व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी मशीहाची वाट पाहिली

त्यांनी मशीहाची वाट पाहिली

त्यांनी मशीहाची वाट पाहिली

“लोकांना मोठी आशा वाटू लागली होती. हा योहानच कदाचित येणारा ख्रिस्त (मशिहा) असावा अशी कल्पना त्यांच्या मनात येई.” —लूक ३:१५, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

१. देवदूताने मेंढपाळांना कोणती आनंदाची बातमी सांगितली?

 रात्रीची वेळ आहे आणि काही मेंढपाळ रानांत आपल्या मेंढरांची राखण करत आहेत. अचानक यहोवाचा देवदूत त्यांच्या जवळ उभा राहतो आणि त्यांच्या सभोवताली तेजस्वी प्रकाश पडतो! त्यांना भीती वाटते, तरीसुद्धा देवदूत सांगत असलेली आनंदाची बातमी ते लक्षपूर्वक ऐकतात. देवदूत त्यांना म्हणतो: “भिऊ नका, कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभु आहे.” देवदूत ज्या बालकाविषयी बोलत आहे ते बालक पुढे ख्रिस्त किंवा मशीहा बनणार आहे. देवदूत मेंढपाळांना असेही सांगतो, की त्यांना हे बालक जवळच्या एका गावात गव्हाणीत ठेवलेले आढळेल. मग, अचानक अनेक देवदूत प्रकट होतात. ते यहोवाची स्तुती करतात: “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांति.”—लूक २:८-१४.

२. “मशिहा” या शब्दाचा अर्थ काय होतो? मशीहा खरोखर कोण होता हे लोकांना कसे समजणार होते?

अर्थात, मशीहा किंवा “ख्रिस्त” हा देवाचा अभिषिक्‍त जन आहे हे त्या यहुदी मेंढपाळांना माहीत आहे. (निर्ग. २९:५-७) पण, याविषयी त्यांना अधिक माहिती कशी मिळणार होती आणि यहोवाने मशीहा बनण्याकरता या बालकाला निवडले आहे हे त्यांना व इतरांना कसे समजणार होते? त्यासाठी प्रथम, त्यांनी मशीहासंबंधी शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांचा अभ्यास करायचा होता, आणि मग त्या भविष्यवाण्या या बालकाच्या जीवनकाळात पूर्ण होतात की नाही हे पाहायचे होते.

लोक मशीहाची वाट का पाहत होते?

३, ४. कशा प्रकारे दानीएल ९:२४, २५ मधील भविष्यवाणी पूर्ण झाली?

याच्या अनेक वर्षांनंतर, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने आपले प्रचार कार्य सुरू केले. त्याने जे म्हटले व केले त्यावरून हाच मशीहा असावा असा काही लोक विचार करू लागले. (लूक ३:१५ वाचा.) पण, बायबलमध्ये ७० सप्तकांची जी भविष्यवाणी दिली आहे, त्यावरून मशीहा केव्हा येईल हे समजणे लोकांना शक्य झाले. ती भविष्यवाणी म्हणते: ‘तुझ्या लोकांसंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत. यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्‍त, अधिपति, असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा व बासष्ट सप्तकांचा अवकाश आहे.’ (दानी. ९:२४, २५) बायबल विद्वानांच्या मते, ही सप्तके दिवसांची नव्हे, तर वर्षांची आहेत. त्याअर्थी, यांपैकी प्रत्येक सप्तक सात वर्षांच्या कालावधीचा आहे. मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर यात दानीएल ९:२४ हे वचन म्हणते: “सत्तर वर्षांची सातपट एवढा कालावधी मुक्रर केलेला आहे.”

आज यहोवाच्या लोकांना हे माहीत आहे, की दानीएल ९:२५ मध्ये सांगितलेली ६९ सप्तके म्हणजे ४८३ वर्षे आहेत. आणि त्यांची सुरुवात, इ.स.पू. ४५५ मध्ये पारसाचा राजा अर्तहशश्‍त याने नहेम्याला जेरूसलेमची डागडुजी व पुनर्बांधणी करण्यास सांगितले तेव्हा झाली. (नहे. २:१-८) ती ४८३ वर्षे, इ.स. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा संपली. त्या वेळी, यहोवाने पवित्र आत्म्याद्वारे येशूला अभिषिक्‍त केले आणि तो मशीहा बनला.—मत्त. ३:१३-१७. *

५. आपण कोणत्या भविष्यवाण्यांविषयी शिकणार आहोत?

बायबलमध्ये मशीहासंबंधी इतर अनेक भविष्यवाण्या आहेत. त्यांपैकी काहींविषयी आपण या लेखात शिकणार आहोत. त्या भविष्यवाण्या मशीहाचा जन्म, त्याचे बालपण व प्रौढावस्था आणि त्याचे सेवाकार्य यांसंबंधी आहेत. या भविष्यवाण्या येशूच्या जीवनकाळात कशा पूर्ण झाल्या त्याविषयी आपण शिकणार आहोत. यामुळे बायबलवरील आपला विश्‍वास आणखी दृढ होईल व लोक ज्या मशीहाची वाट पाहत होते तो येशूच होता हेदेखील सिद्ध होईल.

बालपणाविषयीच्या भविष्यवाण्या

६. उत्पत्ति ४९:१० मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

मशीहाचा जन्म इस्राएलच्या यहूदा वंशात होणार होता. याकोबाचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी त्याने आपल्या पुत्रांना आशीर्वाद दिला आणि यहूदाला त्याने असे म्हटले: “यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याजकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील.” (उत्प. ४९:१०) यहुदी शिक्षकांनी नेहमीच असे मानले, की याकोबाने यहूदाला म्हटलेले हे शब्द मशीहाशी संबंधित होते. पण, याकोबाच्या शब्दांचा काय अर्थ होतो? आपल्याला माहीत आहे, की तो एका राजाबद्दल बोलत होता, कारण प्राचीन काळी राजा स्वतःजवळ राजवेत्र व राजदंड बाळगायचा. त्यावरून त्याला शासन करण्याचा व आज्ञा करण्याचा अधिकार आहे हे दिसून यायचे. तर मग, ही भविष्यवाणी हे दाखवून देते, की ज्याला शासन करण्याचा अधिकार आहे तो राजा यहूदा वंशातून येणार होता. यहूदा वंशातून येणारा पृथ्वीवरील पहिला राजा दावीद, तर शेवटचा राजा सिदकीया होता. पण, याकोबाची भविष्यवाणी सिदकीयानंतर येणाऱ्‍या आणखी एका राजाकडे संकेत करत होती. तो सदासर्वकाळासाठी राजा असणार होता. देवाने सिदकीयाला सांगितले, की ज्याला शासन करण्याचा हक्क आहे तो हाच राजा आहे. (यहे. २१:२६, २७) येशूचा जन्म होण्यापूर्वी गब्रीएल देवदूताने मरीयेला सांगितले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील,’ व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) येशू हा यहूदा वंशातून व दाविदाच्या घराण्यातून आला होता. आणि सिदकीयानंतर, दाविदाच्या घराण्यात केवळ येशूला राजा बनण्याचा हक्क बहाल करण्याचे अभिवचन यहोवाने दिले होते. तेव्हा, येशू ख्रिस्तच तो राजा असला पाहिजे.—मत्त. १:१-३, ६; लूक ३:२३, ३१-३४.

७. मशीहाच्या जन्मासंबंधीची भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

मशीहाचा जन्म बेथलेहेम नावाच्या गावी होणार होता. मीखा संदेष्ट्याने लिहिले: “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुजमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्‌भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.” (मीखा ५:२) ही भविष्यवाणी म्हणते, की मशीहाचा जन्म बेथलेहेममध्ये होणार होता. बेथलेहेम हे यहूदामधील एक गाव असून एके काळी त्याला एफ्राथा म्हटले जायचे. पण, येशूची आई मरीया व तिचा पती योसेफ दुसऱ्‍या एका गावात अर्थात नासरेथमध्ये राहत होते. येशूचा जन्म होण्याची वेळ जवळ आली तेव्हा, रोमच्या शासकाने लोकांना आपली नावनोंदणी करण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या गावी परतण्यास सांगितले. त्यामुळे मरीया व योसेफ बेथलेहेमला परतले जेथे मरीयेने येशूला जन्म दिला. (मत्त. २:१, ५, ६) अशा प्रकारे, भविष्यवाणीत सांगितले होते अगदी त्याप्रमाणे येशूचा जन्म झाला!

८, ९. मशीहाच्या जन्मासंबंधी भविष्यवाणी काय म्हणते? मशीहाच्या जन्मानंतर काय होणार होते?

मशीहाचा जन्म एका कुमारीच्या पोटी होणार होता. (यशया ७:१४ वाचा) या ठिकाणी, “कुमारी” या शब्दासाठी वापरलेला हिब्रू शब्द अल्मा असून त्याचे भाषांतर “मुलगी” असेही केले जाऊ शकते. पण, यशया ७:१४ हे वचन येशूच्या जन्माच्या बाबतीत पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी मत्तयने देवप्रेरणेने, “कुमारी” यासाठी असलेला पारथेनोस हा ग्रीक शब्द वापरला. शुभवर्तमानाचे लेखक मत्तय व लूक लिहितात, की मरीया ही कुमारी होती व ती देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे गर्भवती झाली होती.—मत्त. १:१८-२५; लूक १:२६-३५.

मशीहाच्या जन्मानंतर लहान मुलांची हत्या होणार होती. ही घटना, मशीहाचा जन्म होण्याच्या हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेसारखीच आहे. इजिप्तच्या फारोने, लोकांना अशी आज्ञा दिली होती की त्यांनी सर्व लहान हिब्रू मुलांना नाईल नदीत फेकून द्यावे. (निर्ग. १:२२) यिर्मया ३१:१५, १६ मधील एक भविष्यवाणी असे म्हणते, की “राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे,” कारण शत्रूंनी त्यांना हिरावून घेतले आहे. लोकांनी तिच्या रडण्याचा आवाज दूरवर असलेल्या रामात ऐकला, जे जेरूसलेमच्या उत्तरेकडील बन्यामीनाच्या क्षेत्रात होते. हेरोद राजाने बेथलेहेमातील सर्व लहान मुलांची हत्या करण्याची आज्ञा दिली तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली असे मत्तय सांगतो. (मत्तय २:१६-१८ वाचा.) लोकांनी आपल्या मुलांकरता किती शोक केला असेल याचा विचार करा!

१०. होशेय ११:१ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

१० मशीहाला इजिप्तमधून (मिसरातून) बोलावले जाणार होते. (होशे. ११:१) येशूला हेरोद राजापासून वाचवण्यासाठी, योसेफ व मरीयेने इस्राएल देश सोडावा व येशूला घेऊन इजिप्तमध्ये जावे असे एका देवदूताने त्यांना सांगितले. हेरोदचा मृत्यू होईपर्यंत ते तेथेच राहिले. हेरोदचा मृत्यू झाल्यानंतर योसेफ व मरीया येशूला घेऊन इस्राएलमध्ये परतले. यहोवाने होशेयाला जे सांगितले होते ते पूर्ण झाले: “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे.” (मत्त. २:१३-१५) अर्थातच, येशूच्या जन्माच्या वेळी व त्याच्या लहानपणी ज्या घटना घडल्या त्या नियंत्रित करणे त्याला शक्य नव्हते.

मशीहा आपले सेवाकार्य सुरू करतो!

११. मशीहासाठी मार्ग कोणी तयार केला?

११ एक संदेशवाहक मशीहासाठी मार्ग तयार करणार होता. मलाखीने सांगितले होते, की मशीहा येण्याआधी त्याच्यासाठी मार्ग तयार करण्याकरता एक जण येईल. मशीहा येईल तेव्हा त्याचा स्वीकार करण्यास लोकांनी तयार असावे म्हणून त्यांना तो मदत करणार होता. मलाखी याला एलीया असे म्हणतो. (मलाखी ४:५, ६ वाचा.) येशूने म्हटले, की बाप्तिस्मा देणारा योहान एलीयासारखा होता. (मत्त. ११:१२-१४) मार्कने म्हटले, की मशीहासाठी योहानाने मार्ग तयार केला. नेमके हेच यशया संदेष्ट्याने भाकीत केले होते. (यश. ४०:३; मार्क १:१-४) योहानाला आपल्यासाठी मार्ग तयार करण्यास येशूने सांगितले नव्हते. मशीहा कोण आहे हे लोकांनी ओळखावे अशी देवाची इच्छा होती; त्यामुळे खुद्द देवाने योहानाला एलीयासारखे कार्य करण्याकरता व मशीहाचे स्वागत करण्यास लोकांना तयार करण्याकरता निवडले होते.

१२. देवाने मशीहावर कोणते खास कार्य सोपवले होते?

१२ देव मशीहावर एक खास कार्य सोपवणार होता. येशू नासरेथ या गावात लहानाचा मोठा झाला होता. एके दिवशी, या गावातील सभास्थानात असताना त्याने एक गुंडाळी उघडली आणि त्यातून यशयाचे हे शब्द वाचले: “‘परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्‍यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्‍वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.’” येशूने म्हटले, की ही भविष्यवाणी त्याच्याविषयी होती. तो खरोखर मशीहा होता. म्हणूनच, तो अधिकाराने असे म्हणू शकला: “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना, पूर्ण झाला आहे.”—लूक ४:१६-२१.

१३. येशूच्या गालीलातील सेवाकार्याविषयी यशयाने काय म्हटले?

१३ एक भविष्यवाणी, मशीहाच्या गालीलातील सेवाकार्याविषयी सांगते. यशयाने “जबुलून,” “नफताली” व “विदेशी लोकांचे मंडळ गालील” यांच्याविषयी भविष्यवाणी केली होती. त्याने लिहिले: “अंधकारात चालणाऱ्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणाऱ्‍यांवर प्रकाश पडला आहे.” (यश. ९:१, २) येशूने आपले सेवाकार्य गालीलमधील कफर्णहूम नावाच्या गावात सुरू केले. त्याने जबुलून व नफतालीच्या परिसरातही शिक्षण देण्याचे कार्य केले. त्याने, या ठिकाणी राहणाऱ्‍या लोकांना प्रकाशासारखी चमकणारी सत्ये शिकवून त्यांना मदत केली. (मत्त. ४:१२-१६) गालीलमध्येच येशूने डोंगरावरील प्रवचन दिले, आपल्या प्रेषितांना निवडले आणि आपला पहिला चमत्कार केला. आपले पुनरुत्थान झाल्यानंतर तो ५०० हून अधिक शिष्यांना दिसला तेदेखील गालीलमध्येच. (मत्त. ५:१–७:२७; २८:१६-२०; मार्क ३:१३, १४; योहा. २:८-११; १ करिंथ. १५:६) येशूने ‘जबुलून व नफताली प्रांतांत’ प्रचार कार्य केले तेव्हा यशयाची भविष्यवाणी पूर्ण झाली. येशूने इस्राएलच्या इतर भागांतही राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला.

मशीहासंबंधी आणखी भविष्यवाण्या

१४. स्तोत्र ७८:२ यातील भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

१४ लोकांना शिकवण्यासाठी मशीहा बोधकथांचा व दाखल्यांचा उपयोग करणार होता. आसाफाने एका स्तोत्रात असे गायिले: “मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन.” (स्तो. ७८:२) ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली हे मत्तय आपल्याला सांगतो. येशूने लोकांना शिकवण्यासाठी नेहमी दाखल्यांचा, किंवा उदाहरणांचा उपयोग केला. लोकांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्यासाठी येशूने मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दाखला दिला त्याबद्दल लिहिताना मत्तयाने म्हटले: “दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्‍यासाठी की, संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, ‘मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन.’” (मत्त. १३:३१-३५) येशूने ज्या बोधकथा व दाखले सांगितले त्यांमुळे लोकांना यहोवाविषयीचे सत्य समजणे शक्य झाले.

१५. यशया ५३:४ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

१५ मशीहा लोकांचे रोग बरे करणार होता. यशयाने असे भाकीत केले: “खरोखर आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले.” (यश. ५३:४) पेत्राची सासू आजारी पडली तेव्हा येशूने तिला बरे केले. त्यानंतर, आणखी बरेच लोक पेत्राच्या घरी आले आणि येशूने त्यांचेही रोग बरे केले. यामुळे, यशया संदेष्ट्याने जे भाकीत केले होते ते पूर्ण झाले असे मत्तयाने म्हटले. त्याने म्हटले: “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले.” (मत्त. ८:१४-१७) पण, येशूने लोकांना बरे केल्याची ही एकच घटना नाही; तर आणखी कितीतरी वेळा त्याने लोकांचे रोग बरे केले असे बायबल आपल्याला सांगते.

१६. प्रेषित योहानाने असे काय लिहिले ज्यावरून हे सिद्ध होते, की यशया ५३:१ मधील शब्द येशूविषयीच होते?

१६ येशूने अनेक चांगली कामे केली, तरी तोच मशीहा आहे असा अनेक लोक विश्‍वास ठेवणार नव्हते. (यशया ५३:१ वाचा.) ही भविष्यवाणी अचूकपणे पूर्ण झाली असे प्रेषित योहानाने म्हटले. त्याने लिहिले: “त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताहि त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही; हे ह्‍यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे: ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्‍वास ठेवला आहे? परमेश्‍वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?’” (योहा. १२:३७, ३८) याच्या अनेक वर्षांनंतर, प्रेषित पौलाने सुवार्तेचा प्रचार केला तेव्हासुद्धा येशू हाच मशीहा आहे असा अनेकांनी विश्‍वास ठेवला नाही.—रोम. १०:१६, १७.

१७. स्तोत्र ६९:४ यातील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

१७ लोक मशीहाचा द्वेष करणार होते. (स्तो. ६९:४) येशूने म्हटले: “जी कृत्ये दुसऱ्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाहि पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.” (योहा. १५:२४, २५) शुभवर्तमानांत आपण येशूविषयी जे काही वाचतो त्यावरून सिद्ध होते, की अनेक लोकांनी आणि खासकरून यहुदी धर्मगुरूंनी येशूचा द्वेष केला. तसेच, येशूने असे म्हटले: “जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करिते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देतो.”—योहा. ७:७.

१८. पुढच्या लेखात आपण काय शिकणार आहोत?

१८ पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांना याची खातरी होती, की तोच मशीहा आहे. इब्री शास्त्रवचनांत मशीहासंबंधी दिलेल्या सर्व भविष्यवाण्या येशूने पूर्ण केल्या हे त्यांना माहीत होते. (मत्त. १६:१६) या लेखात आपण हे शिकलो, की येशूच्या लहानपणाविषयी व त्याच्या सेवाकार्याविषयी दिलेल्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. पण, मशीहा कोण आहे हे सिद्ध करणाऱ्‍या आणखी बऱ्‍याच भविष्यवाण्या बायबलमध्ये आहेत. त्यांच्याविषयी आपण पुढच्या लेखात शिकणार आहोत. या भविष्यवाण्यांवर आपण मनन केले, तर मशीहा बनण्यासाठी यहोवाने येशूलाच निवडले होते याबद्दल आपल्या मनात कधीच शंका येणार नाही.

[तळटीप]

^ ‘सत्तर सप्तकांविषयी’ अधिक जाणून घेण्याकरता, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे १९७-१९९ वरील परिशिष्ट पाहा.

तुमचे उत्तर काय आहे?

• येशूच्या जन्मासंबंधीच्या काही भविष्यवाण्या कोणत्या आहेत?

• मशीहासाठी मार्ग कोणी तयार केला?

• यशयाच्या ५३ व्या अध्यायातील भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?

[अभ्यासाचे प्रश्‍न]