनाचा यहोवासोबत जो खास नातेसंबंध होता तो त्याच्या शक्‍तीचा स्रोत होता. त्याचे केस त्याच्या या नातेसंबंधाचे प्रतीक होते.

^ परि. 6 काही भाषांमध्ये, “यहूदाचे चुंबन” हा वाक्यांश प्रचलित आहे, ज्याचा अर्थ आहे “विश्‍वासघातकी कृत्य.”

^ परि. 13 विवाहसोबत्याने विश्‍वासघात केल्यास त्यातून सावरण्यासाठी काय केले पाहिजे याविषयीच्या जास्त माहितीसाठी, १५ जून २०१० च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठे २९-३२ वर असलेला “विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा . . .” या शीर्षकाचा लेख पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

इतर जण देवाच्या अभिषिक्‍त पुत्राला सोडून गेले तरीही पेत्र त्याला एकनिष्ठ राहिला