देवाच्या वचनाच्या अभ्यासातून तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो का?
देवाच्या वचनाच्या अभ्यासातून तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो का?
लरेन म्हणते, “मी बायबलचं नियमित वाचन सुरू केलं तेव्हा त्यातून आनंद मिळण्याऐवजी खरंतर मला ते कंटाळवाणं वाटायचं. वाचलेलं चटकन समजत नसल्यामुळे बऱ्याचदा माझं लक्ष भरकटायचं.”
इतरही काही जण कबूल करतात की जेव्हा त्यांनी बायबल वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ते फारसे आवडत नव्हते. तरीपण, पवित्र शास्त्र वाचणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बायबलचे वाचन सुरू ठेवले. मार्क म्हणतो: “आपण बरेचदा इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन, बायबल वाचन आणि व्यक्तिगत अभ्यास यांकडे दुर्लक्ष करतो. बायबल वाचनाला माझ्या दिनक्रमाचा भाग बनवणं मला शक्य झालं ते केवळ वारंवार प्रार्थना आणि बराच प्रयत्न केल्यामुळे.”
तर मग, देवाच्या वचनाबद्दल, बायबलबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्याचे वाचन आनंददायक बनवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? पुढे सुचवलेल्या काही गोष्टींवर विचार करा.
ध्येये आणि पद्धती
बायबल वाचायला बसता तेव्हा प्रार्थनाशील मनोवृत्ती बाळगा व मन एकाग्र करा. यहोवाला मदतीची विनंती करा, जेणेकरून तुमच्या मनात त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण होईल. तुमचे मन व हृदय ग्रहणशील बनवण्याची त्याला विनवणी करा, ज्यामुळे त्याचा बोध तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. (स्तो. ११९:३४) अशी मनोवृत्ती न बाळगल्यास, काही वेळातच बायबल अभ्यास तुम्हाला अगदी रटाळ वाटू लागेल आणि तो मध्येच थांबवावासा वाटेल. लिन म्हणते: “कधीकधी मी फारच घाईघाईत वाचते, त्यामुळे बऱ्याच छानछान मुद्द्यांकडे माझं लक्षच जात नाही. कित्येकदा तर मुख्य मुद्देदेखील मला पूर्णपणे समजत नाहीत. पण आत्मसंयम बाळगता यावा म्हणून मी प्रार्थना करते आणि यामुळे मला लक्ष एकाग्र करणं शक्य होतं.”
जे शिकता त्याचे महत्त्व ओळखा. बायबलमधील सत्यांचे अवलंबन करणे तुमच्याकरता जीवनदायक ठरू शकते हे आठवणीत असू द्या. तेव्हा, व्यवहारात उपयोग करता येण्याजोगे मुद्दे शोधण्याचा आणि ते उपयोगात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. ख्रिस म्हणतो, “अभ्यास करताना मी असे मुद्दे शोधत असतो की जे मला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील अयोग्य मनोवृत्ती व चुकीच्या इच्छा-आकांक्षा ओळखण्यास मदत करू शकतील. बायबल किंवा आपल्या संस्थेच्या प्रकाशनांचे लेखक व्यक्तिशः मला कधीही भेटलेले नसले, तरीही त्यांनी लिहिलेली माहिती खास माझ्याकरता उपयोगी ठरते हे पाहून मला नवल वाटतं.”
साध्य करता येण्याजोगी ध्येये ठेवा. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांपैकी बऱ्याच व्यक्तींबद्दल अतिशय मनोवेधक माहिती तुम्हाला इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स किंवा वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स यांतून मिळू शकेल. बायबलमधील स्त्रीपुरुषांना जेव्हा तुम्ही विशिष्ट व्यक्तिमत्त्व व भावना असलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्ती म्हणून ओळखू लागाल तेव्हा त्यांच्याबद्दलच्या माहितीची तुमच्या मनावर अधिक गहिरी छाप पडेल.
शास्त्रवचनांच्या साहाय्याने कोणत्या नवीन पद्धतीने युक्तिवाद करता येईल याचा विचार करा. (प्रे. कृत्ये १७:२, ३) सोफिया हेच उद्दिष्ट समोर ठेवून अभ्यास करते. ती सांगते, “बायबलमधील सत्ये सेवाकार्यात व इतर वेळी अगदी स्पष्टपणे समजावून सांगता यावीत, म्हणून तर्क करण्याच्या नवनवीन पद्धती शिकून घेण्याची व शोधून काढण्याची माझी इच्छा आहे. आणि यासाठी टेहळणी बुरूज हे अतिशय उत्कृष्ट साधन आहे.”—२ तीम. २:१५.
बायबलमधील अहवालांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. इब्री लोकांस ४:१२ म्हणते, ‘देवाचे वचन सजीव आहे.’ तेव्हा, बायबलचे वाचन करताना एखादा अहवाल अधिक अर्थपूर्ण बनवण्याकरता, त्या अहवालातील पात्रांसमोर कोणते दृश्य असेल याची कल्पना करा. त्यांना कोणते आवाज ऐकू येत असतील आणि त्यांच्या मनात त्या वेळी कोणत्या भावना असतील याची कल्पना करा. त्यांना आलेल्या अनुभवांचा तुमच्या जीवनातील परिस्थितीशी मेळ बसवण्याचा प्रयत्न करा. विशिष्ट परिस्थितीत त्यांनी जे निर्णय घेतले त्यांवरून धडे घ्या. असे केल्यामुळे बायबलमधील अहवाल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासोबतच ते आठवणीत ठेवणेही तुम्हाला सोपे जाईल.
समजायला कठीण असलेली शास्त्रवचने व स्पष्टीकरणे चांगल्या प्रकारे समजून घेता यावीत म्हणून पुरेसा वेळ द्या. प्रत्येक वेळी अभ्यासाला बसताना पुरेसा वेळ द्या. अभ्यास करताना तुमच्यासमोर काही अतिशय रोचक प्रश्न उद्भवू शकतात व त्यांसाठी तुम्हाला जास्त सखोल अभ्यास करावा लागू शकतो. अनोळखी शब्दांचा अर्थ शब्दकोशात पडताळून पाहा, तळटीपांकडे लक्ष द्या, आणि शास्त्रवचनांचे प्रतिसंदर्भ (क्रॉसरेफरेन्सेस) उघडून ते वाचा. वाचलेली माहिती तुम्हाला जितक्या चांगल्या प्रकारे समजेल आणि ती तुम्ही जितकी जास्त उपयोगात आणाल तितकाच तुम्हाला बायबलच्या अभ्यासातून जास्त आनंद मिळेल. मग तुम्हीही स्तोत्रकर्त्याप्रमाणे असे म्हणू शकाल: “तुझे [यहोवाचे] निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारिले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.”—स्तो. ११९:१११.
अभ्यासाला घेतलेले साहित्य घाईघाईने संपवण्याचा प्रयत्न करू नका. व्यक्तिगत अभ्यासासाठी तुम्ही किती वेळ देता याबद्दल वाजवी असा. यासोबतच सभांच्या तयारीसाठीही पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करा. राकेल म्हणते, “कधीकधी माझ्या मनावर इतकं दडपण असतं की मी लक्ष एकाग्र करूच शकत नाही. म्हणून एकदाच खूप वेळपर्यंत अभ्यास करण्यापेक्षा थोडा थोडा अभ्यास करणं मला जास्त हिताचं वाटतं. यामुळे मला माझ्या अभ्यासातून जास्त फायदा करून घेणं शक्य होतं.” ख्रिस सांगतो: “घाईघाईने अभ्यास केला तर माझा विवेक मला बोचू लागतो कारण वाचलेल्या माहितीतली फारच कमी माहिती माझ्या आठवणीत राहते. ती माझ्या हृदयाला स्पर्श करत नाही.” म्हणूनच, अभ्यासाला पुरेसा वेळ द्या.
देवाच्या वचनाच्या अभ्यासाची लालसा वाढवा. प्रेषित पेत्राने म्हटले: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:३) तान्ह्या बाळांना दुधाची लालसा उत्पन्न करावी लागत नाही. ती उपजतच त्यांच्यात असते. पण, देवाच्या वचनाची लालसा किंवा इच्छा आपल्याला धरावी लागते असे बायबलमध्ये सांगितले आहे. जर तुम्ही दररोज बायबलचे एक पान वाचले तर लवकरच ही लालसा तुमच्या मनात निर्माण होईल. आणि काही काळातच, जे सुरुवातीला कठीण वाटत होते ते तुम्हाला आनंददायक वाटू लागेल.
बायबलमधील उताऱ्यांवर मनन करा. वाचलेल्या माहितीवर मनन करणेदेखील अतिशय फायदेकारक ठरते. मनन केल्यामुळे तुम्ही अभ्यासलेल्या आध्यात्मिक विषयांचा एकमेकांशी संबंध जोडणे तुम्हाला शक्य होईल. लवकरच, तुमच्याजवळ आध्यात्मिक सत्यांची श्रृंखला तयार होईल, जणू मोत्यांची एक सुंदर माळच.—स्तो. १९:१४; नीति. ३:३.
तुमचा वेळ सार्थकी लागेल
अभ्यासाची चांगली सवय टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न तर करावा लागतो, पण त्यामुळे तुम्हाला असंख्य आशीर्वाद मिळतील. आध्यात्मिक विषय समजून घेण्याची तुमची क्षमता वाढेल. (इब्री ५:१२-१४) देवप्रेरित शास्त्रवचनांतून मिळवलेल्या समजबुद्धीमुळे तुम्हाला सुख, शांती व समाधान लाभेल. जे देवाच्या प्रेरित वचनातील सुबुद्धी मिळवतात आणि जीवनात तिचा उपयोग करतात त्यांच्याकरता ती “जीवनवृक्ष” ठरते.—नीति. ३:१३-१८.
देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केल्यामुळे तुमच्यात सुज्ञ हृदय उत्पन्न होईल. (नीति. १५:१४) यामुळे, इतरांना मनापासून व बायबलवर आधारित असलेला सल्ला देणे तुम्हाला शक्य होईल. जीवनात कोणतेही निर्णय घेताना, जर तुम्ही बायबलमध्ये तसेच ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांमध्ये सापडणाऱ्या माहितीची मदत घेतली, तर यहोवाच्या प्रेरित वचनामुळे मिळणारा आनंद व स्थैर्य तुम्हाला अनुभवता येईल. (मत्त. २४:४५) तुम्ही अधिक सकारात्मक, आशावादी व आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्ती बनाल. शिवाय, देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाशी जुळलेल्या सर्व गोष्टी यशस्वी ठरतील.—स्तो. १:२, ३.
तुमच्या मनात देवाबद्दलचे प्रेम वाढत जाईल, तसतशी तुम्हाला इतरांनाही आपल्या विश्वासांबद्दल सांगण्याची प्रेरणा मिळेल. हेदेखील अतिशय समाधानदायक ठरू शकते. सोफिया अशी नवनवीन शास्त्रवचने आठवणीत ठेवण्याचा व वापरण्याचा प्रयत्न करत आहे, जी घरमालकांचे लक्ष वेधून घेतील. असे करण्याद्वारे ती आपले ख्रिस्ती सेवाकार्य अधिक परिणामकारक व आनंददायक बनवू इच्छिते. ती म्हणते, “बायबलमधील शब्द वाचल्यावर लोक जी प्रतिक्रिया दाखवतात ती पाहणे हा एक अतिशय उत्साहवर्धक अनुभव आहे.”
देवाच्या वचनाच्या अभ्यासातून आनंद मिळवण्याचा सर्वात उल्लेखनीय फायदा म्हणजे यहोवा देवासोबत आपला जवळचा नातेसंबंध निर्माण होतो. बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला त्याचे नीतिनियम जाणून घेण्यास आणि त्याचे प्रेम, उदारता व न्याय यांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत मिळते. इतर कोणतेही कार्य यापेक्षा जास्त महत्त्वाचे किंवा यापेक्षा जास्त फलदायी नाही. म्हणून, पूर्णपणे तल्लीन होऊन देवाच्या वचनाचा अभ्यास करा. तुमचा वेळ नक्कीच सार्थकी लागेल.—स्तो. १९:७-११.
[५ पानांवरील चौकट/चित्रे]
देवाच्या वचनाचे वाचन: ध्येये व पद्धती
▪ बायबल वाचायला बसता तेव्हा प्रार्थनाशील मनोवृत्ती बाळगा व मन एकाग्र करा.
▪ जे शिकता त्याचे महत्त्व ओळखा.
▪ साध्य करता येण्याजोगी ध्येये ठेवा.
▪ शास्त्रवचनांच्या साहाय्याने कोणत्या नवीन पद्धतीने युक्तिवाद करता येईल याचा विचार करा.
▪ बायबलमधील अहवालांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करा.
▪ समजायला कठीण असलेली शास्त्रवचने व स्पष्टीकरणे चांगल्या प्रकारे समजून घेता यावीत म्हणून पुरेसा वेळ द्या.
▪ अभ्यासाला घेतलेले साहित्य घाईघाईने संपवण्याचा प्रयत्न करू नका.
▪ देवाच्या वचनाच्या अभ्यासाची लालसा वाढवा.
▪ बायबलमधील उताऱ्यांवर मनन करा.
[४ पानांवरील चित्र]
बायबलमधील ज्या अहवालाचे तुम्ही वाचन करत आहात त्यात स्वतःला ठेवून त्याचे दृश्य डोळ्यांसमोर उभे करा