व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाला आपला वाटा मानत आहात का?

तुम्ही यहोवाला आपला वाटा मानत आहात का?

तुम्ही यहोवाला आपला वाटा मानत आहात का?

“तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३३.

१, २. (क) गलतीकर ६:१६ मध्ये उल्लेखिलेले ‘देवाचे इस्राएल’ कोणाला सूचित करते? (ख) मत्तय १९:२८ मध्ये उल्लेखिलेले ‘इस्राएलाचे बारा वंश’ कोणाला सूचित करतात?

 तुम्ही बायबलमध्ये इस्राएल हे नाव वाचता तेव्हा तुमच्या मनात काय येते? इसहाकाचा पुत्र याकोब ज्याला इस्राएल हे नवीन नाव देण्यात आले होते त्याचा तुम्ही विचार करता का? की त्याच्या वंशजांचा म्हणजे प्राचीन इस्राएल राष्ट्राचा तुम्ही विचार करता? बायबलमध्ये उल्लेख केलेल्या आध्यात्मिक इस्राएलाविषयी काय म्हणता येईल? बायबलमध्ये लाक्षणिक अर्थाने इस्राएलाचा उल्लेख केला जातो तेव्हा तो सहसा ‘देवाच्या इस्राएलाला,’ अर्थात १,४४,००० जणांना सूचित करतो, ज्यांचा राजे व याजक या नात्याने स्वर्गात सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक केला जातो. (गलती. ६:१६; प्रकटी. ७:४; २१:१२) पण, मत्तय १९:२८ मध्ये इस्राएलाच्या १२ वंशांचा जो खास उल्लेख करण्यात आला आहे त्याचाही विचार करा.

येशूने म्हटले: “पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.” या वचनात उल्लेखिलेले ‘इस्राएलाचे बारा वंश’ अशांना सूचित करतात ज्यांचा न्यायनिवाडा येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांद्वारे केला जाईल व ज्यांना पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळचे जीवन मिळण्याची आशा आहे. इस्राएलाच्या या बारा वंशांना, १,४४,००० जणांच्या याजकीय सेवांचा फायदा होईल.

३, ४. विश्‍वासू अभिषिक्‍त जनांनी कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे?

प्राचीन काळचे याजक व लेवी यांच्याप्रमाणेच आज अभिषिक्‍त जनदेखील आपल्या सेवेला एक विशेषाधिकार मानतात. (गण. १८:२०) अभिषिक्‍त जन, पृथ्वीवर वतन म्हणून काही जमीनजुमला मिळण्याची अपेक्षा करत नाहीत. या उलट, ते स्वर्गात येशू ख्रिस्तासोबत याजक व राजे या नात्याने सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहतात. प्रकटीकरण ४:१०, ११ मध्ये आपण अभिषिक्‍त जनांच्या स्वर्गीय सेवेविषयी जे काही वाचतो त्यावरून सूचित होते, की ते स्वर्गात याजक व राजे या नात्याने यहोवाची सेवा करत राहतील.—यहे. ४४:२८.

पृथ्वीवर असताना अभिषिक्‍त जन ज्या प्रकारे जीवन जगतात त्यावरून यहोवा त्यांचा वाटा आहे हे स्पष्टपणे दिसून येते. यहोवाची सेवा करण्याचा जो विशेषाधिकार त्यांना लाभला आहे त्यास ते सर्वाधिक महत्त्व देतात. ते ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आपला विश्‍वास असल्याचे दाखवतात व निरंतर ख्रिस्ताचे अनुसरण करतात. असे करण्याद्वारे ते आपले ‘पाचारण व निवड दृढ’ करतात. (२ पेत्र १:१०) अभिषिक्‍त जनांपैकी प्रत्येकाची परिस्थिती व क्षमता वेगवेगळी आहे. असे असले, तरी आपल्या मर्यादांमुळे आपण देवाची जास्त सेवा करू शकत नाही अशी कारणे ते सांगत नाहीत. या उलट, ते देवाच्या सेवेला प्राधान्य देतात व आपल्या परीने होईल तितकी देवाची सेवा करतात. आणि असे करण्याद्वारे ते, पृथ्वीवरील नंदनवनात जीवन जगण्याची आशा बाळगणाऱ्‍यांसाठी एक उत्तम उदाहरणही मांडतात.

५. सर्व ख्रिस्ती यहोवाला आपला वाटा कसे मानू शकतात, आणि असे करणे कठीण का असू शकते?

आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची, आपण ‘आपला वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताचे अनुसरण’ केले पाहिजे. (मत्त. १६:२४) पृथ्वीवरील नंदनवनात जीवन जगण्याची आशा बाळगणारे लक्षावधी लोक अशाच प्रकारे देवाची उपासना व ख्रिस्ताचे अनुसरण करत आहेत. आपण देवाच्या सेवेत अधिक करू शकतो असे त्यांना जाणवते तेव्हा फक्‍त नावापुरती देवाची सेवा करण्यात ते समाधान मानत नाहीत. अनेकांना साधे जीवन जगण्याची व पायनियर बनण्याची प्रेरणा मिळाली आहे. काही जण वर्षातील काही महिने पायनियर सेवा करतात. तर, इतर काहींना पायनियर सेवा करणे जमत नसले, तरी ते सेवाकार्यात भाग घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. असे सर्व जण, विश्‍वासू मरीयेप्रमाणे आहेत जिने येशूच्या मस्तकावर सुगंधी तेल ओतले होते. तिच्याबद्दल येशूने म्हटले: “हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. . . . हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे.” (मार्क १४:६-८) आपण सैतानाच्या वर्चस्वाखाली असलेल्या जगात राहत असल्यामुळे आपल्याला आपल्या परीने शक्य ते करणे सोपे नसेल. तरीसुद्धा, आपण यहोवाची सेवा करण्याचा नेटाने प्रयत्न करू शकतो व त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो. आपल्या जीवनातील चार क्षेत्रांत आपण हे कसे करू शकतो त्याचा विचार करा.

पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटणे

६. (क) अनेक जण कसे दाखवतात की सध्याच्या जीवनातच त्यांचा वाटा आहे? (ख) दाविदासारखी मनोवृत्ती बाळगणे केव्हाही चांगले आहे असे का म्हणता येईल?

येशूने आपल्या शिष्यांना, पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटण्यास सांगितले. जगातील लोक सहसा पहिल्याने आपल्या स्वार्थी इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास झटतात आणि ‘आपले वतन इहलोकीच आहे’ असे ते मानतात. (स्तोत्र १७:१, १३-१५ वाचा.) आपल्या निर्माणकर्त्याची काडीमात्र कदर न करणारे अनेक जण ऐशआरामाचे जीवन जगण्यात, संसार थाटण्यात व आपल्या मुलाबाळांसाठी भरपूर धनसंपत्ती मागे सोडण्यात स्वतःला झोकून देतात. अशांना आपले वतन इहलोकीच म्हणजे याच जीवनात आहे असे वाटते. याच्या अगदी उलट, दावीद यहोवाच्या नजरेत “चांगले नाव” कमावण्यास अधिक उत्सुक होता. आपण सर्वांनीदेखील असेच करावे असे दाविदाचा पुत्र शलमोन याने म्हटले. (उप. ७:१, ईझी-टू-रीड व्हर्शन) आसाफाप्रमाणेच, दाविदालाही याची जाणीव होती, की यहोवाला आपला मित्र बनवणे हे आपल्या स्वार्थी इच्छा-आकांक्षांना प्राधान्य देण्यापेक्षा कितीतरी चांगले आहे. देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध राखण्यात दाविदाला आनंद वाटला. आज आपल्या काळात, अनेक ख्रिश्‍चनांनी आपल्या जीवनात नोकरी-व्यवसायापेक्षा आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिले आहे.

७. पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटणाऱ्‍या एका बांधवाला कोणते आशीर्वाद मिळाले?

मध्य आफ्रिका प्रजासत्ताक या देशात राहणारे झॉन-क्लोड यांचे उदाहरण विचारात घ्या. ते ख्रिस्ती मंडळीत एक वडील असून त्यांना तीन मुले आहेत. ते राहतात त्या ठिकाणी नोकरी मिळणे खूप मुश्‍कील आहे, त्यामुळे हातात असलेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी तेथील बरेच लोक काहीही करायला तयार असतात. एके दिवशी, झॉन-क्लोड यांच्या उत्पादन व्यवस्थापकाने त्यांना सांगितले, की त्यांना आता आठवड्याचे सातही दिवस रात्रपाळी करावी लागेल; म्हणजे रोज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांना कामावर यावे लागेल. झॉन-क्लोड यांनी व्यवस्थापकाला सांगितले की त्यांना केवळ आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजाच नव्हे, तर आध्यात्मिक गरजाही तृप्त करणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांच्यावर ख्रिस्ती मंडळीला मदत करण्याची जबाबदारीही आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर व्यवस्थापकाची काय प्रतिक्रिया होती? व्यवस्थापकाने झॉन-क्लोडला म्हटले: “तू स्वतःला नशीबवान समज की तुझ्याकडे निदान नोकरी तरी आहे; पण ती टिकवून ठेवण्यासाठी तुला सर्वकाही विसरावं लागेल, अगदी आपल्या बायकोमुलांना व समस्यांनासुद्धा. तू केवळ आणि केवळ आपल्या कामावर लक्ष दे. तूच ठरव तुला काय पाहिजे: तुझा धर्म की तुझी नोकरी.” असे जर तुमच्या बाबतीत घडले असते, तर तुम्ही काय केले असते? झॉन-क्लोडला विश्‍वास होता, की आपली नोकरी गेली, तरी देव आपला सांभाळ करेल. त्यांना जास्तीत जास्त देवाची सेवा करणे शक्य होणार होते, आणि त्यांच्या कुटुंबाच्या भौतिक गरजा भागवण्यास यहोवा त्यांना मदत करणार होता. या विश्‍वासाने ते आठवड्याच्या मध्ये होणाऱ्‍या सभेला गेले. त्यानंतर, ते कामाला जायला निघाले. पण, आपली नोकरी टिकून आहे की नाही हेदेखील त्यांना माहीत नव्हते. इतक्यात, त्यांना एक फोन आला. त्यांना समजले, की त्यांच्या व्यवस्थापकालाच कामावरून काढून टाकण्यात आले होते. अशा रीतीने आपल्या बांधवाची नोकरी टिकून राहिली.

८, ९. यहोवाला आपला वाटा मानण्यात आपण लेव्यांच्या व याजकांच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

तुमच्यापैकी काहींना कदाचित अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागले असेल. अशा वेळी तुम्हाला असा प्रश्‍न पडला असेल, ‘मी माझ्या कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण करणार?’ (१ तीम. ५:८) तुम्ही अशा परिस्थितीला तोंड दिले असो अगर नसो, तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला बहुधा याची खातरी पटली असेल की देव जर तुमचा वाटा असेल म्हणजे त्याची सेवा करण्याच्या विशेषाधिकाराची तुम्हाला मनस्वी कदर असेल, तर तो तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही. ‘तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा’ असे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले तेव्हा त्याने त्यांना असे आश्‍वासन दिले, की “ह्‍याहि सर्व गोष्टी” म्हणजे काय खावे, काय प्यावे व काय घालावे यांसारख्या गोष्टीही ‘त्यांना मिळतील.’—मत्त. ६:३३.

लेव्यांचा विचार करा. त्यांना जमिनीचे वतन मिळाले नव्हते. त्यांनी आपल्या जीवनात शुद्ध उपासनेला प्राधान्य दिले होते; त्यामुळे आपला सांभाळ करण्यासाठी त्यांना यहोवावर विसंबून राहायचे होते. यहोवाने त्यांना म्हटले: ‘मीच तुझा वाटा आहे.’ (गण. १८:२०) लेवी व याजक यांच्याप्रमाणे आज आपण खरोखरच्या मंदिरात सेवा करत नसलो, तरी आपण त्यांच्या मनोवृत्तीचे अनुकरण करू शकतो; अर्थात यहोवा आपला सांभाळ करील असा आत्मविश्‍वास आपण बाळगू शकतो. या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे तसतसा आपला सांभाळ करण्याच्या देवाच्या सामर्थ्यावर आपण अधिकाधिक भरवसा ठेवला पाहिजे.—प्रकटी. १३:१७.

पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे

१०, ११. नोकरीच्या बाबतीत काहींनी यहोवावर कसा भरवसा ठेवला आहे? उदाहरण द्या.

१० येशूने आपल्या शिष्यांना असाही आर्जव केला: ‘पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा.’ (मत्त. ६:३३) याचा अर्थ, योग्य-अयोग्यतेच्या बाबतीत मानवांच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करणे. (यशया ५५:८, ९ वाचा.) तुम्हाला कदाचित माहीत असेल की पूर्वी अनेक जण तंबाखूची शेती करण्यात, तंबाखूची उत्पादने विकण्यात, इतरांना युद्धाचे प्रशिक्षण देण्यात, तसेच युद्धाची शस्त्रे बनवण्याच्या व विकण्याच्या कामात गोवलेले होते. पण, सत्याचे ज्ञान मिळाल्यानंतर मात्र अनेकांनी आपली नोकरी बदलली आणि ते बाप्तिस्म्यासाठी पात्र ठरले.—यश. २:४; २ करिंथ. ७:१; गलती. ५:१४.

११ याचे एक उदाहरण आहे अँड्रू. त्याने व त्याच्या पत्नीने यहोवाविषयीचे ज्ञान घेतले आणि त्याची सेवा करण्याचा निश्‍चय केला. अँड्रूला आपल्या नोकरीबद्दल खूप अभिमान वाटायचा, पण त्याने ती नोकरी सोडून दिली. का? कारण तो युद्धात गोवलेल्या एका संघटनेत काम करत होता; पण, आता त्याने पहिल्याने देवाची नीतिमत्ता मिळवण्यास झटण्याचा निर्धार केला होता. अँड्रूने आपली नोकरी सोडली तेव्हा त्याला दोन मुले होती व केवळ काही महिने पुरतील इतकेच पैसे त्याच्याजवळ होते. मानवी दृष्टिकोनातून पाहता त्याच्याजवळ काहीच ‘वतन’ नव्हते असे कदाचित वाटेल. पण, देवावर भरवसा ठेवून तो नोकरी शोधू लागला. आज मागे वळून पाहताना तो व त्याचे कुटुंब खातरीने म्हणू शकतात, की यहोवाचा हात तोकडा नाही. (यश. ५९:१) साधेसुधे जीवन जगण्याची निवड केल्यामुळे अँड्रूला व त्याच्या पत्नीला पूर्ण-वेळची सेवा करणेदेखील शक्य झाले आहे. तो म्हणतो, “पैसा, घर, आरोग्य आणि वाढतं वय या गोष्टींमुळे आम्ही काही वेळा चिंतित व्हायचो. पण, यहोवा नेहमी आमच्या पाठीशी होता. . . . कोणतीही शंका न बाळगता आम्ही निश्‍चितपणे म्हणू शकतो की यहोवाची सेवा करणं हे सगळ्यात उदात्त व मनाला समाधान देणारं कार्य आहे.” *उप. १२:१३.

१२. जीवनात देवाच्या नीतिमान स्तरांना प्राधान्य देण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्‍यकता आहे? स्थानिक उदाहरणे सांगा.

१२ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असला तर ह्‍या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” (मत्त. १७:२०) जीवनात देवाच्या नीतिमान स्तरांना प्राधान्य दिल्यामुळे तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागले तरी तुम्ही देवाच्या नीतिमान स्तरांना प्राधान्य द्याल का? याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास मंडळीतील इतर सदस्यांशी बोला. त्यांचे अनुभव ऐकून तुम्हाला नक्कीच खूप उत्तेजन मिळेल.

यहोवाने केलेल्या आध्यात्मिक तरतुदींची कदर करा

१३. आपण यहोवाची सेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आध्यात्मिक तरतुदींच्या बाबतीत आपण काय अपेक्षा करू शकतो?

१३ यहोवाची सेवा करण्याच्या विशेषाधिकाराची तुम्ही मनापासून कदर केली, तर त्याने ज्याप्रमाणे लेव्यांच्या गरजा पूर्ण केल्या त्याचप्रमाणे तो तुमच्याही भौतिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करेल याची खातरी तुम्ही बाळगू शकता. दाविदाचा विचार करा. तो एका गुहेत लपून बसला होता. तरीसुद्धा, देव आपल्या गरजा पूर्ण करेल याची त्याला खातरी होती. संकटातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही असे आपल्याला वाटते तेव्हा आपणसुद्धा यहोवावर विसंबून राहू शकतो. हे आठवणीत आणा, की आसाफ “देवाच्या पवित्रस्थानात” गेला तेव्हा, त्याला अस्वस्थ करणाऱ्‍या गोष्टीची अचूक समज त्याला प्राप्त झाली. (स्तो. ७३:१७) त्याचप्रमाणे, आपणसुद्धा आपल्याला आध्यात्मिक तजेला देणाऱ्‍या देवाकडे वळले पाहिजे. यावरून आपण दाखवून देतो की आपली परिस्थिती काहीही असो, देवाची सेवा करण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे त्याची आपण कदर करतो. अशा प्रकारे आपण यहोवाला आपला वाटा मानतो.

१४, १५. काही शास्त्रवचनांवर अधिक प्रकाश टाकला जातो तेव्हा आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे आणि का?

१४ आध्यात्मिक प्रकाशाचा स्रोत असलेला यहोवा देव बायबलमधील ‘गहन गोष्टींवर’ अधिक प्रकाश टाकतो तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? (१ करिंथ. २:१०-१३) या बाबतीत प्रेषित पेत्राने एक उत्तम उदाहरण मांडले. येशूने एकदा आपल्या श्रोत्यांना म्हटले: “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्‍त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही.” येशूने जे म्हटले त्याचा शाब्दिक अर्थ घेऊन अनेक शिष्य म्हणाले: “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” आणि त्याच्या “शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले.” पण पेत्राने म्हटले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहा. ६:५३, ६०, ६६, ६८.

१५ येशूने आपला देह खाण्याविषयी व आपले रक्‍त पिण्याविषयी जे म्हटले ते पेत्राला पूर्णपणे समजले नाही. पण, तो आध्यात्मिक समज प्राप्त करण्यासाठी देवावर विसंबून राहिला. एखाद्या विषयावर अधिक आध्यात्मिक प्रकाश टाकला जातो तेव्हा त्याची शास्त्रवचनीय कारणे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? (नीति. ४:१८) पहिल्या शतकात बिरुयातील लोकांनी “मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:११) तुम्ही त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास यहोवाची सेवा करण्याच्या तुमच्या विशेषाधिकाराची तुम्ही अधिक कदर कराल. तसेच, यहोवा तुमचा वाटा असल्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल.

केवळ प्रभूमध्ये लग्न करणे

१६. पहिले करिंथकर ७:३९ मध्ये दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने देव तुमचा वाटा कसा होऊ शकतो?

१६ आपण नेहमी देवाचे उद्देश आठवणीत ठेवले पाहिजे असे आणखी एक क्षेत्र आहे. ते म्हणजे, ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करण्याविषयी’ बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे. (१ करिंथ. ७:३९) देवाने दिलेल्या या सल्ल्याचे उल्लंघन करण्याऐवजी अनेकांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्वांची देव काळजी घेतो. दाविदाला एकाकीपणाच्या व असहायतेच्या भावनेने ग्रासले तेव्हा त्याने काय केले? त्याने म्हटले: “मी [देवापुढे] आपले गाऱ्‍हाणे मांडितो; मी आपले संकट त्याला सांगतो. माझ्या ठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे.” (स्तो. १४२:१-३) अशा प्रकारच्या भावना, अनेक दशके अविवाहित राहून देवाची सेवा करणाऱ्‍या यिर्मया संदेष्ट्याच्याही मनात आल्या असतील. त्याच्या उदाहरणाची चर्चा, गॉड्‌स वर्ड फॉर अस थ्रू जेरमाया या पुस्तकातील ८ व्या अध्यायात करण्यात आली आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता.

१७. एका अविवाहित बहिणीला अधूनमधून एकाकी वाटते तेव्हा ती त्यावर कशा प्रकारे मात करते?

१७ अमेरिकेतील एक बहीण म्हणते: “मी लग्न करणारच नाही असं मी कधीच ठरवलं नाही. माझ्या आयुष्यात एखादी योग्य व्यक्‍ती आली तर मी जरूर लग्न करेन. सत्यात नसलेल्या माझ्या आईनं, मला मागणी घालणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीशी मी लग्न करावं असा दबाव माझ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मी तिला विचारलं, ‘माझं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त झाल्यास त्याची जबाबदारी तू घेशील का?’ काही काळानंतर, तिनं पाहिलं की मला चांगली नोकरी आहे, मी स्वतःची चांगली काळजी घेते व मी आनंदी आहे. त्यामुळे तिनं माझ्यावर लग्नाचा दबाव आणण्याचं सोडून दिलं.” या बहिणीला कधीकधी एकाकी वाटते. ती म्हणते: “अशा वेळी मी यहोवावर विसंबून राहते. तो माझा कधीच त्याग करत नाही.” कोणत्या गोष्टीने या बहिणीला यहोवावर भरवसा ठेवण्यास मदत केली आहे? ती म्हणते: “मी प्रार्थना करते तेव्हा देव एक खरीखुरी व्यक्‍ती आहे व मी कधीच एकटी नाही याची जाणीव मला होते. या विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी माझी प्रार्थना ऐकत असेल, तर मला सन्मानित व आनंदी का नाही वाटणार?” “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे,” याचा भरवसा असल्यामुळे ती म्हणते: “मी इतरांना मदत करण्यासाठी स्वतःला झोकून देते व बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. ‘अमुक व्यक्‍तीला मदत करण्यासाठी मी काय करू शकते?’ असा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला मनापासून आनंद होतो.” (प्रे. कृत्ये २०:३५) होय, तिने यहोवाला आपला वाटा मानला आहे आणि त्याची सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळाल्याबद्दल ती खूप आनंदी आहे.

१८. यहोवा कोणत्या अर्थी तुम्हाला त्याचा वाटा बनवू शकतो?

१८ तुमची परिस्थिती काहीही असो, तुम्ही जरूर देवाला आपला वाटा मानू शकता. असे केल्यास, देवाच्या आनंदी लोकांपैकी तुम्हीदेखील एक असाल. (२ करिंथ. ६:१६, १७) परिणामस्वरूप, प्राचीन काळातील देवाच्या सेवकांप्रमाणे तुम्ही यहोवाचा वाटा होऊ शकता. (अनुवाद ३२:९, १० वाचा.) ज्याप्रमाणे सर्व राष्ट्रांपैकी इस्राएल राष्ट्र देवाचा वाटा बनले, त्याचप्रमाणे देव तुम्हाला आपला वाटा बनवू शकतो व प्रेमळपणे तुमचा सांभाळ करू शकतो.—स्तो. १७:८.

[तळटीप]

^ सावध राहा! नोव्हेंबर २००९ (इंग्रजी), पृष्ठे १२-१४ पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• पहिल्याने देवाचे राज्य व त्याची नीतिमत्ता मिळवण्यास झटण्याद्वारे तुम्ही यहोवाला आपला वाटा कसा मानू शकता?

• यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक तरतुदींची कदर करण्याद्वारे तुम्ही यहोवाला आपला वाटा कसा मानू शकता?

• केवळ प्रभूमध्ये लग्न करण्याविषयी देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे तुम्ही यहोवाला आपला वाटा कसा मानू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

जीवनात आपण यहोवाच्या सेवेला प्राधान्य देतो तेव्हा तो आपला वाटा बनू शकतो

[१५ पानांवरील चित्र]

यिर्मयाचे उदाहरण प्रोत्साहनदायक आहे