खरे अध्यात्म तुम्हाला ते कोठे सापडेल?
खरे अध्यात्म तुम्हाला ते कोठे सापडेल?
प्रेषित पौलाने लिहिले, “ऐहिक प्रवृत्तीचे फळ मृत्यू आहे; पण आध्यात्मिक प्रवृत्तीची परिणती जीवन व शांती यात होते.” (रोमकर ८:६, किंग जेम्स व्हर्शन) या शब्दांतून प्रेषित पौलाने स्पष्ट केले की आध्यात्मिक प्रवृत्तीचे असणे वा नसणे हा केवळ आपापल्या आवडीचा किंवा पसंतीचा प्रश्न नाही. हा मुळात जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कोणत्या अर्थाने “जीवन व शांती” मिळते? बायबलनुसार, अशा व्यक्तीला सध्या तर मनःशांती व देवासोबत शांतीचा संबंध अनुभवता येतोच पण भविष्यात तिला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वादही मिळेल. (रोमकर ६:२३; फिलिप्पैकर ४:७) म्हणूनच येशूने असे म्हटले होते, की “आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक असणारे सुखी आहेत!”—मत्तय ५:३.
तुम्ही हे मासिक वाचत आहात त्याअर्थी तुम्हालाही अध्यात्माविषयी आस्था आहे. आणि निश्चितच हे सुज्ञपणाचे लक्षण आहे. तरीपण या विषयावर इतके वेगवेगळे दृष्टिकोन अस्तित्वात असताना, तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की शेवटी ‘खरे अध्यात्म म्हणजे काय? ते कसे मिळवता येईल?’
“ख्रिस्ताचे मन”
आध्यात्मिक प्रवृत्ती बाळगण्याच्या महत्त्वाविषयी व फायद्यांविषयी सांगण्यासोबतच प्रेषित पौलाने खरे अध्यात्म काय आहे याविषयीही बरेच काही सांगितले. करिंथ या पुरातन शहरातील ख्रिश्चनांना लिहिताना पौलाने शारीरिक मनुष्य, अर्थात जो शरीराच्या वासनांनुसार वागतो आणि आध्यात्मिक मनुष्य, अर्थात जो आध्यात्मिक गोष्टी प्रिय मानतो यांमधील फरक स्पष्ट केला. पौलाने लिहिले: “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात.” दुसरीकडे पाहता त्याने सांगितले की आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य हा वेगळा असतो कारण त्याच्या ठायी “ख्रिस्ताचे मन” असते.—१ करिंथकर २:१४-१६.
“ख्रिस्ताचे मन” असण्याचा अर्थ ‘ख्रिस्त येशूची चित्तवृत्ती’ बाळगणे. (रोमकर १५:५; फिलिप्पैकर २:५) दुसऱ्या शब्दांत आध्यात्मिक प्रवृत्तीचा मनुष्य तोच, जो येशूप्रमाणे विचार करतो आणि त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो. (१ पेत्र २:२१; ४:१) एका व्यक्तीची चित्तवृत्ती जितकी जास्त ख्रिस्तानुरूप असेल तितकीच त्याची आध्यात्मिक प्रवृत्ती बळावेल आणि तितकेच तो “जीवन व शांती” या ध्येयांच्या जवळ जाईल.—रोमकर १३:१४.
‘ख्रिस्ताची चित्तवृत्ती’ कशी जाणून घेता येईल
ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्याठायी असण्याकरता प्रथम आपल्याला ती जाणून घ्यावी लागेल. त्याअर्थी, आध्यात्मिक प्रवृत्ती संपादन करण्याची पहिली पायरी म्हणजे येशूची विचारसरणी जाणून घेणे. पण २,००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका व्यक्तीची विचारसरणी तुम्हाला कशी बरे जाणून घेता येईल? विचार करा, तुमच्या देशातील ऐतिहासिक व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही काय कराल? कदाचित, तुम्ही त्यांच्याविषयी वाचन कराल. त्याचप्रकारे येशूविषयी लिहिण्यात आलेल्या इतिहासाचे वाचन करणे हा त्याची चित्तवृत्ती जाणून घेण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.—योहान १७:३.
येशूच्या जीवनाविषयी, आपल्याजवळ चार तपशीलवार ऐतिहासिक अहवाल उपलब्ध आहेत. अर्थात मत्तय, मार्क, लूक व योहान यांनी लिहिलेली शुभवर्तमाने. हे अहवाल काळजीपूर्वक वाचल्यामुळे तुम्हाला येशू कशाप्रकारे विचार करायचा, त्याच्या मनातल्या भावना, आणि निरनिराळ्या प्रसंगी तो विशिष्टप्रकारे का वागला हे समजून घेण्यास मदत होईल. या वाचलेल्या माहितीविषयी मनन केल्यास हळूहळू तुमच्या मनात येशूच्या व्यक्तिमत्त्वाचे एक चित्र तयार होईल. तुम्ही स्वतःला आधीच ख्रिस्ताचा अनुयायी मानत असला तरीसुद्धा, अशाप्रकारे वाचन व मनन केल्याने, तुम्हाला ‘आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जाण्यास’ मदत होईल.—२ पेत्र ३:१८.
तर हे मनात बाळगून, आता आपण शुभवर्तमानातील काही उताऱ्यांचे परीक्षण करू आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की येशू इतक्या आध्यात्मिक प्रवृत्तीचा का योहान १३:१५.
होता? मग तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता, की मला त्याच्या आदर्शाचे कसे अनुकरण करता येईल?—आध्यात्मिक प्रवृत्ती व ‘आत्म्याचे फळ’
शुभवर्तमानकार लूक सांगतो की येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याच्यावर देवाचा पवित्र आत्मा उतरला आणि येशू “पवित्र आत्म्याने परिपूर्ण” झाला. (लूक ३:२१, २२; लूक ४:१) येशूने आपल्या शिष्यांनाही देवाच्या पवित्र आत्म्याच्या अर्थात त्याच्या ‘कार्यकारी शक्तीच्या’ मार्गदर्शनाने चालण्याचे महत्त्व पटवून दिले. (उत्पत्ति १:२, NW; लूक ११:९-१३) हे इतके महत्त्वाचे का आहे? कारण देवाच्या आत्म्याला एका व्यक्तीच्या मनाचे परिवर्तन करण्याचे व त्यास ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीच्या अनुरूप बनवण्याचे सामर्थ्य आहे. (रोमकर १२:१, २) पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे गुण उत्पन्न करतो. या गुणांना बायबलमध्ये “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” म्हटले आहे व हे गुण असलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवृत्तीची आहे हे दिसून येते. (गलतीकर ५:२२, २३) थोडक्यात सांगायचे झाल्यास, जो देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो तोच खरा आध्यात्मिक प्रवृत्तीचा मनुष्य.
येशूने आपल्या संबंध सेवाकार्यादरम्यान आत्म्याचे फळ प्रदर्शित केले. विशेषतः ज्यांना समाजातले तळागाळातले लोक समजले जात होते अशा लोकांशी वागताना त्याची प्रीति, ममता, आणि चांगुलपणा हे गुण स्पष्टपणे दिसून आले. (मत्तय ९:३६) उदाहरणार्थ, प्रेषित योहानाने वर्णन केलेली एक घटना पाहू या. तो लिहितो: “[येशू] तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.” येशूच्या शिष्यांनीही या मनुष्याला पाहिले पण त्यांनी केवळ त्याला एक पापी मनुष्य म्हणून पाहिले. त्यांनी विचारले, “कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या?” त्या मनुष्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही त्याला पाहिले पण त्यांना दिसला तो फक्त एक भिकारी. ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?” पण येशूने मात्र त्या अंधळ्या मनुष्याकडे, मदतीची गरज असलेल्या एका व्यक्तीच्या रूपात पाहिले. तो त्या मनुष्याशी बोलला आणि त्याने त्याला बरे केले.—योहान ९:१-८.
या घटनेवरून तुम्हाला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीविषयी काय समजते? पहिली गोष्ट म्हणजे, येशूने गोरगरिबांकडे दुर्लक्ष केले नाही तर तो त्यांच्याशी अतिशय कनवाळूपणे वागला. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. तुम्हीही येशूच्या या नमुन्याचे अनुकरण करता असे तुम्हाला वाटते का? येशूने लोकांकडे ज्या दृष्टिकोनाने पाहिले त्याच दृष्टिकोनाने तुम्हीही पाहता का? त्यांचे जीवन सुधारण्याकरता, आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य मिळावे म्हणून तुम्हीही त्यांना साहाय्य करता का? की जे मोठ्या पदावर आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची आणि जे तितके प्रतिष्ठित नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची तुमची वृत्ती आहे? जर पहिल्या प्रश्नाचे तुम्ही होकारार्थी उत्तर दिले असेल, तर मग तुम्ही खरोखरच येशूच्या आदर्शाचे पालन करत आहात असे म्हणता येईल.—स्तोत्र ७२:१२-१४.
आध्यात्मिक प्रवृत्ती व प्रार्थना
शुभवर्तमानातील अहवालांतून आपल्याला हे पाहायला मिळते की येशू वारंवार देवाला प्रार्थना करत असे. (मार्क १:३५; लूक ५:१६; ) पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान येशूने मुद्दामहून प्रार्थनेकरता वेळ काढला. शिष्य मत्तय लिहितो: “लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला.” ( २२:४१मत्तय १४:२३) आपल्या स्वर्गीय पित्यासोबत संभाषण करण्यात शांतपणे घालवलेल्या या क्षणांमुळे येशूला बळ मिळे. (मत्तय २६:३६-४४) आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीही येशूप्रमाणेच देवाशी संभाषण करण्याच्या संधी शोधतात. त्यांना माहीत आहे की असे केल्यामुळे सृष्टिकर्त्यासोबतचा त्यांचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ होईल आणि त्यांना ख्रिस्ताची विचारसरणी आणखी चांगल्याप्रकारे आत्मसात करण्यास मदत मिळेल.
येशू अनेकदा बराच वेळ प्रार्थना करत असे. (योहान १७:१-२६) उदाहरणार्थ, प्रेषित होण्याकरता १२ जणांची निवड करण्याआधी येशू “प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला.” (लूक ६:१२) आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती येशूच्या या उदाहरणाचे अनुकरण करतात. अर्थात, त्यांनीही रात्रभर प्रार्थना केलीच पाहिजे असा याचा अर्थ नाही. पण जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ते देवाला प्रार्थना करण्यासाठी पुरेसा वेळ देतात आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची विनंती करतात जेणेकरून त्यांना आध्यात्मिकरित्या हितकारक असे निर्णय घेता यावेत.
प्रार्थना करताना येशू मनापासून, प्रांजळपणे देवाशी बोलत असे. याबाबतीतही आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे. येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने कशाप्रकारे प्रार्थना केली याविषयी लूकने लिहिले. तो सांगतो, “अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लूक २२:४४) येशूने यापूर्वीही मनःपूर्वक प्रार्थना केल्या होत्या पण या प्रसंगी पृथ्वीवरील त्याच्या जीवनातील सर्वात कठीण परीक्षेला तोंड देताना त्याने “अधिक आग्रहाने” प्रार्थना केली आणि त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. (इब्री लोकांस ५:७) आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्ती येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. विशेषतः, अतिशय कठीण परीक्षांना तोंड देताना ते देवाला “अधिक आग्रहाने” प्रार्थना करतात व पवित्र आत्मा, मार्गदर्शन व साहाय्य देण्याची विनंती करतात.
येशू अतिशय प्रार्थनाशील वृत्तीचा होता, त्यामुळे त्याचे शिष्यही या बाबतीत त्याचे अनुकरण करण्यास उत्सुक होते यात काही आश्चर्य नाही. म्हणूनच त्यांनी त्याला अशी विनंती केली की ‘प्रभुजी, आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा.’ (लूक ११:१) त्याचप्रकारे आज, जे खरोखरच आध्यात्मिक वृत्तीचे आहेत आणि ज्यांना देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्याची उत्सुकता आहे ते देवाला प्रार्थना करताना येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. खरी आध्यात्मिक वृत्ती आणि प्रार्थना या दोन गोष्टींत अतिशय जवळचा संबंध आहे.
आध्यात्मिक वृत्ती आणि सुवार्तेचा प्रचार
मार्कच्या शुभवर्तमानातील एका वृत्तान्तात येशू रात्री अगदी उशीरापर्यंत बऱ्याच आजारी लोकांना बरे करतो. दुसऱ्या दिवशी पहाटे तो एकांतात प्रार्थना करत असताना, त्याचे प्रेषित त्याच्याजवळ येतात आणि त्याला सांगतात की बरेच लोक त्याला शोधत आहेत. कदाचित या लोकांनाही आपल्या आजारांपासून मुक्त व्हायचे असेल. पण येशू त्यांना सांगतो: “मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दूसरीकडे जाऊ.” का? “कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे,” असे येशू स्वतःच सांगतो. (मार्क १:३२-३८; लूक ४:४३) लोकांना बरे करणे येशूकरता महत्त्वाचे होते हे खरे आहे पण देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हे येशूचे सर्वात प्रमुख काम होते.—मार्क १:१४, १५.
आजही इतरांना देवाच्या राज्याविषयी सांगणे हे ख्रिस्ताची चित्तवृत्ती असणाऱ्यांचे ओळखचिन्ह आहे. जे आपले अनुयायी होऊ इच्छितात अशांना येशूने अशी आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) या शिवाय, येशूने असे भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) देवाच्या वचनानुसार, प्रचार कार्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने साध्य केले जाते. त्याअर्थी या कार्यात अर्थपूर्ण सहभाग घेणे हे नक्कीच खऱ्या आध्यात्मिक वृत्तीचे लक्षण आहे.—प्रेषितांची कृत्ये १:८.
सबंध जगातील लोकांना राज्याच्या संदेशाची घोषणा करण्याकरता लाखो जणांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. (योहान १७:२०, २१) जे या कार्यात सहभागी होतात त्यांनी केवळ आध्यात्मिक वृत्तीचे असणे पुरेसे नाही, तर त्यांनी जागतिक पातळीवर सुसंघटित असणेही महत्त्वाचे आहे. राज्याच्या सुवार्तेचा सबंध जगात प्रचार करण्यात ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून तुमच्या मते, आज कोण चालत आहेत?
तुम्ही पात्रतेस पोचता का?
अर्थात, खरोखरच आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तीला ओळखण्याची इतरही वैशिष्ट्ये आहेत. पण आतापर्यंत आपण ज्यांविषयी चर्चा केली ती वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यास, तुम्ही आध्यात्मिक वृत्तीची व्यक्ती म्हणवण्याच्या पात्रतेस पोचता का? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकता: ‘मी देवाचे वचन बायबल, नियमित स्वरूपाने वाचतो का व जे वाचले त्यावर मनन करतो का? आत्म्याच्या फळात जे गुण समाविष्ट आहेत ते माझ्या वागणुकीतून दिसून येतात का? मी प्रार्थनाशील वृत्तीचा पुरुष अथवा स्त्री आहे का? जे लोक देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा जगव्याप्त प्रचार कार्य करत आहेत त्यांच्यासोबत संबंध जोडण्यास मी उत्सुक आहे का?’
या प्रश्नांच्या साहाय्याने प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केल्यास, आपण कितपत आध्यात्मिक वृत्तीचे आहोत हे तुम्हाला ठरवता येईल. आम्ही तुम्हाला आताच आवश्यक पावले उचलण्याचे प्रोत्साहन देतो. कारण असे केल्यास, तुम्हाला “जीवन व शांती” लाभेल.—रोमकर ८:६; मत्तय ७:१३, १४; २ पेत्र १:५-११. (w०७ ८/१)
[७ पानांवरील चौकट/चित्रे]
आध्यात्मिक वृत्तीची ओळखचिन्हे
◆ देवाचे वचन प्रिय मानणे
◆ आत्म्याचे फळ वागणुकीतून दिसून येणे
◆ देवाला नियमित व प्रांजळपणे प्रार्थना करणे
◆ इतरांना राज्याच्या सुवार्तेविषयी सांगणे
[५ पानांवरील चित्र]
बायबल तुम्हाला “ख्रिस्ताची चित्तवृत्ती” जाणून घेण्यास मदत करते