“मागील गोष्टींकडे” पाहत राहू नका
“मागील गोष्टींकडे” पाहत राहू नका
“जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”—लूक ९:६२, पं.र.भा.
तुमचे उत्तर काय असेल?
आपण “लोटाच्या बायकोची आठवण” का केली पाहिजे?
आपण कोणत्या तीन गोष्टींवर सतत विचार करण्याचे टाळले पाहिजे?
आपण कशा प्रकारे यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने वाटचाल करतो?
१. येशूने कोणती ताकीद दिली होती, आणि कोणता प्रश्न निर्माण होतो?
“लोटाच्या बायकोची आठवण करा.” (लूक १७:३२) येशू ख्रिस्ताने सुमारे २,००० वर्षांपूर्वी दिलेली ही ताकीद पूर्वी कधी नव्हे इतकी आज महत्त्वाची आहे. पण, येशूने ही गंभीर ताकीद दिली तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? येशूचे श्रोते यहुदी होते, त्यामुळे त्यांना त्याविषयी जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. लोटाच्या बायकोचे काय झाले होते ते त्यांना माहीत होते. आपल्या कुटुंबासोबत सदोम नगरातून पळून जाताना तिने देवाची आज्ञा मोडून मागे वळून पाहिले आणि ती मिठाचा खांब बनली.—उत्पत्ति १९:१७, २६ वाचा.
२. लोटाच्या बायकोने मागे वळून का पाहिले असावे, आणि तिच्या अवज्ञाकारी कृत्यामुळे तिचे काय झाले?
२ पण लोटाच्या बायकोने मागे वळून का पाहिले? जे काही घडत होते ते पाहण्यास ती उत्सुक होती का? शहराचा नाश होत आहे यावर तिचा विश्वास नसल्यामुळे तिने मागे वळून पाहिले असावे का? कदाचित तिचा विश्वास कमजोर झाला असावा. किंवा मग, सदोममध्ये तिने ज्या सर्व गोष्टी मागे सोडल्या होत्या त्यांच्या अनावर ओढीमुळे तिने मागे वळून पाहिले असावे. (लूक १७:३१) कारण कोणतेही असो, तिच्या त्या अवज्ञाकारी कृत्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लावले. जरा विचार करा! सदोम आणि गमोराच्या नीच रहिवाशांचा ज्या दिवशी नाश झाला त्याच दिवशी तीदेखील मरण पावली. म्हणून येशूने, “लोटाच्या बायकोची आठवण करा,” असे जे म्हटले त्याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये.
३. लाक्षणिक अर्थाने आपण मागे वळून पाहू नये या गोष्टीवर येशूने कशा प्रकारे भर दिला?
३ आज आपणसुद्धा अशा एका काळात जगत आहोत जेव्हा आपण लाक्षणिक अर्थाने मागे वळून न पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मुद्द्यावर येशूने कशा प्रकारे भर दिला त्याकडे लक्ष द्या. येशूचा शिष्य बनण्याआधी घरच्यांचा निरोप घेऊ इच्छिणाऱ्या एका मनुष्याला येशूने म्हटले: “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.” (लूक ९:६२) अशा प्रकारे उत्तर देऊन येशू कठोरपणे किंवा असंमजसपणे वागत होता का? नाही, कारण येशूला माहीत होते, की तो मनुष्य जबाबदारीतून अंग चोरण्यासाठी निव्वळ एक कारण सांगत होता. येशूने, टाळाटाळ करण्याच्या या वृत्तीला “मागील गोष्टींकडे” पाहणे असे म्हटले. शेत नांगरणाऱ्या व्यक्तीने जर क्षणभर मागे वळून पाहिले किंवा हातातले नांगर खाली टाकून मागे वळून पाहिले तर काही फरक पडतो का? त्या व्यक्तीने असे काहीही केले तर तिचे तिच्या कामावरून लक्ष विचलित होऊन याचा तिच्या कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
४. आपण आपले लक्ष कशावर केंद्रित केले पाहिजे?
४ आपण आपले लक्ष गतकाळातील गोष्टींवर केंद्रित करण्याऐवजी भविष्यातील गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे. ही गोष्ट नीतिसूत्रे ४:२५ मध्ये कशा प्रकारे स्पष्टपणे सांगण्यात आली आहे त्याकडे लक्ष द्या. तेथे म्हटले आहे: “तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.”
५. मागील गोष्टींकडे न पाहण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे?
५ मागे वळून न पाहण्याचे एक सबळ कारण आपल्याजवळ आहे. ते कोणते? सध्याचा काळ हा ‘शेवटला काळ’ आहे. (२ तीम. ३:१) हा असा काळ आहे, जेव्हा केवळ दोन दुष्ट शहरांचाच नव्हे, तर संपूर्ण दुष्ट जगाचा समूळ नाश होणार आहे. लोटाच्या बायकोच्या बाबतीत जे घडले तसे आपल्या बाबतीत घडू नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? सर्वात प्रथम, आपण गतकाळातील अशा काही गोष्टी ओळखल्या पाहिजेत ज्यांकडे मागे वळून पाहण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. (२ करिंथ. २:११) त्या कोणत्या गोष्टी आहेत व त्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे आपण कसे टाळू शकतो याची आता आपण चर्चा करू या.
जुने दिवस चांगले होते
६. काही वेळा आपण गतकाळातील गोष्टींविषयी कोणता चुकीचा दृष्टिकोन बाळगू शकतो?
६ आपण कदाचित, जुने दिवस चांगले होते असा चुकीचा दृष्टिकोन बाळगू शकतो. गतकाळातील समस्यांना आपण कदाचित नकळतपणे क्षुल्लक लेखू आणि त्याच वेळी आपण पूर्वी अनुभवलेल्या आनंदाच्या गोष्टी नको तितक्या फुगवून सांगू, जणू त्या काळी परिस्थिती खरोखरच खूप चांगली होती. पूर्वीच्या दिवसांबद्दल असा विकृत दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपल्याला त्या जुन्या दिवसांची ओढ लागू शकते. पण बायबल आपल्याला असा इशारा देते: “पूर्वीचे दिवस आतापेक्षा का बरे होते, असे विचारू नकोस कारण तुझी ही विचारपूस शहाणपणाची नाही.” (उप. ७:१०, मराठी कॉमन लँग्वेज) अशा प्रकारची विचारसरणी इतकी घातक का आहे?
७-९. (क) मिसर देशात इस्राएल लोकांच्या बाबतीत काय घडले? (ख) इस्राएल लोकांजवळ आनंद करण्याची कोणती कारणे होती? (ग) इस्राएल लोक कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार व कुरकूर करू लागले?
७ मोशेच्या काळात इस्राएल लोकांच्या बाबतीत काय घडले ते विचारात घ्या. सुरुवातीला मिसर देशात इस्राएल लोकांचे पाहुणे म्हणून स्वागत करण्यात आले होते. पण, योसेफाच्या मृत्यूनंतर मात्र मिसरी लोकांनी “त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांस जेरीस आणावे, या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले.” (निर्ग. १:११) सरतेशेवटी, फारोने इस्राएल लोकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाच्या लोकांचा एक प्रकारे जातिसंहारच झाला. (निर्ग. १:१५, १६, २२) म्हणूनच, यहोवाने मोशेला जे म्हटले त्याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. त्याने म्हटले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे.”—निर्ग. ३:७.
८ इस्राएल लोकांची मिसरच्या गुलामगिरीतून सुटका झाली व स्वतंत्र लोक या नात्याने ते मिसर देशातून बाहेर पडले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? यहोवाने गर्विष्ठ फारोवर व त्याच्या लोकांवर दहा पीडा आणल्या तेव्हा इस्राएल लोकांना एका अद्भुत मार्गाने यहोवाच्या शक्तीचा प्रत्यय आला होता. (निर्गम ६:१, ६, ७ वाचा.) खरेतर, मिसरी लोकांनी इस्राएलांना शेवटी मुक्तच केले नाही, तर मिसर देशातून निघून जाण्याचा तगादाही त्यांच्यामागे लावला. तसेच, मिसरी लोकांनी त्यांना सोन्याचांदीचे इतके दागिने दिले की देवाच्या लोकांनी “मिसरी लोकांना लुटिले” असे बायबल म्हणते. (निर्ग. १२:३३-३६) इस्राएल लोकांनी फारोचा व त्याच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश होताना पाहिला तेव्हा त्यांना आणखीनच आनंद झाला. (निर्ग. १४:३०, ३१) अशा रोमांचकारी घटना प्रत्यक्ष पाहून नक्कीच त्यांचा विश्वास आणखी दृढ व्हायला हवा होता.
९ पण, आपला विश्वास बसणार नाही, की इस्राएल लोकांची चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यानंतर काही काळातच ते तक्रार व कुरकूर करू लागले. कशाबद्दल? तर अन्नाबद्दल! यहोवा त्यांना जे काही पुरवत होता त्याबद्दल ते असंतुष्ट झाले आणि त्यांनी अशी तक्रार केली: “मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीहि आम्हाला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.” (गण. ११:५, ६) होय, त्यांचा दृष्टिकोन विकृत झाला होता, इतका की ते गुलामगिरीच्या देशात परत जाऊ इच्छित होते! (गण. १४:२-४) अशा प्रकारे, इस्राएल लोकांनी मागील गोष्टींकडे पाहिले आणि यहोवाची कृपापसंती गमावली.—गण. ११:१०.
१०. इस्राएल लोकांच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकतो?
१० इस्राएल लोकांच्या उदाहरणावरून आज आपण कोणता धडा शिकतो? हाच की, आपल्यासमोर अडचणी व समस्या येतात तेव्हा आपल्याला सकारात्मक वाटणाऱ्या गतकाळातील गोष्टींवर—कदाचित सत्यात येण्यापूर्वी अनुभवलेल्या गोष्टींवर आपण आपले लक्ष केंद्रित करू नये. गतकाळातील अनुभवांवरून आपण जे धडे शिकलो त्यांवर मनन करणे किंवा गतकाळातील गोड आठवणींमध्ये रमणे चुकीचे नसले, तरी गतकाळाबद्दल आपण संतुलित व वास्तविक दृष्टिकोन राखला पाहिजे. नाहीतर, आपल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण अधिकच असमाधानी होऊन, पूर्वीच्या जीवनशैलीकडे वळण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो.—२ पेत्र २:२०-२२ वाचा.
गतकाळातील त्याग
११. काहींनी गतकाळात जे त्याग केले त्यांबद्दल त्यांचा काय दृष्टिकोन आहे?
११ दुःखाची गोष्ट म्हणजे, काही जण गतकाळात केलेल्या त्यागांकडे मागे वळून पाहतात आणि आयुष्यात आपण चांगल्या संधी गमावल्या असा विचार करतात. तुम्हाला कदाचित उच्च शिक्षण घेण्याच्या, मानप्रतिष्ठा मिळवण्याच्या किंवा जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या अनेक संधी मिळाल्या असतील, पण तुम्ही त्यांचा पाठपुरावा न करण्याचे ठरवले. आपल्या अनेक बंधुभगिनींनी व्यवसायाच्या, मनोरंजनाच्या, शिक्षणाच्या किंवा खेळक्रीडेच्या क्षेत्रातील मोठमोठे हुद्दे सोडून दिले आहेत. त्यानंतर आता बराच काळ लोटला आहे, आणि अंत अजूनही आलेला नाही. तर मग, तुम्ही पूर्वी जे त्याग केले ते जर केले नसते, तर आज तुम्ही कोठे असता याचे स्वप्नरंजन तुम्ही करता का?
१२. पौलाने ज्या गोष्टी मागे सोडून दिल्या होत्या त्यांबद्दल त्याला कसे वाटले?
१२ प्रेषित पौलाने ख्रिस्ताचा अनुयायी बनण्यासाठी जीवनात बरेच त्याग केले. (फिलिप्पै. ३:४-६) त्याने ज्या गोष्टी मागे सोडून दिल्या त्यांबद्दल त्याला कसे वाटले? तो म्हणतो: “ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.” ते का? तो पुढे म्हणतो: “इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” * (फिलिप्पै. ३:७, ८) ज्याप्रमाणे एक व्यक्ती केरकचरा टाकून दिल्यानंतर त्याबद्दल दुःख करत बसत नाही, त्याचप्रमाणे जगात यशस्वी होण्याच्या ज्या अनेक संधी पौलाला मिळाल्या होत्या त्यांकडे पाठ फिरवल्याचा त्याला कधीच पस्तावा झाला नाही. त्या आपल्या फायद्याच्या होत्या असे त्याला कधीच वाटले नाही.
१३, १४. आपण पौलाने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?
१३ आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या ज्या अनेक संधी आपण गमावल्या त्यांचा आपण विचार करू लागलो आहोत असे जर आपल्याला वाटत असेल, तर कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? पौलाने जे उदाहरण मांडले त्याचे अनुकरण करा. ते कसे? सध्या तुमच्याजवळ जे आहे ते किती मौल्यवान आहे त्याचा विचार करा. यहोवासोबत तुम्ही एक मौल्यवान नातेसंबंध जोडला आहे व त्याला विश्वासू राहण्याच्या बाबतीत तुम्ही त्याच्या नजरेत चांगले नाव कमावले आहे. (इब्री ६:१०) सैतानाचे जग आपल्याला जी भौतिक सुखे देऊ करते ती सुखे आपण सध्या अनुभवत असलेल्या व भविष्यात अनुभवणार असलेल्या आध्यात्मिक आशीर्वादांच्या जवळही पोचत नाही.—मार्क १०:२८-३० वाचा.
१४ पौल पुढे अशा एका गोष्टीचा उल्लेख करतो ज्यामुळे विश्वासूपणे चालत राहण्यास आपल्याला मदत मिळेल. तो म्हणतो, की “जे झाले ते विसरून जे पुढे आहे त्याच्याकडे” तो ‘धाव घेत आहे.’ (फिलिप्पै. ३:१३ मराठी कॉमन लँग्वेज) या ठिकाणी, पौल आपल्याला दोन पावले उचलण्यास सांगतो आणि ही दोन्ही पावले उचलणे महत्त्वाचे आहे. पहिले, आपण ज्या गोष्टी मागे सोडून दिल्या आहेत त्या आपण विसरल्या पाहिजेत; दुसऱ्या शब्दांत, त्या गोष्टींविषयी अवाजवी चिंता करण्यात आपण आपली मौल्यवान शक्ती व वेळ वाया घालवू नये. दुसरे, अंतिम रेषेच्या अगदी जवळ असलेल्या धावपटूप्रमाणे आपणही समोर जे आहे त्याकडे धाव घेतली पाहिजे, म्हणजे त्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.
१५. देवाच्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांवर आपण मनन करतो तेव्हा आपल्याला कोणता फायदा होतो?
१५ आपण गतकाळातील अथवा आधुनिक काळातील देवाच्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांवर मनन करतो तेव्हा मागील गोष्टींकडे पाहण्याऐवजी पुढे वाटचाल करत राहण्याची आपल्याला आणखी प्रेरणा मिळू शकते. उदाहरणार्थ, अब्राहाम व सारा सतत ऊर देशातील आठवणी काढत बसले असते, तर ते तेथे गेले असते कारण त्या देशात “त्यांना परत जाण्याची संधि होती.” (इब्री ११:१३-१५) पण ते तेथे गेले नाही. मोशेने सुरुवातीला मिसर देशातील ज्या अनेक गोष्टींचा त्याग केला तितका त्याग नंतरच्या काळातील कोणत्याही इस्राएली व्यक्तीने केला नाही. असे असले, तरी मागे सोडून दिलेल्या गोष्टींची त्याला ओढ लागली असे बायबलमध्ये कोठेही सांगितलेले नाही. उलट, बायबल आपल्याला असे सांगते, की “ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.”—इब्री ११:२६.
गतकाळातील वाईट अनुभव
१६. गतकाळातील अनुभवांचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?
१६ गतकाळातील सगळेच अनुभव आपल्याला चांगले वाटणार नाहीत. पूर्वी केलेल्या पापांचा किंवा चुकांचा विचार करून आपण कदाचित खूप अस्वस्थ होत असू. (स्तो. ५१:३) आपल्याला पूर्वी कधीतरी दिलेला कडक सल्ला अजूनही आपल्या मनाला झोंबत असेल. (इब्री १२:११) अन्याय—मग तो खरोखरचा असो अथवा कल्पित—आपल्या मनात घर करू शकतो. (स्तो. ५५:२) अशा अनुभवांमुळे आपण मागील गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करत नाही याची खातरी करण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी तीन उदाहरणे विचारात घ्या.
१७. (क) प्रेषित पौलाने स्वतःचे वर्णन “सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान” असे का केले? (ख) कोणत्या गोष्टीने पौलाला नकारार्थी विचारांमुळे अस्वस्थ न होण्यास मदत केली?
१७ गतकाळातील चुका. प्रेषित पौलाने स्वतःचे वर्णन “सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान” असे केले. (इफिस. ३:८) पौलाला स्वतःबद्दल असे का वाटले? “कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला” असे तो म्हणतो. (१ करिंथ. १५:९) पौलाने पूर्वी ज्यांचा छळ केला होता त्यांपैकी एखादी व्यक्ती त्याला भेटली तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? पण, अशा नकारार्थी विचारांमुळे अस्वस्थ होण्याऐवजी, पौलाने त्याचे लक्ष त्याच्यावर जी कृपा करण्यात आली होती त्यावर केंद्रित केले. (१ तीम. १:१२-१६) परिणामस्वरूप, त्याच्या मनात कृतज्ञता दाटून आली आणि त्याला आपले सेवाकार्य आवेशाने करत राहण्याची प्रेरणा मिळाली. पौलाने ज्या गोष्टी सोडून दिल्या होत्या त्यांत त्याचे पूर्वीचे पापपूर्ण आचरण समाविष्ट होते आणि ते विसरून जाण्याचा त्याने दृढनिश्चय केला होता. आपणसुद्धा आपले लक्ष, यहोवाने आपल्याला दाखवलेल्या दयेवर केंद्रित केले तर गतकाळातील बदलू न शकणाऱ्या घटनांची नको तितकी चिंता करण्यात आपण आपली शक्ती खर्च करणार नाही. त्या उलट, आपल्याला जे कार्य नेमून दिले आहे ते पूर्ण करण्यात आपण आपली शक्ती खर्च करू.
१८. (क) पूर्वी कधीतरी दिलेल्या सल्ल्याकडे आपण नकारात्मक भावनेने पाहिले तर काय होऊ शकते? (ख) सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत आपण शलमोनाच्या शब्दांचे पालन कसे करू शकतो?
१८ दुःखदायक सल्ला. पूर्वी कधीतरी दिलेल्या कडक सल्ल्याबद्दल मनात राग बाळगण्याचा आपल्याला मोह झाला तर काय? असे जर आपण केले तर आपल्याला दुःख होऊ शकते व आपण ‘खचूनही जाऊ’ शकतो. (इब्री १२:५) दिलेला सल्ला आपण तडकाफडकी नाकारला किंवा सल्ला स्वीकारला पण नंतर आपण ‘खचून गेलो’ तर या दोन्हींचा परिणाम एकच होतो. तो म्हणजे आपण त्या सल्ल्याचा स्वतःला लाभ होऊ देत नाही. तेव्हा, शलमोनाच्या शब्दांचे पालन करणे किती उचित आहे! त्याने म्हटले: “तू शिक्षण [“अनुशासन,” NW] दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे.” (नीति. ४:१३) ज्याप्रमाणे एक वाहनचालक रस्त्यावरील सूचनांचे पालन करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिलेला सल्ला आपण स्वीकारू या आणि तो लागू करून पुढे वाटचाल करू या.—नीति. ४:२६, २७; इब्री लोकांस १२:१२, १३ वाचा.
१९. आपण हबक्कूक व यिर्मयाच्या विश्वासाचे अनुकरण कसे करू शकतो?
१९ अन्याय—खरोखरचा किंवा कल्पित. काही वेळा आपल्याला हबक्कूक संदेष्ट्याप्रमाणे वाटू शकते. यहोवाने काही वाईट गोष्टी का घडू दिल्या हे न समजल्यामुळे हबक्कूकने न्यायासाठी यहोवाचा धावा केला. (हब. १:२, ३) त्या संदेष्ट्याच्या विश्वासाचे अनुकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने म्हटले: “तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लास करीन.” (हब. ३:१८) प्राचीन काळातील यिर्मयाप्रमाणे आपण न्यायी देव यहोवा याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला व ‘आशेने’ त्याच्याकडे पाहिले, तर तो योग्य वेळी सर्वकाही ठीक करेल याची खातरी आपण बाळगू शकतो.—विलाप. ३:१९-२४.
२०. आपण कसे दाखवून देऊ शकतो, की आपल्याला “लोटाच्या बायकोची आठवण” आहे?
२० आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. आज अनेक अद्भुत घटना घडत आहेत व लवकरच आणखी बऱ्याच अद्भुत घटना घडणार आहेत. तेव्हा, आपण सर्व जण यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने वाटचाल करू या. मागील गोष्टींकडे न पाहता पुढे वाटचाल करत राहण्याच्या बायबलच्या सल्ल्याचे आपण पालन करू या. असे करण्याद्वारे आपण दाखवून देऊ, की आपल्याला खरोखरच “लोटाच्या बायकोची आठवण” आहे.
[तळटीप]
^ परि. 12 “केरकचरा” असे भाषांतरित केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ “कुत्र्यांना टाकलेले,” “शेण,” किंवा “विष्ठा” असाही होतो. एका बायबल विद्वानाच्या मते, पौलाने या ठिकाणी जो शब्द वापरला त्यावरून “एखाद्या निरुपयोगी व घृणास्पद गोष्टीकडे निश्चयपूर्वक पाठ फिरवणे व पुन्हा कधीच त्याकडे न वळणे,” हा अर्थ सूचित होतो.
[अभ्यासाचे प्रश्न]