व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?

देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?

देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?

“त्यानंतर मी दुसऱ्‍या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता; . . . तो जोरदार वाणीने म्हणाला, ‘पडली, मोठी बाबेल पडली.’”—प्रकटीकरण १८:१, २.

१, २. यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्याकरता देवदूतांचा उपयोग करतो हे कशावरून?

पात्म द्वीपावर कैदेत असताना वयोवृद्ध प्रेषित योहानाला भविष्यसूचक दृष्टांत दाखवले जातात. ‘आत्म्याने संचरित’ होऊन तो दृष्टांतात ‘प्रभूच्या दिवसांत आहे’ असे पाहतो आणि रोमांचकारी घटना पाहतो. १९१४ मध्ये येशू ख्रिस्त सिंहासनावर विराजमान झाल्यापासून प्रभूच्या दिवसाची सुरुवात होते व त्याच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याचा शेवट होतो.—प्रकटीकरण १:१०.

यहोवा देवाने योहानाला हे थेट प्रकट केले नाही. त्याने एका माध्यमाचा उपयोग केला. प्रकटीकरण १:१ मध्ये म्हटले आहे: “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण: हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्‍याला कळविले.” ‘प्रभूच्या दिवसाबद्दलच्या’ अद्‌भुत गोष्टी योहानाला प्रकट करण्यासाठी यहोवाने येशूद्वारे एका देवदूताचा उपयोग केला. एके प्रसंगी तर योहानाने “दुसऱ्‍या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले” ज्याला “मोठा अधिकार होता.” या देवदूताला कोणते काम देण्यात आले होते? “तो जोरदार वाणीने म्हणाला, ‘पडली, मोठी बाबेल पडली.’” (प्रकटीकरण १८:१, २) या शक्‍तिशाली देवदूताला मोठ्या बाबेलच्या अर्थात खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याच्या पतनाची घोषणा करण्याचा सुहक्क देण्यात आला होता. त्यामुळे यात काही शंकाच नाही की यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्याकरता महत्त्वपूर्ण मार्गांनी देवदूतांचा उपयोग करतो. देवाच्या उद्देशांत देवदूत कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि आपल्यावर ते प्रभाव कसा पाडतात याविषयी आणखी खोलात शिरण्याआधी आपण या आत्मिक प्राण्यांच्या अस्तित्वाविषयी आधी पाहूया.

देवदूत अस्तित्वात कसे आले?

३. देवदूतांविषयी अनेक लोकांच्या कोणत्या गैरसमजूती आहेत?

आज लाखो लोक, देवदूत आहेत असा विश्‍वास करतात. परंतु देवदूतांविषयी आणि त्यांच्या उगमाविषयी या लोकांच्या अनेक गैरसमजूती आहेत. उदाहरणार्थ, काही धार्मिक लोकांचा असा विश्‍वास आहे, की आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्‍तीला स्वर्गात देवाकडे बोलवले जाते आणि ती देवदूत बनते. परंतु देवाचे वचन, देवदूतांच्या निर्मितीविषयी, त्यांच्या अस्तित्वाविषयी आणि त्यांच्या उद्देशाविषयी हीच शिकवण देते का?

४. देवदूतांच्या उगमाविषयी शास्त्रवचने आपल्याला काय सांगतात?

शक्‍ती व अधिकार यांत अग्र असलेल्या देवदूताचे अर्थात प्रमुख देवदूताचे नाव आद्यदेवदूत मीखाएल हे आहे. (यहुदा ९) तो दुसरा-तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१६) अगणित युगांआधी जेव्हा यहोवाने निर्माणकर्ता होण्याचे ठरवले तेव्हा त्याने त्याच्या निर्मितीत सर्वात आधी एका देवदूताला अर्थात त्याच्या पुत्राला निर्माण केले. (प्रकटीकरण ३:१४; १९:११) नंतर, आपल्या या ज्येष्ठ पुत्राद्वारे यहोवाने इतर आत्मिक प्राण्यांची निर्मिती केली. (कलस्सैकर १:१५-१७) या देवदूतांना आपले पुत्र असे संबोधताना यहोवाने कुलपिता ईयोबाला असे विचारले: “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. . . . तिची कोनशिला कोणी बसविली? त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:४, ६, ७) तेव्हा, देवदूत देवाची निर्मिती आहेत आणि मानवांना निर्माण करण्याच्या कैक वर्षांआधी ते अस्तित्वात आले.

५. कोणकोणत्या वर्गांत देवदूतांना संघटित करण्यात आले आहे?

“देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे,” असे १ करिंथकर १४:३३ मध्ये म्हटले आहे. यामुळे, यहोवाने आपल्या या आत्मिक पुत्रांना तीन मूलभूत वर्गांत संघटित केले आहे: (१) सराफीम अथवा सराफदूत, जे देवाच्या सिंहासनाजवळ त्याचे सेवक म्हणून सेवा करतात, यहोवाच्या पावित्र्याची घोषणा करतात आणि त्याच्या लोकांना आध्यात्मिकरीत्या शुद्ध ठेवतात, (२) करुब, जे यहोवाचे सार्वभौमत्व उंचावून धरतात आणि (३) इतर देवदूत जे त्याची इच्छा पूर्णत्वास नेतात. (स्तोत्र १०३:२०; यशया ६:१-३; यहेज्केल १०:३-५; दानीएल ७:१०) हे आत्मिक प्राणी कोणकोणत्या मार्गांनी मानवांवर प्रभाव पाडतात?—प्रकटीकरण ५:११.

देवदूत कोणती भूमिका बजावतात?

६. एदेन बागेच्या संबंधाने यहोवाने करुबांचा कशाप्रकारे उपयोग केला?

आत्मिक प्राण्यांचा सर्वात पहिला उल्लेख उत्पत्ति ३:२४ मध्ये करण्यात आला आहे. तेथे असे म्हटले आहे: “[यहोवाने] मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारुप तरवार ठेविली.” या करुबांमुळे आदाम आणि हव्वा पुन्हा आपल्या आधीच्या बागेसमान घरात प्रवेश करू शकत नव्हते. हे मानव-इतिहासाच्या सुरुवातीला घडले. तेव्हापासून देवदूत कोणती भूमिका बजावत आले आहेत?

७. मूळ भाषेत “देवदूत” या शब्दाच्या अर्थानुसार देवदूत कोणती एक भूमिका बजावत आहेत?

मूळ भाषेतल्या बायबलमध्ये जवळजवळ ४०० वेळा देवदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. हिब्रू आणि ग्रीक या दोन्ही भाषेतल्या “देवदूत” या शब्दाचे भाषांतर “दूत” असे केले जाऊ शकते. तेव्हा देवदूतांनी देव आणि मानवजात यांच्यातील दळणवळणाचे माध्यम म्हणून सेवा केली आहे. या लेखाच्या पहिल्या दोन परिच्छेदांत सांगितल्याप्रमाणे यहोवाने योहानाला आपला संदेश कळवण्याकरता एका देवदूताचा उपयोग केला.

८, ९. (क) देवदूताने दिलेल्या भेटीचा मानोहा आणि त्याच्या पत्नीवर कोणता प्रभाव पडला? (ख) मानोहाला देवदूताने दिलेल्या भेटीच्या प्रसंगावरून पालक कोणता धडा शिकू शकतात?

पृथ्वीवरील देवाच्या सेवकांना आधार देण्याकरता व उत्तेजन देण्याकरता देखील देवदूतांचा उपयोग केला जातो. जसे की, इस्राएलमधील शास्त्यांच्या काळांत, मानोहाला व त्याच्या निसंतान बायकोला अपत्य व्हावे अशी तीव्र इच्छा होती. तुला एक पुत्र होईल, हे मानोहाच्या बायकोला सांगण्याकरता यहोवाने एका देवदूताला तिच्याकडे पाठवले. याविषयीच्या अहवालात देवदूत तिला असे सांगतो: “तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.”—शास्ते १३:१-५.

मानोहाच्या बायकोने कालांतराने एका मुलाला अर्थात शमशोनाला जन्म दिला. बायबल इतिहासात तो फार गाजला. (शास्ते १३:२४) मुलाचा जन्म होण्याआधी मानोहाने अशी विनंती केली की, त्या देवदूताने पुन्हा येऊन आपल्याला, आपण या मुलांचे संगोपन कसे करावे याविषयीच्या सूचना द्याव्यात. मानोहाने असे विचारले: “ह्‍या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे?” यहोवाच्या देवदूताने मानोहाच्या बायकोला ज्या सूचना दिल्या त्या त्याने मानोहाला पुन्हा बोलून दाखवल्या. (शास्ते १३:६-१४) देवदूताने दिलेल्या भेटीने मानोहाला किती प्रोत्साहन मिळाले असेल! आज देवदूत अशाप्रकारे लोकांना भेट देत नसले तरी, पालक मात्र मानोहाप्रमाणे आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतेवेळी यहोवाचे प्रशिक्षण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू शकतात.—इफिसकर ६:४.

१०, ११. (क) अलीशा आणि त्याचा सेवक या दोघांवर, चाल करून आलेल्या अरामी सैन्याचा काय परिणाम झाला? (ख) या घटनेवर मनन केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

१० देवदूत आपल्या पाठीशी असतात याचे आणखी एक प्रभावशाली उदाहरण, अलीशा संदेष्ट्याच्या दिवसांतले आहे. अलीशा इस्राएलातील दोथान या शहरात राहत होता. एके दिवशी अलीशाचा सेवक सकाळी लवकर उठला होता व त्याने बाहेर पाहिले तर त्याला, शहराला घोड्यांनी व रथांनी घेरा घातला आहे असे दिसले. अरामाच्या राजाने अलीशाला धरून आणण्यासाठी जबरदस्त मोठे लष्कर पाठवले होते. हे मोठे सैन्य पाहून अलीशाच्या सेवकाची काय अवस्था झाली? तो अतिशय भयभीत झाला; कदाचित त्याला भीतीने कापरे भरले. तो ओरडला: “स्वामी, हाय! हाय! आता आपण काय करावे?” त्याला वाटले, झाले, आता आपले काही खरे नाही. पण अलीशाने त्याला उत्तर दिले: “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” अलीशाच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?—२ राजे ६:११-१६.

११ आपल्या पाठीशी देवदूतांचे सैन्य आहे, याची अलीशाला जाणीव होती. परंतु सेवकाला तर काहीच दिसत नव्हते. म्हणून “अलीशाने प्रार्थना केली की हे परमेश्‍वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टि दे.” लगेच यहोवाने सेवकाचे डोळे उघडले. आणि सेवक पाहतो ते काय: “अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे!” (२ राजे ६:१७) तेव्हा सेवकाला आपल्या पाठीशी देवदूत असल्याचे दिसले. आपणही आपल्या आध्यात्मिक दृष्टीने यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली देवदूत यहोवाच्या लोकांचे संरक्षण करतात हे पाहू शकतो.

ख्रिस्ताच्या काळात देवदूतांचा पाठिंबा

१२. गब्रीएल देवदूताकडून मरीयेला साहाय्य कसे मिळाले?

१२ यहुदी कुमारी मरीया हिला जेव्हा एक बातमी कळली तेव्हा देवदूतांनी तिला दिलेल्या आधाराची आपण चर्चा करू या. “तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव,” ही बातमी तिला कळवण्यात आली होती. पण, देवाने पाठवलेल्या देवदूताने अर्थात गब्रीएलने तिला ही आश्‍चर्यकारक बातमी कळवण्याआधी तिला म्हटले: “मरीये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.” (लूक १:२६, २७, ३०, ३१) आपल्यावर देवाची कृपा आहे हे दर्शवणारे शब्द ऐकल्यावर मरीयेला किती उत्तेजन व बळ मिळाले असावे!

१३. देवदूतांनी येशूला कशाप्रकारे पाठिंबा दिला?

१३ देवदूतांचा पाठिंबा असल्याचे आणखी एक उदाहरण आहे येशूचे. सैतानाने येशूला अरण्यात तीन वेळा मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हा येशूने त्याला कसा नकार दिला होता? अहवाल आपल्याला असे सांगतो, की या परीक्षांच्या शेवटी “सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.” (मत्तय ४:१-११) येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा काहीसे असेच घडले. येशू आत्म्यात अगदी दुःखी होऊन गुडघे टेकून प्रार्थना करू लागला: “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्‍ति देताना त्याने पाहिले.” (लूक २२:४२, ४३) आज आपल्याला कोणत्याप्रकारे देवदूतांचा पाठिंबा आहे?

आधुनिक काळात देवदूतांचा पाठिंबा

१४. यहोवाच्या साक्षीदारांना आधुनिक दिवसांत कोणकोणत्या प्रकारे छळ सहन करावा लागला आणि याचा परिणाम काय झाला आहे?

१४ आधुनिक दिवसांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्याच्या इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण, त्यांना देवदूतांचा पाठिंबा असल्याचा पुरावा पाहत नाही का? उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धाच्या आधी आणि नंतर यहोवाचे साक्षीदार जर्मनीतील व पश्‍चिम युरोपमधील नात्सीवादाच्या जळजळीत हल्ल्यात तग धरून राहू शकले (१९३९-४५). इटली, स्पेन आणि पोर्तुगालच्या कॅथलिक पुराणमतवाद्यांच्या राजवटीत तर त्यांना आणखी जास्त काळ छळ सहन करावा लागला. आणि, पूर्व सोव्हियत युनियन व त्याच्या मांडलिक देशांकडूनही त्यांनी पुष्कळ छळ सहन केला. शिवाय, आणखी एक उदाहरण काही आफ्रिकन राष्ट्रांतील साक्षीदारांचे आहे ज्यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. * अलिकडच्या काळात, यहोवाच्या सेवकांना जॉर्जिया देशात अत्यंत क्रूरप्रकारचा छळ सोसावा लागला आहे. सैतानाने आपली सर्व शक्‍ती एकवटून यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तरीपण, एक संघटना या नात्याने ते अशा विरोधातही तग धरून राहू शकले; इतकेच नव्हे तर त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. हे काही अंशी देवदूतांकडून मिळणाऱ्‍या सुरक्षेमुळेच शक्य झाले.—स्तोत्र ३४:७; दानीएल ३:२८; ६:२२.

१५, १६. यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या जगव्याप्त सेवेत देवदूतांचा पाठिंबा कसा मिळतो?

१५ यहोवाच्या साक्षीदारांवर, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा संपूर्ण पृथ्वीवर प्रचार करण्याविषयी आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना बायबलमधील सत्य शिकवून त्यांना शिष्य बनवण्याविषयी जी कामगिरी सोपवण्यात आली आहे ते ती गांभीर्याने घेतात. (मत्तय २८:१९, २०) परंतु, आपण ही कामगिरी देवदूतांच्या पाठिंब्याविना पार पाडू शकत नाही, ही जाणीव त्यांना आहे. त्यामुळे प्रकटीकरण १४:६, ७ मध्ये जे म्हटले आहे त्यातून त्यांना सतत उत्तेजन मिळत राहते. या वचनात असे लिहिले आहे: “नंतर मी [प्रेषित योहान] दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला: ‘देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.’”

१६ हे शब्द स्पष्टपणे दाखवतात, की यहोवाच्या साक्षीदारांच्या महान जगव्याप्त सुवार्तिक कार्याला देवदूतांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन आहे. यहोवा, प्रामाणिक अंतकरणाच्या लोकांची आपल्या साक्षीदारांशी भेट घडवण्यासाठी आपल्या देवदूतांचा उपयोग करतो. देवदूत साक्षीदारांना सार्वकालिक जीवन मिळण्यास योग्य असलेल्या लोकांकडे जाण्याचेही मार्गदर्शन देतात. म्हणूनच, आपण अनेकदा असे अनुभव ऐकतो ज्यात, एक यहोवाचा साक्षीदार एखाद्या व्यक्‍तीला नेमक्या त्याच वेळेला भेटतो जेव्हा ती व्यक्‍ती अतिशय यातनामय काळाचा सामना करत असते व तिला आध्यात्मिक मदतीची गरज असते. याला योगायोग म्हणता येणार नाही.

जवळच्या भविष्यात देवदूतांची पराक्रमी भूमिका

१७. फक्‍त एकाच देवदूताने अश्‍शूरी सैन्याला काय केले?

१७ देवदूत फक्‍त दूत व यहोवाच्या उपासकांना आधार देणारे म्हणूनच सेवा करत नाहीत तर ते आणखी एक भूमिका बजावतात. गतकाळात त्यांनी देवाचे न्यायदंड बजावले. जसे की, सा.यु.पू. आठव्या शतकात जरुसलेमवर अश्‍शूरी सैन्ये चालून आले. तेव्हा यहोवाने काय केले? तो म्हणाला: “मी आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे याचे संरक्षण करीन.” तेव्हा काय घडले याविषयी बायबल आपल्याला सांगते: “त्या रात्री असे झाले की परमेश्‍वराच्या देवदूताने जाऊन अश्‍शूरी गोटातले एक लक्ष पंचायशी हजार लोक मारिले; पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते!” (२ राजे १९:३४, ३५) फक्‍त एका देवदूतापुढे मानवांची सैन्ये किती क्षुद्र आहेत!

१८, १९. जवळच्या भविष्यात देवदूत कोणती भूमिका बजावणार आहेत आणि याचा मानवजातीवर कसा परिणाम होईल?

१८ जवळच्या भविष्यात देवदूत देवाच्या न्यायदंड बजावणाऱ्‍या दलात असतील. लवकरच येशू “आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल.” ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा सूड उगवण्याचे’ काम या देवदूतांचे असेल. (२ थेस्सलनीकाकर १:७, ८) मानवजातीवर याचा किती मोठा प्रभाव पडेल! संपूर्ण जगभरात घोषित केल्या जात असलेल्या देवाच्या राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देण्यास नकार देणाऱ्‍यांचा नाश होणार आहे. जे यहोवाचा, धार्मिकतेचा, नम्रतेचा शोध घेतात फक्‍त अशांनाच “परमेश्‍वराच्या क्रोधदिनी” दृष्टीआड केले जाईल; त्यांना कसलीही इजा होणार नाही.—सफन्या २:३.

१९ यहोवा पृथ्वीवरील आपल्या उपासकांना पाठिंबा देण्याकरता व बळ देण्याकरता आपल्या शक्‍तिशाली देवदूतांचा उपयोग करतो, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. देवाच्या उद्देशांत देवदूत बजावत असलेल्या भूमिकेविषयीची आपल्याला असलेली समज सांत्वनदायक आहे कारण, असेही काही देवदूत आहेत ज्यांनी यहोवाविरुद्ध बंड केले आणि ते आता सैतानाच्या नेतृत्वाखाली आहेत. तर, दियाबल सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्या शक्‍तिशाली प्रभावापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरता खरे ख्रिस्ती कोणत्या उपाययोजना करू शकतात, याबद्दलची चर्चा पुढील लेखात केली जाईल. (w०७ ३/१५)

[तळटीप]

^ परि. 14 साक्षीदारांवर आलेल्या छळाच्या लाटांविषयीच्या सविस्तर अहवालांसाठी, यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक (इंग्रजी) १९८३ (अंगोला), १९७२ (चेकोस्लोव्हाकिया), २००० (चेक प्रजासत्ताक), १९९२ (इथियोपिया), १९७४ आणि १९९९ (जर्मनी), १९८२ (इटली), १९९९ (मलावी), २००४ (मॉल्डोवा), १९९६ (मोझांबिक), १९९४ (पोलंड), १९८३ (पोर्तुगाल), १९७८ (स्पेन), २००२ (युक्रेन), आणि २००६ (झांबिया) पाहा.

तुम्ही काय शिकलात?

• देवदूत अस्तित्वात कसे आले?

• बायबल काळांत देवदूतांचा कोणकोणत्या कार्यांसाठी उपयोग करण्यात आला होता?

प्रकटीकरण १४:६, ७, आज देवदूत करत असलेल्या कार्याविषयी काय सांगते?

• जवळच्या भविष्यात देवदूत कोणती पराक्रमी भूमिका बजावणार आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

मानोहा आणि त्याच्या पत्नीला देवदूताच्या भेटीमुळे प्रोत्साहन मिळाले

[१५ पानांवरील चित्र]

“त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत”