“हे युद्ध परमेश्वराचे आहे”
“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे”
“हे युद्ध परमेश्वराचे आहे”
दोन प्रतिस्पर्धी सैन्ये एकमेकांसमोर उभी आहेत; त्यांच्या मध्ये एक खोरे आहे. चाळीस दिवसांपासून इस्राएली पुरुषांची भीतीमुळे झोप उडून गेली आहे. पलिष्ट्यांचा महावीर गल्याथ सतत त्यांना टोमणे मारत आहे.—१ शमुवेल १७:१-४, १६.
गल्याथ मोठ्या आवाजात इस्राएलांना असा टोमणा मारतो: “तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा, आणि त्याने मजकडे यावे. याने मजशी लढून मला ठार मारिले तर आम्ही तुमचे दास होऊ; पण माझी त्याजवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर, तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. . . . इस्राएलाच्या सर्व सैन्यास मी कस्पटासमान लेखीत आहे. कोणाहि पुरुषास मजपुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.”—१ शमुवेल १७:८-१०.
प्राचीन काळात, दोन सैन्यात लागलेल्या चुरशीत, केवळ सैन्यांचे प्रतिनिधित्त्व करणारे वीरपुरुष लढायचे. या अशाप्रकारच्या चुरशी सामान्य होत्या. जो वीर जिंकायचा त्याचे सैन्य विजयी ठरायचे. पण इस्राएलला टोमणा देणारा हा वीरसैनिक सामान्य सैनिक नव्हता. तो अतिशय धिप्पाड आणि क्रूर होता; शत्रूपक्षातील या वीराला पाहून भल्या भल्यांची बोबडी वळत होती. परंतु यहोवाच्या लोकांच्या सैन्याची टर उडवून गल्याथ स्वतःची हार पुकारतो.
ही केवळ एक सैनिकी चुरस नव्हती. ती यहोवा आणि पलिष्ट्यांच्या दैवतांमधील चुरस अथवा झुंज होती. देवाच्या शत्रूंविरुद्ध आपल्या सैन्याचे निडरतेने नेतृत्व करण्याऐवजी राजा शौलाची भीतीने गाळण उडते.—१ शमुवेल १७:११.
नुकतीच मिसरूड फुटलेला पोरगा यहोवावर भरवसा ठेवतो
दोन्हीकडची सैन्ये शांतपणे उभी आहेत. अशावेळी, इस्राएलचा भावी राजा बनण्यासाठी ज्याचा अभिषेक करण्यात आला आहे तो, शौलाच्या सैन्यात असलेल्या आपल्या भावांना भेटायला येतो. या तरुणाचे नाव आहे दावीद. गल्याथाचे बोलणे ऐकल्यावर तो विचारतो: “या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय?” (१ शमुवेल १७:२६) दावीदाच्या नजरेत गल्याथ, पलिष्ट्यांचे व त्यांच्या देवांचे प्रतिनिधीत्व करत आहे. दावीदाचा नीतिमान क्रोध भडकतो; यहोवा आणि इस्राएलला टोमणा मारणाऱ्याविरुद्ध उभा राहून तो या मूर्तीपूजक राक्षसाविरुद्ध लढण्याची तयारी दाखवतो. पण राजा शौल त्याला म्हणतो: “ह्या पलिष्ट्यांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरूण आहे.”—१ शमुवेल १७:३३.
शौल आणि दावीदाच्या दृष्टिकोनात जमीनअस्मानाचा फरक आहे! दावीद गुराखी आहे, तो काय या क्रूर राक्षसाबरोबर लढेल, असा शौल विचार करत असतो. पण दावीद, सार्वभौम प्रभू यहोवाला हा कोण मर्त्य मनुष्य ललकारतोय, असा गल्याथाविषयी विचार करत असतो. देव आपल्या नावाची आणि आपल्या लोकांची थट्टा करणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, या आत्म-विश्वासावर दावीद अशाप्रकारची निडरता दाखवतो. गल्याथ आपल्या शक्तीची बढाई मारतो पण दावीद यहोवावर आपला भरवसा ठेवून त्याच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहतो.
“सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे”
दावीदाचा विश्वास भक्कम पायावर आधारित आहे. दोन प्रसंगी देवाने त्याला त्याच्या मेंढरांची, एकदा एका अस्वलापासून आणि एकदा एका सिंहापासून सुटका करण्यास मदत केली होती, हे त्याला आठवत होते. त्यामुळे, आताही यहोवा आपल्याला या असाध्य वाटणाऱ्या पलिष्टी शत्रूवर विजय मिळवण्यास मदत करेल, अशी या तरुण गुराख्याची पक्की खात्री आहे. (१ शमुवेल १७:३४-३७) हातात केवळ एक गोफण आणि पाच गुळगुळीत गोटे घेऊन दावीद गल्याथाशी लढायला जातो.
१ शमुवेल १७:४५-४७, पं.र.भा.
यहोवाकडून येणाऱ्या शक्तीच्या आधारावर तरुण दावीद हे अशक्य वाटणारे आव्हान स्वीकारतो. धैर्याने तो गल्याथाला म्हणतो: “तू तरवार व भाला व बरची घेऊन माझ्याकडे आलास, परंतु सैन्यांचा यहोवा इस्राएलांच्या फौजांचा देव, ज्याला तू तुच्छ लेखले आहे त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल, . . . अशासाठी की, इस्राएलांच्यामध्ये देव आहे असे सर्व पृथ्वीने जाणावे; आणि असे की तरवार व भाला यांकडून यहोवा तारण करीत नाही असे ह्या सर्व समुदायाने जाणावे; कारण लढाई यहोवाची आहे, आणि तो तुम्हांस आमच्या हाती देईल.”—शेवटी काय होते? ईश्वरप्रेरित अहवाल पुढे असे सांगतो: “दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दाविदाच्या हाती तरवार नव्हती.” (१ शमुवेल १७:५०) दावीदाच्या हातात तलवार नव्हती पण त्याच्या पाठीशी शक्तीशाली यहोवा देव होता. *
या झुंजीत दावीदाचा यहोवावरील भरवसा फोल ठरला नाही! आपल्याला मनुष्यांचे भय आणि यहोवाच्या वाचवण्याच्या शक्तीवर भरवसा या दोन गोष्टींमध्ये निवड करावी लागते तेव्हा आपली निवड हीच असेल: आपण “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) शिवाय, आपण जेव्हा कठीण परिस्थितींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा आपण, राक्षसासमान वाटणाऱ्या समस्यांकडे देखील संतुलित दृष्टिकोनाने पाहू लागतो. (w०६ ५/१)
[तळटीप]
^ परि. 13 यहोवाच्या साक्षीदारांचे २००६ कॅलेंडर, मे/जून पाहा.
[९ पानांवरील चौकट/चित्र]
किती मोठा होता गल्याथ?
पहिले शमुवेल १७:४-७ मधील अहवाल आपल्याला सांगतो, की गल्याथाची उंची सहा हातांपेक्षा अधिक होती; म्हणजे नऊ फूटापेक्षा जास्त. त्याच्या पितळी कवचावरून आपल्याला त्याच्या शरीराचा आकार आणि त्याच्या शक्तीचा अंदाज येऊ शकतो. या कवचाचे वजन ५७ किलो होते! त्याच्या भाल्याचा दांडा एखाद्या लाकडी तुळईसारखा होता आणि त्याच्या भाल्याच्या पात्याचे वजन ७ किलो होते! गल्याथाची शस्त्रेच दावीदाच्या वजनापेक्षा अधिक होती!