व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका मनःपूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर

एका मनःपूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर

एका मनःपूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर

“ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तो. ८३:१८, पं.र.भा.

१, २. बऱ्‍याच जणांना कोणता अनुभव आला आहे आणि कोणते प्रश्‍न विचार करण्याजोगे आहेत?

काही वर्षांपूर्वी, एक स्त्री तिच्या घराजवळील परिसरात घडलेल्या एका भयानक दुर्घटनेमुळे अतिशय दुःखी होती. रोमन कॅथलिक कुटुंबात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे, ती सांत्वनासाठी आपल्या पाळकाकडे गेली. पण तो तर तिच्याशी बोलायलाही तयार नव्हता. तेव्हा तिने देवाला प्रार्थना केली: “तू कोण आहेस ते मला ठाऊक नाही. . . . पण तू आहेस हे मात्र नक्की. मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचे आहे, मला मदत कर!” काही दिवसांनी, यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आले. त्यांनी दिलेल्या माहितीतून तिला सांत्वन व अनेक प्रश्‍नांची उत्तरे तर मिळालीच, शिवाय, कित्येक नवीन गोष्टीही समजल्या. विशेषतः, देवाला एक नाव आहे आणि ते नाव यहोवा आहे हे तिला कळाले. हा तिच्याकरता एक विलक्षण, हृदयस्पर्शी अनुभव होता. ती म्हणाली, “याच देवाबद्दल तर जाणून घ्यायची मला लहानपणापासून इच्छा होती!”

बऱ्‍याच जणांना या स्त्रीसारखाच अनुभव आला आहे. त्यांनी बायबलमधून स्तोत्र ८३:१८ हे वचन वाचले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी यहोवाचे नाव पाहिले. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतरानुसार या वचनात असे म्हटले आहे: “म्हणजे लोकांना हे कळेल की तू ज्याचे नाव यहोवा आहे, तो तूच केवळ सबंध पृथ्वीवर सर्वोच्च आहेस.” पण, हे ८३ वे स्तोत्र का लिहिण्यात आले होते, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याकाळी कोणत्या अशा घटना घडणार होत्या ज्यामुळे यहोवाच केवळ खरा देव आहे हे सर्वांनाच मान्य करावे लागणार होते? या स्तोत्रात आज आपल्याकरता काही बोध आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत. *

यहोवाच्या लोकांविरुद्ध एक षडयंत्र

३, ४. स्तोत्र ८३ कोणी लिहिले असावे आणि या स्तोत्रात कशाविषयी वर्णन केले आहे?

स्तोत्र ८३ च्या उपरिलेखानुसार हे “आसाफाचे गीत” आहे. हे स्तोत्र रचणारा कदाचित दावीद राजाच्या राज्यातील, लेवी वंशाचा प्रसिद्ध संगीतकार आसाफ याचा वंशज असावा. यहोवाने आपले सार्वभौमत्त्व सिद्ध करावे आणि आपले नाव सर्वांना प्रकट करावे अशी हे स्तोत्र रचणारा यहोवाला विनंती करतो. हे स्तोत्र बहुधा शलमोनाच्या मृत्यूनंतर लिहिण्यात आले असावे. असे का म्हणता येईल? कारण दावीद व शलमोन या दोघांच्याही कारकीर्दीत सोरच्या राजाचे इस्राएल राष्ट्रासोबत मैत्रिपूर्ण संबंध होते. पण ८३ वे स्तोत्र रचण्यात आले तोपर्यंत सोरचे रहिवासी इस्राएलाच्या शत्रूंशी संगनमत करून इस्राएलाचे विरोधक बनले होते.

स्तोत्रकर्ता अशा दहा राष्ट्रांच्या नावांचा उल्लेख करतो, ज्यांनी देवाच्या लोकांचा नाश करण्याचे षडयंत्र रचले होते. ही शत्रू राष्ट्रे इस्राएलाच्या सर्व बाजूंस वसलेली होती आणि त्यांची नावे याप्रमाणे दिलेली आहेत: “तंबूंत राहणारे अदोमी व इश्‍माएली, मवाब व हगारी, गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत; अश्‍शूरहि त्यांस सामील झाला आहे.” (स्तो. ८३:६-८) स्तोत्रकर्ता कोणत्या ऐतिहासिक घटनेविषयी सांगत असावा? काहींचे असे म्हणणे आहे की यहोशाफाटाच्या काळात अम्मोन, मवाब व सेईर पहाडातील रहिवाशांनी मिळून इस्राएलवर केलेल्या हल्ल्याविषयी कदाचित तो सांगत असावा. (२ इति. २०:१-२६) तर इतरांच्या मते, या स्तोत्रात कोणत्याही विशिष्ट घटनेबद्दल नव्हे, तर इस्राएल राष्ट्राच्या सबंध इतिहासात आजूबाजूच्या राष्ट्रांनी त्यांच्याशी केलेल्या शत्रुतापूर्ण व्यवहाराविषयी सांगितलेले असावे.

५. स्तोत्र ८३ यातील शब्द आज ख्रिश्‍चनांना कशा प्रकारे प्रोत्साहन देतात?

यांपैकी कोणतीही शक्यता खरी असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. ती अशी, की यहोवा देवाने हे स्तोत्र लिहिण्याची प्रेरणा अशा काळात दिली जेव्हा त्याचे राष्ट्र धोक्यात आले होते. या स्तोत्रातील शब्द आजच्या काळातही देवाच्या सेवकांना धीर देतात. कारण, त्यांच्याही सबंध इतिहासात त्यांचा नाश करण्यास उत्सुक असलेल्या शत्रूंकडून त्यांना एकापाठोपाठ एक हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे. तसेच, लवकरच जेव्हा मागोगचा गोग आपल्या सैन्याद्वारे, देवाची आत्म्याने व खरेपणाने उपासना करणाऱ्‍या सर्वांचा नाश करण्याचा एक शेवटला प्रयत्न करेल, तेव्हा देखील या स्तोत्रातील शब्द नक्कीच आपले मनोबल वाढवतील. —यहेज्केल ३८:२, ८, ९, १६ वाचा.

स्तोत्रकर्त्याला सर्वाधिक काळजी कशाची होती?

६, ७. (क) स्तोत्र ८३ च्या सुरुवातीला स्तोत्रकर्ता कशाबद्दल प्रार्थना करतो? (ख) स्तोत्रकर्त्याला सर्वात जास्त काळजी कशाची होती?

स्तोत्रकर्ता कशा प्रकारे आपल्या भावना यहोवाला प्रार्थनेत व्यक्‍त करतो ते पाहा: “हे देवा, तू स्तब्ध राहू नको. हे देवा, मौन धरू नको, स्वस्थ राहू नको. कारण पाहा, तुझे शत्रु दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढिले आहे. ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करितात; . . . कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करितात.”—स्तो. ८३:१-३,.

स्तोत्रकर्त्याला सर्वाधिक काळजी कशाबद्दल वाटत होती? स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी तर त्याला नक्कीच वाटत असेल. पण, त्याच्या प्रार्थनेचा मुख्य विषय तो नव्हता. तर, यहोवाच्या नावाची निंदा केली जात होती आणि जे राष्ट्र त्याच्या नावाने ओळखले जायचे त्या राष्ट्राला धमक्या दिल्या जात होत्या, याची त्याला सर्वात जास्त काळजी होती. आपणही, या दुष्ट जगाच्या शेवटल्या कठीण काळात स्तोत्रकर्त्यासारखाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे.—मत्तय ६:९, १० वाचा.

८. इस्राएलाविरुद्ध षडयंत्र रचण्यामागे राष्ट्रांचा काय हेतू होता?

इस्राएलाचे शत्रू काय म्हणत होते हे स्तोत्रकर्ता सांगतो: “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.” (स्तो. ८३:४) ही राष्ट्रे देवाच्या निवडलेल्या लोकांबद्दल किती द्वेष बाळगत होती! पण त्यांच्या षडयंत्रामागे आणखी एक हेतू होता. इस्राएल देशावर त्यांचा डोळा होता व ते उद्दामपणे असे म्हणत होते: “देवाची निवासस्थाने आपल्या ताब्यात घेऊ या.” (स्तो. ८३:१२) आपल्या काळातही असेच काहीतरी घडत आहे का? हो, घडत आहे!

देवाचे पवित्र निवासस्थान

९, १०. (क) प्राचीन काळात, देवाचे पवित्र निवासस्थान कशास म्हणण्यात आले? (ख) आज अभिषिक्‍त शेषजन व ‘दुसरी मेंढरे’ कोणते आशीर्वाद अनुभवत आहेत?

प्राचीन काळात प्रतिज्ञात देशाला देवाचे पवित्र निवास्थान म्हणून ओळखले जात असे. इजिप्तच्या दास्यातून सुटका झाल्यानंतर इस्राएल लोकांनी गायिलेले जयजयकाराचे गीत तुम्हाला आठवत असेल: “तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.” (निर्ग. १५:१३) कालांतराने, देवाच्या या ‘निवासात’ याजकगण असलेल्या मंदिराचा, तसेच जेरूसलेम या राजधानी शहराचा समावेश झाला. येथे दाविदाच्या कुळातील राजे यहोवाच्या सिंहासनावर बसून राज्य करत. (१ इति. २९:२३) म्हणूनच, येशूने जेरूसलेम शहराला “थोर राजाची नगरी” म्हटले.—मत्त. ५:३५.

१० आपल्या काळाविषयी काय म्हणता येईल? सा.यु. ३३ मध्ये ‘देवाचे इस्राएल’ हे नवे राष्ट्र उदयास आले. (गल. ६:१६) देवाच्या नावाचे साक्षीदार असण्याची जी जबाबदारी नैसर्गिक इस्राएल राष्ट्राने पार पाडली नाही, ती जबाबदारी येशूच्या अभिषिक्‍त बांधवांनी बनलेल्या या नव्या राष्ट्राने पार पाडली. (यश. ४३:१०; १ पेत्र २:९) प्राचीन इस्राएलाला जे वचन देण्यात आले होते, ते देवाने त्यांनाही दिले: “मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल.” (२ करिंथ. ६:१६; लेवी. २६:१२) सन १९१९ मध्ये यहोवाने ‘देवाच्या इस्राएलातील’ शेषजनांविषयी संमती व्यक्‍त केली. त्यावेळी, त्यांना एका ‘देशाचे’ वतन मिळाले. हा देश त्यांचे आध्यात्मिक कार्यक्षेत्र असून, त्यात ते एका आत्मिक नंदनवनाचा आनंद उपभोगतात. (यश. ६६:८) १९३० च्या दशकापासून ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ लाखो लोक त्यांना येऊन मिळाले आहेत. (योहा. १०:१६) आधुनिक काळातील हे ख्रिस्ती यहोवाचे आशीर्वाद व आध्यात्मिक वाढ अनुभवत आहेत आणि एका अर्थाने हा यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा विजय आहे. (स्तोत्र ९१:१, २ वाचा.) अर्थातच हे पाहून सैतान अधिकच क्रोधाविष्ट होतो!

११. पूर्वीपासूनच देवाच्या शत्रूंचे मुख्य ध्येय काय आहे?

११ शेवटल्या काळात सैतानाने, अभिषिक्‍त शेषजन आणि दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांच्या साथीदारांचा विरोध करण्याकरता पृथ्वीवरील त्याच्या प्रतिनिधींचा उपयोग केला आहे. नात्सींच्या काळात पश्‍चिम युरोपात तसेच सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट शासनाखाली पूर्व युरोपातही हेच घडले. इतरही बऱ्‍याच देशांत सैतानाने यहोवाच्या लोकांचा विरोध केल्याची उदाहरणे आहेत. आणि विशेषतः मागोगचा गोग देवाच्या लोकांवर शेवटला हल्ला करेल त्यावेळी त्यांना अनेक मार्गांनी विरोध व छळ सहन करावा लागेल. गतकाळाप्रमाणेच त्या शेवटल्या हल्ल्याच्या वेळीही विरोधक, कदाचित यहोवाच्या लोकांची मालमत्ता व संपत्ती जबरदस्तीने त्यांच्यापासून हिरावून घेतील. पण पहिल्यापासून सैतानाच्या विरोधाचा मूळ उद्देश एकच आहे. तो म्हणजे, देवाच्या लोकांचा सामूहिक रीत्या नाश करणे, ज्यामुळे “यहोवाचे साक्षीदार” हे नाव पूर्णपणे मिटवून टाकले जाईल. आपल्या सार्वभौमत्त्वाला उद्दामपणे दिलेल्या या आव्हानाला यहोवा कशी प्रतिक्रिया दाखवतो? स्तोत्रकर्त्याच्या शब्दांकडे पुन्हा एकदा लक्ष द्या.

यहोवाच्या विजयाची खात्री देणारे एक प्राचीन उदाहरण

१२-१४ मगिद्दो शहराजवळ मिळालेल्या कोणत्या दोन ऐतिहासिक विजयांचा स्तोत्रकर्ता उल्लेख करतो?

१२ शत्रू राष्ट्रांचे मनसुबे निष्फळ करण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ आहे याविषयी स्तोत्रकर्ता पूर्ण भरवसा व्यक्‍त करतो. ८३ व्या स्तोत्रात तो मगिद्दो या प्राचीन शहरापासून काही अंतरावर इस्राएलांनी आपल्या शत्रूंवर मिळवलेल्या दोन निर्णायक विजयांचा उल्लेख करतो. मगिद्दो शहर, याच नावाच्या एका खोऱ्‍यात वसलेले होते. उन्हाळ्यात, किशोन नदीचे कोरडे झालेले नागमोडी पात्र या खोऱ्‍यात स्पष्ट दिसते. हिवाळ्यात पाऊस पडल्यावर मात्र ही नदी दुथडी भरून वाहते. म्हणूनच कदाचित या नदीला ‘मगिद्दोचे जलप्रवाह’ असेही म्हणण्यात आले आहे.—शास्ते ४:१३; ५:१९.

१३ मगिद्दो खोऱ्‍यापासून १५ किलोमीटर अंतरावर मोरे नावाची टेकडी आहे. गिदोन शास्त्याच्या काळात याच टेकडीजवळ मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडील लोक लढाईकरता एकत्र आले होते. (शास्ते ७:१, १२) गिदोनाच्या लहानशा सैन्यात केवळ ३०० माणसे होती. पण यहोवाच्या साहाय्याने त्यांनी एका मोठ्या सैन्याला पराभूत केले. कसे? देवाने सांगितल्यानुसार त्यांनी रात्रीच्या वेळी शत्रूच्या छावणीला वेढा घातला. त्यांच्या हातात मातीचे घडे होते व त्यांत मशाली होत्या. गिदोनाने इशारा देताच सर्वांनी आपापल्या हातातील मातीचा घडा फोडला. तेव्हा घड्यांत लपवलेल्या मशाली रात्रीच्या अंधारात अकस्मात प्रकाशल्या. त्याच वेळी त्यांनी आपली रणशिंगे फुंकून असा घोष केला: “[यहोवाची] तरवार व गिदोनाची तरवार!” हे सर्व पाहून त्यांचे शत्रू गोंधळात पडले आणि ते एकमेकांनाच तरवारीने मारू लागले; जे बचावले ते यार्देन नदीच्या पलीकडे पळून गेले. यादरम्यान, शत्रूंचा पाठलाग करण्यात इतरही इस्राएली सामील झाले. शत्रू सैन्यातील एकूण १,२०,००० सैनिकांचा वध करण्यात आला.—शास्ते ७:१९-२५; ८:१०.

१४ मोरे टेकडीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर मगिद्दो खोऱ्‍याच्या पलीकडे ताबोर डोंगर आहे. येथे एकदा शास्ता बाराक याने हासोराचा कनानी राजा याबीन याच्या सैन्याचा सामना करण्यासाठी १०,००० इस्राएली सैनिकांना एकत्रित केले होते. राजा याबीनाच्या सैन्याचे नेतृत्त्व त्याचा सेनापती सीसरा करत होता. या कनानी सैन्यात ९०० रथ होते, ज्यांच्या चाकांना लोखंडाच्या धारदार पाती बसवलेल्या होत्या. इस्राएलाच्या सैन्याजवळ मात्र फारशी शस्त्रास्त्रे नव्हती. इस्राएलाचे सैन्य ताबोर डोंगरावर एकत्रित झाल्याची खबर मिळताच सीसराने आपले सैन्य खोऱ्‍यात जमा केले. मग, ‘परमेश्‍वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्‍यांचा तरवारीने धुव्वा उडविला.’ कदाचित अचानक आलेल्या पावसामुळे कीशोन नदीला पूर येऊन रथाची चाके चिखलात रुतली असावीत. सीसराच्या सगळ्या सैन्याचा इस्राएलाने संहार केला.—शास्ते ४:१३-१६; ५:१९-२१.

१५. (क) यहोवाने काय करावे अशी स्तोत्रकर्ता त्याला प्रार्थना करतो? (ख) देवाच्या शेवटल्या लढाईचे नाव आपल्याला कशाची आठवण करून देते?

१५ स्तोत्रकर्त्याच्या काळात इस्राएल राष्ट्रावर डोळा ठेवून असलेल्या राष्ट्रांचा यहोवाने याच प्रकारे पराजय करावा अशी स्तोत्रकर्ता विनंती करतो. तो प्रार्थना करतो: “मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्‍यांना कीशोन नदीजवळ तू जसे केले, तसे त्यांना कर; ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.” (स्तो. ८३:९, १०) लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, सैतानाच्या जगाविरुद्ध देवाच्या शेवटल्या लढाईला हर्मगिदोन (म्हणजेच, मगिद्दो पर्वत) असे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आपल्याला मगिद्दोजवळ झालेल्या निर्णायक लढायांची आठवण होते. प्राचीन काळातील त्या लढायांमध्ये यहोवाला मिळालेल्या विजयातून आपल्याला आश्‍वासन मिळते की हर्मगिदोनाच्या लढाईतही विजय यहोवाचाच होईल.—प्रकटी. १६:१३-१६.

यहोवाचे सार्वभौमत्त्व सिद्ध होण्याकरता प्रार्थना करा

१६. विरोधकांना आज कशा प्रकारे “लज्जित” व्हावे लागले आहे?

१६ या ‘शेवटल्या काळादरम्यान’ यहोवाच्या लोकांचा नाश करण्याचे सर्व प्रयत्न त्याने निष्फळ केले आहेत. (२ तीम. ३:१) यामुळे यहोवाच्या सेवकांच्या विरोधकांची लाजिरवाणी अवस्था झाली आहे. स्तोत्र ८३:१६ यात हे भाकीत करण्यात आले होते: “हे परमेश्‍वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.” कितीतरी देशांत यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचार कार्य थांबवण्याचे विरोधकांचे प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. या देशांमध्ये, एकमात्र खरा देव यहोवा याचे उपासक खंबीर राहिल्यामुळे व त्यांनी धीराने विरोधाला तोंड दिल्यामुळे चांगल्या मनोवृत्तीच्या लोकांना साक्ष मिळाली आहे व अशा कित्येक जणांनी ‘[यहोवाच्या] नावाचा शोध’ केला आहे. एकेकाळी जेथे यहोवाच्या साक्षीदारांचा क्रूरपणे छळ करण्यात आला होता, तेथे आज यहोवाचे हजारो, लाखो सेवक त्याचे स्तवन करत आहेत. खरोखर, यहोवाचा केवढा मोठा विजय! आणि त्याच्या शत्रूंसाठी किती शरमेची गोष्ट! —यिर्मयाह १:१९ वाचा.

१७. मानवजात आज कोणत्या निर्णायक वळणावर उभी आहे आणि लवकरच आपल्याला कोणते शब्द आठवतील?

१७ अर्थात, अजून लढाई संपलेली नाही हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण सुवार्तेची घोषणा करत राहतो. आणि सर्व लोकांप्रमाणेच आपल्या विरोधकांनाही आपण सुवार्ता सांगतो. (मत्त. २४:१४, २१) पण, पश्‍चात्ताप करून तारण मिळवण्याची संधी या विरोधकांसाठी आज जरी खुली असली, तरी लवकरच ती संपुष्टात येईल. शेवटी, कोणत्याही व्यक्‍तीच्या तारणापेक्षा यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण अधिक महत्त्वाचे आहे. (यहेज्केल ३८:२३ वाचा.) बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे सर्व राष्ट्रे जेव्हा जगभरातील देवाच्या लोकांचा नाश करण्याकरता एक होतील, तेव्हा आपल्याला स्तोत्रकर्त्याचे हे शब्द आठवतील: “ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत.”—स्तो. ८३:१७.

१८, १९. (क) यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा जाणूनबुजून विरोध करणाऱ्‍यांचे लवकरच काय होईल? (ख) यहोवाचे सार्वभौमत्त्व लवकरच कायमचे सिद्ध होणार आहे, हे जाणून तुम्हाला कसे वाटते?

१८ यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा जाणूनबुजून विरोध करणाऱ्‍यांचा लवकरच लाजिरवाणा अंत होईल. देवाचे वचन सांगते की जे “सुवार्ता मानीत नाहीत”—व त्यामुळे ज्यांचा हर्मगिदोनात नाश होईल—त्यांच्याकरता हा “युगानुयुगाचा नाश” ठरेल. (२ थेस्सलनी. १:७-९) त्यांचा नाश झाल्यामुळे व यहोवाची उपासना करणाऱ्‍यांचा बचाव झाल्यामुळे, केवळ यहोवाच खरा देव आहे हे पूर्णपणे सिद्ध होईल. नव्या जगात, हा महान विजय सर्वांच्या कायम आठवणीत राहील. “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल,” तेव्हा जे लोक पुन्हा जिवंत होतील त्यांनाही यहोवाच्या या महान विजयाबद्दल समजेल. (प्रे. कृत्ये २४:१५) यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या अधीन होणे किती सुज्ञपणाचे आहे याचा खात्रीलायक पुरावा त्यांना नव्या जगात पाहायला मिळेल. त्यामुळे, त्यांच्यापैकी जे नम्र मनोवृत्तीचे असतील, त्यांना केवळ यहोवाच खरा देव असल्याची लगेच खात्री पटेल.

१९ आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने त्याच्या विश्‍वासू उपासकांकरता खरोखर किती अद्‌भुत भवितव्य राखून ठेवले आहे! स्तोत्रकर्त्याच्या या प्रार्थनेचे यहोवाने लवकर उत्तर द्यावे अशी प्रार्थना करण्याची तुम्हाला प्रेरणा होत नाही का: “ते सर्वकाळ लज्जित आणि घाबरे होवोत, होय, ते गोंधळून जावोत, आणि नाश पावोत. आणि ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे”?—स्तो. ८३:१७, १८, पं.र.भा.

[तळटीप]

^ परि. 2 या लेखाचा अभ्यास करण्याआधी जर तुम्ही ८३ व्या स्तोत्रातील माहितीशी परिचित होण्याकरता आधी ते वाचून काढले तर तुमचा अभ्यास अधिक अर्थपूर्ण होईल.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

स्तोत्र ८३ रचण्यात आले तेव्हा इस्राएल राष्ट्राची काय परिस्थिती होती?

स्तोत्र ८३ च्या लेखकाला सर्वाधिक काळजी कशाची होती?

• सैतान आज कोणाचा विरोध व छळ करत आहे?

स्तोत्र ८३:१८ यातील प्रार्थनेचे यहोवा कशा प्रकारे उत्तर देईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

प्राचीन मगिद्दोजवळ लढलेल्या लढायांचा आपल्या भविष्याशी काय संबंध आहे?

कीशोन नदी

हरोशेथ

कर्मेल डोंगर

इज्रेलचे खोरे

मगिद्दो

तानख

गिलबोवा डोंगर

एन-हरोद

मोरे

एन-दोर

ताबोर डोंगर

गालीलचा समुद्र

यार्देन नदी

[१२ पानांवरील चित्र]

एका मनःपूर्वक प्रार्थनेच्या रूपात असलेले स्तोत्र रचण्याची प्रेरणा स्तोत्रकर्त्याला कशामुळे मिळाली?