व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या जीवनाला आकार देणारी तीन अधिवेशने

माझ्या जीवनाला आकार देणारी तीन अधिवेशने

माझ्या जीवनाला आकार देणारी तीन अधिवेशने

जॉर्ज वॉरनचक यांच्याद्वारे कथित

आपल्या अधिवेशनांमध्ये ऐकलेल्या एखाद्या गोष्टीचा तुमच्या मनावर इतका गहिरा प्रभाव पडला आहे का, की ज्यामुळे जीवनात मोठे बदल करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली? माझ्या बाबतीत नेमकं असंच घडलं. मागं वळून पाहताना मला याची जाणीव होते, की खासकरून तीन अधिवेशनांमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला. पहिल्या अधिवेशनामुळे मला बुजरेपणावर मात करण्यास मदत मिळाली. दुसऱ्‍या अधिवेशनानं मला आहे त्यात संतुष्ट राहायला शिकवलं. आणि तिसऱ्‍या अधिवेशनामुळे सेवा आणखी वाढवण्याचं उत्तेजन मिळालं. पण, हे कसं घडलं ते सांगण्याआधी, या अधिवेशनांच्या कित्येक वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी घडलेल्या काही गोष्टींविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो.

माझा जन्म १९२८ मध्ये झाला. तीन मुलांपैकी मी सर्वात धाकटा. मी आणि माझ्या दोन बहिणी मार्जी व ओल्गा, अमेरिकेतील न्यू जर्झीच्या साउथ बाउन्ड ब्रुक, या २,००० लोकवस्ती असलेल्या छोट्याशा नगरात लहानाचे मोठे झालो. आम्ही गरीब असलो, तरीही आई मोठ्या मनाची होती. जेव्हा कधी तिला काही विशेष जेवण बनवायला जमायचं तेव्हा ती शेजाऱ्‍यांनाही ते द्यायची. मी नऊ वर्षांचा असताना, हंगेरीयन भाषा बोलणारी एक साक्षीदार आमच्या घरी आली. आईची मातृभाषा हंगेरियनच असल्यामुळे ती बायबलचा संदेश ऐकून घेण्यास लगेच तयार झाली. नंतर, बर्था नावाच्या एका वीस-बावीस वर्षांच्या साक्षीदार बहिणीनं आईचा अभ्यास पुढे चालू ठेवला आणि यहोवाची एक सेवक बनण्यास तिला मदत केली.

आईच्या अगदी उलट, मी स्वाभावानेच बुजरा, भित्रा होतो. त्यातल्या त्यात आई मला नेहमी टाकून बोलायची. “तू ऊठसूट माझे दोष का काढत असतेस?” असं मी रडवेला होऊन तिला विचारलं, तेव्हा ‘तू माझा लाडका आहेस पण, तू लाडानं बिघडू नयेस म्हणून मी तुझ्याशी असं वागते,’ असं तिनं मला सांगितलं. आईचा हेतू चांगला होता, पण मी मात्र प्रशंसेचे दोन शब्द ऐकायला आसूसलो होतो आणि त्यामुळे आपण इतरांपेक्षा कमी आहोत अशी भावना हळूहळू माझ्या मनात निर्माण झाली.

एक दिवस, शेजारच्या काकू ज्या नेहमी माझ्याशी आपुलकीनं बोलायच्या, त्यांनी मला त्यांच्या मुलांसोबत चर्चच्या संडे स्कूलला जायला सांगितलं. मी गेलो तर यहोवाचं मन दुखावेल याची मला जाणीव होती, पण न गेल्यास काकूंना वाईट वाटेल याची मला भीती वाटत होती. त्यामुळे, स्वतःचीच लाज वाटत असूनही मी कितीतरी महिन्यांपर्यंत चर्चला जात राहिलो. लोकांच्या भीतीमुळे मी शाळेतही माझ्या विवेकाविरुद्ध जाऊन वागलो. शाळेचे मुख्याध्यापक खूप कडक होते. आणि सर्व मुलांना झेंडावंदन करायला लावायचं असं त्यांनी शिक्षकांना सांगून ठेवलं होतं. मी देखील झेंडावंदन करायचो. जवळजवळ एक वर्ष असं चाललं. पण मग, एक मोठा बदल घडून आला.

धैर्यवान असण्याचा धडा मिळाला

सन १९३९ मध्ये एक लहानसा गट पुस्तक अभ्यासाठी आमच्या घरी एकत्र जमू लागला. बेन मिस्काल्स्‌की नावाचा एक तरुण पायनियर बांधव हा अभ्यास चालवायचा. आम्ही त्याला बिग बेन म्हणत असू. हे नाव त्याला अगदी साजेसं होतं कारण तो आमच्या घराच्या दाराएवढा उंच व धिप्पाड होता. पण, शरीर अगडबंब असलं तरी त्याचं मन लोण्याहून मऊ होतं. त्याचा प्रेमळ हसरा चेहरा पाहिला की माझी भीती कुठल्याकुठं पळायची. म्हणून बेननं मला त्याच्यासोबत क्षेत्रसेवेत येण्याविषयी विचारलं, तेव्हा मी लगेच हो म्हटलं. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. मी उदास असायचो तेव्हा तो एका मोठ्या भावाप्रमाणे प्रेमळपणे माझी समजूत काढायचा. याचीच तर मला सगळ्यात जास्त गरज होती. त्यामुळे, बेन मला खूप खूप आवडू लागला.

सन १९४१ मध्ये, बेननं आमच्या कुटुंबाला त्याच्यासोबत त्याच्या कारमध्ये मिझूरीतील सेंट लुइस इथं होणाऱ्‍या अधिवेशनाला येण्याविषयी सुचवलं. मला तर आनंदानं अक्षरशः उड्या माराव्याशा वाटल्या! याआधी मी कधी घरापासून ७०-८० किलोमीटरपेक्षा जास्त दूर गेलो नव्हतो. आणि आता तर १,५०० किलोमीटरपेक्षा जास्त दूरचा प्रवास मी करणार होतो! पण, सेंट लुइसमध्ये त्या दरम्यान काही समस्या निर्माण झाल्या होत्या. तेथील पाळकांनी आपल्या चर्चच्या सदस्यांना ताकीद दिली होती, की त्यांनी आपल्या घरांत साक्षीदारांच्या मुक्कामाची सोय केली असल्यास ती लगेच रद्द करावी. पुष्कळ लोकांनी त्यांच्या सांगण्यानुसार केलं. आम्ही ज्या कुटुंबाकडे मुक्काम करणार होतो त्यांनाही धमकी देण्यात आली होती. तरीही, त्यांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी आम्हाला आपल्या घरात राहू देण्याचा जो शब्द दिला होता तो त्यांना तोडायचा नव्हता असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी दाखवलेल्या धैर्याचा माझ्या मनावर गहिरा प्रभाव पडला.

त्या अधिवेशनात माझ्या बहिणींचा बाप्तिस्मा झाला. त्याच दिवशी, ब्रुकलिन बेथेलमधील बंधू रदरफर्ड यांनी एक जोरदार भाषण दिलं. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान, देवाची सेवा करण्यास इच्छुक असलेल्या सर्व मुलांना उभं राहण्यास सांगितलं. त्या वेळी जवळजवळ १५,००० मुलं उभी राहिली. मीही त्यांच्यापैकी एक होतो. मग त्यांनी सेवाकार्यात आणखी जास्त भाग घेण्याची इच्छा असलेल्यांपैकी आम्हा मुलांना “हो” असं म्हणण्यास सांगितलं. इतर मुलांसोबत मीही मोठ्यानं “हो!” म्हटलं. टाळ्यांचा गडगडाट झाला. त्या क्षणी माझ्यात एक विलक्षण उत्साह संचारल्यासारखं मला वाटलं.

अधिवेशनानंतर, आम्ही एका बांधवाला भेटायला पश्‍चिम व्हर्जिनियाला गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की, कशा प्रकारे एकदा प्रचार कार्य करत असताना संतापलेल्या जमावानं त्यांना मारलं आणि अंगाला डांबर फासून त्यावर पिसं चिकटवली. मी अगदी श्‍वास रोखून ऐकत होतो. “पण मी प्रचार करायचं थांबवणार नाही” असं त्या बांधवानं म्हटलं. त्या बांधवाला भेटल्यानंतर मला जणू मी दावीद असल्यासारखं वाटत होतं. आता मी गल्याथाचा—माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सामना करण्यास तयार होतो.

शाळेत गेल्यावर, मी मुख्याध्यापकांकडे गेलो. त्यांनी डोळे वटारून मला पाहिलं. मी मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना केली. मग, मी एका दमात बोलून टाकलं: “मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला जाऊन आलोय. यापुढे मी झेंडावंदन करणार नाही!” थोडा वेळ ते काहीच बोलले नाही. मग, ते हळूच आपल्या खुर्चीवरून उठून माझ्याकडे आले. त्यांचा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. ते माझ्या अंगावर ओरडून म्हणाले: “झेंडावंदन कर, नाहीतर तुला शाळेतून काढून टाकेन.” पण या वेळी मात्र मी कोणतीही तडजोड केली नाही. मला मनोमन इतका आनंद झाला होता की याआधी मी कधीही असा आनंद अनुभवला नव्हता.

या घटनेबद्दल केव्हा एकदाचं बेनला सांगतो असं मला झालं होतं. राज्य सभागृहात त्याला पाहताच, मी ओरडलो: “मी झेंडावंदन केलं नाही! मला शाळेतून काढून टाकलंय!” त्यानं मला प्रेमानं मिठी मारली आणि म्हटलं: “नक्कीच यहोवाला तुझा अभिमान वाटत असेल.” (अनु. ३१:६) किती प्रेरणादायी होते ते शब्द! १५ जून, १९४२ रोजी माझा बाप्तिस्मा झाला.

आहे त्यात संतुष्ट असण्याचा धडा मी शिकलो

दुसऱ्‍या विश्‍वयुद्धानंतर देशाची आर्थिक परिस्थिती बरीच सुधारली आणि चंगळवादाला ऊत आला. मला चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे, पूर्वी ज्यांचं मी फक्‍त स्वप्नच पाहू शकत होतो त्या वस्तू आता मी विकत घेऊ शकत होतो. माझ्या काही मित्रांनी मोटारसायकली घेतल्या, तर काहींनी मोठी घरं बांधली. मीसुद्धा एक नवी कोरी कार खरेदी केली. पण, चैनीच्या नवनवीन वस्तू खरेदी करण्याच्या नादात, आध्यात्मिक कार्यांकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं. मी चुकीच्या मार्गावर आहे हे मला माहीत होतं. पण, १९५० मध्ये न्यू यॉर्क सिटीत झालेल्या एका अधिवेशनामुळे माझ्या जीवनशैलीत बदल करण्यास मला मदत मिळाली.

त्या अधिवेशनात, जवळजवळ प्रत्येक वक्त्यानं प्रचार कार्यात स्वतःला झोकून देण्याचं श्रोत्यांना आवाहन केलं. “संसाराचा व्याप कमी करा आणि नेमून दिलेल्या धावेवरून धावत राहा,” असा सल्ला एका वक्त्यानं आम्हाला दिला. इतक्या लोकांमध्ये ते मलाच उद्देशून बोलत आहेत की काय असं मला वाटलं. गिलियड पदवीदान समारंभाला उपस्थित राहिल्यावर मी विचार करू लागलो, ‘माझ्याच वयाचे हे साक्षीदार सगळ्या सुखसोयींचा त्याग करून परक्या देशात जाऊन सेवा करू शकतात, तर आपल्याच देशात राहून मला असं करता येणार नाही का?’ अधिवेशन संपण्याअगोदरच मी पायनियर सेवा सुरू करण्याचा निश्‍चय केला होता.

याच दरम्यान, मी माझ्याच मंडळीतली एक उत्साही बहीण एव्हलिन मॉन्डाक हिच्याशी लग्न करण्याच्या विचारात होतो. सहा मुलांचं संगोपन करणारी एव्हलिनची आई खरोखरंच खूप धाडसी होती. तिला एका मोठ्या रोमन कॅथलिक चर्चसमोर उभं राहून साक्षकार्य करायला विशेष आवडायचं. कितीदातरी चर्चच्या पाळकानं चिडून तिला तिथून निघून जायला सांगितलं, पण ती तिथून हलायची नाही. एव्हलिनही आपल्या आईसारखीच कोणाला घाबरायची नाही.—नीति. २९:२५.

सन १९५१ मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही आपल्या नोकऱ्‍यांना राजीनामा देऊन पायनियर सेवा करू लागलो. एका विभागीय पर्यवेक्षकांनी आम्हाला न्यू यॉर्क सिटीपासून जवळजवळ १५० किलोमीटर दूर असलेल्या अमागानसेट या अटलांटिक किनारपट्टीवरील खेडेगावी जाऊन सेवा करण्याचं प्रोत्साहन दिलं. आमच्या राहण्याची सोय करणं शक्य नसल्याचं तिथल्या मंडळीनं कळवलं तेव्हा आम्ही एखादा ट्रेलर (राहण्याची व्यवस्था असलेला एक मोठा ट्रक) मिळतो का म्हणून पाहू लागलो. पण, आम्हाला परवडेल असा ट्रेलर सापडला नाही. मग, आम्हाला एक जुना ट्रेलर सापडला. ट्रेलरच्या मालकानं त्यासाठी ९०० डॉलर मागितले. आणि लग्नात भेटस्वरूप मिळालेले नेमके तेवढेच पैसे आमच्याकडे होते. आम्ही तो ट्रेलर विकत घेतला, दुरुस्त केला आणि आमच्या नवीन क्षेत्रात गेलो. पण, आम्ही तिथं पोचलो तेव्हा आमच्याजवळ काहीच पैसे नव्हते. अशा परिस्थितीत पायनियर सेवेत टिकून राहता येईल का असा आम्ही विचार करू लागलो.

एव्हलिन लोकांच्या घरांची साफसफाईची कामं करायची आणि मी एका इटालियन रेस्टॉरन्टमध्ये रात्रीच्या वेळी साफसफाईचं काम करू लागलो. रेस्टॉरन्टच्या मालकानं मला सांगितलं, “उरलंसुरलं जेवण आपल्या बायकोसाठी घेऊन जात जा.” पहाटे दोनच्या सुमारास मी घरी पोचायचो, तेव्हा आमचा ट्रेलर पिझ्झा आणि पास्ताच्या खमंग वासानं भरून जायचा. थंडीनं गारठलेल्या ट्रेलरमध्ये ते परत एकदा गरम करून खाणं जणू एक मेजवानीच असायची. शिवाय, मंडळीतले बांधव कधीकधी एखादा मोठा मासा ट्रेलरच्या दरवाजापुढे ठेवून जायचे. अमागानसेटमध्ये त्या प्रिय बांधवांसोबत मिळून सेवा करण्यात घालवलेल्या वर्षांदरम्यान आम्ही हे शिकलो, की आहे त्यात संतुष्ट असल्यानं जीवन आणखी समाधानी बनतं. खरोखर, ते किती आनंददायक दिवस होते!

सेवा आणखी वाढवण्याची प्रेरणा

सन १९५३ च्या जुलै महिन्यात, न्यू यॉर्क सिटीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला विविध देशांतून आलेल्या शेकडो मिशनऱ्‍यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांनी अनेक रोमांचक अनुभव सांगितले. त्यांचा उत्साह प्रेरणादायी होता. शिवाय, अधिवेशनात एका वक्त्यानं सांगितलं की कितीतरी देशांत अजूनही राज्याचा संदेश पोचलेला नाही. आम्ही आमची सेवा आणखी वाढवली पाहिजे याची आम्हाला जाणीव झाली. त्या अधिवेशनातच आम्ही मिशनरी प्रशिक्षणासाठी अर्ज केला. त्याच वर्षी, गिलियड प्रशालेच्या २३ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण आम्हाला मिळालं. १९५४ च्या फेब्रुवारी महिन्यात हा वर्ग सुरू झाला. हा आमच्याकरता केवढा मोठा सन्मान होता!

आम्हाला ब्राझीलमध्ये सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं आहे हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. जहाजानं १४ दिवसांच्या प्रवासाला निघण्यापूर्वी, बेथेलमधील एका जबाबदार बांधवानं मला सांगितलं: “तुमच्यासोबत नऊ अविवाहित मिशनरी बहिणी प्रवास करणार आहेत. त्या सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी!” माझ्या मागून दहा तरुणी जहाजावर येत असल्याचं पाहून खलाशी कसे आ वासून बघत राहिले याची तुम्ही कल्पना करू शकता का? पण, त्या बहिणींनी स्थिती योग्य प्रकारे हाताळली. तरीही, आम्ही सुरक्षितपणे ब्राझीलमध्ये पोचल्यावरच माझ्या जिवात जीव आला.

पोर्तुगीज भाषा शिकल्यावर, मला दक्षिण ब्राझीलमधील रियो ग्रँडी डो सुल या राज्यात विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. मला ज्या विभागीय पर्यवेक्षकाच्या जागी नेमण्यात आलं होतं त्या अविवाहित बांधवानं आम्हाला म्हटलं: “या डोंगराळ भागात एका जोडप्याला पाठवण्यात आलं हे पाहून मला आश्‍चर्य वाटतंय.” मंडळ्या खेड्यांमध्ये दूरदूर होत्या आणि काही मंडळ्यांपर्यंत तर फक्‍त ट्रकनंच जाता येत होतं. ट्रकचालकाच्या जेवणाची सोय केली तरच तो ट्रकमध्ये बसू द्यायचा. घोड्यावर बसतात तसे पाय फाकून आम्ही सामानाच्या वर बसायचो आणि सामानाला बांधलेल्या दोरांना घट्ट पकडायचो. ड्रायव्हरनं अचानक गाडी वळवली की सामान बाजूला कलायचं तेव्हा आमची नजर खाली खोल दऱ्‍यांकडे जायची आणि आम्ही दोरांना आणखी घट्ट पकडायचो. तरीसुद्धा, आमच्या येण्याची उत्सुकतेनं वाट पाहत असलेल्या बांधवांच्या चेहऱ्‍यावरील आनंद पाहून आम्हाला दिवसभरचा प्रवास सार्थक झाल्यासारखं वाटायचं.

आम्ही सहसा बांधवांच्याच घरी उतरायचो. ते गरीब असूनही उदार मनाचे होते. एका दुर्गम भागातील सर्व बांधव मटण पॅक करण्याच्या कारखान्यात काम करायचे. तुटपुंज्या मजुरीमुळे त्यांना एक वेळच्या जेवणावरच भागवावं लागायचं. एखाद्या दिवशी काम न केल्यास मजुरी मिळत नसे. तरीही, आम्ही मंडळीला भेट द्यायला जायचो, तेव्हा मंडळीच्या विविध कार्यांत भाग घेण्यासाठी ते कामावरून दोन दिवसांची सुटी घ्यायचे. यहोवावर त्यांचा भरवसा होता. देवाच्या राज्याशी संबंधित असलेल्या कार्यांकरता त्याग करण्याविषयीचा धडा आम्हाला त्या गरीब बांधवांकडून शिकायला मिळाला, हे आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्यात राहून आम्हाला जे काही शिकायला मिळालं, ते कोणत्याही शाळेत शिकायला मिळालं नसतं. आजही त्या बांधवांची आठवण होते, तेव्हा माझे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

सन १९७६ मध्ये, आजारी असलेल्या माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आम्ही अमेरिकेला परतलो. ब्राझील सोडताना आम्हाला फार दुःख झालं. पण, त्या देशातील मंडळ्यांची प्रगती आम्हाला पाहायला मिळाली याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. ब्राझीलहून आम्हाला पत्रे येतात, तेव्हा तिथं घालवलेल्या काळाच्या गोड आठवणींची मनात गर्दी होते.

प्रियजनांशी पुनर्मिलन

आईची काळजी घेत असतानाच साफसफाईची छोटीमोठी कामं करून आम्ही पायनियर सेवा करत होतो. १९८० मध्ये आई मरण पावली. ती शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिली. नंतर, मला अमेरिकेत विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. १९९० मध्ये आम्ही कनेक्टिकटमधील एका मंडळीला भेट दिली, तेव्हा तिथं एका अतिशय खास व्यक्‍तीशी आमची भेट झाली. या मंडळीतल्या वडिलांपैकी एक बेन होता. तोच बेन ज्यानं ५० वर्षांपूर्वी मला धैर्यानं यहोवाची बाजू घेण्याचं प्रोत्साहन दिलं होतं. आम्ही एकमेकांना मिठी मारली तेव्हा आम्हाला किती आनंद झाला होता याची तुम्ही कल्पना करू शकता का?

सन १९९६ पासून मी आणि एव्हलिन, न्यू जर्झीतील एलिझाबेथ या पोर्तुगीज भाषिक मंडळीत दुर्बल खास पायनियर म्हणून सेवा करत आहोत. माझी प्रकृती तितकी चांगली नसते, तरीही माझ्या प्रिय पत्नीच्या मदतीनं मी सेवेत होईल तितका सहभाग घेतो. एव्हलिन आमच्या शेजारी राहणाऱ्‍या एका वृद्ध भगिनीचीही काळजी घेते. ती कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? बर्था! तीच बर्था जिनं ७० वर्षांआधी आईला यहोवाची सेवक बनण्यास मदत केली होती. आमच्या कुटुंबाला सत्याबद्दल शिकण्यास मदत करण्यासाठी तिनं जे काही केलं त्याच्यासाठी तिचे आभार मानण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला किती आनंद होत आहे!

सुरुवातीच्या त्या अधिवेशनांमुळे, खऱ्‍या उपासनेची बाजू घेण्यास, आहे त्यात संतुष्ट असण्यास आणि सेवा आणखी वाढवण्यास मला प्रेरणा मिळाली यासाठी मी कृतज्ञ आहे. होय, सुरुवातीच्या त्या अधिवेशनांनी खरोखरच माझ्या जीवनाला आकार दिला.

[२३ पानांवरील चित्र]

एव्हलिनची आई (डावीकडे) आणि माझी आई

[२३ पानांवरील चित्र]

माझा मित्र बेन

[२४ पानांवरील चित्र]

ब्राझीलमध्ये

[२५ पानांवरील चित्र]

आज एव्हलिनसोबत