चमत्कार खरे की काल्पनिक?
चमत्कार खरे की काल्पनिक?
“चमत्कार अवश्य होतात—देवदूतांना विचारून पाहा,” असे एका कारवर लिहिलेल्या शब्दांनी रस्त्यावरून चाललेल्या एका गृहस्थाचे लक्ष वेधले. हे गृहस्थ धार्मिक प्रवृत्तीचे होते तरी पण या शब्दांचा काय अर्थ असावा, हे त्यांना निश्चित माहीत नव्हते. कार चालकाचा चमत्कारांवर विश्वास होता, असा या स्टिकरचा अर्थ होता का? की, चमत्कार आणि देवदूत या दोन्ही गोष्टींचा उपहास करणारे ते शब्द होते?
जर्मन लेखक मॅनफ्रेट बार्टल काय म्हणाले ते कदाचित तुम्हाला माहीत करून घ्यायला आवडेल; ते म्हणाले: “चमत्कार हा असा शब्द आहे, जो लोकांना लगेच दोन विरुद्ध गटात विभागतो.” चमत्कार मानणाऱ्या लोकांची ही खात्री असते, की चमत्कार होतात आणि कदाचित बहुतेकदा होतात. * उदाहरणार्थ, असे सांगितले जाते, की गेल्या काही वर्षांत ग्रीसमध्ये, महिन्यातून एकदा तरी चमत्कार होतात, असे चमत्कारांवर विश्वास ठेवणारे म्हणतात. यामुळे ग्रीक कर्मठ चर्चच्या एका बिशपांना असा इशारा द्यावा लागला: “चमत्कारांवर विश्वास ठेवणारे, देव, मारीया आणि संतांना मानव समजू लागले आहेत. तेव्हा, लोकांनी याबाबतीत अतिरेक करू नये.”
काही राष्ट्रांत फार कमी लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. जर्मनीत २००२ मध्ये छापण्यात आलेल्या ॲलन्सबॉख सर्व्हेनुसार, ७१ टक्के नागरिक चमत्कार, वास्तविक नव्हे तर काल्पनिक असतात असे मानतात. परंतु, चमत्कार मानणाऱ्या एक तृतीयांशपेक्षा कमी लोकांपैकी तीन स्त्रियांनी असा दावा केला की त्यांना कुमारी मारीयेकडून संदेश मिळाला आहे. एक देवदूत आणि एका कबूतरासह मारीया त्यांना प्रकट झाली होती; हे दर्शन मिळून काही महिने उलटल्यानंतर जर्मन बातमीपत्रक वेस्टफालेनपोस्टने अशी बातमी दिली: “आतापर्यंत सुमारे ५०,००० तीर्थयात्रेकरू, यांपैकी काही बरे होण्याच्या उद्देशाने आले तर काही, या स्त्रियांनी पाहिलेल्या दृष्टान्ताबद्दल कुतूहल वाटत असल्यामुळे आले.” याशिवाय आणखी १०,००० जण, मारीया पुन्हा दर्शन देते की काय हे पाहण्यासाठी गावात येतील, अशी अपेक्षा केली जात होती. १८५८ साली फ्रान्सच्या लुद्र्ज येथे आणि १९१७ साली पोर्तुगालच्या फतिमा येथे कुमारी मारीयेने अशीच दर्शने दिली होती असे म्हणतात.
अख्रिस्ती धर्माच्या लोकांच्याबाबतीत काय?
सर्व धर्माच्या लोकांना चमत्कारांवर विश्वास असल्याचे दिसून येते. धर्माचा विश्वकोश (इंग्रजी) यांत असे म्हटले आहे, की बौद्ध, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माच्या संस्थापकांनी चमत्काराविषयी विविध मते बाळगली; परंतु तो विश्वकोश म्हणतो: “या धर्मांच्या इतिहासावरून हे निर्विवादपणे दिसून येते, की चमत्कार आणि चमत्काराच्या कथा, मानवाच्या धार्मिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहेत.” हाच विश्वकोश पुढे म्हणतो, की “स्वतः बुद्धाने काही वेळा चमत्कार केले.” नंतर, जेव्हा बौद्ध धर्माने चीनमध्ये मूळ धरले तेव्हा या धर्माच्या भिक्षुकांनी बहुतेकदा आपल्यात चमत्कारिक शक्ती आहे हे दाखवले.”
अशा अनेक तथाकथित चमत्कारांचा उल्लेख केल्यानंतर तो विश्वकोश समारोपात असे म्हणतो: “एक व्यक्ती, धार्मिक चरित्रकारांनी सांगितलेल्या चमत्काराच्या सर्वच कहाण्यांवर विश्वास ठेवणार नाही; पण, आपल्या उत्कट
अनुयायांना चमत्कार करण्याची शक्ती बहाल करू शकणाऱ्या बुद्धाचे गौरव करण्याच्या चांगल्या हेतूने या कहाण्या रचण्यात आल्या होत्या यांत काही शंका नाही.” तोच विश्वकोश इस्लाम धर्माविषयी असे म्हणतो: “बहुतेक इस्लाम धर्मीय समाजाने चमत्कारांवर विश्वास ठेवला आहे. मुहंमदने अनेक प्रसंगी लोकांदेखत चमत्कार केले, असे चित्र परंपरांमध्ये (हदीथमध्ये) रेखाटण्यात आले आहे. . . . संतांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या कबरेतूनच, विश्वासू लोकांच्या फायद्यास्तव चमत्कार केले असा विश्वास केला जातो; लोक प्रामाणिकपणे अशी विनंती करतात, की संतांनी त्यांची मदत करावी.”ख्रिस्ती धर्मातील चमत्कारांविषयी काय?
ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या अनेकांमध्ये याबाबतीत दुमत आहे. येशू ख्रिस्ताने किंवा पूर्व-ख्रिस्ती काळांत देवाच्या सेवकांनी केलेल्या चमत्कारांविषयी बायबलमध्ये असलेले अहवाल वास्तविक आहेत, असे काही जण मानतात. तर, पुष्कळ लोक प्रॉटेस्टंट सुधारक मार्टिन लुथर यांजशी सहमत होतात. धर्माचा विश्वकोश (इंग्रजी) मार्टिन लुथरविषयी असे म्हणतो: “लुथर आणि कॅल्विन या दोघांनी असे लिहिले, की चमत्कारांचे युग समाप्त झाले आहे व आता चमत्कार होण्याची लोकांनी अपेक्षा करू नये.” कॅथलिक चर्चने “चमत्कार कसे झाले याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न न करता त्यांच्यावर विश्वास ठेवला,” असे या विश्वकोशात म्हटले आहे. परंतु, “सुज्ञानी प्रॉटेस्टंट समाज असा विश्वास करू लागला, की ख्रिस्ती धर्माचे आचरण, हा बहुतांशी नैतिकतेचा प्रश्न आहे; व बऱ्याच प्रमाणात देवाचा किंवा आत्मिक जगाचा मानवी जीवनाशी संपर्क नाही किंवा त्यांचा प्रभाव नाही.”
इतर तथाकथित ख्रिश्चन तसेच काही पाळक, बायबलमध्ये उल्लेखित चमत्कार वास्तविक आहेत याबाबतीत साशंक आहेत. उदाहरणार्थ, बायबलमधील, निर्गम ३:१-५ येथील जळत्या झुडूपाच्या अहवालाचा विचार करा. बायबल नेमके काय म्हणते (इंग्रजी) हे पुस्तक असे स्पष्टीकरण देते, की पुष्कळ जर्मन तत्त्ववेत्ते, या घटनेला चमत्काराचा एक खरा अहवाल समजत नाहीत. उलट, तो “मोशेच्या मनात चालेल्या आंतरिक झगड्याचे अर्थात पश्चात्तापाचे आणि तीव्र दुःखाच्या भावनांचे एक प्रतिक होता,” असे ते म्हणतात. तेच पुस्तक पुढे म्हणते: “अग्नीच्या ज्वाला म्हणजे ईश्वरी उपस्थितीच्या सूर्यप्रकाशात फुलांची उधळण असू शकतात.”
तुम्हाला हे स्पष्टीकरण समाधानकारक वाटणार नाही. मग तुम्ही काय विश्वास करावा? चमत्कार खरोखरच घडले होते असा विश्वास करणे तर्कशुद्ध आहे का? आधुनिक दिवसांत होणाऱ्या चमत्कारांविषयी काय? आपण देवदूतांना तर विचारू शकत नाही, तेव्हा कोणाला विचारू शकतो?
बायबलचा दृष्टिकोन
प्राचीन काळी देवाने काही वेळा मानवांना शक्य नसलेली कार्ये करण्यासाठी हस्तक्षेप केला होता, असे बायबलमध्ये सांगितले आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “तू चिन्हे व अद्भुत कृत्ये [अर्थात चमत्कार] दाखवून समर्थ हाताने व बाहु उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल यांस मिसर देशातून बाहेर आणिले.” (यिर्मया ३२:२१) कल्पना करा, मोशेच्या दिवसांतील सर्वात शक्तिशाली राष्ट्राचा देवाने पाठवलेल्या दहा पीडांनी पाणउतारा केला; या पीडांपैकी एका पीडेमुळे तर फारो राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा मृत्यू झाला. हे चमत्कार नव्हेत तर आणखी काय!—निर्गम, अध्याय ७ ते १४.
यानंतर, अनेक शतकांनंतर, चार शुभवर्तमान लेखकांनी येशूने केलेल्या सुमारे ३५ चमत्कारांचे वर्णन केले. वास्तविक पाहता, त्यांच्या शब्दांवरून असे सूचित होते, की त्यांनी ज्यांच्याविषयी सांगितले त्यांपेक्षा कितीतरी अधिक चमत्कार येशूने केले होते. हे सर्व अहवाल वास्तविक आहेत की काल्पनिक? *—मत्तय ९:३५; लूक ९:११.
बायबल देवाचे सत्य वचन असल्याचा दावा करते. हा दावा खरा आहे तर त्यात सांगितलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्याकडे ठोस कारण आहे. बायबल जसे स्पष्टपणे सांगते, की प्राचीन काळी चमत्काराद्वारे लोकांचे आजार बरे करण्यात आले, चमत्काराद्वारे मेलेल्यांना पुन्हा जिवंत करण्यात आले, वगैरे तसे बायबल हेही स्पष्टपणे सांगते, की आता असे चमत्कार घडत नाहीत. (“गतकाळाप्रमाणे आज चमत्कार का होत नाहीत” हा पृष्ठ ४ वरील चौकोन पाहा.) मग याचा असा अर्थ होतो का, की बायबल वास्तविक आहे असा विश्वास करणारे देखील, आधुनिक दिवसांतील चमत्कार खरे नाहीत असा विश्वास करतात? पुढील लेखात याचे उत्तर दिले आहे.
[तळटीपा]
^ परि. 3 या लेखात वापरण्यात आलेल्या “चमत्कार” या शब्दाची व्याख्या एका बायबल कोशात अशाप्रकारे करण्यात आली आहे: “लौकिक जगातील परिणाम जे मनुष्याच्या किंवा निर्सगाच्या ज्ञात शक्तीपेक्षा वरचढ आहेत; यामुळे ते अलौकिक स्रोताकडून होतात असे मानले जाते.”
^ परि. 14 बायबलच्या विश्वासयोग्यतेच्या पुराव्याचा तुम्ही विचार करू शकता. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकात हे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
[४ पानांवरील चौकट]
गतकाळाप्रमाणे आज चमत्कार का होत नाहीत
बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कारांविषयी सांगण्यात आले आहे. (निर्गम ७:१९-२१; १ राजे १७:१-७; १८:२२-३८; २ राजे ५:१-१४; मत्तय ८:२४-२७; लूक १७:११-१९; योहान २:१-११; ९:१-७) या अनेक चमत्कारांमुळे, येशू मशीहा असल्याची ओळख पटली व त्याला देवाचा पाठिंबा होता हे सिद्ध झाले. येशूच्या आरंभीच्या अनुयायांनी देखील आपल्याला चमत्कारिक देणग्या असल्याचे दाखवून दिले; जसे की त्यांना निरनिराळ्या भाषा बोलण्याची देणगी मिळाली आहे, हे दाखवले आणि ईश्वरप्रेरित वाणी त्यांना समजू शकली. (प्रेषितांची कृत्ये २:५-१२; १ करिंथकर १२:२८-३१) ख्रिस्ती मंडळी बाल्यावस्थेत असताना अशा चमत्कारिक देणग्यांचा फायदा झाला. तो कसा?
एक कारण म्हणजे, शास्त्रवचनांच्या फार कमी प्रती उपलब्ध होत्या. सहसा, केवळ श्रीमंत लोकच गुंडाळ्या किंवा पुस्तके बाळगत असत. मूर्तीपूजक राष्ट्रांतील लोकांना, बायबलविषयी किंवा बायबलचा लेखक यहोवा देव याच्याविषयी कसलेच ज्ञान नव्हते. ख्रिस्ती शिकवण तोंडी द्यावी लागत होती. अशावेळी देव, ख्रिस्ती मंडळीचा उपयोग करून घेत आहे हे दाखवण्यासाठी चमत्कारिक देणग्यांचा उपयोग केला जाई.
परंतु या देणग्यांची गरज राहणार नाही तेव्हा त्या नाहीशा होतील, असे पौलाने सांगितले. “संदेश असेल तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.”—१ करिंथकर १३:८-१०.
आज, लोक बायबल, बायबल संदर्भ ग्रंथ आणि विश्वकोश मिळवू शकतात. ६० लाखांपेक्षा अधिक प्रशिक्षित ख्रिश्चन, बायबलवर आधारित असलेले देवाबद्दलचे ज्ञान घ्यायला लोकांना मदत करीत आहेत. म्हणूनच, येशू ख्रिस्त देवाचा नियुक्त मुक्तिदाता आहे हे सिद्ध करण्यासाठी किंवा यहोवाच्या सेवकांना यहोवाचा पाठिंबा आहे याचा पुरावा देण्यासाठी चमत्कारांची आज गरज नाही.