मंडळीची उन्नती होवो
मंडळीची उन्नती होवो
‘मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती झाली.’—प्रेषितांची कृत्ये ९:३१.
१. ‘देवाच्या मंडळीविषयी’ कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात?
सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने ख्रिस्ताच्या शिष्यांच्या एका गटाला एक नवे राष्ट्र, ‘देवाचे इस्राएल’ म्हणून मान्यता दिली. (गलतीकर ६:१६) हे आत्म्याने अभिषिक्त ख्रिस्ती ‘देवाची मंडळी’ देखील बनले असे बायबल सांगते. (१ करिंथकर ११:२२) पण याचा काय अर्थ होतो? ‘देवाच्या मंडळीत’ कशाप्रकारची व्यवस्था असणार होती? तिचे सदस्य पृथ्वीच्या कोणत्याही भागात राहात असले तरी ती कशाप्रकारे कार्य करणार होती? शिवाय, आपल्या जीवनाचा व आपण आनंदी असण्याशी हे कशाप्रकारे संबंधित आहे?
२, ३. मंडळी सुसंघटित असेल हे येशूने कशाप्रकारे सुचवले?
२ यापूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, अभिषिक्त अनुयायांची एक मंडळी असेल याविषयी येशूने भाकीत केले होते. त्याने पेत्राला असे म्हटले होते: “ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार मत्तय १६:१८) शिवाय, येशू अद्याप प्रेषितांसोबत होता तेव्हा त्याने लवकरच स्थापन होणार असलेल्या या मंडळीच्या कार्याविषयी व तिच्या व्यवस्थेविषयी काही सूचना दिल्या होत्या.
नाही.” (३ मंडळीत काहीजण पुढाकार घेतील हे येशूने शिकवले आणि आपल्या कृतींतूनही दाखवले. मंडळीत पुढाकार घेणारे आपल्या गटातील लोकांची सेवा करण्याद्वारे नेतृत्त्व करतील असे त्याने दाखवले. ख्रिस्ताने म्हटले: “परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करितात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवितात, हे तुम्हाला ठाऊक आहे; परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” (मार्क १०:४२-४४) तेव्हा, ‘देवाची मंडळी’ ही ठिकठिकाणी विखुरलेल्या काही व्यक्तींनी बनलेली, कोणतीही सुसंघटित संरचना नसलेली अशी मंडळी असणार नव्हती हे स्पष्टच आहे. उलट या मंडळीत एक निश्चित संरचना असणार होती आणि मंडळीतले सदस्य एकमेकांसोबत सहकार्य करून चालणार होते.
४, ५. मंडळीत आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवणे गरजेचे होते हे कशावरून दिसून येते?
४ ‘देवाच्या मंडळीचे’ मस्तक म्हणून ज्याला नेमण्यात आले होते, त्या येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना व त्याच्या अनुयायांपैकी इतरांना सांगितले की मंडळीत त्यांना इतरांप्रती काही सुनिश्चित जबाबदाऱ्या असतील. या कोणत्या जबाबदाऱ्या होत्या? एक महत्त्वाची जबाबदारी ही मंडळीच्या सदस्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याची होती. तुम्हाला आठवत असेल, की येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर इतर काही प्रेषितांसमोर त्याने पेत्राला असे म्हटले होते: “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीति करितोस काय?” पेत्राने उत्तर दिले “होय, प्रभू, मी आपणावर प्रेम करितो हे आपणाला ठाऊक आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझी कोकरे चार. . . . माझी मेंढरे पाळ. . . . माझी मेंढरे चार.” (योहान २१:१५-१७) असे म्हणून येशूने किती महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली!
५ येशूच्या शब्दांवरून दिसून येते की मंडळीतल्या सदस्यांची तुलना मेंढवाड्यातील मेंढराशी केली आहे. या मेंढरांत ख्रिस्ती पुरुष, स्त्रिया व मुलांचाही समावेश आहे आणि त्यांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याची व त्यांचे चांगल्यारितीने पालन करण्याची गरज होती. शिवाय, येशूने आपल्या सर्व अनुयायांना इतरांना शिकवण्याची व शिष्य बनवण्याची आज्ञा दिली होती त्याअर्थी त्याच्या मेंढरांमध्ये सामील होणाऱ्या नव्या व्यक्तींनाही ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पुरवणे गरजेचे होते.—मत्तय २८:१९, २०.
६. नव्याने स्थापन झालेल्या ‘देवाच्या मंडळीत’ कोणकोणत्या व्यवस्था करण्यात आल्या?
६ ‘देवाच्या मंडळीची’ स्थापना झाल्यानंतर या मंडळीचे सदस्य आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्याकरता व एकमेकांना प्रोत्साहन देण्याकरता नियमितपणे एकत्र येऊ लागले. “ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.” (प्रेषितांची कृत्ये २:४२, ४६, ४७) मंडळीविषयीच्या ऐतिहासिक अहवालात सांगितलेली आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आवश्यक पात्रता असलेल्या काही सुयोग्य पुरुषांना मंडळीचा कारभार चालवण्यात साहाय्य करण्यास नियुक्त करण्यात आले होते. त्यांचे किती शिक्षण झालेले आहे, किंवा त्यांच्याजवळ कोणकोणती कौशल्ये आहेत या आधारावर त्यांना नेमण्यात आले नव्हते. हे पुरुष “पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण” असे होते. यांपैकी एक होता स्तेफन. त्याच्याविषयी अहवालात असे म्हटले आहे की तो “विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष” होता. मंडळीच्या व्यवस्थेचा एक चांगला परिणाम म्हणजे, “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. [व] यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.”—प्रेषितांची कृत्ये ६:१-७.
देवाने नेमलेले पुरुष
७, ८. (क) आरंभीच्या ख्रिश्चनांमध्ये, प्रेषित व वडील वर्ग कोणत्या पात्रतेने सेवा करत होते? (ख) मंडळ्यांच्या माध्यमाने मार्गदर्शन पुरवण्यात आले तेव्हा काय परिणाम झाला?
७ आरंभीच्या काळात मंडळीच्या व्यवस्थेत प्रेषितांनीच पुढाकार घेतला व हे समजण्याजोगे होते. पण केवळ तेच मंडळीचे नेतृत्त्व करत होते असे नाही. एकदा पौल व त्याचे साथीदार अंत्युखियास पर आले. प्रेषितांची कृत्ये १४:२७ सांगते: “तेथे पोहंचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने [“आपल्याद्वारे,” NW] कायकाय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.” अद्यापही ते त्या स्थानिक मंडळीसोबत असताना ख्रिस्ती बनलेल्या गैरयहुदी लोकांनी सुंता करण्याची गरज आहे किंवा नाही याविषयी प्रश्न उद्भवला. हा प्रश्न सोडवण्याकरता, पौल व बर्णबा यांनी “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे” असे ठरले. हे प्रेषित व वडीलवर्ग नियमन मंडळाच्या रूपात कार्य करत होते हे यावरून स्पष्ट होते.—प्रेषितांची कृत्ये १५:१-३.
प्रेषितांची कृत्ये १५:६) बरीच चर्चा केल्यावर व पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते शास्त्रवचनांच्या सामंजस्यात एका निष्कर्षावर आले. हा निर्णय त्यांनी पत्राद्वारे मंडळीला कळवला. (प्रेषितांची कृत्ये १५:२२-३२) ज्यांना ही माहिती पाठवण्यात आली त्यांनी ती स्वीकारली आणि तिचे पालन केले. याचा काय परिणाम झाला? सर्व बंधूभगिनींना उत्तेजन मिळाले. बायबल सांगते: “ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.”—प्रेषितांची कृत्ये १६:५.
८ “प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले,” तेव्हा ख्रिस्ती वडील असणारा याकोब, जो येशूचा सावत्र भाऊ होता पण प्रेषित नव्हता त्याने या सभेची अध्यक्षता केली. (९. बायबलमध्ये आवश्यक पात्रता असलेल्या ख्रिस्ती पुरुषांकरता कोणकोणत्या भूमिकांचे वर्णन करण्यात आले आहे?
९ पण स्थानिक मंडळ्यांचा दैनंदिन कारभार कसा व कोणी चालवायचा होता? क्रेत द्वीपावरील मंडळ्यांचे उदाहरण घ्या. तेथे राहणाऱ्या बहुतेक लोकांचे चांगले नाव नव्हते तरीसुद्धा यांच्यापैकी काहीजणांनी परिवर्तन केले आणि ते खरे ख्रिस्ती बनले. (तीत १:१०-१२; २:२, ३) ते निरनिराळ्या शहरांत राहात होते आणि जेरुसलेम येथील नियमन मंडळापासून बरेच दूर होते. पण यामुळे फारशी समस्या निर्माण झाली नाही कारण क्रेत बेटावर, तसेच इतर ठिकाणीही, स्थानिक मंडळ्यांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्तीचे “वडील” नेमण्यात आले होते. या वडिलांजवळ बायबलमध्ये सांगितल्यानुसार आवश्यक पात्रता होती. त्यांना वडील किंवा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले होते. हे “सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावयासहि” समर्थ होते. (तीत १:५-९; १ तीमथ्य ३:१-७) इतर आध्यात्मिक पुरुषांजवळ सेवा सेवक या नात्याने मंडळीत साहाय्य करण्याची पात्रता होती.—१ तीमथ्य ३:८-१०, १२, १३.
१०. मत्तय १८:१५-१७ नुसार गंभीर समस्या कशारितीने सोडवायच्या होत्या?
१० मंडळीत अशाप्रकारची व्यवस्था असेल हे येशूनेही सुचवले होते. मत्तय १८:१५-१७ यातील अहवाल तुम्हाला आठवत असेल. तेथे येशूने देवाच्या लोकांपैकी दोन व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या समस्येविषयी, त्यांपैकी एकाने दुसऱ्याविरुद्ध काही पाप केल्यास उद्भवणाऱ्या समस्येविषयी सांगितले. ज्याचे नुकसान झाले आहे त्याने दुसऱ्याजवळ जाऊन एकांतात, म्हणजे फक्त त्या दोघांमध्ये आपला ‘अपराध त्याला दाखवावा’ असे येशूने सांगितले. जर असे करूनही समस्या सुटली नाही तर ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे अशा एक किंवा दोन व्यक्तींना मदत करण्याची विनंती केली जाऊ शकते. आणि तरीसुद्धा जर प्रश्न सोडवता आला नाही तर? येशूने म्हटले: “जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.” येशूने हे शब्द उद्गारले तेव्हा यहुदी लोक अद्यापही ‘देवाची मंडळी’ होते आणि त्याअर्थी हे शब्द सुरुवातीला त्यांनाच लागू होणार होते. * पण ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर येशूचे हे मार्गदर्शन मंडळीला लागू होणार होते. देवाच्या लोकांमध्ये प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आध्यात्मिक उत्तेजन व मार्गदर्शन देण्याकरता एक सुनिश्चित संरचना, एक मंडळी असेल याचा हा एक पुरावा होता.
११. समस्या सोडवण्यात वडिलांचा कशाप्रकारे सहभाग असणार होता?
११ वडील जन किंवा पर्यवेक्षकांनी स्थानिक मंडळीच्या वतीने समस्या हाताळणे किंवा पाप केलेल्या व्यक्तींचे प्रकरण हाताळणे हे योग्यच होते. तीत १:९ यात वडील म्हणून नियुक्त होण्याकरता पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गुणांचा उल्लेख केला आहे त्याच्याशी हे सुसंगत आहे. पौलाने तीताला “अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी,” म्हणून मंडळ्यांकडे पाठवले. तीत आणि स्थानिक मंडळीचे वडील देखील अपरिपूर्ण होते. (तीत १:४, ५) आज वडील म्हणून नियुक्त केले जाण्याकरता ज्यांचा विचार केला जातो त्यांनी काही काळापासून आपला विश्वास व सुभक्तीचा पुरावा दिलेला असणे अगत्याचे आहे. यामुळे मंडळीतल्या सदस्यांना या व्यवस्थेकरवी पुरवल्या जाणाऱ्या मार्गदर्शनावर व नेतृत्त्वावर भरवसा ठेवणे शक्य होते.
१२. वडिलांची मंडळीप्रती कोणती जबाबदारी आहे?
१२ इफिसस येथील मंडळीच्या वडिलांना पौलाने असे म्हटले: “स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या [पुत्राच्या] रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८) आजही मंडळीच्या पर्यवेक्षकांना ‘देवाच्या मंडळीचे पालन करण्याकरता’ नेमले जाते. त्यांनी हे प्रेमळपणे केले पाहिजे. कळपावर धनीपण गाजवून नव्हे. (१ पेत्र ५:२, ३) पर्यवेक्षकांनी सर्वांना उत्तेजन देण्याचा आणि कळपातल्या ‘सर्वांना’ साहाय्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मंडळीला जडून राहणे
१३. कधीकधी मंडळीत काय घडू शकते आणि का?
१३ वडील व मंडळीतले सर्वजण अपरिपूर्ण आहेत, तेव्हा अधूनमधून समस्या व गैरसमज होणे साहजिक आहे. पहिल्या शतकात काही प्रेषित अद्याप मंडळीत असूनही त्यांच्यातही समस्या निर्माण होत असत. (फिलिप्पैकर ४:२, ३) कधीकधी एखाद्या पर्यवेक्षकाच्या किंवा इतर कोणाच्या अविचारी किंवा असत्य बोलण्यामुळे आपल्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. किंवा शास्त्रवचनांनुसार नाही असे काहीतरी मंडळीत घडत आहे असे आपल्याला वाटू शकते. आणि वडिलांना याविषयी माहीत असूनही ते काही करत नाहीत असे कदाचित भासत असेल. अर्थात, वडिलांनी आधीच या गोष्टीची दखल घेतली असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांनी आधीच शास्त्रवचनांनुसार हे प्रकरण सोडवले असण्याचीही शक्यता आहे. कदाचित त्या प्रकरणाशी संबंधित अशा काही गोष्टी असतील ज्यांची आपल्याला काहीही कल्पना नाही. आणि जरी आपण विचार करत आहोत ते खरे असले तरीसुद्धा पुढील गोष्टींचा विचार करा: करिंथच्या मंडळीविषयी यहोवाला काळजी असूनही त्या मंडळीत एक गंभीर पाप काही काळपर्यंत घडत होते. पण कालांतराने यहोवाने हे प्रकरण योग्यरितीने व गंभीरतेने हाताळले जाण्याची व्यवस्था केली. (१ करिंथकर ५:१, ५, ९-११) आपण स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो, ‘मी करिंथ मंडळीत असतो तर त्या मधल्या काळात मी कशी प्रतिक्रिया दाखवली असती?’
१४, १५. काहींनी येशूसोबत चालण्याचे का सोडून दिले आणि यातून आपण काय शिकू शकतो?
१४ मंडळीशी संबंधित असलेल्या आणखी एका शक्यतेचा विचार करा. एखाद्या व्यक्तीला शास्त्रवचनांतील एखादी शिकवण समजायला व स्वीकारायला कठीण वाटते अशी कल्पना करा. कदाचित त्याने बायबल व मंडळीत उपलब्ध असलेल्या प्रकाशनांतून संशोधनही केले असेल. तसेच, अनुभवी ख्रिस्ती बांधवांकडून, वडिलांकडूनही त्याने साहाय्याची विनंती केली असेल. तरीही तो मुद्दा समजून घेणे त्याला अतिशय जड जात असेल. त्याने काय करावे? येशूच्या मृत्यूच्या सुमारे एका वर्षाआधी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्याने स्वतःला “जीवनाची भाकर” म्हटले आणि त्याने असेही म्हटले की एखाद्याने जर “मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही” तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी काही जणांना धक्का बसला. पण स्पष्टीकरण मागण्याऐवजी, किंवा विश्वास बाळगून कालांतराने हे स्पष्ट होईल याची वाट पाहण्याऐवजी बरेच शिष्य “पुन्हा कधी [येशू] बरोबर चालले नाहीत.” (योहान ६:३५, ४१-६६) या परिस्थितीतही, आपण तेथे असतो तर आपण काय केले असते?
१५ आधुनिक काळात, काहींनी स्थानिक मंडळीसोबत संपर्क तोडून टाकला आहे. आपण देवाची सेवा स्वतंत्रपणे सेवा करू, असे त्यांना वाटते. आपल्या भावना दुखावल्या, किंवा वडिलांनी मंडळीत घडत असलेली एखादी चूक सुधारली नाही किंवा एखादी शिकवणूक आपण स्वीकारू शकत नाही अशाप्रकारची कारणे कदाचित या व्यक्ती देत असतील. त्यांचे असे वागणे योग्य आहे का? प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध असला पाहिजे हे जरी खरे असले तरीसुद्धा प्रेषितांच्या काळाप्रमाणेच आजही तो एक जगव्याप्त मंडळीचा आपल्या उद्देशाकरता उपयोग करत आहे हे आपण नाकारू शकत नाही. शिवाय पहिल्या शतकात यहोवाने स्थानिक मंडळ्यांचा उपयोग केला व त्यांना आशीर्वाद दिला, तसेच मंडळीच्या हिताकरता त्याने सुयोग्य वडील व सेवा सेवकांचीही व्यवस्था केली. आजच्या काळातही तो हेच करत आहे.
१६. एखाद्याला मंडळी सोडून जाण्याचा मोह झाल्यास त्याने कशाचा विचार करावा?
१६ जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला असे वाटत असेल की देवासोबतचा आपला वैयक्तिक नातेसंबंध पुरेसा आहे, मंडळीसोबत सहवास राखण्याची आपल्याला गरज नाही तर ही व्यक्ती देवाने स्थापित केलेल्या व्यवस्थेचा अव्हेर करत आहे. कारण देवाच्या लोकांची जगव्याप्त मंडळी तसेच स्थानिक मंडळ्या या दोन्ही व्यवस्था देवानेच स्थापित केलेल्या आहेत. ही व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा एखाद्या लहानशा गटासोबत देवाची उपासना करत असेल पण मंडळीच्या बाहेर वडिलांच्या व्यवस्थेविषयी आणि सेवा सेवकांच्या तरतुदीविषयी काय? पौलाने कलस्सै येथील मंडळीला एक पत्र लिहिले होते आणि हे पत्र लावदिकिया येथील मंडळीतही वाचले जावे असे त्याने सांगितले होते. या पत्रात त्याने ‘ख्रिस्तामध्ये मुळावण्याविषयी व रचले जाण्याविषयी’ लिहिले होते. या मार्गदर्शनाचा फायदा स्वतंत्रपणे उपासना करणाऱ्यांना नव्हे, तर केवळ अशाच बांधवांना मिळणे शक्य होते, की जे या मंडळ्यांसोबत सहवास राखत होते.—कलस्सैकर २:६, ७; ४:१६.
सत्याचा स्तंभ व पाया
१७. पहिले तीमथ्य ३:१५ आपल्या मंडळीविषयी काय सांगते?
१७ ख्रिस्ती वडील तीमथ्य याला लिहिलेल्या पहिल्या पत्रात प्रेषित पौलाने स्थानिक मंडळीत वडील व सेवा सेवक म्हणून पात्र ठरण्याकरता कोणते गुण आवश्यक आहेत याविषयी लिहिले होते. त्यानंतर लगेच पौलाने ‘जिवंत देवाच्या मंडळीचा’ उल्लेख केला व म्हटले की ही मंडळी “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. (१ तीमथ्य ३:१५) अभिषिक्त ख्रिश्चनांच्या संपूर्ण मंडळीने पहिल्या शतकात आपण सत्याचा स्तंभ असल्याचे सिद्ध केले. आणि वैयक्तिक ख्रिश्चनांना हे सत्य मिळण्याचे प्रमुख माध्यम स्थानिक मंडळीच होते हे देखील निर्विवाद आहे. तेथेच सत्य शिकवले जात होते, येथेच सत्याचे समर्थन केले जात होते आणि येथेच त्यांना सत्यात उन्नती करणे शक्य होते.
१८. मंडळीच्या सभा इतक्या महत्त्वाच्या का आहेत?
१८ त्याचप्रकारे आज जगव्याप्त ख्रिस्ती मंडळी हे देवाचे घर व “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. आपल्या स्थानिक मंडळीत नियमित सभांना उपस्थित राहून त्यांत सहभाग घेणे हा आपली उन्नती होण्याचा, देवासोबतचा आपला नातेसंबंध बळकट करण्याचा आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज होण्याचा एकमेव मार्ग आहे. करिंथ मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौलाने या सभांमध्ये जे शिकवले जाते त्याविषयी लिहिले. त्याने लिहिले की सभांमध्ये जे काही शिकवले जाते ते स्पष्ट व समजण्याजोगे असावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून उपस्थित राहणाऱ्या सर्वांची “उन्नती” होऊ शकेल. (१ करिंथकर १४:१२, १७-१९) आज स्थानिक मंडळीच्या व्यवस्थेचा जनक स्वतः यहोवा देव असून तोच तिला सांभाळत आहे हे जर आपण ओळखले तर आपलीही उन्नती होऊ शकते.
१९. आपल्या मंडळीप्रती तुम्हाला कृतज्ञता का वाटते?
१९ होय, जर ख्रिस्ती या नात्याने आपली उन्नती व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपण मंडळीच्या आतच राहिले पाहिजे. बऱ्याच काळापासून ख्रिस्ती मंडळीने खोट्या शिकवणुकींपासून संरक्षण पुरवले आहे आणि मशीही राज्याचा सबंध जगात प्रचार करण्यासाठी यहोवाने या मंडळीचा उपयोग केला आहे. निश्चितच देवाने ख्रिस्ती मंडळीच्या माध्यमाने बरेच काही साध्य केले आहे.—इफिसकर ३:९, १०. (w०७ ४/१५)
[तळटीप]
^ परि. 10 बायबल विद्वान ॲल्बर्ट बार्न्स याने मान्य केले की येशूने “मंडळीला कळीव” असे म्हटले तेव्हा तो अशा व्यक्तींच्या संदर्भात बोलत असावा की ज्यांना “अशा प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे,” अर्थात, चर्चचे प्रतिनिधी. यहुदी सभास्थानात वडीलजन होते व त्यांच्यासमोर अशाप्रकारची प्रकरणे आणली जात असत.
तुम्हाला आठवते का?
• यहोवा पृथ्वीवरील मंडळ्यांचा उपयोग करेल अशी आपण अपेक्षा का करू शकतो?
• वडील अपरिपूर्ण असूनही मंडळीसाठी काय करतात?
• स्थानिक मंडळीच्या माध्यमाने तुमची कशाप्रकारे उन्नती झाली आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चित्र]
जेरुसलेम येथील प्रेषित व वडीलजन नियमन मंडळ या नात्याने कार्य करत होते