व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राजा ख्रिस्त याची निष्ठावानपणे सेवा करणे

राजा ख्रिस्त याची निष्ठावानपणे सेवा करणे

राजा ख्रिस्त याची निष्ठावानपणे सेवा करणे

“सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.”—दानीएल ७:१४.

१, २. ख्रिस्ताने सा.यु. ३३ साली पूर्ण अर्थाने राज्य शासनास आरंभ केला नाही हे आपल्याला कशावरून कळते?

 कोणता असा शासक आहे की ज्याने आपल्या प्रजेकरता आपला प्राण दिला आणि मग पुन्हा जिवंत होऊन राज्य सुरू केले? कोणता असा राजा आहे की जो पृथ्वीवर राहिला, आपल्या प्रजेचा भरवसा व निष्ठा संपादन केली आणि मग स्वर्गातून राज्य करू लागला? हे आणि आणखी बरेच काही, केवळ एकच व्यक्‍ती करू शकते—येशू ख्रिस्त. (लूक १:३२, ३३) ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान व स्वर्गारोहण झाल्यावर, सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी देवाने “सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले.” (इफिसकर १:२०-२२; प्रेषितांची कृत्ये २:३२-३६) अशारितीने, ख्रिस्ताने मर्यादित अर्थाने राज्य करण्यास सुरुवात केली. त्याचे सुरुवातीचे प्रजाजन म्हणजे आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती होते ज्यांचे मिळून आध्यात्मिक इस्राएल अर्थात “देवाचे इस्राएल” बनले.—गलतीकर ६:१६; कलस्सैकर १:१३.

सा.यु. ३३ सालच्या त्या पेन्टेकॉस्टनंतर जवळजवळ ३० वर्षांनी प्रेषित पौलाने पुन्हा एकदा खुलासा केला की ख्रिस्ताने अद्याप पूर्ण अर्थाने राज्य शासन सुरू केले नव्हते; पौलाने सांगितले, की तो “देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे.” (इब्री लोकांस १०:१२, १३) मग, सा.यु. पहिल्या शतकाच्या अंताच्या सुमारास, वयस्क प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात विश्‍वाचा सार्वभौम प्रभू यहोवा, येशूला नवस्थापित स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून सिंहासनावर अधिष्ठित करत असल्याची, भविष्यात घडणार असलेली घटना पाहिली. (प्रकटीकरण ११:१५; १२:१-५) आणि आज आपण इतिहासात ज्या वळणावर उभे आहोत, तेथून मागे वळून पाहताना आपल्याला निश्‍चित पुरावा मिळतो की ख्रिस्ताने १९१४ सालापासून स्वर्गात मशीही राज्याचा राजा म्हणून शासन करण्यास आरंभ केला. *

३. (क) राज्याच्या सुवार्तेला १९१४ पासून कोणता नवा अर्थ लाभला आहे? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो?

होय, १९१४ सालापासून राज्याच्या सुवार्तेला एक नवा रोमांचक अर्थ लाभला आहे. तेव्हापासून ख्रिस्त देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने शासन करू लागला आहे; अर्थात, सध्या तो “आपल्या वैऱ्‍यांमध्ये” राज्य करत आहे. (स्तोत्र ११०:१, २, पं.र.भा.; मत्तय २४:१४; प्रकटीकरण १२:७-१२) शिवाय, सबंध पृथ्वीवर त्याचे निष्ठावान प्रजाजन, मानव इतिहासात कधीही न घडलेल्या अशा एका जगव्याप्त बायबल शिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याद्वारे त्याच्या अधिकाराला अतिशय उत्सुकतेने आपले समर्थन देत आहेत. (दानीएल ७:१३, १४; मत्तय २८:१८) आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती अर्थात “राज्याचे पुत्र,” “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करतात. ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेल्या एकनिष्ठ अनुयायांचा वाढता समुदाय या अभिषिक्‍त जनांना, देवाच्या राज्याचे राजदूत या नात्याने सहयोग देतात. (मत्तय १३:३८; २ करिंथकर ५:२०; योहान १०:१६) तरीपण, वैयक्‍तिक रित्या आपण स्वतः खरोखर ख्रिस्ताचा अधिकार स्वीकारत आहोत का याचे परीक्षण करणे अगत्याचे आहे. त्याच्याप्रती आपली निष्ठा अढळ आहे का? स्वर्गात राज्य करणाऱ्‍या राजाला आपण कसे काय निष्ठावान राहू शकतो? पण सर्वप्रथम, आपण ख्रिस्ताला का निष्ठावान राहावे याची कारणे आपण विचारात घेऊ या.

निष्ठावान राहण्यास प्रेरित करणारा राजा

४. पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान भावी राजा या नात्याने येशूने काय साध्य केले?

ख्रिस्ताला आपली एकनिष्ठा ही त्याने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल वाटणाऱ्‍या कृतज्ञतेवर आधारित आहे. (१ पेत्र १:८) देवाच्या नियुक्‍त वेळी राजा या नात्याने येशू सबंध पृथ्वीवर जे साध्य करील ते त्याने पृथ्वीवर असताना एक भावी राजा या नात्याने लहान प्रमाणात करून दाखवले. त्याने उपाशी लोकांना खायला दिले. जे आजारी, अंधळे, अपंग, बहिरे व मुके होते, त्यांना त्याने बरे केले. इतकेच काय, तर त्याने काही मृत व्यक्‍तींनाही पुन्हा जिवंत केले. (मत्तय १५:३०, ३१; लूक ७:११-१६; योहान ६:५-१३) शिवाय, पृथ्वीवरील येशूच्या जीवनाचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या या भावी शासकाचे गुण जाणून घेण्यास मदत मिळते; या गुणांपैकी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याचे स्वार्थत्यागी प्रेम. (मार्क १:४०-४५) यासंदर्भात, नेपोलियन बोनापार्ट याने असे म्हटल्याचे सांगितले जाते: “सिकंदर, कैसर, शार्लमेन व मी साम्राज्ये स्थापन केली. पण आम्ही जे पराक्रम केले ते कशाच्या बळावर? शक्‍तीच्या बळावर. पण येशू ख्रिस्त हा एकटाच असा आहे की ज्याने आपले राज्य, प्रेमाच्या बळावर स्थापन केले. आजही, लाखो लोक त्याच्यासाठी आपला प्राण देण्यास तयार होतील.”

५. येशूचे व्यक्‍तिमत्त्व इतके आकर्षक का होते?

येशू मनाचा सौम्य व लीन असल्यामुळे, जीवनातल्या दबावांमुळे व ओझ्यांमुळे खचून गेलेल्यांना त्याच्या प्रेरणादायी शिकवणुकी व त्याचे दयाळू व्यक्‍तिमत्त्व चेतनादायी वाटले. (मत्तय ११:२८-३०) लहान मुले देखील त्याच्या सहवासात अगदी आनंदाने वावरत. नम्र, विचारशील माणसे स्वेच्छेने त्याचे शिष्य बनले. (मत्तय ४:१८-२२; मार्क १०:१३-१६) त्याच्या समजूतदार व आदरपूर्वक वागणुकीमुळे अनेक देवभीरू स्त्रियांची निष्ठा त्याने जिंकली आणि यांपैकी कित्येक स्त्रियांनी त्याच्या सेवाकार्यात त्याला साहाय्य करण्याकरता आपला वेळ, शक्‍ती व संपत्ती खर्च केली.—लूक ८:१-३.

६. लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशूच्या कोमल भावना कशाप्रकारे व्यक्‍त झाल्या?

ख्रिस्ताच्या सर्वात कोमल भावना, त्याचा मित्र लाजार मरण पावला तेव्हा व्यक्‍त झाल्या. मरीया व मार्था यांचे दुःख पाहून त्याला राहावले नाही आणि तो अक्षरशः “रडला.” काही वेळानंतर आपण लाजरला पुन्हा जिवंत करणार आहोत हे माहीत असूनही, त्या अकथनीय दुःखाने तो “विव्हळ झाला.” मग प्रेमाने व करुणेने प्रेरित होऊन येशूने देवाकडून मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग केला व लाजरला पुन्हा जिवंत केले.—योहान ११:११-१५, ३३-३५, ३८-४४.

७. येशूला आपण सदैव निष्ठावान राहावे याकरता तो का पात्र आहे? (पृष्ठ ३१ वरील चौकोन पाहावा.)

जे योग्य त्याकरता येशूला असलेले प्रेम आणि दांभिकता व दुष्टता याविषयी त्याला वाटणारी घृणा पाहून आपण विस्मित होतो. दोन वेळा त्याने मंदिरातून लोभी व्यापाऱ्‍यांना हाकलून लावले होते. (मत्तय २१:१२, १३; योहान २:१४-१७) शिवाय, पृथ्वीवर मानव म्हणून राहात असताना त्याला सर्व प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे, आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या सर्व दबावांची व समस्यांची त्याला कल्पना आहे कारण त्याने स्वतः ते अनुभवले आहे. (इब्री लोकांस ५:७-९) द्वेष व अन्यायाला बळी पडणे काय असते हे ही त्याने अनुभवले. (योहान ५:१५-१८; ११:५३, ५४; १८:३८-१९:१६) शेवटी, आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरता आणि आपल्या प्रजाजनांना सार्वकालिक जीवन मिळवून देण्याकरता त्याने अतिशय यातनादायी मृत्यूला कवटाळले. (योहान ३:१६) ख्रिस्ताच्या या गुणांवर मनन केल्यावर, त्याला सदैव निष्ठावान राहण्याची तुम्हाला प्रेरणा मिळत नाही का? (इब्री लोकांस १३:८; प्रकटीकरण ५:६-१०) पण राजा ख्रिस्त याच्या प्रजाजनांपैकी एक असण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे?

ख्रिस्ताच्या प्रजाजनांपैकी एक होण्याकरता

८. ख्रिस्ताच्या प्रजाजनांकडून कोणती अपेक्षा केली जाते?

या तुलनेचा विचार करा: परदेशात जाऊन त्या देशाचे नागरिकत्व मिळवण्याकरता काही मूलभूत अटी पूर्ण कराव्या लागतात. भावी नागरिकांनी प्रामाणिक असावे व आरोग्यासंबंधी काही आवश्‍यकता त्यांनी पूर्ण कराव्यात अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. त्याचप्रकारे, ख्रिस्ताच्या प्रजाजनांनी उच्च नैतिक दर्जांनुसार जगणे व आध्यात्मिकरित्या सुदृढ असणे आवश्‍यक आहे.—१ करिंथकर ६:९-११; गलतीकर ५:१९-२३.

९. आपण ख्रिस्ताला निष्ठावान आहोत हे कशाप्रकारे दाखवू शकतो?

साहजिकच, येशू ख्रिस्त अशीही अपेक्षा करतो की त्याच्या प्रजाजनांनी त्याला व त्याच्या राज्याला निष्ठावान राहावे. या पृथ्वीवर भावी राजा म्हणून राहात असताना त्याने ज्या शिकवणुकी दिल्या त्यांचे आपल्या जीवनात पालन करण्याद्वारे त्याचे प्रजाजन आपली निष्ठा व्यक्‍त करतात. उदाहरणार्थ, ते भौतिक संपत्तीच्या मागे लागण्याऐवजी राज्याच्या कार्यांना व देवाच्या इच्छेला अधिक महत्त्व देतात. (मत्तय ६:३१-३४) तसेच, सर्वात कठीण परिस्थितीतही ते ख्रिस्ताच्या गुणांचे अनुकरण करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. (१ पेत्र २:२१-२३) शिवाय, ख्रिस्ताचे प्रजाजन इतरांचे भले करण्याकरता पुढाकार घेण्याद्वारे त्याचे अनुकरण करतात.—मत्तय ७:१२; योहान १३:३-१७.

१०. (क) कुटुंबात व (ख) मंडळीत ख्रिस्ताप्रती निष्ठा कशी दाखवली जाऊ शकते?

१० येशूच्या गुणांचे आपल्या कौटुंबिक जीवनात अनुकरण करण्याद्वारेही त्याचे प्रजाजन त्याच्याप्रती आपली निष्ठा व्यक्‍त करतात. उदाहरणार्थ, पती आपल्या पत्नी व मुलांशी व्यवहार करताना ख्रिस्ताचे अनुकरण करण्याद्वारे आपल्या स्वर्गीय राजाप्रती निष्ठा व्यक्‍त करतात. (इफिसकर ५:२५, २८-३०; ६:४; १ पेत्र ३:७) पत्नी आपल्या निष्कलंक वर्तनाने तसेच “सौम्य व शांत आत्मा” प्रदर्शित करून ख्रिस्ताला आपण निष्ठावान असल्याचे दाखवतात. (१ पेत्र ३:१-४; इफिसकर ५:२२-२४) मुले ख्रिस्ताप्रमाणेच आज्ञाधारक राहण्याद्वारे त्याला निष्ठावान राहतात. येशू लहान होता तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या, ते अपरिपूर्ण होते तरीसुद्धा त्यांच्या आज्ञेत राहिला. (लूक २:५१, ५२; इफिसकर ६:१) ख्रिस्ताचे प्रजाजन “समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे” व “कनवाळू नम्र मनाचे” होण्याद्वारे त्याचे अनुकरण करण्याचा एकनिष्ठतेने प्रयत्न करतात. ख्रिस्ताप्रमाणेच, ‘वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे न करण्याचा’ ते कसोशीने प्रयत्न करतात.—१ पेत्र ३:८, ९; १ करिंथकर ११:१.

कायद्याच्या चौकटीत राहणारे प्रजाजन

११. ख्रिस्ताचे प्रजाजन कोणत्या नियमाला अधीन होतात?

११ परदेशात स्थाईक होऊ इच्छिणारे ज्याप्रकारे नव्या देशाच्या कायद्यांचे पालन करतात त्याचप्रकारे, ख्रिस्ताचे प्रजाजन देखील येशूने शिकवलेल्या व आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टींचे आपल्या जीवनात पालन करण्याद्वारे ‘ख्रिस्ताच्या नियमाला’ अधीन होतात. (गलतीकर ६:२) विशेषतः ते प्रीतीच्या ‘राजमान्य नियमाचे’ एकनिष्ठपणे पालन करतात. (याकोब २:८) ते असे कशाप्रकारे करतात?

१२, १३. आपण कशाप्रकारे निष्ठेने ‘ख्रिस्ताच्या नियमाला’ अधीन होतो?

१२ ख्रिस्ताचे प्रजाजनही अद्याप अपरिपूर्ण आहेत आणि त्यांच्याकडून चुका या होतातच. (रोमकर ३:२३) त्यामुळे, “एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति [करण्याकरता]” ते सतत आपल्या बांधवांबद्दल ‘निर्दंभ बंधुप्रेम’ विकसित करण्याचा प्रयत्न करतात. (१ पेत्र १:२२) “कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास,” ख्रिस्ती निष्ठेने त्याच्या नियमाचे पालन करून ‘एकमेकांचे सहन करतात, आणि आपसांत क्षमा करतात.’ या नियमाचे पालन केल्यामुळे त्यांना इतरांचे दोष विसरून एकमेकांवर प्रेम करण्याची कारणे शोधण्याचे उत्तेजन मिळते. आपल्या प्रेमळ राजाला निष्ठेने अधीन होऊन “पूर्णता करणारे बंधन” अशी जी प्रीती, ती धारण करणाऱ्‍या लोकांचा सहवास तुम्हाला लाभल्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटत नाही का?—कलस्सैकर ३:१३, १४.

१३ शिवाय, येशूने सांगितले की त्याने ज्या प्रेमाचा आदर्श आपल्या प्रजाजनांपुढे ठेवला, ते प्रेम सर्वसामान्यपणे लोक एकमेकांबद्दल जे प्रेम दाखवतात त्याच्याही पुढे जाते. (योहान १३:३४, ३५) जर आपण फक्‍त आपल्यावर ज्यांचे प्रेम आहे अशा लोकांबद्दलच प्रेम व्यक्‍त केले तर आपण “विशेष ते काय [करतो]?” अशाप्रकारचे प्रेम जर आपण दाखवत असू तर आपले प्रेम अपूर्ण व सदोष ठरेल. येशूने आपल्याला त्याच्या पित्याच्या प्रेमाचे अनुकरण करण्यास सांगितले. अर्थात आपला द्वेष व छळ करणाऱ्‍या शत्रूंबद्दलही आपण तत्त्वांवर आधारित असलेले हे प्रेम व्यक्‍त करतो. (मत्तय ५:४६-४८) हे प्रेम ख्रिस्ताच्या प्रजाजनांना त्यांच्या सगळ्यात मुख्य कार्यात सातत्याने टिकून राहण्याची प्रेरणा देते. हे कोणते कार्य आहे?

निष्ठेची परीक्षा

१४. प्रचाराचे कार्य इतके महत्त्वाचे का आहे?

१४ देवाच्या राज्याच्या प्रजाजनांवर या ‘राज्याविषयी साक्ष देण्याचे’ कार्य सोपवण्यात आले आहे. (प्रेषितांची कृत्ये २८:२३) हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे कारण मशीही राज्याद्वारे सबंध विश्‍वात यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन केले जाईल. (१ करिंथकर १५:२४-२८) आपण राज्याच्या सुवार्तेची घोषणा करतो तेव्हा ऐकणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे प्रजाजन बनण्याची संधी दिली जाते. शिवाय, लोक या संदेशाला ज्याप्रकारे प्रतिसाद देतात त्यावरून त्यांचा न्याय करण्याकरता राजा ख्रिस्त याला एक आधार मिळतो. (मत्तय २४:१४; २ थेस्सलनीकाकर १:६-१०) त्यामुळे, ख्रिस्ताप्रती आपली निष्ठा व्यक्‍त करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे राज्याविषयी इतरांना सांगण्याच्या त्याच्या आज्ञेचे पालन करणे.—मत्तय २८:१८-२०.

१५. ख्रिश्‍चनांच्या निष्ठेची परीक्षा का घेतली जाते?

१५ अर्थात, सैतान या प्रचाराच्या कार्याला जमेल त्या मार्गाने विरोध करतो आणि मानवी शासक ख्रिस्ताला देवाने दिलेला अधिकार जुमानत नाहीत. (स्तोत्र २:१-३, ६-८) या कारणांमुळे येशूने आपल्या शिष्यांना हा इशारा दिला होता: “दास धन्यापेक्षा मोठा नाही . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहान १५:२०) अशारितीने, आज ख्रिस्ताचे अनुयायी एका आत्मिक लढाईत सामील आहेत आणि ही त्यांच्या निष्ठेची परीक्षा आहे.—२ करिंथकर १०:३-५; इफिसकर ६:१०-१२.

१६. देवाच्या राज्याचे प्रजाजन कशाप्रकारे ‘देवाचे ते देवाला भरून देतात?’

१६ तरीपण, देवाच्या राज्याचे प्रजाजन मानवी अधिकाऱ्‍यांचा अनादर न करता, आपल्या अदृश्‍य राजाला निष्ठावान राहतात. (तीत ३:१, २) येशूने म्हटले: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” (मार्क १२:१३-१७) म्हणूनच, ख्रिस्ताचे प्रजाजन देवाच्या नियमांच्या विरोधात न जाणाऱ्‍या सर्व सरकारी कायद्यांचे पालन करतात. (रोमकर १३:१-७) पण यहुदी उच्च न्यायालयाने जेव्हा येशूच्या शिष्यांना प्रचार न करण्याची आज्ञा देऊन देवाच्या नियमांची उपेक्षा केली तेव्हा प्रेषितांनी त्यांना ठामपणे पण आदरपूर्वक सांगितले की “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये १:८; ५:२७-३२.

१७. निष्ठेची परीक्षा होताना आपण धैर्यवान का असावे?

१७ साहजिकच, छळाला तोंड देऊन आपल्या राजाला निष्ठावान राहण्याकरता ख्रिस्ताच्या प्रजाजनांना धैर्यवान असावे लागते. पण येशूने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” (मत्तय ५:११, १२) ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या अनुयायांना या शब्दांची सत्यता स्वतः अनुभवायला मिळाली. राज्याविषयी प्रचार करत राहिल्यामुळे त्यांना फटके मारण्यात आले तेव्हा त्याच्या “नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून” त्यांनी आनंद मानला. “आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ५:४१, ४२) तुम्हीही कठीण परिस्थिती, आजारपण, शोक, दुःख किंवा विरोधाला तोंड देताना त्या प्रेषितांसारखेच निष्ठावान राहता, म्हणून प्रशंसेस पात्र आहात.—रोमकर ५:३-५; इब्री लोकांस १३:६.

१८. येशूने पंतय पिलाताला जे सांगितले त्यावरून काय दिसून येते?

१८ या पृथ्वीवर जेव्हा येशू अद्याप भावी राजाच्या रूपात होता, तेव्हा त्याने रोमी सुभेदार पंतय पिलात याला असे सांगितले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही, माझे राज्य ह्‍या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) त्यामुळे, स्वर्गीय राज्याचे प्रजाजन कधीही कोणाविरुद्ध शस्त्र उगारत नाहीत किंवा कोणत्याही मानवी संघर्षात सहभागी होत नाहीत. ‘शांतीच्या अधिपतीला’ निष्ठावान राहून ते जगाच्या फुटीरवादी वादविषयांत पूर्णपणे तटस्थ राहतात.—यशया २:२-४; ९:६, ७.

निष्ठावान प्रजाजनांकरता सार्वकालिक प्रतिफळ

१९. ख्रिस्ताचे प्रजाजन भविष्याकडे पूर्ण विश्‍वासाने का पाहतात?

१९ “राजांचा राजा” ख्रिस्त, याचे निष्ठावान प्रजाजन पूर्ण विश्‍वासाने भविष्याकडे डोळे लावून आहेत. त्यांचा राजा त्याचे अलौकिक सामर्थ्य प्रकट करील त्या दिवसाची ते आतूरतेने अपेक्षा करत आहेत, आणि तो दिवस आता दूर नाही. (प्रकटीकरण १९:११–२०:३; मत्तय २४:३०) आत्म्याने अभिषिक्‍त असलेले निष्ठावान, “राज्याचे पुत्र” ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याचे बहुमोल वतन मिळण्याची वाट पाहात आहेत. (मत्तय १३:३८; लूक १२:३२) तर ख्रिस्ताची निष्ठावान “दुसरी मेंढरे” आपल्या राजाकडून ही शाबासकी मिळवण्यास अधीर आहेत, की “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” (योहान १०:१६; मत्तय २५:३४) राज्याच्या सर्व प्रजाजनांनो, राजा ख्रिस्त याची सदैव निष्ठावानपणे सेवा करण्याचा संकल्प करा. (w०६ ५/१)

[तळटीप]

^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील परिशिष्टात, “१९१४—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष” पृष्ठे २१५-१८ पाहावीत.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ख्रिस्ताला आपण निष्ठावान राहावे याकरता तो पात्र का आहे?

• ख्रिस्ताचे प्रजाजन त्याला निष्ठा कशाप्रकारे दाखवतात?

• आपण राजा ख्रिस्त याला निष्ठावान का राहू इच्छितो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३१ पानांवरील चौकट]

ख्रिस्ताचे आणखी काही उल्लेखनीय गुण

निष्पक्षतायोहान ४:७-३०.

करुणामत्तय ९:३५-३८; १२:१८-२१; मार्क ६:३०-३४.

स्वार्थत्यागी प्रेमयोहान १३:१; १५:१२-१५.

एकनिष्ठामत्तय ४:१-११; २८:२०; मार्क ११:१५-१८.

दुसऱ्‍यांच्या दुःखाची जाणीवमार्क ७:३२-३५; लूक ७:११-१५; इब्री लोकांस ४:१५, १६.

माफकतामत्तय १५:२१-२८.

[२९ पानांवरील चित्र]

एकमेकांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याद्वारे, आपण ‘ख्रिस्ताचा नियमाला’ निष्ठावानपणे अधीन होतो

[३१ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ताचे गुण तुम्हाला त्याची निष्ठावानपणे सेवा करण्यास प्रवृत्त करतात का?