रचनाकाराशिवाय रचना?
रचनाकाराशिवाय रचना?
नैसर्गिक निवडीमुळे जीवन इतके क्लिष्ट व वैविध्यपूर्ण आहे, असा चार्ल्स डार्विनने दावा करून सुमारे १५० वर्षे उलटली आहेत. परंतु, अलिकडेच त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि त्याचे आधुनिक सिद्धांत यांविरुद्ध काहीजण आपले मत मांडत आहेत. या लोकांचे असे म्हणणे आहे, की जिवंत प्राण्यांची अगदी उत्कृष्टपणे जुळणी केलेली रचना, एक उद्देशपूर्ण रचनाकाराकडे अंगुली दर्शवते. अनेक सन्माननीय शास्त्रज्ञ देखील, आज आपण पृथ्वीवर पाहत असलेली विभिन्न जातीची प्राणीसृष्टी उत्क्रांतीमुळे अस्तित्वात आली, ही कल्पना स्वीकारत नाहीत.
यांपैकी काही शास्त्रज्ञ, बुद्धिमान रचना नावाचा प्रतिवाद मांडत आहेत. ते असा दावा करतात, की जीवशास्त्र, गणित आणि सामान्य ज्ञान या गोष्टी सृष्टीतील रचनेला आधार देतात. हा विचार शाळेतील अभ्यासात शिकवला जावा, असा त्यांचा प्रयत्न चालला आहे. उत्क्रांतीचा हा विरोध खासकरून संयुक्त संस्थानांत अधिक दिसून येत असला तरी, इंग्लंड, टर्की, नेदरलँड्स, पाकिस्तान आणि सर्बिया येथेही तो पाहायला मिळतो.
महत्त्वाची गोष्ट वगळली जाते
परंतु बुद्धिमान रचना या अगदी काळजीपूर्वक तयार केलेल्या कल्पनेत, एक महत्त्वाची गोष्ट वगळण्यात आली आहे. या कल्पनेत रचनाकाराचा उल्लेखच नाही. रचनाकाराशिवाय रचना आकारणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? बुद्धिमान रचनेचे पुरस्कार करणारे, “हा रचनाकार कोण किंवा काय आहे याबद्दल कसलाही स्पष्ट दावा करत नाहीत,” असा अहवाल द न्यू यॉर्क टाईम्स मॅगझीनने दिला. लेखिका, क्लॉडिआ वॉलिस म्हणते, की बुद्धिमान रचनेचे पुरस्कर्ते “‘देव’ या शब्दाचा आपल्या चर्चेत उल्लेख न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.” आणि न्यूजवीक मासिकात असे म्हटले होते, की “बुद्धिमान रचना या संकल्पनेत रचनाकाराचे अस्तित्व आणि त्याची ओळख यांचा कसलाही उल्लेख नाही.”
रचनाकाराला वगळण्याचा प्रयत्न करणे किती व्यर्थ आहे हे तुम्ही समजू शकता. विश्व आणि जीवसृष्टीतील रचनेचे स्पष्टीकरण, रचनाकाराचे अस्तित्व आणि त्याची ओळख न देता किंवा त्याचा विचारच न करता पूर्ण होणे कसे शक्य आहे?
रचनाकार असल्याचे कबूल करायचे की नाही हा विवाद काही अंशी पुढील प्रश्नांवर केंद्रित आहे: अलौकिक रचनाकार अस्तित्वात आहे असे कबूल केल्याने वैज्ञानिक व बौद्धिक वाढ खुंटेल का? जेव्हा इतर कोणतेही स्पष्टीकरण देता येत नाही तेव्हा आपण बुद्धिमान रचनाकार असल्याचे कबूल करावे का? आणि, रचनेवरून रचनाकार आहे असा निष्कर्ष काढणे खरोखरच शहाणपण आहे का? पुढील लेखात या आणि अशाच प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा करण्यात आली आहे. (w०७ ८/१५)
[३ पानांवरील चित्रे]
नैसर्गिक निवडीमुळे जीवन इतके क्लिष्ट आहे, असा चार्ल्स डार्विनने दावा केला
[चित्राचे श्रेय]
डार्विन: From a photograph by Mrs. J. M. Cameron/U.S. National Archives photo