गांभीर्याने यहोवाची सेवा करणे
गांभीर्याने यहोवाची सेवा करणे
‘सर्व गोष्टींविषयी गांभीर्य असू दे.’—तीत २:७.
१, २. जगातील पुष्कळ लोक कशामुळे जीवनाबद्दल गांभीर्याने विचार करत नाहीत, आणि यामुळे कोणते प्रश्न उद्भवतात?
आज आपण अशा एका जगात राहत आहोत जेथे लोकांना मानव इतिहासातील सगळ्यात कठीण व दुःखद अनुभवांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध नाही अशा लोकांना या ‘कठीण दिवसांचा’ सामना करणे जवळजवळ अशक्य असू शकते. (२ तीम. ३:१-५) ते स्वतःच्या बळावर प्रत्येक दिवसाचा सामना करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात त्यांना पुरेसे यश मिळत नाही. जीवनाबद्दल गांभीर्याने विचार केल्यास आपण जीवनातील आनंद गमावून बसू असा विचार करून अनेक जण तसे करण्याचे टाळतात आणि मनोरंजन, मौजमजा अशा गोष्टींना ते आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देतात.
२ जीवनातील ताणतणावांचा सामना करण्यासाठी, लोक सहसा मौजमजेच्या गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य देतात. या बाबतीत ख्रिश्चनांनी सावधगिरी बाळगली नाही, तर तेसुद्धा या जीवनशैलीत सहज अडकू शकतात. आपण हे कसे टाळू शकतो? यासाठी आपण नेहमीच गंभीर असले पाहिजे का? मौजमजा व आपल्या जबाबदाऱ्या यांमध्ये आपण समतोल कसा साधू शकतो? जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देताना, आपण जीवनाबद्दल अतिशय टोकाची भूमिका घेऊन अवाजवी चिंता करू नये म्हणून बायबलमधील कोणती तत्त्वे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात?
मौजमजेला जास्त महत्त्व देणाऱ्या जगात गंभीरपणे वागणे
३, ४. जीवनाकडे गंभीरतेने पाहणे महत्त्वाचे आहे हे समजण्यास बायबल कशा प्रकारे आपल्याला मदत करते?
३ हे जग ‘सुखविलासाच्या’ गोष्टींना अवाजवी महत्त्व देते हे सांगण्याची गरज नाही. (२ तीम. ३:४) ते मौजमजा करण्यावर जास्त भर देत असल्यामुळे, आपली आध्यात्मिकता धोक्यात येऊ शकते. (नीति. २१:१७) म्हणूनच, प्रेषित पौलाने तीमथ्याला व तीताला लिहिलेल्या पत्रांत गंभीरतेच्या विषयावरदेखील सल्ला सापडतो. आपण या सल्ल्याचे पालन केल्यास, जीवनाबद्दल गंभीरपणे विचार न करण्याच्या जगाच्या दृष्टिकोनाचा प्रतिकार करण्यास आपल्याला मदत मिळेल.—१ तीमथ्य २:१, २; तीत २:२-८ वाचा.
४ नेहमीच ऐशआरामाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, जीवनातील गंभीर गोष्टींबद्दल विचार करणे किती महत्त्वाचे आहे याबाबतीत शलमोनाने कितीतरी शतकांपूर्वी लिहिले. (उप. ३:४; ७:२-४) होय, आपले जीवन क्षणभंगुर असल्यामुळे, तारण मिळवण्यास आपण ‘नेटाने यत्न केला’ पाहिजे. (लूक १३:२४) त्यासाठी, आपण सर्व गोष्टींवर ‘गांभीर्याने’ मनन करणे गरजेचे आहे. (तीत २:७) म्हणजेच, आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक पैलूकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
५. जीवनातील कोणत्या एका पैलूकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे?
५ उदाहरणार्थ, परिश्रम करण्याच्या बाबतीत यहोवाचे व येशूचे अनुकरण करण्याद्वारे, खरे ख्रिस्ती आपल्या कामाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीकडे गांभीर्याने पाहतात. (योहा. ५:१७) म्हणून, कामाप्रती असलेल्या त्यांच्या चांगल्या दृष्टिकोनामुळे व ते भरवशालायक असल्यामुळे सहसा त्यांची प्रशंसा केली जाते. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी, खासकरून कुटुंबप्रमुख कठीण परिश्रम करण्याच्या आपल्या जबाबदारीकडे गांभीर्याने लक्ष देतात. कारण, आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण न करण्याचा अर्थ ‘विश्वास नाकारणे’ असा आहे आणि असे करणे यहोवाला नाकारण्यासारखेच आहे.—१ तीम. ५:८.
आपल्या उपासनेप्रती गंभीर, पण आनंदी दृष्टिकोन
६. यहोवाची उपासना आपण गांभीर्याने केली पाहिजे असे आपण कशावरून म्हणू शकतो?
६ यहोवा खऱ्या उपासनेला कधीही कमी लेखत नाही. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन, इस्राएल लोक यहोवाची उपासना करण्यापासून बहकले, तेव्हा त्यांना भयंकर दुष्परिणाम भोगावे लागले. (यहो. २३:१२, १३) इ.स. पहिल्या शतकात, भ्रष्ट शिकवणींमुळे आणि प्रवृत्तींमुळे खरी उपासना दूषित होऊ नये म्हणून ख्रिस्ताच्या अनुयायांना जोरदार संघर्ष करणे आवश्यक होते. (२ योहा. ७-११; प्रकटी. २:१४-१६) आजही, खरे ख्रिस्ती आपल्या उपासनेकडे गांभीर्याने पाहतात.—१ तीम. ६:२०.
७. पौलाने आपल्या सेवाकार्याची तयारी कशी केली?
७ क्षेत्र सेवेतून आपल्याला आनंद मिळतो. पण, या कार्यातील आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी चांगली पूर्वतयारी केली पाहिजे. पौलाने ज्यांना शिकवले त्यांची परिस्थिती त्याने कशा प्रकारे लक्षात घेतली याबद्दल त्याने सांगितले. त्याने लिहिले: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.” (१ करिंथ. ९:२२, २३) लोकांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यात पौलाला आनंद झाला, आणि आपल्या श्रोत्यांच्या विशिष्ट गरजा कशा प्रकारे पूर्ण करता येतील याचा त्याने गांभीर्याने विचार केला. अशा प्रकारे, तो त्यांना प्रोत्साहन व यहोवाची उपासना करण्याचे उत्तेजन देऊ शकला.
८. (क) सेवाकार्यात आपण ज्या लोकांना शिकवतो त्यांच्याबद्दल आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे? (ख) बायबल अभ्यास चालवल्याने सेवाकार्यातील आपल्या आनंदात कशा प्रकारे भर पडू शकते?
८ पौलाने त्याच्या सेवाकार्याकडे किती गांभीर्याने पाहिले? तो यहोवाचा आणि जो कोणी सत्याचा संदेश ऐकू इच्छित होता त्या सर्वांचा “दास” बनण्यास तयार होता. (रोम. १२:११; १ करिंथ. ९:१९) आपण जेव्हा देवाचे वचन लोकांना शिकवण्याची जबाबदारी स्वीकारतो—मग ती गृह बायबल अभ्यासादरम्यान असो, ख्रिस्ती सभेत असो, किंवा कौटुंबिक उपासनेत असो—तेव्हा आपण ज्यांना शिकवत आहोत त्यांच्याप्रती ही आपली जबाबदारी आहे असे आपण समजतो का? नियमितपणे बायबल अभ्यास चालवणे हे एका ओझ्यासारखे आहे असे कदाचित आपल्याला वाटेल. हे मान्य आहे, की असे करण्यासाठी आपल्याला सहसा आपल्या वैयक्तिक गोष्टींतून वेळ काढून तो वेळ इतरांना मदत करण्यासाठी द्यावा लागतो. पण, असे करणे म्हणजे “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” असे येशूने जे म्हटले होते त्याच्या सामंजस्यात नाही का? (प्रे. कृत्ये २०:३५) इतरांना वैयक्तिकपणे तारणाच्या मार्गाविषयी शिकवल्याने आपल्याला जो आनंद मिळतो त्याची तुलना इतर कोणत्याही कामाशी करता येऊ शकत नाही.
९, १०. (क) गंभीर असण्याचा अर्थ आपण मनोरंजन करू शकत नाही किंवा मौजमजा करण्यात इतरांसोबत वेळ घालवू शकत नाही असा होतो का? स्पष्ट करा. (ख) वडिलांना प्रोत्साहनदायक व मनमिळाऊ असण्यास कोणती गोष्ट मदत करेल?
९ गंभीर असण्याचा अर्थ असा होत नाही, की आपण मनोरंजन करू शकत नाही किंवा मौजमजा करण्यात आपण इतरांसोबत वेळ घालवू शकत नाही. येशूने फक्त शिकवण्यासाठीच वेळ काढला नाही, तर विश्रांती घेण्यासाठी व इतरांशी चांगले नातेसंबंध जोडण्यासाठीदेखील त्याने वेळ काढला आणि या बाबतीत त्याने आपल्याकरता सर्वोत्तम उदाहरण मांडले. (लूक ५:२७-२९; योहा. १२:१, २) गंभीर असण्याचा अर्थ असाही होत नाही, की आपल्या चेहऱ्यावर नेहमीच अतिशय गंभीर भाव असले पाहिजेत. येशू जर कडक, अतिशय गंभीर स्वभावाचा असता, तर लोक त्याच्याजवळ नक्कीच आले नसते. लहान मुलांनादेखील त्याच्याजवळ येण्यास आवडायचे. (मार्क १०:१३-१६) तर मग, समतोल राखण्याच्या बाबतीत आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो?
१० एका बांधवाने एका वडिलांबद्दल असे म्हटले: “ते स्वतःकडून जास्त अपेक्षा करतात, पण इतरांनी परिपूर्ण असावे अशी ते कधीच अपेक्षा करत नाहीत.” तुमच्या बाबतीतही असेच म्हणता येईल का? इतरांकडून काही वाजवी अपेक्षा करणे योग्य आहे. उदाहरणार्थ, आईवडील जेव्हा मुलांना पूर्ण करता येतील असे ध्येय त्यांच्यापुढे ठेवतात आणि ती ध्येये पूर्ण करण्यास त्यांना मदतही करतात तेव्हा मुले त्यांना चांगला प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे, ख्रिस्ती वडील मंडळीतील प्रत्येक सदस्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास प्रोत्साहित करू शकतात आणि ही प्रगती कशी करता येईल या बाबतीत विशिष्ट सूचना देऊ शकतात. शिवाय, मंडळीतील वडील जेव्हा स्वतःबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगतात, तेव्हा ते प्रोत्साहनदायक व मनमिळाऊ असतात; त्यामुळे इतर जण त्यांच्याजवळ जाण्यास घाबरत नाहीत. (रोम. १२:३) एका बहिणीने म्हटले: “वडिलांनी प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेऊ नये; पण ते जर नेहमीच धीरगंभीर असतील, तर त्यांच्याशी बोलायला अवघड जाते.” काही वडिलांना पाहून “खूप भीती वाटू शकते, कारण ते अतिशय गंभीर स्वभावाचे असतात,” असे एका बहिणीला वाटत असल्याचे तिने म्हटले. ज्यामुळे आपला आनंदी देव यहोवा याच्या उपासनेकरता असलेला त्याच्या सेवकांचा आनंदी दृष्टिकोन मंदावेल असे काहीही मंडळीतील वडील करू इच्छिणार नाहीत.—१ तीम. १:११.
मंडळीमध्ये जबाबदारी स्वीकारणे
११. मंडळीत ‘काम करू पाहणे’ याचा काय अर्थ होतो?
११ पौलाने जेव्हा मंडळीतील पुरुषांना मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पात्र बनण्यास परिश्रम करण्याचे प्रोत्साहन दिले, तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या पाहिजेत या हेतूने तो त्यांना प्रोत्साहन देत नव्हता. त्याऐवजी, त्याने लिहिले: “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.” (१ तीम. ३:१, ४) मंडळीत पर्यवेक्षकाचे ‘काम करू पाहणाऱ्या’ ख्रिस्ती पुरुषांनी आपल्या बांधवांची सेवा करण्यास आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण उत्पन्न करण्याकरता मेहनत करण्याची तीव्र इच्छा विकसित करणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या बांधवाचा बाप्तिस्मा होऊन कमीत कमी एक वर्ष झाले असेल आणि १ तीमथ्य ३:८-१३ मध्ये सेवा सेवकांसाठी सांगितलेल्या शास्त्रवचनीय पात्रता तो माफक प्रमाणात पूर्ण करत असेल, तर सेवा सेवक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याची शिफारस केली जाऊ शकते. ८ व्या वचनाकडे खासकरून लक्ष द्या. तेथे म्हटले आहे: “तसेच सेवकहि गंभीर असावे.”
१२, १३. मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यास पुढे येण्यासाठी तरुण बांधव कोणकोणत्या मार्गांनी प्रयत्न करू शकतात ते सांगा.
१२ तुम्ही किशोरावस्थेच्या शेवटल्या टप्प्यात असलेले बाप्तिस्माप्राप्त गंभीर तरुण आहात का? तर, मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे येण्याचे अनेक मार्ग तुमच्यापुढे आहेत. क्षेत्र सेवेत तुम्ही घेत असलेला सहभाग वाढवणे हा त्यांपैकी एक मार्ग आहे. तुम्ही असे बांधव आहात का, की ज्याला सर्वच वयोगटातील बंधुभगिनींसोबत क्षेत्र सेवेत कार्य करायला आवडते? तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बायबल अभ्यास चालवण्याचा प्रयत्न करत आहात का? ख्रिस्ती सभांमध्ये दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार, तुम्ही बायबल अभ्यास चालवता तेव्हा तुम्हाला आपले शिकवण्याचे कौशल्य विकसित करता येईल. शिवाय, जी व्यक्ती यहोवाच्या मार्गांविषयी शिकत आहे तिच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यास तुम्ही शिकाल. तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनात बदल करण्याची गरज जाणवू लागते, तेव्हा तो त्याच्या जीवनात बायबलची तत्त्वे कशी लागू करू शकतो याबद्दल त्याला धीराने व व्यवहारकुशलतेने मदत करण्यास तुम्ही शिकाल.
१३ तुम्ही तरुण बांधव, मंडळीतील वृद्ध जनांना मदत करण्यास तयार असू शकता, आणि शक्य असेल त्या मार्गाने तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुम्ही राज्य सभागृह स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यासाठीही मदत करू शकता. तुम्हाला जमेल त्या मार्गाने तुम्ही मदत करण्याची तयारी दाखवता, तेव्हा तुमच्या मदत करण्याच्या मनोवृत्तीतून तुम्ही आपल्या सेवेबद्दल गंभीर आहात हे दाखवता. तीमथ्याप्रमाणेच, तुम्हीदेखील मंडळीच्या कार्यांत पूर्ण मनाने भाग घेण्यास शिकू शकता.—फिलिप्पैकर २:१९-२२ वाचा.
१४. मंडळीत सेवा करण्यासाठी तरुण बांधव पात्र आहेत की नाही याची “पारख” कशी करता येईल?
१४ मंडळीतील वडिलांनो, जे तरुण बांधव ‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळण्याचा’ आणि “नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति, शांति,” व सोबतच इतर गंभीर गुण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना कामास लावण्यासाठी जागरूक असा. (२ तीम. २:२२) मंडळीतील कामे त्यांच्यावर सोपवण्याद्वारे, ते जबाबदारी पेलण्यास पात्र आहेत की नाही याची “पारख” होऊ शकते, जेणेकरून त्यांची “प्रगती सर्वांस दिसून” येईल.—१ तीम. ३:१०; ४:१५.
मंडळीत आणि कुटुंबात गंभीरपणा दाखवणे
१५. पहिले तीमथ्य ५:१, २ ही वचने लक्षात घेऊन, आपण गंभीर आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
१५ गंभीर असण्यात आपल्या बंधुभगिनींचा आदर करणेदेखील समाविष्ट आहे. पौलाने तीमथ्याला जो सल्ला दिला त्यात त्याने, इतरांचा आदर करण्याच्या गरजेबद्दल सांगितले. (१ तीमथ्य ५:१, २ वाचा.) विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत व्यवहार करताना असे करणे विशेषकरून महत्त्वाचे आहे. ईयोबाने स्त्रियांचा आदर करण्याबद्दल, खासकरून, त्याच्या पत्नीचा आदर करण्याबद्दल जे उदाहरण मांडले त्याचे आपण अनुकरण करू शकतो. इतर स्त्रियांकडे कामेच्छेने न पाहण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला. (ईयो. ३१:१) आपण आपल्या बंधुभगिनींबद्दल गंभीर असल्यास, आपण त्यांच्यासोबत इश्कबाजी करणार नाही किंवा आपल्यासोबत असताना आपल्या बंधुभगिनींना अवघडल्यासारखे वाटेल असे काहीही करणार नाही. खासकरून, लग्न करण्याच्या इच्छेने एकमेकांना भेटणाऱ्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एक गंभीर ख्रिस्ती व्यक्ती, विरुद्धलिंगी व्यक्तीच्या भावनांशी कधीही खेळणार नाही.—नीति. १२:२२.
१६. पतीच्या व पित्याच्या भूमिकेबद्दल जगातील काहींचा दृष्टिकोन काय आहे व बायबलचा दृष्टिकोन काय आहे ते सांगा.
१६ कुटुंबातील वेगवेगळ्या भूमिका आपल्याला देवाकडून मिळालेल्या आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल गंभीर दृष्टिकोन बाळगला पाहिजे. सैतानाचे जग, पतीच्या व पित्याच्या भूमिकेची थट्टा करते. कुटुंबप्रमुख केवळ उपहासाचा व अपमानाचा विषय आहे असे मनोरंजन जगत त्याचे चित्रण करते, आणि त्यातून लोकांना आनंद मिळतो. पण, बायबल म्हणते की पती हा “पत्नीचे मस्तक” आहे आणि अशा प्रकारे ते पतींवर एक मोठी जबाबदारी सोपवते.—इफिस. ५:२३; १ करिंथ. ११:३.
१७. आपण आपल्या जबाबदाऱ्यांकडे गंभीरतेने पाहतो हे कौटुंबिक उपासनेत सहभाग घेण्याद्वारे आपण कसे दाखवू शकतो ते स्पष्ट करा.
१७ एक पती आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करत असेल. पण, जर तो कुटुंबाला आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवत नसेल, तर त्याच्यात समंजसपणा व बुद्धीची कमतरता असल्याचे तो दाखवत असतो. (अनु. ६:६, ७) त्यामुळेच, १ तीमथ्य ३:४ म्हणते की जर तुम्ही एक कुटुंबप्रमुख असून, तुम्ही मंडळीत अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळवण्याची आकांक्षा धरत असाल, तर तुम्ही ‘आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालविणारे, पूर्ण गंभीरपणाने आपल्या मुलांना स्वाधीन राखणारे असे’ पुरुष असले पाहिजेत. (१ तीम. ३:४, पं.र.भा.) या बाबतीत स्वतःला असे विचारा, ‘मी कुटुंबात नियमितपणे कौटुंबिक उपासना चालवण्यासाठी वेळ काढतो का?’ कुटुंबात आध्यात्मिक गोष्टींत पुढाकार घेण्यासाठी काही ख्रिस्ती पत्नींना आपल्या पतींजवळ अक्षरशः याचना करावी लागते. या जबाबदारीकडे एक पती कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो त्याकडे त्याने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अर्थातच, कौटुंबिक उपासना यशस्वी होण्यासाठी एका ख्रिस्ती पत्नीने या व्यवस्थेला पाठिंबा दिला पाहिजे व आपल्या पतीला सहकार्य केले पाहिजे.
१८. लहान मुले गंभीर असण्यास कसे शिकू शकतात?
१८ जीवनाबद्दल मुलांनीदेखील गंभीर दृष्टिकोन बाळगला पाहिजे असे प्रोत्साहन त्यांना दिले जाते. (उप. १२:१) मुलांनी परिश्रम करण्यास आणि आपले वय व क्षमता यांनुसार घरातील लहान-सहान कामे करण्यास शिकण्यात काहीच वावगे नाही. (विलाप. ३:२७) दावीद राजा लहान वयातच एक उत्तम मेंढपाळ बनला होता. तो एक संगीतकार व गीतकारदेखील बनला. या कौशल्यांमुळे त्याला इस्राएलच्या राजासमोर सेवा करण्याची संधी मिळाली. (१ शमु. १६:११, १२, १८-२१) दावीद लहान होता तेव्हा तो एक खेळकर मुलगा होता; पण, तो मौल्यवान कौशल्येदेखील शिकला, ज्यांचा उपयोग नंतर त्याने यहोवाची स्तुती करण्यासाठी केला. मेंढपाळ या नात्याने त्याच्याजवळ असलेल्या कौशल्यांमुळे त्याला धीराने इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी मदत मिळाली. तरुण मुलांनो, आपल्या सृष्टिकर्त्याची सेवा करण्यास आणि भविष्यातील जबाबदाऱ्या हाताळण्यास तुम्हाला मदत करतील अशी कोणती उपयुक्त कौशल्ये शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात?
संतुलित दृष्टिकोन बाळगणे
१९, २०. तुम्ही स्वतःबद्दल व तुमच्या उपासनेबद्दल कोणता संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचा दृढ निर्धार केला आहे?
१९ आपण सर्वच जण स्वतःबद्दल एक संतुलित दृष्टिकोन बाळगू शकतो आणि अतिशय गंभीर असण्याचे टाळू शकतो. आपण “फाजील धार्मिक” होऊ इच्छित नाही. (उप. ७:१६) घरात, कामाच्या ठिकाणी, किंवा आपल्या बंधुभगिनींशी व्यवहार करताना निर्माण झालेला तणाव थोड्याफार विनोदामुळे दूर होऊ शकतो. अतिशय टीकात्मक असल्यास घरातील शांतीपूर्ण वातावरण भंग होऊ शकते. म्हणून, कुटुंबातील सदस्यांनी या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. मंडळीत, सर्वच जण हसण्यास व एकमेकांच्या सहवासात आनंद करण्यास शिकू शकतात. आणि ज्यामुळे इतरांची उन्नती होईल अशा प्रकारे आपले संभाषण व शिकवण्याची पद्धत सकारात्मक ठेवू शकतात.—२ करिंथ. १३:१०; इफिस. ४:२९.
२० आपण अशा एका जगात राहत आहोत जेथे लोक यहोवाबद्दल किंवा त्याच्या नियमांबद्दल गंभीर दृष्टिकोन बाळगत नाहीत. त्यांच्या अगदी उलट, यहोवाचे लोक मात्र त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास व आपल्या देवाला एकनिष्ठ राहण्यास प्रयत्नशील असतात. जे लोक “पूर्ण गंभीरपणाने” यहोवाची उपासना करतात अशा एका मोठ्या समूहाचा आपण भाग आहोत ही किती आनंदाची गोष्ट आहे! तर मग, आपण आपल्या जीवनाबद्दल व आपल्या उपासनेबद्दल गंभीर दृष्टिकोन बाळगण्याचा दृढ निर्धार करू या.
तुमचे उत्तर काय असेल?
• जीवनाबद्दल गंभीरपणे विचार न करण्याच्या जगाच्या दृष्टिकोनाचा प्रतिकार आपण का केला पाहिजे?
• आपण आपल्या सेवा कार्याबद्दल आनंदी असण्यासोबतच गंभीर कसे असू शकतो?
• आपण आपल्या जबाबदाऱ्यांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावरून कसे दिसते की आपण गंभीर आहोत की नाही?
• आपल्या बंधुभगिनींचा व कुटुंबातील सदस्यांचा आदर करणे ही एक गंभीर बाब का आहे हे स्पष्ट करा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चित्रे]
पतीने आपल्या कुटुंबाच्या भौतिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत