धावा करणाऱ्यांना कोण सोडवू शकेल?
धावा करणाऱ्यांना कोण सोडवू शकेल?
‘हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन दे. कारण धावा करणाऱ्या दरिद्र्याला तो सोडवील.’—स्तो. ७२:१, १२.
१. देवाने दाविदाला दाखवलेल्या करुणेवरून आपण काय शिकतो?
किती दिलासा देणारे आहेत हे शब्द! बहुधा प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाने हे शब्द लिहिले असावेत. ते लिहिण्याच्या कितीतरी वर्षांआधी, दाविदाने बथशेबासोबत केलेल्या व्यभिचारामुळे त्याचे मन त्याला खात होते. त्या वेळी, दाविदाने देवाला अशी याचना केली: “तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. . . . माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. . . . पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तो. ५१:१-५) पण, आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्याला वारशाने मिळालेली पापी प्रवृत्ती विचारात घेऊन यहोवा आपल्याशी व्यवहार करतो.
२. स्तोत्र ७२ आपल्याला कसे साहाय्य करू शकते?
२ यहोवाला आपल्या दैन्यावस्थेची जाणीव आहे. पण पूर्वभाकीत केल्याप्रमाणे, देवाचा अभिषिक्त राजा ‘धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, यांना सोडवील. दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.’ (स्तो. ७२:१२, १३) हे कशा प्रकारे केले जाईल? याचे उत्तर ७२ व्या स्तोत्रात आपल्याला मिळते. हे स्तोत्र दाविदाचा पुत्र शलमोन याच्या राज्याधिकाराबद्दल असून, देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त कशा प्रकारे मानवजातीच्या दुःखाचे निवारण करेल याची पूर्वझलक या स्तोत्रातून मिळते.
ख्रिस्ताच्या शासनाची पूर्वझलक
३. शलमोनाने कोणता वर मागितला, आणि देवाने त्याला काय दिले?
३ वयोवृद्ध दाविदाने, शलमोनाला राजा बनवले जावे असे सांगितल्यानंतर, त्याला काही खास सूचना दिल्या आणि शलमोनाने त्यांचे काटेकोरपणे पालन केले. (१ राजे १:३२-३५; २:१-३) नंतर, यहोवाने स्वप्नात शलमोनाला दर्शन देऊन त्याला म्हटले: “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.” शलमोनाने देवाजवळ केवळ एकच विनंती केली: “आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाइटाचा विवेक करिता येईल.” शलमोनाने अशी नम्र विनंती केली म्हणून त्याने जे मागितले ते देवाने त्याला दिले, किंबहुना त्याहूनही अधिक दिले.—१ राजे ३:५, ९-१३.
४. शलमोनाच्या काळात राज्य करणाऱ्या एका राणीने त्याच्या शासनाचे वर्णन कशा प्रकारे केले?
४ यहोवाच्या आशीर्वादाने शलमोनाचा शासनकाळ शांती व समृद्धीचा सर्वात उल्लेखनीय काळ ठरला. आजवर कोणत्याही शासनाधीन मानवजातीला असा काळ अनुभवायला मिळाला नाही. (१ राजे ४:२५) शलमोन आपला राज्यकारभार कसा चालवतो हे पाहायला अनेक लोक यायचे. शबाची राणी देखील आपल्या लवाजम्यासोबत त्याचा राज्यकारभार पाहायला आली होती. तिने शलमोनाला असे सांगितले: “आपली करणी व ज्ञान याविषयीची जी कीर्ति मी आपल्या देशी ऐकली ती खरी आहे. . . . आता पाहत्ये तो माझ्या कानी आले ते अर्धेहि नव्हते. आपले शहाणपण व समृद्धि ह्यांची कीर्ति झाली आहे तीहून ती अधिक आहेत.” (१ राजे १०:१, ६, ७) पण, येशूने शलमोनापेक्षा कितीतरी पटीने अधिक बुद्धिमत्ता दाखवली होती. म्हणूनच, तो उचितपणे स्वतःबद्दल असे म्हणू शकला: “पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.”—मत्त. १२:४२.
थोर शलमोनाच्या शासनाखाली मिळणारे आशीर्वाद
५. स्तोत्र ७२ मध्ये कशाबद्दल सांगितले आहे आणि त्यातून कशाची पूर्वझलक मिळते?
५ थोर शलमोनाच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या शासनाखाली मानवजातीला कोणकोणते आशीर्वाद मिळतील हे जाणून घेण्यासाठी आता आपण ७२ व्या स्तोत्रातील वैशिष्ट्यांचे परीक्षण करू या. (स्तोत्र ७२:१-४ वाचा.) “शांतीचा अधिपति” असलेल्या आपल्या पुत्राच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या ‘सत्तेबद्दल’ यहोवाला कसे वाटते हे या स्तोत्रात सांगितले आहे. (यश. ९:६, ७) देवाच्या मार्गदर्शनाखाली थोर शलमोन ‘दीनांना न्याय’ देईल आणि “दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण” करेल. त्याच्या शासनात सर्वत्र शांती व नीतिमत्ता असेल. येशू पृथ्वीवर होता तेव्हा, भविष्यातील त्याचे हजार वर्षांचे शासन काय साध्य करेल याची पूर्वझलक त्याने दाखवली.—प्रकटी. २०:४.
६. येशूने देवाच्या राज्यात मिळणाऱ्या आशीर्वादांची कोणती पूर्वझलक दाखवली?
६ स्तोत्र ७२ च्या पूर्णतेत, येशू ख्रिस्त मानवजातीसाठी काय करेल याची पूर्वझलक देणाऱ्या त्याच्या काही कार्यांचा विचार करा. दुःखाने पीडित असलेल्या लोकांविषयी त्याला किती कळवळा होता हे जाणून आपण प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. (मत्त. ९:३५, ३६; १५:२९-३१) उदाहरणार्थ, कुष्ठरोगाने ग्रस्त असलेला एक माणूस येशूजवळ येऊन त्याला असे म्हणाला: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” येशूने म्हटले: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि तो मनुष्य बरा झाला! (मार्क १:४०-४२) नंतर, येशू एका विधवेला भेटला जिचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता. येशूला “तिचा कळवळा आला” व त्याने मुलाला म्हटले “ऊठ!” आणि मुलगा उठला. होय, तो पुन्हा जिवंत झाला!—लूक ७:११-१५.
७, ८. येशूला बरे करण्याची शक्ती मिळाली होती याची काही उदाहरणे सांगा.
७ यहोवाने येशूला चमत्कार करण्याची शक्ती दिली होती. ही गोष्ट, ‘रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेल्या एका स्त्रीच्या’ उदाहरणावरून दिसून येते. “तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते.” पण, तिचा रोग बरा होण्याऐवजी आणखीनच बळावला होता. त्या स्त्रीने लोकांच्या गर्दीत शिरून येशूला स्पर्श केला. असे करण्याद्वारे खरेतर तिने, ‘रक्तस्राव होत असलेल्या’ स्त्रीच्या बाबतीत नियमशास्त्रात दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन केले होते. (लेवी. १५:१९, २५) त्या क्षणी आपल्यामधून शक्ती निघाल्याचे येशूला जाणवले आणि आपल्याला कोणी स्पर्श केला असे त्याने विचारले. त्यावर त्या स्त्रीने ‘भीत भीत व कापत कापत त्याच्या पाया पडून त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला.’ यहोवाने तिला बरे केले आहे हे ओळखून येशू तिच्याशी दयाळूपणे वागला आणि म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”—मार्क ५:२५-२७, ३०, ३३, ३४.
८ देवाकडून मिळालेल्या शक्तीच्या बळावर येशूने रोग्यांना बरे तर केलेच, पण त्याने केलेले हे चमत्कार पाहून लोकांच्या मनावर जबरदस्त प्रभावही पडला असेल. उदाहरणार्थ, डोंगरावरील सुप्रसिद्ध प्रवचन देण्याआधी येशूने लोकांना कसे बरे केले होते हे पाहून लोक थक्क झाले असतील यात शंका नाही. (लूक ६:१७-१९) येशू हाच मशीहा आहे याची खातरी करण्यासाठी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने आपल्या दोन शिष्यांना पाठवले, तेव्हा येशू ‘पुष्कळ लोकांस रोग, पीडा व वाईट आत्मे यांपासून मुक्त करत असल्याचे’ त्यांनी स्वतः पाहिले. येशूने मग त्या दोघा शिष्यांना म्हटले: “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.” (लूक ७:१९-२२) ही बातमी ऐकून योहानाला किती दिलासा मिळाला असेल!
९. येशूने केलेल्या चमत्कारांतून कशाची पूर्वझलक मिळाली?
९ हे खरे आहे की पृथ्वीवरील आपल्या सेवा कार्यादरम्यान येशूने लोकांच्या दुःखाचे निवारण केले ते केवळ तात्पुरते होते. कारण, त्याने ज्यांना बरे केले होते किंवा पुन्हा जिवंत केले होते ते नंतर मरण पावले. तरीसुद्धा, पृथ्वीवर असताना येशूने केलेल्या चमत्कारांतून, मशीही शासनाखाली तो मानवजातीला सर्व दुःखातून कायमचे मुक्त करेल याची पूर्वझलक मिळाली.
लवकरच सबंध पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात!
१०, ११. (क) देवाच्या राज्यात मिळणारे आशीर्वाद किती काळ टिकतील, आणि येशू ख्रिस्ताचे शासन कसे असेल? (ख) ख्रिस्तासोबत नंदनवनात कोण असेल, आणि त्याला अनंतकाळ जगणे कसे शक्य होईल?
१० पृथ्वीवरील नंदनवनातील जीवन कसे असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र ७२:५-९ वाचा.) सूर्य व चंद्र अस्तित्वात असतील तोपर्यंत म्हणजेच सदासर्वकाळ एकमेव खऱ्या देवाचे उपासक पृथ्वीवरील नंदनवनात जीवनाचा आनंद लुटतील! येशू ख्रिस्ताचे शासन “कापलेल्या गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमि सिंचन करणाऱ्या सरींप्रमाणे” तजेला देणारे ठरेल.
११ या स्तोत्रात सांगितलेल्या आशीर्वादांची कल्पना करताना, पृथ्वीवरील नंदनवनात जगण्याच्या आशेने तुमचे मन प्रफुल्लित होत नाही का? “तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील” असे येशूने त्याच्या बाजूला वधस्तंभावर खिळलेल्या अपराध्याला सांगितले तेव्हा त्याला खरोखर अत्यानंद झाला असेल. (लूक २३:४३, NW) येशूच्या हजार वर्षांच्या राजवटीत त्या मनुष्याला पुन्हा जिवंत केले जाईल. त्याने जर ख्रिस्ताचे शासन स्वीकारले, तर त्याला परिपूर्ण आरोग्यासह पृथ्वीवर अनंतकाळ सुखाने जगणे शक्य होईल.
१२. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत, पुनरुत्थान करण्यात आलेल्या अनीतिमान लोकांना कोणती संधी दिली जाईल?
१२ थोर शलमोनाच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या शासनात, “नीतिमान उत्कर्ष” पावतील म्हणजे ते समृद्ध होतील. (स्तो. ७२:७) पृथ्वीवर असताना येशूला लोकांबद्दल खूप प्रेम व कळवळा होता आणि नवीन जगातही त्याला लोकांबद्दल असेच वाटेल. देवाने प्रतिज्ञा केलेल्या नवीन जगात, ‘अनीतिमान’ लोकांचे पुनरुत्थान केले जाईल आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्याची संधी दिली जाईल. (प्रे. कृत्ये २४:१५) अर्थात, जे देवाच्या स्तरांनुसार जगण्यास नकार देतात अशांना नवीन जगात राहून त्यातील शांती भंग करण्याची संधी दिली जाणार नाही.
१३. येशूचे राज्य किती व्यापक असेल, आणि त्यातील शांती कधीही भंग का होणार नाही?
१३ थोर शलमोनाचे राज्य सबंध पृथ्वीभर पसरलेले असेल हे पुढील शब्दांतून सूचित होते: “समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि [फरात] नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो. अरण्यातले रहिवासी त्याला नमन करोत; त्याचे वैरी धूळ चाटोत.” (स्तो. ७२:८, ९) होय, येशू ख्रिस्त सबंध पृथ्वीवर राज्य करेल. (जख. ९:९, १०) जे त्याच्या शासनाची आणि त्या शासनाखाली मिळणाऱ्या आशीर्वादांची कदर करतात ते त्याला ‘नमन करतात.’ असे करण्याद्वारे ते स्वेच्छेने स्वतःला त्याच्या अधीन करतात. दुसरीकडे पाहता, जे अपश्चात्तापीपणे पाप करत राहतात, त्यांचा जणू वयाच्या ‘शंभराव्या वर्षी’ नाश करण्यात येईल. (यश. ६५:२०) त्याअर्थी, ते ‘धूळ चाटतील.’
येशूला आपल्याबद्दल सहानुभूती आहे
१४, १५. येशूला मानवांच्या दुःखाची जाणीव आहे आणि तो ‘धावा करणाऱ्या दरिद्र्याला सोडवील’ असे आपण का म्हणू शकतो?
१४ सध्या पापी मानवजातीची अवस्था दयनीय असून तिला मदतीची अत्यंत गरज आहे. पण, आपल्याला आशा आहे. (स्तोत्र ७२:१२-१४ वाचा.) थोर शलमोनाला म्हणजे येशूला मानवांच्या अपरिपूर्ण स्थितीची जाणीव असल्यामुळे त्याला आपल्याबद्दल सहानुभूती आहे. शिवाय, येशूने नीतिमत्तेसाठी खूप काही सहन केले आणि देवाने त्याला स्वतःहून परीक्षांचा सामना करू दिला. किंबहुना, येशूला इतका भावनात्मक त्रास सहन करावा लागला की “रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता”! (लूक २२:४४) नंतर, वधस्तंभावर असताना त्याने आरोळी मारून म्हटले: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” (मत्त. २७:४५, ४६) येशूला हे सर्व सहन करावे लागले आणि सैतानाने त्याला यहोवापासून दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, तरीसुद्धा तो शेवटपर्यंत यहोवा देवाला विश्वासू राहिला.
१५ येशूला मानवांच्या दुःखाची जाणीव असल्यामुळे “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील,” याची आपण खातरी बाळगू शकतो. आपल्या पित्याप्रमाणेच येशूला देखील आपल्याबद्दल कळकळ असल्यामुळे, तो ‘दरिद्र्यांचे ऐकेल,’ ‘भग्नहृदयी जनांना बरे करेल,’ व ‘त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधेल.’ (स्तो. ६९:३३; १४७:३) येशू “सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला” असल्यामुळे, त्याला ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती’ वाटते. (इब्री ४:१५) आज येशू ख्रिस्त राजा या नात्याने स्वर्गात राज्य करत आहे आणि मानवांच्या सर्व दुःखाचे निवारण करण्यास तो उत्सुक आहे हे जाणून आपल्याला किती आनंद होतो!
१६. शलमोन आपल्या प्रजेविषयी सहानुभूती का दाखवू शकला?
१६ शलमोनाजवळ बुद्धी व समज असल्यामुळे, त्याला ‘दुबळ्यांबद्दल दया’ वाटली. शिवाय, त्याला आपल्या जीवनात अनेक दुःखद प्रसंगांचा सामना करावा लागला. शलमोनाचा भाऊ अम्नोन याने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला आणि त्यामुळे त्याचा भाऊ अबशालोम याने अम्नोनाला ठार केले. (२ शमु. १३:१, १४, २८, २९) अबशालोमाने दाविदाचे सिंहासन बळकावले, पण त्याचा कट फसला कारण यवाबाने त्याला ठार मारले. (२ शमु. १५:१०, १४; १८:९, १४) नंतर, शलमोनाचा भाऊ अदोनीया याने राजपद बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याला जर यात यश आले असते, तर त्याने शलमोनाला नक्कीच जिवे मारले असते. (१ राजे १:५) शलमोनाने यहोवाच्या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या प्रार्थनेत जे काही म्हटले त्यावरून त्याला मानवांच्या दुःखांची जाणीव होती असे म्हणता येईल. शलमोन राजाने आपल्या प्रजेविषयी अशी प्रार्थना केली: ‘आपणास होणारे क्लेश किंवा दुःख ते ओळखतात. तू [यहोवा] त्यांना क्षमा कर; प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्यास फळ दे.’—२ इति. ६:२९, ३०.
१७, १८. देवाच्या काही सेवकांना कोणत्या दुःखांचा सामना करावा लागला, आणि त्यांचा सामना करण्यास कोणत्या गोष्टीने त्यांची मदत केली?
१७ गतकाळात आलेल्या वाईट अनुभवांमुळे ‘आपल्याला दुःख’ होऊ शकते. मेरी * नावाच्या तिशीतील एका साक्षीदार बहिणीने लिहिले: “सध्या मी आनंदी असले, तरी पूर्वीच्या गोष्टी आठवल्या की स्वतःची खूप लाज व तिटकारा वाटतो. अशा वेळी मी इतकी दुःखी होते की मला अक्षरशः रडू येतं, जणू काही या सर्व गोष्टी कालपर्वाच घडल्या आहेत. मनात खोलवर बसलेल्या त्या आठवणींमुळे आजही कमीपणाच्या व अपराधीपणाच्या भावना निर्माण होतात.”
१८ आज देवाच्या अनेक सेवकांना देखील असे वाटत असेल. पण, अशा भावनांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते? मेरी म्हणते: “आज खऱ्या मित्रांच्या व मंडळीतील बंधुभगिनींच्या सहवासात मला आनंद वाटतो. तसंच, यहोवानं भविष्याबद्दल दिलेल्या अभिवचनांवर मी माझं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते. आणि मला पूर्ण खातरी आहे की तो माझं दुःख नाहीसं करून मला आनंदी जीवन देईल.” (स्तो. १२६:५) देवाने आपल्या राज्याचा राजा या नात्याने आपल्या पुत्राला नियुक्त केले आहे. या नियुक्त राजावर आपण भरवसा ठेवला पाहिजे. त्याच्याबद्दल असे पूर्वभाकीत करण्यात आले होते: “दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल.” (स्तो. ७२:१३, १४) किती दिलासा देणारे आहेत हे शब्द!
लवकरच विपुलतेचे नवीन जग
१९, २०. (क) स्तोत्र ७२ मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या राज्याद्वारे कोणत्या समस्येचे निवारण करण्यात येईल? (ख) ख्रिस्ताच्या शासनाचे श्रेय प्रामुख्याने कोणाला मिळाले पाहिजे आणि हे शासन जे साध्य करेल त्याबद्दल वैयक्तिकपणे तुम्हाला कसे वाटते?
१९ थोर शलमोनाच्या शासनाखाली देवाच्या नवीन जगात नीतिमान मानवांचे भविष्य कसे असेल याचे चित्र पुन्हा एकदा आपल्या डोळ्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करा. बायबल असे म्हणते: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.” (स्तो. ७२:१६) सहसा, डोंगरमाथ्यांवर पीक उत्पन्न केले जात नाही. त्यामुळे, पृथ्वीवर किती मुबलक प्रमाणात पीक उत्पन्न होईल यावर हे शब्द भर देतात. पृथ्वीचे उत्पन्न, शलमोनाच्या शासनकाळात विपुल पीक उत्पन्न करणाऱ्या ‘लबानोन’ प्रदेशासारखे असेल. विचार करा! भविष्यात अन्नटंचाई नसेल, कोणीही कुपोषित नसेल, कोणीही उपाशी नसेल! उलट, सर्व जण ‘मिष्टान्नाच्या मेजवानीचा’ आस्वाद घेतील.—यश. २५:६-८; ३५:१, २.
२० या सर्व आशीर्वादांचे श्रेय कोणाला मिळाले पाहिजे? प्रामुख्याने, या विश्वाचा सनातन राजा आणि सार्वभौम शासक असलेल्या यहोवा देवाला. मग, या सुंदर व दिलासादायक स्तोत्राच्या अखेरीस स्तोत्रकर्त्याने गायिले त्याप्रमाणे आपणही आनंदाने गाऊ: “त्याचे [राजा येशू ख्रिस्ताचे] नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत. परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करितो; त्याचा धन्यवाद होवो. त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन.”—स्तो. ७२:१७-१९.
[तळटीप]
^ परि. 17 नाव बदलण्यात आले आहे.
तुमचे उत्तर काय असेल?
• स्तोत्र ७२ यातून कशाची पूर्वझलक मिळते?
• थोर शलमोन कोण आहे, आणि त्याचे राज्य किती व्यापक असेल?
• स्तोत्र ७२ मध्ये सांगितलेल्या आशीर्वादांसंबंधी तुम्हाला कोणती गोष्ट विशेष आकर्षक वाटते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्र]
शलमोनाच्या राजवटीतील समृद्धी कशाची पूर्वझलक होती?
[३२ पानांवरील चित्र]
थोर शलमोनाच्या शासनाखाली नंदनवनातील जीवन मिळवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू त्यांचे सार्थक होईल