व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही तुमची सचोटी जपाल का?

तुम्ही तुमची सचोटी जपाल का?

तुम्ही तुमची सचोटी जपाल का?

“माझा प्राण जाईतोवर मी आपली सचोटी सोडणार नाही.”—ईयो. २७:५, NW.

१, २. सचोटी राखण्याची तुलना कशाशी करण्यात आली आहे, व आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

समजा तुम्ही एका घराचा नकाशा पाहत आहात. घराची रचना किती सुबक व आटोपशीर आहे हे पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटते. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या इतरांना या घराचा किती फायदा होऊ शकतो यावर जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. पण, जोपर्यंत घर बांधले जात नाही, तुम्ही त्यात राहायला जात नाही व त्याची देखभाल करत नाही तोपर्यंत हा नकाशा व घराविषयी तुम्ही पाहिलेली स्वप्ने यांना काहीच महत्त्व नसेल, नाही का?

तसेच, सचोटी हा गुण आपल्यासाठी आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे असा आपण विचार करू. पण जोपर्यंत आपण स्वतः सचोटी दाखवत नाही व ती टिकवून ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. हे अगदी एक इमारत बांधण्यासारखे आहे. इमारतीच्या नकाशाचा फक्‍त विचार केल्याने इमारत उभी राहत नाही तर इमारत बांधण्याकरता पुष्कळ वेळ खर्च करावा लागतो आणि प्रयत्न करावे लागतात. (लूक १४:२८, २९) तसेच, आपली ख्रिस्ती सचोटी टिकवून ठेवण्याकरता आपल्याला बराच वेळ खर्च करावा लागेल, बरेच प्रयत्न करावे लागतील. आणि आपले हे प्रयत्न काही वाया जाणार नाहीत! तेव्हा आपण तीन प्रश्‍नांवर विचार करून पाहू या: आपण सचोटी कशी राखू शकतो? ती जपून कशी ठेवू शकतो? एखादा जर काही काळासाठी सचोटी राखण्यास चुकला तर तो काय करू शकतो?

आपण सचोटी राखणाऱ्‍यांपैकी एक कसे होऊ शकतो?

३, ४. (क) सचोटी कशी राखायची हे यहोवाने आपल्याला कसे शिकवले आहे? (ख) आपण सचोटी कशी राखू शकतो, हे येशूने कसे दाखवून दिले?

सचोटी राखायची की नाही ही निवड करण्याचा सुहक्क देऊन यहोवाने आपल्याला सन्मानित केले आहे, हे आपण आधीच्या लेखात पाहिले होते. पण हा सुहक्क देऊन तो तिथेच थांबला नाही. तर हा सद्‌गुण आपल्या अंगी कसा बाणवायचा तेही तो आपल्याला शिकवतो. आणि शिकवलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करण्याकरता तो आपल्याला सढळ हाताने त्याचा पवित्र आत्माही देतो. (लूक ११:१३) शिवाय, जे सचोटीने वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो आध्यात्मिक अर्थाने संरक्षण देखील पुरवतो.—नीति. २:७.

सचोटी कशी राखायची हे यहोवाने आपल्याला कसे शिकवले आहे? एका प्रमुख मार्गाने. आपला पुत्र येशू याला पृथ्वीवर पाठवून त्याने आपल्याला हे शिकवले आहे. येशूने पृथ्वीवरील त्याच्या संपूर्ण आयुष्यात पूर्ण आज्ञाधारकता दाखवली. त्याने ‘मरण सोसेपर्यंत आज्ञापालन केले.’ (फिलिप्पै. २:८) येशूने पृथ्वीवर असताना प्रत्येक कार्यात व कठीण असलेल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञेचे पालन केले. त्याने यहोवाला म्हटले: “तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘माझीही अशीच आज्ञाधारक मनोवृत्ती आहे का?’ योग्य हेतू बाळगून आपणही जेव्हा आज्ञाधारकता दाखवतो तेव्हा आपण सचोटी राखणारे बनतो. कोणकोणत्या बाबतीत आज्ञाधारकता दाखवण्याची गरज आहे हे आपण पाहू या.

५, ६. (क) इतर लोक आपल्याला पाहत नसतात तेव्हा देखील सचोटी राखण्याच्या महत्त्वावर दाविदाने कशा प्रकारे जोर दिला? (ख) ख्रिस्ती जेव्हा एकटे असतात तेव्हा त्यांना कोणत्या मोहांना तोंड द्यावे लागू शकते?

आपण जेव्हा एकटे असतो तेव्हाही यहोवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. एकांतात असताना सचोटी दाखवणे किती महत्त्वाचे आहे हे स्तोत्रकर्ता दावीद याने दाखवून दिले. (स्तोत्र १०१:२ वाचा.) दावीद राजा असल्यामुळे त्याच्या अवतीभोवती सतत लोक असायचे. शेकडो, नव्हे तर हजारो लोकांच्या नजरा कदाचित त्याच्यावर असतील. (स्तोत्र २६:१२ पडताळून पाहा.) अशा वेळी त्याला सचोटी दाखवणे आवश्‍यक होते. आपल्या प्रजेपुढे त्याने एक उत्तम उदाहरण असायला हवे होते. (अनु. १७:१८, १९) पण एकांतात, म्हणजे ‘घरात’ असतानाही त्याने सचोटी दाखवली पाहिजे हे त्याला माहीत होते. आपल्याविषयी काय?

स्तोत्र १०१:३ मध्ये दाविदाने असे लिहिले: “मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही.” आज आपल्यासमोर, खासकरून आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा अनेक अनुचित गोष्टी येऊ शकतात. इंटरनेटचा वापर करणाऱ्‍यांना खासकरून याबाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज पडते. अनुचित, अश्‍लील साहित्य उघडण्याचा त्यांना सहजपणे मोह होण्याची शक्यता आहे. हा मोह जर आपल्याला आवरता आला नाही तर ज्या देवाने दाविदाला वरील शब्द लिहिण्याची प्रेरणा दिली त्या देवाच्या आज्ञांचे आपण पालन करत आहोत असे आपण म्हणू शकू का? पोर्नोग्राफीमुळे खूप वाईट परिणाम घडतात. यामुळे आपल्या मनामध्ये चुकीच्या व लोभी इच्छा निर्माण होतात. आपला विवेक दूषित होतो, वैवाहिक जीवन विस्कळीत होते आणि यांत गोवलेल्या सर्वांचा अपमान होतो.—नीति. ४:२३; २ करिंथ. ७:१; १ थेस्सलनी. ४:३-५.

७. बायबलमधले कोणते तत्त्व आपल्याला, एकटे असताना आपली सचोटी टिकवून ठेवण्यास मदत करू शकते?

अर्थात यहोवाचा कोणताही सेवक हा खऱ्‍याखुऱ्‍या अर्थाने एकटा नसतो. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे आपल्यावर सतत लक्ष असते. (स्तोत्र ११:४ वाचा.) आपण मोहांचा प्रतिकार करत आहोत हे पाहून त्याला किती आनंद होत असेल! मोहांचा प्रतिकार करून तुम्ही मत्तय ५:२८ मधील येशूने दिलेल्या ताकीदीचे पालन करता. तेव्हा, वाईट काम करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या चित्रांकडे न पाहण्याचा दृढ निश्‍चय करा. अश्‍लील चित्रे पाहण्याकरता किंवा साहित्य वाचण्याकरता आपल्या मौल्यवान सचोटीचा सौदा करू नका!

८, ९. (क) दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांना आपली सचोटी टिकवून ठेवण्याकरता कोणत्या अडचणीला तोंड द्यावे लागले होते? (ख) आज तरुण जन यहोवा आणि त्यांच्या सोबतच्या ख्रिस्ती बंधूभगिनींना आनंदित कसे करतात?

यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांमध्ये असतानाही आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करून सचोटी राखू शकतो. दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांचे उदाहरण घ्या. तरुणवयातच त्यांना बॅबिलोनला बंदिवान म्हणून नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या आजूबाजूला यहोवाविषयी कसलीच माहिती नसलेले लोक होते. अशा परिस्थितीतच या चार हिब्रू तरुणांवर देवाच्या नियमशास्त्रात मना केलेले मिष्टान्‍न खाण्याचा दबाव आणण्यात आला. हे अन्‍न खाण्यात काय वावगे आहे, अशी सबब हे तरुण सहजपणे देऊ शकले असते. कारण, ते काय करत आहेत हे पाहायला त्यांचे आईवडील, इतर वडीलधारी माणसे, याजक वगैरे कोणीच तेथे नव्हते. पण कोण त्यांना पाहत होता? यहोवा त्यांना पाहत होता. त्यामुळे त्यांनी, त्यांच्यावर इतका दबाव असतानाही व जोखीम पत्करून यहोवाची आज्ञा मानणे पसंत केले.—दानी. १:३-९.

संपूर्ण जगभरात, यहोवाचे तरुण साक्षीदार या चार हिब्रू तरुणांसारखी दृढ भूमिका घेतात. ख्रिश्‍चनांकरता असलेल्या देवाच्या स्तरांचे ते पालन करतात व समवयस्कांच्या हानिकारक दबावासमोर नमते घेण्यास नकार देतात. ड्रग्ज, हिंसाचार, शिवीगाळ, अनैतिकता व इतर वाईट गोष्टी करण्यास नकार देऊन तुम्ही तरुणहो, यहोवाच्या आज्ञेचे पालन करता. आणि असे करून तुम्ही सचोटी राखता. यामुळे तुम्हाला स्वतःला फायदा होतो शिवाय यहोवा आणि तुमच्या सोबतच्या ख्रिस्ती बंधूभगिनींना आनंद होतो!—स्तो. ११०:३.

१०. (क) व्यभिचाराविषयीच्या कोणत्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे काही तरुणांनी आपल्या सचोटीशी हातमिळवणी केली आहे? (ख) व्यभिचाराच्या धोक्याच्या बाबतीत सचोटी आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करते?

१० विरुद्ध लिंगी व्यक्‍तीबरोबर व्यवहार करण्याच्या बाबतीतही आपण आज्ञाधारकता दाखवणे महत्त्वाचे आहे. देवाच्या वचनात व्यभिचाराचे खंडन करण्यात आले आहे, हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तरीपण, याबाबतीत जर आपण दक्षता बाळगली नाही तर आपली आज्ञाधारक मनोवृत्ती हळूहळू स्वैराचारी बनू शकते. जसे की, काही तरुण मौखिक किंवा गुद समागमात भाग घेतात, परस्पर हस्तमैथुन करतात. आपण प्रत्यक्षात “सेक्स” करत नसतो त्यामुळे ही कार्ये इतकी वाईट नाहीत, असा ते विचार करतात. पण हे तरुण एक गोष्ट विसरतात, किंबहुना, मुद्दामहून तिच्याकडे कानाडोळा करतात. ती ही, की बायबलमध्ये व्यभिचार असे भाषांतरीत केलेल्या शब्दासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे त्या शब्दात या सर्व प्रथांचा समावेश होतो ज्यामुळे एखाद्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. * याहीपेक्षा वाईट म्हणजे ते सचोटी राखणे किती महत्त्वाचे आहे याकडे चक्क दुर्लक्ष करतात. आपण सचोटी राखू इच्छित असल्यामुळे, वाईट कामे करण्यासाठी बहाणा शोधत नाही. कोणतीही शिक्षा न मिळता आपण पापाच्या मार्गावर कोठपर्यंत जाऊ शकतो, असा आपण विचार करत नाही. आणि पाप केल्यामुळे आपल्याला मंडळीकडून जी शिक्षा मिळू शकते फक्‍त त्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करत नाही. तर कोणती गोष्ट केल्यामुळे यहोवा संतुष्ट होऊ शकेल व त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, यावर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. आपण पापाच्या किती जवळ जाऊ शकतो हे पाहण्याऐवजी आपण पापापासून होता होईल तितके दूर राहतो आणि ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढतो.’ (१ करिंथ. ६:१८) असे करून आपण दाखवून देतो, की आपण सचोटी दाखवणाऱ्‍यांपैकी एक आहोत.

आपण आपली सचोटी कशी जपू शकतो?

११. लहानसहान गोष्टींतही आज्ञाधारकता दाखवणे महत्त्वाचे का आहे? उदाहरण देऊन सांगा.

११ देवाच्या आज्ञांचे पालन करून आपण सचोटी हा गुण अंगी बाणवतो आणि आज्ञाधारक मनोवृत्ती तशीच कायम ठेवून आपण आपली सचोटी जपून ठेवतो. लहानसहान बाबतीतही आज्ञाधारकता दाखवण्याची गोष्ट आपल्याला कदाचित क्षुल्लक वाटेल. पण याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपल्या सचोटीचे रेकॉर्ड बनवतो. उदाहरणार्थ, एक वीट काही कामाची वाटणार नाही. पण जेव्हा आपण अशाच अनेक वीटा जवळजवळ रचतो तेव्हा एक सुंदर घर उभे राहते. यास्तव, लहानसहान गोष्टींतही आज्ञाधारकता दाखवून आपण आपली सचोटी जपून ठेवतो.—लूक १६:१०.

१२. गैरवागणूक व अन्याय सहन करावा लागत असतानाही दाविदाने सचोटी कशी राखली?

१२ आपल्यावर संकट ओढवते, आपल्याला गैरवागणूक किंवा अन्याय सहन करावा लागतो तेव्हा खासकरून आपण सचोटी दाखवली पाहिजे. बायबलमधल्या दाविदाचे उदाहरण घ्या. तो तरुण होता तेव्हा त्याला, यहोवाच्या अधिकाराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या एका राजाकडून अर्थात शौल राजाकडून छळ सहन करावा लागला. शौल राजा यहोवाच्या मर्जीतून उतरला होता आणि देवाची ज्यावर कृपापसंती होती त्या दाविदाचा तो खूप द्वेष करत होता. तरीसुद्धा शौलाला काही काळापर्यंत अधिकारपदावर ठेवण्यात आले होते आणि दाविदाचा पिच्छा करून त्याला छळण्याकरता तो इस्राएली सैन्याचा वापर करत होता. यहोवाने काही वर्षांपर्यंत दाविदाविरुद्ध हा अन्याय होऊ दिला. दाविदाला यामुळे देवाचा राग आला का? सहन करण्याचा काही उपयोग नाही, असा त्याने विचार केला का? बिलकुल नाही. उलट, शौल हा देवाने अभिषिक्‍त केलेला राजा आहे असा विचार करून त्याने शौलाला गाढ आदर दाखवला. शौलाचा जीव घेण्याची त्याला एकदा संधी मिळालेली असतानाही त्याने शौलाचा बदला घेतला नाही.—१ शमु. २४:२-७.

१३. एखाद्या बांधवाने अथवा भगिनीने आपले मन अथवा आपल्या भावना दुखावल्या तरीसुद्धा आपण सचोटी कशी जपून ठेवू शकतो?

१३ दाविदाचे उदाहरण आज आपल्याकरता किती प्रभावी आहे! आपण अपरिपूर्ण मानवांचे मिळून बनलेल्या एका जगव्याप्त मंडळीचा भाग आहोत. यांपैकी एखादा बांधव अथवा भगिनी आपले मन दुखावू शकते किंवा अविश्‍वासू देखील बनू शकते. आपण अशा एका काळात जगत आहोत जेव्हा यहोवाचे लोक एक समूह या नात्याने कधीही दूषित होऊ शकत नाहीत. (यश. ५४:१७) तरीपण, जेव्हा कोणी आपले मन किंवा आपल्या भावना दुखावते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? आपण जर त्या बांधवाविषयी अथवा भगिनीविषयी मनात राग बाळगला तर देवाशी आपण राखलेली सचोटी धोक्यात येण्याची शक्यता आहे. इतरांच्या वर्तनामुळे आपण देवाबद्दलच्या आपल्या भावना कटु होऊ देऊ नयेत किंवा विश्‍वासूपणे चालण्याचे सोडू नये. (स्तो. ११९:१६५) जेव्हा आपण धीराने परीक्षांचा सामना करतो तेव्हा आपल्याला आपली सचोटी जपून ठेवण्यास साहाय्य मिळते.

१४. संघटनेत किंवा बायबल वचनांच्या समजूतीत काही फेरबदल होतात तेव्हा सचोटी दाखवणाऱ्‍यांची प्रतिक्रिया काय असते?

१४ दोष काढायची किंवा सतत टिका करायची मनोवृत्ती टाळण्याद्वारेही आपण सचोटी राखू शकतो. याचा अर्थ आपण यहोवाशी एकनिष्ठ असले पाहिजे. आज पूर्वी पेक्षा अधिक तो आपल्या लोकांवर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. इतिहासात पूर्वी कधी नव्हे तितकी आज शुद्ध उपासना पृथ्वीवर उंचावली जात आहे. (यश. २:२-४) बायबल वचनांच्या स्पष्टीकरणात किंवा अमूक गोष्टी करण्याच्या बाबतीत जेव्हा काही फेरबदल केले जातात तेव्हा आपण हे बदल स्वीकारतो. आध्यात्मिक प्रकाश दिवसेंदिवस वाढत चालल्याचा पुरावा पाहून आपल्याला आनंद होतो. (नीति. ४:१८) एखादा बदल आपल्याला समजत नाही तेव्हा तो समजण्यास मदत करावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करतो. आणि सोबतच आज्ञाधारक मनोवृत्ती ठेवून सचोटी राखतो.

एखादा सचोटी राखण्यास चुकला तर?

१५. या संपूर्ण विश्‍वात केवळ कोण तुमच्याकडून तुमची सचोटी हिरावून घेऊ शकते?

१५ हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. सचोटी दाखवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, हे आपण मागील लेखात पाहिले होते. आपण जर सचोटी राखली नाही तर आपण यहोवाबरोबर नातेसंबंध जोडू शकत नाही किंवा आपल्याला कोणतीही आशा राहणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: या संपूर्ण विश्‍वात केवळ एकच व्यक्‍ती तुमच्याकडून तुमची सचोटी हिरावून घेऊ शकते. ती व्यक्‍ती आहे तुम्ही स्वतः. ईयोबाला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली होती. त्याने म्हटले: “माझा प्राण जाईतोवर मी आपली सचोटी सोडणार नाही.” (ईयो. २७:५, NW) तुम्ही देखील ईयोबाप्रमाणे असे ठरवले आणि यहोवाच्या जवळ राहिलात तर तुम्ही शेवटपर्यंत सचोटी राखू शकाल.—याको. ४:८.

१६, १७. (क) एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडले असले तर त्याने काय करू नये? (ख) त्या ऐवजी त्याने काय करावे?

१६ तरीसुद्धा, काही जण सचोटी राखण्यास चुकतात. प्रेषित जिवंत असताना जसे झाले तसे काहींना गंभीर पाप करण्याची जणू सवयच लागली आहे. तुमच्या बाबतीत असे होत असेल तर सुधरण्याची काही आशा नाही, असा याचा अर्थ होतो का? नाही. मग तुम्ही काय करू शकता? काय करू नये, ते आधी आपण पाहू या. एखाद्याच्या हातून पाप घडते तेव्हा, ते पाप पालकांपासून, इतर बंधूभगिनींपासून किंवा वडिलांपासून लपवून ठेवायची मानवाची प्रवृत्तीच आहे. परंतु बायबल आपल्याला अशी आठवण करून देते: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीति. २८:१३) जो आपले दोष झाकतो तो एक घोडचूक करत असतो. कारण देवापासून तर काहीही लपवता येत नाही. (इब्री लोकांस ४:१३ वाचा.) काही जण तर दुहेरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे ते गंभीर पाप करत असतात आणि दुसरीकडे ते यहोवाचीही सेवा करण्याचे नाटक करत असतात. या अशा प्रकारच्या जीवनशैलीत सचोटी नसते. उलट, ते बेइमानी करत असतात. आपली गंभीर पातके लपवून यहोवाची उपासना करण्याचे ढोंग करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट होत नाही. अशा ढोंगी लोकांचा त्याला राग येतो.—नीति. २१:२७; यश. १:११-१६.

१७ एका ख्रिस्ती बांधवाच्या अथवा भगिनीच्या हातून एखादे गंभीर पाप घडते तेव्हा त्याने अथवा तिने काय करावे याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. त्यांनी ख्रिस्ती वडिलांची मदत घेतली पाहिजे. आध्यात्मिकरीत्या गंभीर आजारी पडलेल्यांना मदत करण्यासाठी यहोवाने एक तरतूद केली आहे. (याकोब ५:१४ वाचा.) आपल्याला शिक्षा किंवा ताडन मिळेल अशी भीती बाळगू नका. नाहीतर तुम्ही आध्यात्मिक अर्थाने केव्हाही बरे होऊ शकणार नाही. इंजेक्शन किंवा ऑपरेशनमुळे वेदना होतील या भीतीने कोणीही सुज्ञ व्यक्‍ती, जीव-घेण्या आजारावर इलाज करण्याचे टाळेल का?—इब्री १२:११.

१८, १९. (क) सचोटी राखण्यास एकदा चुकल्यास पुन्हा सचोटी राखणे शक्य आहे हे दाविदाच्या उदाहरणावरून कसे दिसते? (ख) सचोटी राखण्याच्याबाबतीत तुम्ही कोणता दृढनिश्‍चय केला आहे?

१८ आध्यात्मिक आजारातून पूर्णपणे बरे होण्याची काही आशा आहे का? सचोटी राखण्यास एकदा चुकल्यास पुन्हा एकदा सचोटी राखणे शक्य आहे का? पुन्हा एकवार दाविदाच्या उदाहरणाचा विचार करा. त्याच्या हातून एकदा गंभीर पाप घडले. तो दुसऱ्‍या माणसाच्या पत्नीकडे लालसेने पाहत राहिला, तिच्याबरोबर त्याने जारकर्म केले आणि मग तिच्या निरपराध नवऱ्‍याला ठार मारण्याची योजना केली. अशा वेळी, दावीद एक सचोटी राखणारा मनुष्य होता यावर विश्‍वास ठेवायला जड जाते, नाही का? पण त्याची परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती. दाविदाला कठोर शिक्षेची गरज होती, आणि त्याला ती मिळाली देखील. पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याच्यावर दया केली. यहोवाकडून मिळालेल्या या शिक्षेतून दावीद धडा शिकला आणि देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे व अशीच आज्ञाधारक मनोवृत्ती टिकवून ठेवण्याद्वारे त्याने पुन्हा एकदा गमावलेली सचोटी मिळवली. दाविदाच्या जीवनात ज्या घटना घडल्या त्यांसारखेच वर्णन आपल्याला नीतिसूत्रे २४:१६ या वचनात वाचायला मिळते. तिथे असे म्हटले आहे: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.” याचा परिणाम काय झाला? दाविदाचा मृत्यू झाल्यावर यहोवाने त्याच्याविषयी शलमोनाला काय सांगितले ते पाहा. (१ राजे ९:४ वाचा.) दावीद सरळ मनाने चालला अर्थात त्याने सचोटी राखली अशी देवाने दाविदाची आठवण केली. पातक्यांनी जर पश्‍चात्ताप केला तर त्यांची पापे कितीही गंभीर असली तरीसुद्धा देव या पातक्यांना शुद्ध करू शकतो.—यश. १:१८.

१९ प्रेमाने प्रवृत्त होऊन देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपण सचोटी राखणारे होऊ शकतो. एकनिष्ठपणे धीर दाखवा आणि तुमच्या हातून गंभीर पाप घडलेच तर मनापासून पश्‍चात्ताप करा. आपली सचोटी अतिशय मौल्यवान आहे. आपल्यातील प्रत्येकाने दाविदासारखा असा दृढनिश्‍चय केला पाहिजे: “मी तर सचोटीने वागेन.”—स्तो. २६:११, NW.

[तळटीप]

^ परि. 10 टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, २००४, पृष्ठ १३ परिच्छेद १५ पाहा.

तुमचे उत्तर काय?

• तुम्ही सचोटी दाखवणाऱ्‍यांपैकी एक कसे होऊ शकाल?

• कोणकोणत्या मार्गांनी तुम्ही सचोटी जपून ठेवू शकता?

• सचोटी राखण्यास एकदा चुकल्यास पुन्हा सचोटी राखणे कसे शक्य आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चौकट]

“किती चांगली गोष्ट!”

पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका स्त्रीने, एका अनोळखी स्त्रीच्या दयाळुपणाविषयी व सचोटीविषयी हे उद्‌गार काढले. ही गरोदर स्त्री एका कॉफी शॉपमध्ये गेली होती. आणि निघताना आपण आपली पर्स तिथेच विसरून आलो आहोत, हे काही तासांनी तिच्या ध्यानात आले. पर्समध्ये २००० डॉलर (८०,००० रुपयांपेक्षा जास्त) होते. ती नेहमी जितकी रक्कम जवळ बाळगते त्यापेक्षा कितीतरी जास्त ही रक्कम होती. या घटनेविषयी एका स्थानिक बातमीपत्रकाला सांगताना ती म्हणाली: “माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं मला वाटलं.” पण दुसऱ्‍या एका तरुण स्त्रीला ही पर्स सापडली आणि तिने लगेच त्या पर्सच्या मालकाला शोधून काढायचा प्रयत्न केला. पण तिला जेव्हा पत्ता सापडला नाही तेव्हा पर्स घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली आणि पोलिसांनी मग या गरोदर स्त्रीला शोधून काढले. आपली पर्स सापडलेली पाहून ती स्त्री कृतज्ञतेने म्हणाली: “ही खरंच किती चांगली गोष्ट आहे!” पण जिला ही पर्स सापडली होती त्या तरुण स्त्रीने पैसे परत करण्यासाठी एवढा खटाटोप का केला होता बरे? बातमीपत्रकाने पुढे असा खुलासा केला, की या तरुणीने “आपल्या या इमानदारीचे श्रेय, ज्या धर्मात ती लहानाची मोठी झाली होती त्या धर्माला दिले.” ही तरुण स्त्री यहोवाची एक साक्षीदार होती.

[९ पानांवरील चित्र]

विश्‍वासाची परीक्षा होत असतानाही तरुण सचोटी राखू शकतात

[१० पानांवरील चित्र]

दावीद एके प्रसंगी सचोटी राखण्यास चुकला पण नंतर तो सावरला