यहोवा आपल्या कळपाचे पालन करणाऱ्या मेंढपाळांना प्रशिक्षण देतो
यहोवा आपल्या कळपाचे पालन करणाऱ्या मेंढपाळांना प्रशिक्षण देतो
“ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता येतात.”—नीतिसूत्रे २:६.
१, २. बाप्तिस्मा घेतलेले पुरुष मंडळीत अधिक जबाबदाऱ्या मिळवण्याची आकांक्षा का धरतात?
सात वर्षांपासून वडील म्हणून सेवा करणारे निक म्हणतात, “वडील म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली तेव्हा मला खूप आनंद झाला. यहोवाची सेवा आणखी पूर्णपणे करण्याची बहुमोल संधी आपल्याला मिळाली आहे असे मला वाटले. यहोवाने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी नेहमीच त्याचा ऋणी होतो, पण आता मला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची एक उत्तम संधी मिळाली होती. तसेच, इतर वडिलांनी ज्याप्रकारे मला मदत केली होती त्याचप्रकारे मीही मंडळीतल्या बांधवांना होईल तितकी मदत करावी असे मला वाटत होते.” पण या आनंदासोबतच निक यांच्या मनात काही शंकाही होत्या. ते सांगतात, “मला नियुक्त करण्यात आले तेव्हा मी अजून तीस वर्षांचाही नव्हतो. त्यामुळे एक मेंढपाळ या नात्याने मंडळीचे पालन करण्याकरता लागणारी सुज्ञता आणि सुबुद्धी आपल्याजवळ खरच आहे का, अशी भीती मला वाटत होती.”
२ ज्यांना यहोवा आपल्या कळपाची काळजी घेण्याकरता नियुक्त करतो त्यांच्याजवळ आनंदी होण्याची अनेक कारणे आहेत. प्रेषित पौलाने इफिसस येथील वडिलांना येशूचे शब्द उद्धृत करून, यांपैकी एक कारण सांगितले: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) एक सेवा सेवक अथवा वडील या नात्याने सेवा केल्यामुळे बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांना, यहोवा व मंडळीतले भाऊबहीण यांना आपल्यातर्फे काही देण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, सेवा सेवक वडिलांना सहयोग देतात. हे सेवक इतरही अनेक वेळखाऊ, पण आवश्यक कामे करतात. या बांधवांना देवाबद्दल व शेजाऱ्याबद्दल प्रेम असल्यामुळेच ते ही अनमोल सेवा करतात.—मार्क १२:३०, ३१.
३. मंडळीतले विशेषाधिकार मिळवण्याचा काहीजण प्रयत्न का करत नाहीत?
३ पण बाप्तिस्मा घेतलेल्या एखाद्या बांधवाला असे वाटते की सेवा सेवक व कालांतराने वडील बनण्याची आपली कुवत नाही; आणि या आशंकेमुळे तो हे विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. निकसारखेच त्यालाही असे वाटते की एक चांगला मेंढपाळ होण्याकरता लागणारी पात्रता आपल्याजवळ नाही. तुम्हीही असा विचार करणाऱ्या बांधवांपैकी आहात का? अशी भीती वाटणे अयोग्य नाही. नियुक्त मेंढपाळ कळपाशी कशाप्रकारे व्यवहार करतात याबद्दल यहोवा त्यांना जबाबदार ठरवतो. येशूने म्हटले: “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.”—लूक १२:४८.
४. यहोवा त्याच्या मेंढरांची काळजी वाहण्याकरता नियुक्त केलेल्या व्यक्तींना कशाप्रकारे प्रशिक्षण पुरवतो?
४ ज्यांना यहोवा सेवक व वडील म्हणून नियुक्त करतो त्यांनी हा अतिरिक्त भार स्वतःच्याच शक्तीने वाहावा अशी यहोवा अपेक्षा करतो का? नाही, उलट तो त्यांना मदत पुरवतो. केवळ हा भार वाहण्याकरता नव्हे तर यशस्वी होण्याकरता लागणारी मदत तो त्यांना पुरवतो. याआधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, यहोवा त्यांना आपला पवित्र आत्मा देतो; आणि पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ त्यांना मेंढरांची कोमलतेने काळजी घेण्यास मदत करते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; गलतीकर ५:२२, २३) तसेच, यहोवा त्यांना सुबुद्धी, ज्ञान व समजशक्तीही देतो. (नीतिसूत्रे २:६) पण तो हे कशाप्रकारे करतो? आता आपण अशा तीन मार्गांची चर्चा करू या, की ज्यांद्वारे यहोवा त्याच्या मेंढरांची काळजी वाहण्याकरता नियुक्त केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण पुरवतो.
अनुभवी मेंढपाळांकडून प्रशिक्षण
५. पेत्र व योहान इतके परिणामकारक मेंढपाळ का बनले?
५ प्रेषित पेत्र व योहान सन्हेद्रिनापुढे उभे होते तेव्हा लौकिक दृष्टीने ज्ञानी असलेल्या त्या न्यायसभेच्या न्यायाधीशांनी त्यांना “निरक्षर व अज्ञानी” लेखले. अर्थात, त्यांना लिहिता वाचता येत होते, पण त्यांनी रब्बींकडून शास्त्रवचनांच्या अभ्यासाचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. तरीपण पेत्र व योहान आणि इतर शिष्यांनीही आपण परिणामकारक शिक्षक असल्याचे सिद्ध केले होते. कारण त्यांचे ऐकून बरेचजण सत्य मानू लागले होते. मग हे सर्वसाधारण पुरुष असे असाधारण कौशल्य असलेले शिक्षक कसे काय बनू शकले? पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकल्यावर न्यायसभेने ‘हे येशूच्या सहवासात होते हे ओळखले.’ (प्रेषितांची कृत्ये ४:१-४, १३) ते पवित्र आत्म्याच्या साहाय्याने बोलत होते हे खरे आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) पण त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्टपणे दिसत होते, अगदी त्या आध्यात्मिकरित्या अंधळ्या न्यायाधीशांनाही हे जाणवले, की येशूने या माणसांना प्रशिक्षण दिले होते. पृथ्वीवर असताना येशूने प्रेषितांना केवळ मेंढरांसमान लोकांना शोधण्याचेच नाही, तर ते कळपात आल्यानंतर त्यांचे कशाप्रकारे पालनपोषण करायचे याचेही प्रशिक्षण दिले होते.—मत्तय ११:२९; २०:२४-२८; १ पेत्र ५:४.
६. इतरांना प्रशिक्षण देण्यात येशू व पौलाने कशाप्रकारे एक उदाहरण मांडले?
६ येशूचे पुनरुत्थान झाल्यावरही तो मेंढपाळ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांना प्रशिक्षण देत राहिला. (प्रकटीकरण १:१; २:१–३:२२) उदाहरणार्थ, त्याने स्वतः पौलाला निवडून त्याच्या प्रशिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. (प्रेषितांची कृत्ये २२:६-१०) पौलाने या प्रशिक्षणाची कदर केली आणि त्याला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या त्या इतर वडिलांना त्याने शिकवल्या. (प्रेषितांची कृत्ये २०:१७-३५) उदाहरणार्थ त्याने तीमथ्याला देवाच्या सेवेत “लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी” बनण्याकरता प्रशिक्षित करण्यासाठी बराच वेळ व शक्ती खर्च केली. (२ तीमथ्य २:१५) यामुळे त्या दोघांमध्ये अतूट मैत्रीचे बंधन निर्माण झाले. पौलाने तीमथ्याबद्दल असे लिहिले होते: “जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.” (फिलिप्पैकर २:२२) पौलाने तीमथ्याला किंवा आणखी कोणाला स्वतःचा शिष्य बनवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, त्याने सह विश्वासू बांधवांना असे प्रोत्साहन दिले, की “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथकर ११:१.
७, ८. (क) वडील जेव्हा येशू व पौल यांचे अनुकरण करतात तेव्हा चांगले परिणाम घडून येतात हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते? (ख) अनुभवी वडिलांनी भावी सेवा सेवक व भावी वडिलांना प्रशिक्षण देण्यास केव्हा सुरुवात करावी?
७ येशू व पौल यांचे अनुकरण करून अनुभवी मेंढपाळ बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवांना प्रशिक्षित करण्याकरता पुढाकार घेतात आणि त्यांनाही उत्तम परिणाम दिसून येतात. चॅड नावाच्या एका बांधवाचे उदाहरण घ्या. धार्मिक कारणामुळे विभाजित अशा कुटुंबात त्याचे संगोपन झाले, पण अलीकडेच त्याला वडील म्हणून नियुक्त करण्यात आले. तो म्हणतो: “बऱ्याच वर्षांपासून अनेक अनुभवी वडिलांनी मला आध्यात्मिकरित्या प्रगती करण्यास मदत केली. माझे वडील विश्वासात नसल्यामुळे मंडळीतल्या वडिलांनी माझी विशेष काळजी घेतली आणि ते जणू माझे आध्यात्मिक वडील बनले. त्यांनी मला क्षेत्रसेवेत निपुण बनण्यास बरीच मदत केली आणि नंतर, विशेषतः एका वडिलांनी मंडळीत माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता मला प्रशिक्षण दिले.”
८ चॅडच्या अनुभवावरून दिसून येते त्याप्रमाणे, सुज्ञ मेंढपाळ भावी सेवा सेवकांना व वडिलांना आधीपासूनच, म्हणजे या जबाबदाऱ्या मिळवण्यास ते पात्र बनण्याच्या कितीतरी काळाआधीपासूनच प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. हे का आवश्यक आहे? कारण बायबलमध्ये अशी आज्ञा दिली आहे की सेवा सेवक आणि वडील यांना या पदांवर सेवा करण्यास नियुक्त करण्याच्या आधीच त्यांनी नैतिक व आध्यात्मिक दृष्ट्या एक अपेक्षित पातळी गाठली पाहिजे. त्यांची “अगोदर पारख व्हावी” हे अगत्याचे आहे.—१ तीमथ्य ३:१-१०.
९. अनुभवी मेंढपाळांवर कोणती जबाबदारी आहे आणि का?
९ बाप्तिस्मा झालेल्या बांधवांची पारख करायची असेल, तर साहजिकच त्यांना आधी प्रशिक्षण दिले पाहिजे. उदाहरणार्थ, जर शाळेत शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थ्याला कोणतेही प्रशिक्षण न देता एखाद्या कठीण परीक्षेला बसण्यास सांगितले तर विद्यार्थी त्या परीक्षेत उत्तीर्ण होईल का? नाही, तो नापास होईल. म्हणूनच, प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पण जाणते शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता शिकवत नाहीत तर ते ज्ञान त्यांच्या कामी पडावे अशारितीने शिकवतात. त्याचप्रकारे, परिश्रमी वडील बाप्तिस्मा झालेल्या बांधवांना नियुक्त पदी सेवा करण्याकरता आवश्यक असलेले गुण विकसित करण्यास मदत करतात आणि याकरता ते त्यांना विशिष्ट प्रशिक्षण देतात. या बांधवांना सेवा सेवक किंवा वडील म्हणून नियुक्त होण्यास मदत करता यावी या दृष्टीने केवळ ते प्रशिक्षण देत नाहीत, तर त्यांना कळपाची काळजी चांगल्याप्रकारे घेता यावी या दृष्टीने त्यांना मदत करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ते त्यांना प्रशिक्षण देतात. (२ तीमथ्य २:२) अर्थात, सेवा सेवक किंवा वडील म्हणून नियुक्त होण्याकरता आवश्यक पात्रता गाठण्याकरता बाप्तिस्मा झालेल्या बांधवांनी स्वतः देखील प्रयत्न व मेहनत केली पाहिजे. (तीत १:५-९) पण, अनुभवी वडील अशा बांधवांना स्वेच्छेने प्रशिक्षण देण्याद्वारे त्यांना झपाट्याने प्रगती करण्यास मदत करू शकतात.
१०, ११. मेंढपाळ इतरांना अधिक जबाबदाऱ्यांकरता कशाप्रकारे प्रशिक्षित करू शकतात?
१० तर मग प्रश्न येतो, की अनुभवी मेंढपाळ इतरांना मंडळीच्या जबाबदाऱ्या हाताळण्याचे प्रशिक्षण कोणत्या विशिष्ट मार्गांनी देऊ शकतात? सर्वप्रथम, मंडळीतल्या बांधवांमध्ये रस घेण्याद्वारे, नियमितपणे क्षेत्र सेवेत त्यांच्यासोबत कार्य करण्याद्वारे आणि ‘सत्याचे वचन नीट सांगण्याचे’ कौशल्य विकसित करण्यास त्यांना साहाय्य करण्याद्वारे ते असे करू शकतात. (२ तीमथ्य २:१५) इतरांची सेवा केल्याने किती आनंद मिळतो याविषयी त्यांच्याशी चर्चा करून व आध्यात्मिक ध्येये ठेवून ती मिळवल्याने किती समाधान मिळते याबाबतीत स्वतःचा अनुभव सांगून परिपक्व मेंढपाळ त्या बांधवांना मदत करू शकतात. तसेच, “कळपाला कित्ते” होण्याकरता एखाद्या बांधवाने कोठे सुधारणा केली पाहिजे याबाबतीत दयाळूपणे सुस्पष्ट सूचना देण्याद्वारेही ते मदत करू शकतात.—१ पेत्र ५:३, ५.
११ एखाद्या बांधवाला सेवासेवक म्हणून नियुक्त करण्यात आल्यावरही सुज्ञ मेंढपाळ त्याचे प्रशिक्षण चालू ठेवतात. ब्रूस यांनी अनेक दशके वडील म्हणून सेवा केली आहे. ते सांगतात: “ज्याची नुकतीच सेवा सेवक म्हणून नियुक्ती झाली आहे अशा बांधवासोबत बसून विश्वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेल्या सूचनांची उजळणी करण्यास मला आवडते. त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या विशिष्ट कामाबद्दल काही सूचना प्रकाशित करण्यात आल्या असतील त्या त्याही आम्ही वाचून काढतो आणि मग त्याला त्या कामाची सवय होईपर्यंत त्याच्यासोबत ते काम करण्याचा मी प्रयत्न करतो.” सेवा सेवकाचा अनुभव जसजसा वाढत जातो तसतसे त्याला मेंढपाळ कार्याकरताही प्रशिक्षित केले जाऊ शकते. ब्रूस पुढे सांगतात, “एखाद्या मेंढपाळ भेटीकरता एखाद्या सेवा सेवकाला मी सोबत घेऊन जातो तेव्हा ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला भेटण्यास आम्ही जात आहोत, त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊ शकतील अशी विशिष्ट शास्त्रवचने निवडण्यास मी त्याला मदत करतो. सेवा सेवकाला जर परिणामकारक मेंढपाळ बनायचे असेल, तर बायबलच्या वचनांनी समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला स्पर्श करावा अशाप्रकारे त्यांचा वापर करण्यास शिकणे अतिशय आवश्यक आहे.”—इब्री लोकांस ४:१२; ५:१४.
१२. अनुभवी मेंढपाळ नव्यानेच नियुक्ती झालेल्या वडिलांना कशाप्रकारे प्रशिक्षित करू शकतात?
१२ ज्यांना नुकतेच वडील म्हणून नेमण्यात आले आहे त्यांनाही प्रशिक्षण दिल्यास बराच फायदा होऊ शकतो. याआधी उल्लेख करण्यात आला होता त्या निकने सांगितले: “मला दोन वयस्क वडिलांनी अतिशय मोलाची मदत दिली. विशिष्ट परिस्थिती नेमकी कशी हाताळली जावी हे माहीत असूनही, ते सहसा माझे मत ऐकून घ्यायचे आणि माझ्याशी सहमत नसले तरीसुद्धा ते माझाही अभिप्राय विचारात घ्यायचे. मंडळीतल्या बंधू भगिनींशी ते किती नम्रपणे व आदरपूर्वक वागतात याचे निरीक्षण करण्याद्वारेही मला बरेच काही शिकायला मिळाले. समस्या सोडवताना किंवा प्रोत्साहन देताना बायबलचा निपुणतेने वापर करणे किती अगत्याचे आहे हे देखील या वडिलांनी माझ्या मनावर ठसवले.”
देवाच्या वचनातून मिळणारे प्रशिक्षण
१३. (क) परिणामकारक मेंढपाळ होण्याकरता एका बांधवाला कशाची आवश्यकता आहे? (ख) “माझी शिकवण माझी नाही,” असे येशूने का म्हटले?
१३ खरे पाहता, एका मेंढपाळाने “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे” म्हणून त्याला जे नियम, तत्त्वे, व उदाहरणे जाणून घेणे आवश्यक आहे ती सर्व देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये आढळतात. (२ तीमथ्य ३:१६, १७) जगिक दृष्टीने एखादा बंधू बराच शिकलेला असेल, पण परिणामकारक मेंढपाळ बनण्याकरता, त्याला शास्त्रवचनांचे कितपत ज्ञान आहे आणि त्यांचा तो व्यवहारात कितपत वापर करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. येशूचेच उदाहरण घ्या. तो पृथ्वीवर आजवर होऊन गेलेला सर्वात ज्ञानी, सर्वात समंजस व सुज्ञ आध्यात्मिक मेंढपाळ होता; पण तोसुद्धा, यहोवाच्या मेंढरांना शिकवताना स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहिला नाही. त्याने म्हटले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला श्रेय का दिले? त्याने स्वतःच याचा खुलासा केला: “जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचेच गौरव पाहतो.”—योहान ७:१६, १८.
१४. मेंढपाळ स्वतःचेच गौरव पाहण्याचे कशाप्रकारे टाळतात?
१४ विश्वासू मेंढपाळ स्वतःचेच गौरव पाहात नाहीत. ते स्वतःच्या बुद्धीच्या आधारावर नव्हे, तर देवाच्या वचनाच्या आधारावरच सल्ला किंवा प्रोत्साहन देतात. त्यांना जाणीव आहे की एका मेंढपाळाचे काम, मेंढरांना वडिलांचे नव्हे तर “ख्रिस्ताचे मन” आत्मसात करण्यास मदत करणे हे आहे. (१ करिंथकर २:१४-१६) उदाहरणार्थ, वैवाहिक जीवनात समस्यांना तोंड देणाऱ्या एखाद्या जोडप्याला मदत करताना, जर वडिलाने बायबलच्या तत्त्वांच्या व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ प्रकाशित केलेल्या साहित्याच्या आधारावर सल्ला देण्याऐवजी स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर सल्ला दिला, तर काय घडू शकते? (मत्तय २४:४५) त्याच्या सल्ल्यावर विशिष्ट संस्कृतीच्या रूढीपरंपरांचा पगडा असू शकतो आणि त्याचे स्वतःचे ज्ञान मर्यादित असल्यामुळे तो सल्ला देखील संकुचित स्वरूपाचा असू शकतो. अर्थात सगळ्याच रूढीपरंपरा वाईट नसतात आणि कदाचित त्या वडिलाला जीवनात बराच अनुभव असेलही. पण मेंढरांना सर्वात जास्त फायदा तेव्हाच होईल की जेव्हा मेंढपाळ त्यांना मनुष्यांचे विचार किंवा स्थानिक रूढीपरंपरा नव्हेत, तर येशूची वाणी व यहोवाची वचने ऐकण्याचे प्रोत्साहन देतील.—स्तोत्र १२:६; नीतिसूत्रे ३:५, ६.
‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ प्रशिक्षण
१५. येशूने “विश्वासू व बुद्धिमान दासाला” कोणती आज्ञा दिली होती आणि त्यांना मिळालेल्या सफलतेचे एक कारण कोणते आहे?
१५ प्रेषित पेत्र, योहान व पौल हे सर्व मेंढपाळ, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ असे ज्याचे येशूने वर्णन केले त्या समूहापैकी होते. या दास वर्गात येशूच्या पृथ्वीवरील अभिषिक्त बंधूंचा समावेश होतो; त्यांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा आहे. (प्रकटीकरण ५:९, १०) या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात पृथ्वीवर उरलेल्या ख्रिस्ताच्या बांधवांची संख्या साहजिकच कमी होत गेली आहे. पण, येशूने त्यांना जे कार्य करण्याची आज्ञा दिली होती, अर्थात, अंत येण्याआधी राज्याच्या सुवार्तेच्या घोषणेचे कार्य, ते मात्र अभूतपूर्व प्रमाणात विस्तारले आहे. पण तरीसुद्धा दास वर्गाला या कार्यात उल्लेखनीय सफलता मिळाली आहे! का? याचे एक कारण म्हणजे, प्रचार व शिकवण्याच्या कार्यात आपले साहाय्य करण्याकरता त्यांनी ‘दुसरी मेंढरे’ या समूहातील सदस्यांना प्रशिक्षित केले आहे. (योहान १०:१६; मत्तय २४:१४; २५:४०) आणि आज तर या कार्यात याच समूहातील विश्वासू सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.
१६. दास वर्ग नियुक्त पुरुषांना कशाप्रकारे प्रशिक्षण पुरवतो?
१६ दास वर्ग हे प्रशिक्षण कशाप्रकारे पुरवतात? पहिल्या शतकात, दास वर्गाच्या प्रतिनिधींना मंडळीतल्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आला होता. (१ करिंथकर ४:१७) आजही असेच घडते. नियमन मंडळ, जो दास वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा अभिषिक्त वडिलांचा एक लहानसा गट आहे, त्याने आपल्या प्रतिनिधींना जगभरातील हजारो मंडळ्यांमध्ये सेवा सेवकांना व वडिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे. शिवाय, मेंढरांची काळजी उत्तमरित्या घेण्याचे प्रशिक्षण देण्याकरता, नियमन मंडळातर्फे शाखा दप्तराच्या सदस्यांकरता, प्रवासी पर्यवेक्षकांकरता, वडिलांकरता व सेवा सेवकांकरता निरनिराळ्या प्रशाला आयोजित केल्या जातात. याव्यतिरिक्त पत्रांद्वारे, टेहळणी बुरूज लेखांद्वारे आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास सुसंघटित * (इंग्रजी) यांसारख्या इतर प्रकाशनांद्वारेही वेळोवेळी मार्गदर्शन पुरवले जाते.
१७. (क) येशूने दास वर्गावर भरवसा असल्याचे कसे दाखवले आहे? (ख) आध्यात्मिक मेंढपाळ आपल्याला दास वर्गावर भरवसा असल्याचे कसे दाखवू शकतात?
१७ येशूला आपल्या दास वर्गावर इतका भरवसा होता की त्याने त्यास “आपल्या सर्वस्वावर” अर्थात पृथ्वीवरील आपल्या सर्व आध्यात्मिक संपत्तीवर नेमले. (मत्तय २४:४७) नियुक्त मेंढपाळ देखील, दास वर्गाच्या नियमन मंडळाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करण्याद्वारे दाखवतात की त्यांनासुद्धा या दास वर्गावर भरवसा आहे. होय, मेंढपाळ जेव्हा इतरांना प्रशिक्षण देतात, स्वतः देवाच्या वचनातील मार्गदर्शन स्वीकारतात, आणि दास वर्गाने पुरवलेल्या प्रशिक्षणाचा व्यवहारात उपयोग करतात तेव्हा कळपातील एकता वाढवण्यास ते हातभार लावत असतात. ख्रिस्ती मंडळीतल्या प्रत्येक सदस्याबद्दल कळकळ असलेल्या या पुरुषांना यहोवाने प्रशिक्षित केले आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! (w०६ ५/१)
[तळटीप]
^ परि. 16 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• अनुभवी आध्यात्मिक मेंढपाळ कशाप्रकारे इतरांना प्रशिक्षण देतात?
• मेंढपाळ स्वतःच्या विचारांच्या आधारांवर का शिकवत नाहीत?
• मेंढपाळ दास वर्गावर भरवसा असल्याचे कशाप्रकारे व का दाखवतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२४, २५ पानांवरील चित्रे]
ख्रिस्ती वडील मंडळीतल्या तरुण बांधवांना प्रशिक्षित करतात
[२६ पानांवरील चित्रे]
‘विश्वासू व बुद्धिमान दास’ वडिलांकरता भरपूर प्रशिक्षण पुरवतात