व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचे प्रमाण देतो

देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचे प्रमाण देतो

देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचे प्रमाण देतो

‘नीतिमत्त्वाच्या योगे कृपा सार्वकालिक जीवनासाठी राज्य करेल.’—रोम. ५:२१.

१, २. आज लोकांच्या दृष्टीने कोणती देणगी अमूल्य आहे, पण कोणती देणगी सगळ्यात मौल्यवान आहे?

 ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने म्हटले, की रोमन साम्राज्याचे कायदेकानून, मानवसमाजाला मिळालेला एक अमूल्य वारसा किंवा देणगी आहे. पण, यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असलेली एक देणगी देवाने आपल्याला दिली आहे असे बायबल आपल्याला सांगते. ही प्रेमळ देणगी म्हणजे, देवाच्या नजरेत स्वीकृत व नीतिमान स्थिती मिळवण्यासाठी, तसेच तारणाची व सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त करण्यासाठी देवाने केलेली तरतूद.

देवाने ज्या प्रकारे या देणगीची तरतूद केली त्यात एका अर्थी कायद्याचे पैलू गोवलेले होते. रोमकरांस पत्राच्या ५ व्या अध्यायात, प्रेषित पौलाने या किचकट पैलूंची तपशीलवार चर्चा केली नाही. उलट, “आपण विश्‍वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणाला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे,” अशा उत्साहवर्धक आश्‍वासनाने त्याने आपल्या पत्राची सुरुवात केली. ज्यांना देवाकडून ही प्रेमळ देणगी मिळते तेदेखील त्याच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त होतात. पौलदेखील अशा लोकांपैकी एक होता. त्याने लिहिले: “आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”—रोम. ५:१, ५.

३. देवाने पुरवलेल्या देणगीच्या संदर्भात कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

पण, या प्रेमळ देणगीची तरतूद करण्याची गरज का निर्माण झाली? देव एका न्याय्य मार्गाने व सर्वांना लाभदायक ठरेल अशा मार्गाने ही देणगी कसा काय पुरवू शकला? आणि ही देणगी प्राप्त करण्यासाठी एका व्यक्‍तीने काय करणे जरुरीचे आहे? या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे काय आहेत आणि त्यांतून देवाचे प्रेम कसे दिसून येते ते आता आपण पाहू या.

देवाचे प्रेम आणि मानवांचे पाप

४, ५. (क) यहोवाने कोणत्या सर्वश्रेष्ठ मार्गाने आपले अपार प्रेम व्यक्‍त केले? (ख) रोमकर ५:१२ यातील शब्दांचा अर्थ समजून घेणे आपल्याला का शक्य आहे?

आपल्या अपार प्रेमाचा सर्वश्रेष्ठ पुरावा म्हणून यहोवाने आपला एकुलता एक पुत्र मानवांच्या साहाय्यासाठी पाठवला. त्या प्रेमाविषयी पौलाने असे म्हटले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) “आपण पापी असतानाच,” असे या वचनात म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या. आपण पापी कसे बनलो हे सर्व मानवांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

याविषयाचा खुलासा करताना पौलाने सुरुवातीला या गोष्टीचा उल्लेख केला: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोम. ५:१२) आपल्याला ही गोष्ट समजणे शक्य आहे कारण मानवी जीवनाची सुरुवात कशी झाली याचा अहवाल देवाने नमूद करून ठेवला आहे. यहोवाने आदाम व हव्वा अशा दोन मानवांची निर्मिती केली होती. निर्माणकर्ता खुद्द परिपूर्ण आहे, आणि त्याने निर्माण केलेले पहिले मानव अर्थात आपले पूर्वजदेखील परिपूर्ण होते. देवाने त्यांच्यावर मर्यादा घालणारी केवळ एक आज्ञा दिली होती आणि त्यांनी त्या आज्ञेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मृत्यूदंड ओढवेल असे त्याने त्यांना सांगितले होते. (उत्प. २:१७) पण, हे पहिले मानव दुष्टपणे वागले. त्यांनी देवाने दिलेल्या वाजवी आज्ञेचे उल्लंघन केले आणि असे करण्याद्वारे आपला नियंता व सार्वभौम अधिकारी असलेल्या देवाला नाकारले.—अनु. ३२:४, ५.

६. (क) कशामुळे आदामाच्या वंशजांमध्ये मरण आले, आणि नियमशास्त्र देण्यात आल्यानंतर ही स्थिती बदलली का? (ख) आनुवंशिकतेने मिळणाऱ्‍या आजारांच्या उदाहरणावरून काय स्पष्ट केले जाऊ शकते?

आदामाने पाप केले त्याच्यानंतर त्याला मुले झाली असल्यामुळे, त्याच्या मुलांना आनुवंशिकतेने पाप व पापाचे परिणाम मिळाले. अर्थात, आदामाप्रमाणे त्याच्या मुलांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले नव्हते. त्यामुळे आदामाने केलेल्या पापासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले नव्हते; शिवाय, तोपर्यंत नियमशास्त्रदेखील देण्यात आले नव्हते. (उत्प. २:१७) तरीसुद्धा, आदामाच्या वंशजांना आनुवंशिकतेने पाप मिळाले. अशा रीतीने, इस्राएल लोकांना पापाची स्पष्टपणे जाणीव करून देणारे नियमशास्त्र देवाने दिले तोपर्यंत पापाने व मृत्यूने त्यांच्यावर राज्य केले. (रोमकर ५:१३, १४ वाचा.) मानवांना आनुवंशिकतेने पापाचे परिणाम कसे मिळाले हे आनुवंशिकतेने मिळणाऱ्‍या काही आजारांच्या किंवा दोषांच्या उदाहरणावरून स्पष्ट केले जाऊ शकते. एखाद्या कुटुंबातील काही मुलांना आनुवंशिकतेने त्यांच्या पालकांकडून एखादा आजार मिळाला असेल. पण, त्या कुटुंबातील सर्वच मुलांना तो आजार होतोच असे नाही. पण, पापाच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. आपल्या सर्वांनाच आदामापासून आनुवंशिकतेने पाप मिळाले आहे आणि त्यामुळे आपण सर्व मरतो. या बिकट स्थितीतून आपली कधी सुटका होऊ शकते का?

देवाने येशू ख्रिस्तामार्फत कोणती तरतूद केली?

७, ८. दोन परिपूर्ण मनुष्यांच्या जीवनक्रमामुळे कोणते वेगळे परिणाम निष्पन्‍न झाले?

आनुवंशिकतेने मिळालेल्या पापी अवस्थेतून मानवांची सुटका करण्यासाठी देवाने एक प्रेमळ तरतूद केली. ही तरतूद दुसऱ्‍या एका मनुष्यामुळे म्हणजे नंतरच्या एका परिपूर्ण मनुष्यामुळे—त्याअर्थी दुसऱ्‍या आदामामुळे शक्य झाली असे पौलाने म्हटले. (१ करिंथ. १५:४५) पण, या दोन्ही परिपूर्ण मनुष्यांच्या जीवनक्रमामुळे सर्वस्वी वेगळे परिणाम निष्पन्‍न झाले. ते कसे?रोमकर ५:१५, १६ वाचा.

पौलाने म्हटले: “जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही.” आदामाने केलेल्या अपराधासाठी तो दोषी होता आणि त्याबद्दल त्याला उचित दंड देण्यात आला म्हणजे तो मरण पावला. पण, तो एकटाच मेला नाही. बायबल म्हणते: “ह्‍या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली.” आदामावर ठोठावण्यात आलेला उचित न्यायदंड साहजिकच त्याच्या अपरिपूर्ण वंशजांवरही ठोठावण्यात आला, ज्यात आपलाही समावेश होतो. असे असले, तरी परिपूर्ण मनुष्य येशू याच्या अगदी उलट परिणाम घडवून आणू शकला हे जाणून आपल्याला दिलासा मिळतो. तो कोणता परिणाम आहे? याचे उत्तर, पौलाने जे म्हटले त्यात आढळते. त्याने म्हटले: “सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.”—रोम. ५:१८.

९. रोमकर ५:१६, १८ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, देव मानवांना नीतिमान ठरवतो याचा काय अर्थ होतो?

“नीतिमान ठरणे” व ‘नीतिमत्त्व प्राप्त होणे’ असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक भाषेतील शब्दांचा काय अर्थ होतो? याविषयी एका बायबल अनुवादकाने लिहिले: “हे वाक्यांश कायद्याशी संबंधित रूपक आहेत. ते पूर्णपणे कायद्याशी संबंधित नसले, तरी त्यांतून कायद्याचा अर्थ ध्वनित होतो. ते एका व्यक्‍तीच्या आंतरिक बदलाला नव्हे, तर देवाच्या नजरेत तिच्या बदललेल्या स्थितीला सूचित करतात. . . . हे रूपक असे चित्र डोळ्यांसमोर उभे करते, जणू एका व्यक्‍तीला अनीतिमत्त्वाच्या अपराधासाठी देवाच्या न्यायालयात आणण्यात आले आहे; पण, न्यायाधीश या नात्याने देव त्या व्यक्‍तीच्या पक्षाने निर्णय देतो, म्हणजेच देव त्याला निर्दोष ठरवतो.”

१०. येशूने असे काय केले ज्याच्या आधारावर मानवांना नीतिमान ठरवले जाणे शक्य झाले?

१० ‘सर्व जगाचा न्याय करणारा न्यायाधीश’ कोणत्या आधारावर एका अनीतिमान व्यक्‍तीला निर्दोष घोषित करू शकतो? (उत्प. १८:२५) मानवांना नीतिमान ठरवणे शक्य व्हावे म्हणून यहोवाने पाऊल उचलले. त्याने प्रेमळपणे आपला एकुलता एक पुत्र पृथ्वीवर पाठवला. पृथ्वीवर असताना येशूवर अनेक प्रलोभने आली, लोकांनी त्याची खूप थट्टा केली व त्याच्याशी दुर्व्यवहार केला. तरीसुद्धा, त्याने आपल्या पित्याची इच्छा तंतोतंत पूर्ण केली. वधस्तंभावरील मरण पत्करण्याइतपत त्याने आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली. (इब्री २:१०) आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान देऊन, येशूने अशी एक खंडणी दिली जिच्याद्वारे आदामाच्या वंशजांची पाप व मृत्यूतून मुक्‍ती किंवा सुटका होणे शक्य होणार होते.—मत्त. २०:२८; रोम. ५:६-८.

११. खंडणी कोणत्या समतुल्य गोष्टीवर आधारित आहे?

११ दुसऱ्‍या एका ठिकाणी, प्रेषित पौलाने येशूने दिलेल्या बलिदानाचे वर्णन “समतुल्य खंडणी” असे केले. (१ तीम. २:६, NW) त्यात समतुल्य असे काय होते? आदामाने कोट्यवधी लोकांवर म्हणजे त्याच्या सर्व वंशजांवर अपरिपूर्णता व मरण आणले. हे खरे आहे, की येशू एक परिपूर्ण मनुष्य असल्यामुळे कोट्यवधी परिपूर्ण वंशजांचा पिता होऊ शकला असता. * त्यामुळे, आपली अशी समज होती, की येशूचे जीवन व त्याच्या सर्व संभाव्य परिपूर्ण वंशजांचे जीवन हे आदामाने व त्याच्या सर्व वंशजांनी गमावलेल्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या तुल्य होते. पण, येशूची संभाव्य संतती खंडणीचा भाग बनली असे बायबल म्हणत नाही. रोमकर ५:१५-१९ मध्ये म्हटले आहे, की केवळ ‘एका मानवाच्या’ मृत्यूद्वारे सुटका शक्य झाली. होय, येशूचे परिपूर्ण जीवन आदामाच्या परिपूर्ण जीवनाशी समतुल्य होते. तेव्हा, येशू ख्रिस्त हाच केंद्रबिंदू आहे व तोच असलाही पाहिजे. येशूच्या “नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने [“एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे,” पं.र.भा.]” म्हणजे तो मृत्यूपर्यंत देवाला आज्ञाधारक व एकनिष्ठ राहिल्यामुळे सर्व मानवांना खंडणीची मोफत देणगी व जीवन मिळणे शक्य झाले. (२ करिंथ. ५:१४, १५; १ पेत्र ३:१८) पण, हे कसे शक्य झाले?

खंडणीच्या आधारावर निर्दोष ठरवले जाणे

१२, १३. ज्यांना नीतिमान घोषित केले जाते त्यांना देवाच्या दयेची व प्रेमाची गरज का आहे?

१२ यहोवा देवाने आपल्या पुत्राचे खंडणी बलिदान स्वीकारले. (इब्री ९:२४; १०:१०, १२) तरीपण, पृथ्वीवर असलेले येशूचे शिष्य व विश्‍वासू प्रेषित अजूनही अपरिपूर्ण होते. त्यांनी वाईट गोष्टी न करण्याचा जिवापाड प्रयत्न केला असला, तरीसुद्धा ते नेहमीच यशस्वी झाले असे नाही. का नाही? कारण त्यांना आनुवंशिकतेने पाप मिळाले होते. (रोम. ७:१८-२०) पण, याविषयी यहोवा काहीतरी करू शकत होता आणि त्याने ते केलेही. त्याने “समतुल्य खंडणी” स्वीकारली व ती खंडणी आपल्या मानवी सेवकांवर लागू करण्यास तो इच्छुक होता.

१३ प्रेषितांनी व इतरांनी जीवनात काही चांगली कामे केली होती म्हणून देव त्यांच्यावर खंडणी लागू करण्यास बांधील होता असे नाही. या उलट, त्याने आपल्या दयेमुळे व अपार प्रेमामुळे प्रवृत्त होऊन त्यांच्यावर खंडणी लागू केली. प्रेषित व इतर जण, आनुवंशिकतेने मिळालेल्या पापासाठी दोषी नाहीत असे मानून त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या न्यायदंडातून देवाने त्यांची निर्दोष सुटका करण्याचे ठरवले. ही गोष्ट, पौलाने स्पष्ट केली. त्याने म्हटले: “कारण कृपेनेच विश्‍वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे.”—इफिस. २:८.

१४, १५. देवाने ज्यांना निर्दोष ठरवले होते त्यांना कोणते बक्षिस मिळण्याची आशा होती, आणि असे असले तरी त्यांना काय करण्याची गरज होती?

१४ एका व्यक्‍तीला आनुवंशिकतेने मिळालेल्या पापाची व त्याने केलेल्या अपराधांची क्षमा सर्वसमर्थ देव करतो ही किती मोठी देणगी आहे याचा विचार करा! ख्रिस्ती बनण्याआधी एका व्यक्‍तीने किती पापे केली असतील त्याची गणनासुद्धा तुम्ही करू शकत नाही. तरीसुद्धा, खंडणीच्या आधारावर देव त्या सर्व पापांची क्षमा करू शकतो. पौलाने लिहिले: “ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले.” (रोम. ५:१६) ज्या प्रेषितांना व इतरांना ही प्रेमळ देणगी (नीतिमान ठरवले जाणे) मिळाली होती त्यांनी विश्‍वासाने खऱ्‍या देवाची उपासना करत राहायचे होते. त्याबद्दल भविष्यात त्यांना कोणते बक्षिस मिळणार होते? “जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्‍याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करितील.” खरेच, नीतिमत्त्वाच्या देणगीमुळे, आदामाने केलेल्या पापाच्या अगदी उलट परिणाम घडून येतात. या देणगीमुळे जीवन प्राप्त होते.—रोम. ५:१७; लूक २२:२८-३० वाचा.

१५ ज्यांना ही देणगी प्राप्त होते म्हणजे जे नीतिमान ठरवले जातात ते देवाचे आध्यात्मिक पुत्र बनतात. ते ख्रिस्ताच्या सोबतीचे सहवारस असल्यामुळे, त्यांना आत्मिक पुत्र या नात्याने स्वर्गीय जीवनाचे पुनरुत्थान होण्याची व येशू ख्रिस्ताबरोबर ‘राज्य करण्याची’ आशा आहे.रोमकर ८:१५-१७, २३ वाचा.

देव इतरांनाही प्रेम दाखवतो

१६. पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणाऱ्‍यांना आजसुद्धा कोणती देणगी मिळू शकते?

१६ देवावर विश्‍वास ठेवणारे व एकनिष्ठ ख्रिस्ती या नात्याने त्याची सेवा करणारे सर्वच जण स्वर्गात ख्रिस्तासोबत ‘राज्य करण्याची’ अपेक्षा करत नाहीत. ख्रिस्तपूर्व काळातील देवाच्या सेवकांना बायबलवर आधारित एक आशा होती आणि आज अनेकांना तीच आशा आहे. ते पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जीवन जगण्याची आशा बाळगतात. त्यांना देवाकडील ही प्रेमळ देणगी आजसुद्धा मिळू शकते का व पृथ्वीवरील जीवन मिळवण्यास ते नीतिमान ठरवले जाऊ शकतात का? पौलाने रोमकरांस जे लिहिले त्याच्या आधारावर या प्रश्‍नाचे आश्‍वासक उत्तर आहे, ‘होय’!

१७, १८. (क) अब्राहामाच्या विश्‍वासामुळे देवाने त्याला कसे गणले? (ख) यहोवा कोणत्या आधारावर अब्राहामाला नीतिमान गणू शकला?

१७ या बाबतीत पौलाने एक प्रमुख उदाहरण दिले. ते म्हणजे अब्राहामाचे. यहोवाने इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र देण्याआधी व ख्रिस्ताने स्वर्गीय जीवनाचा मार्ग मोकळा करण्याच्या कितीतरी काळाआधी हा विश्‍वासू पुरुष जगत होता. (इब्री १०:१९, २०) त्याच्याविषयी बायबल म्हणते: “तू जगाचा वारीस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्‍वासामुळे प्राप्त होणाऱ्‍या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.” (रोम. ४:१३; याको. २:२३, २४) त्यामुळे देवाने विश्‍वासू अब्राहामाला नीतिमान गणले.रोमकर ४:२०-२२ वाचा.

१८ याचा अर्थ, अनेक दशके यहोवाची सेवा करत असताना अब्राहामाने कधीच पाप केले नाही असा नाही. तो या अर्थाने नीतिमान नव्हता. (रोम. ३:१०, २३) पण, अमर्याद बुद्धी असलेल्या यहोवाने अब्राहामाचा उल्लेखनीय विश्‍वास व त्या विश्‍वासामुळे त्याने केलेली कार्ये विचारात घेतली. अब्राहामाने खासकरून, त्याच्या वंशावळीतून येणाऱ्‍या प्रतिज्ञात ‘संततीवर’ विश्‍वास प्रदर्शित केला. ती संतती मशीहा किंवा ख्रिस्त असल्याचे सिद्ध झाले. (उत्प. १५:६; २२:१५-१८) म्हणूनच, सर्वश्रेष्ठ न्यायाधीश, यहोवा देव ‘ख्रिस्त येशूने भरलेल्या खंडणीच्या’ आधारावर गतकाळात घडलेल्या पापांची क्षमा करू शकतो. त्यामुळेच, अब्राहामाला व ख्रिस्तपूर्व काळातील देवाच्या इतर सेवकांना पुनरुत्थानाची आशा आहे.रोमकर ३:२४, २५ वाचा; स्तो. ३२:१, २.

आजसुद्धा नीतिमान गणले जाणे

१९. देवाने अब्राहामाला नीतिमान गणले ही गोष्ट आज अनेकांना दिलासा देणारी का आहे?

१९ प्रेमळ देव यहोवाने अब्राहामाला नीतिमान गणले ही गोष्ट आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना दिलासा देणारी आहे. यहोवा काही लोकांना, “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” होण्यासाठी आत्म्याने अभिषिक्‍त करून नीतिमान ठरवतो, त्या अर्थाने त्याने अब्राहामाला नीतिमान ठरवले नाही. ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असलेल्या लोकांच्या या मर्यादित संख्येला, “पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले” आहे व “देवाचे पुत्र” म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे. (रोम. १:१; ८:१४, १७, ३३) या उलट, अब्राहामाला “देवाचा मित्र” म्हटले गेले—आणि तेही खंडणी बलिदान दिले जाण्याच्या आधी. (याको. २:२३; यश. ४१:८) तर मग, पृथ्वीवर पुनःस्थापित होणाऱ्‍या नंदनवनात जगण्याची आशा असलेल्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांविषयी काय म्हणता येईल?

२०. आज देव ज्यांना अब्राहामासारखे नीतिमान गणतो त्यांच्याकडून तो काय अपेक्षा करतो?

२० या ख्रिश्‍चनांना, “ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्‍तीच्या द्वारे” स्वर्गीय जीवन मिळण्यासाठी “नीतिमत्त्वाचे दान” मिळालेले नाही. (रोम. ३:२४; ५:१५, १७) तरीसुद्धा, ते देवावर व त्याच्या तरतुदींवर गाढ विश्‍वास प्रदर्शित करतात आणि आपला हा विश्‍वास चांगल्या कार्यांतून दाखवतात. यांपैकी एक कार्य म्हणजे, ‘देवाच्या राज्याची घोषणा करणे आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवणे.’ (प्रे. कृत्ये २८:३१) म्हणूनच, यहोवाने ज्या अर्थाने अब्राहामाला नीतिमान गणले होते, त्या अर्थाने तो यांनाही नीतिमान गणू शकतो. यांना मिळणारी देणगी—देवासोबतची मैत्री—अभिषिक्‍त जनांना मिळणाऱ्‍या ‘दानापेक्षा’ वेगळी आहे. असे असले, तरी ते कृतज्ञ अंतःकरणाने ही देणगी स्वीकारतात.

२१. यहोवाच्या प्रेमामुळे व न्यायामुळे आपल्याला कोणते फायदे मिळतात?

२१ तुम्ही पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची आशा बाळगत असाल, तर तुम्ही हे आठवणीत ठेवले पाहिजे, की तुम्हाला ही सुसंधी एका मानवी शासकाने केलेल्या एखाद्या लहरी कृतीमुळे नव्हे, तर या विश्‍वाच्या सार्वभौम अधिपतीच्या बुद्धिमान उद्देशामुळे प्राप्त झाली आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाने क्रमाक्रमाने पावले उचलली. ही पावले, त्याच्या खऱ्‍या न्यायाशी सुसंगत आहेत. त्याहून अधिक म्हणजे, देवाने उचललेल्या पावलांवरून त्याचे अपार प्रेम प्रकट झाले आहे. म्हणूनच पौल म्हणू शकला: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.”—रोम. ५:८.

[तळटीप]

^ उदाहरणार्थ, वंशज किंवा संतती याच्याशी संबंधित असलेला तो दृष्टिकोन टेहळणी बुरूज १५ मार्च २०००, पृष्ठ ४, परिच्छेद ४ मध्ये, तसेच इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड २, पृष्ठ ७३६, परिच्छेद ४ व ५ मध्ये देण्यात आला होता.

तुम्हाला आठवते का?

• आदामाच्या वंशजांना आनुवंशिकतेने काय मिळाले आणि त्याचा काय परिणाम झाला?

• समतुल्य खंडणी कशा प्रकारे देण्यात आली आणि कोणत्या अर्थी ती समतुल्य होती?

• नीतिमान ठरवले जाण्याच्या देणगीमुळे तुम्हाला कोणती आशा मिळाली आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

परिपूर्ण मनुष्य आदामाने पाप केले. परिपूर्ण मनुष्य येशूने “समतुल्य खंडणी” दिली

[१५ पानांवरील चित्र]

येशूच्या मार्फत आपण नीतिमान गणले जाऊ शकतो ही खरोखरच सुवार्ता आहे!