योग्य आणि अयोग्य—तुम्ही कसे ठरवावे?
योग्य आणि अयोग्य—तुम्ही कसे ठरवावे?
योग्य आणि अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? मानवी इतिहासाच्या अगदी सुरवातीलाच हा प्रश्न उभा राहिला होता. बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकानुसार देवाने एदेन बागेतल्या एका झाडाला “बऱ्यावाइटाचे ज्ञान करुन देणारे झाड” म्हणून निवडले. (उत्पत्ति २:९) या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये, अशी आज्ञा देवाने पहिल्या मानवी जोडप्याला दिली. परंतु, देवाचा शत्रू दियाबल सैतान याने आदाम व हव्वेला असे सुचवले, की जर त्यांनी या झाडाचे फळ खाल्ले तर त्यांचे “डोळे उघडतील,” आणि ते “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होतील.—उत्पत्ति २:१६, १७; ३:१, ५; प्रकटीकरण १२:९.
आता आदाम व हव्वेला एक निर्णय घ्यावा लागणार होता—योग्य आणि अयोग्य याबद्दल असलेला देवाचा दर्जा स्वीकारायचा की स्वतःच स्वतःसाठी दर्जा ठरवायचा? (उत्पत्ति ३:६) त्यांनी देवाची आज्ञा मोडण्यास निवडले आणि त्या झाडाचे फळ खाल्ले. या साध्याशा कृत्याने काय सूचित झाले? देवाने त्यांच्यावर लावलेल्या मर्यादांचा आदर करण्यास नकार देण्याद्वारे त्यांनी असा दावा केला, की योग्य आणि अयोग्य काय आहे हे स्वतःच ठरवणे त्यांच्याकरता व त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या संततीकरता अधिक फायदेकारक आहे. पण, देवाप्रमाणे स्वतःचे दर्जे ठरवण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या मानवजातीला कितपत यश आले आहे?
विविध मते
शतकानुशतके अनेक विचारवंतांच्या शिकवणुकी पडताळून पाहिल्यावर, एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिकाने असे म्हटले, की ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटीस याच्या काळापासून २० व्या शतकापर्यंत, “चांगले काय आहे तसेच योग्य व अयोग्य काय आहे हे ठरवण्यावरून वारंवार वादविवाद झाले आहेत.”
उदाहरणार्थ, सा.यु.पू. पाचव्या शतकात सोफिस्ट म्हणून ग्रीक शिक्षकांचा एक प्रमुख गट होता. त्यांनी अशी शिकवण दिली, की योग्य आणि अयोग्य यांबद्दलचे दर्जे लोकप्रिय मतानुसार ठरवले जातात. याच गटातील एका शिक्षकाने म्हटले: “एखाद्या शहरातील लोकांना विशिष्ट गोष्टी योग्य व उत्तम वाटत असतील, तर त्या गोष्टी त्यांच्याकरता योग्य व उत्तम आहेत.” याच स्तरानुसार पहिल्या लेखाच्या सुरवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्या ज्योडीने ते पैसे ठेवायला हवे होते; कारण, त्याच्या समाजातील बहुतेक लोकांचा किंवा “शहरातील” लोकांनी कदाचित असेच केले असते.
इमॅन्युएल कांट नावाच्या १८ व्या शतकातील एका नामवंत तत्त्ववेत्याने एक वेगळे मत मांडले. ईश्यूज इन एथिक्स नावाच्या एका मासिकात असे म्हटले आहे: “इमॅन्युएल कांट आणि त्याच्यासारख्या इतरांनी . . . स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारावर भर दिला.” कांटच्या तत्त्वानुसार, ज्योडी जोपर्यंत इतरांच्या हक्कांचे उल्लंघन करीत नाही तोपर्यंत तो जे काही करेल तो पूर्णपणे त्याचा व्यक्तिगत निर्णय असेल. लोकांच्या मतानुसार त्याने आपले स्तर ठरवू नये.
मग, ज्योडीने हा पेच कसा सोडवला? त्याने तिसराच मार्ग अवलंबला. ख्रिस्ती आणि गैरख्रिस्ती असे दोन्ही प्रकारचे लोक ज्याची स्तुती करत आले आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे निर्णय घेण्याचे त्याने ठरवले. येशूने अशी शिकवण दिली: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) ज्योडीने ते ८२,००० डॉलर आपल्या क्लायंटच्या हवाली केले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले! ज्योडीला जेव्हा त्याने पैसे ठेवून का घेतले नाहीत असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले, की तो एक यहोवाचा साक्षीदार आहे. तो म्हणाला, की “जे पैसे माझे नाहीत ते मी कसे ठेवेन?” बायबलमधील मत्तय १९:१८ या वचनातील येशूच्या शब्दांचे पालन करणे त्याने महत्त्वाचे समजले, जेथे म्हटले आहे: “चोरी करू नको.”
लोकमत भरवशालायक मार्गदर्शक?
ज्योडीचा प्रामाणिकपणा पाहून काही लोक कदाचित त्याला मूर्ख म्हणतील. पण लोकमत हे भरवशालायक मार्गदर्शक नाही. उदाहरणार्थ, पुरातन काळात काही संस्कृतींत, बालकांचा बली देण्याच्या प्रथेत काही गैर नाही असे मानले जात होते; समजा, अशाच एखाद्या समाजात तुमचा जन्म झाला असता तर? बहुतेक लोकांचा समज आहे म्हणून ही प्रथा योग्य ठरली असती का? (२ राजे १६:३) नरभक्षण हे एक सद्गुणी कृत्य आहे असे मानणाऱ्या समाजात तुमचा जन्म झालेला असता तर काय? मानवाचे मांस खाणे गैर नाही, असा त्याचा अर्थ झाला असता का? एखादी प्रथा बहुतेक लोक पाळतात याचा अर्थ ती प्रथा योग्य आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. फार पूर्वी बायबलने अशा जाळ्यात अडकण्यापासून सावध राहण्याचे उत्तेजन दिले: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजनसमाजास अनुसरू नको.”—निर्गम २३:२.
लोकमतानुसार योग्य व अयोग्य ठरवण्याच्या धोक्यापासून सावध राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने आणखी एक कारण दिले. त्याने, सैतान ‘जगाचा अधिकारी’ आहे असे उघडपणे सांगितले. (योहान १४:३०; लूक ४:६) “सर्व जगाला” ठकविण्यासाठी सैतान आपल्या हुद्द्याचा वापर करतो. (प्रकटीकरण १२:९) तेव्हा, योग्य व अयोग्य याबाबतचा दर्जा तुम्ही केवळ बहुतांश लोकांच्या मतानुसार ठरवल्यास, तुम्ही कदाचित नैतिकतेविषयी सैतानाचा दृष्टिकोन आत्मसात कराल व हे निश्चितच विनाशकारक ठरेल.
तुम्ही स्वतःवर भरवसा ठेवू शकता का?
मग, प्रत्येक व्यक्तीने योग्य काय व अयोग्य काय हे स्वतःच ठरवावे का? बायबल म्हणते: “आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीतिसूत्रे ३:५) का नको? कारण सर्व मानवांना वारशात एक मूलभूत दोष मिळाला आहे ज्यामुळे त्यांचे अंदाज चुकू शकतात. देवाविरुद्ध बंडाळी करण्याद्वारे आदाम व हव्वेने स्वार्थी व द्रोही सैतान याचे दर्जे स्वीकारले व त्याला आपला आध्यात्मिक पिता होण्यास निवडले. यानंतर, त्यांनी आपल्या संततीला एक आनुवंशिक गुणधर्म दिला अर्थात एक कपटी हृदय दिले ज्यात योग्य काय आहे ते जाणण्याची क्षमता आहे परंतु ज्याची, जे चूक आहे तेच करण्याची प्रवृत्ती आहे.—उत्पत्ति ६:५; रोमकर ५:१२; ७:२१-२४.
नीतिशास्त्रावर विश्लेषण करताना दि एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका असे म्हणतो: “बहुतेकदा असे दिसून येते, की आपण नैतिकरीत्या काय केले पाहिजे हे लोकांना माहीत असूनही ते आपलाच स्वार्थ साधणाऱ्या गोष्टी करत राहतात. अशा लोकांना, जे योग्य आहे ते करण्याची कारणे कशी सांगावीत हा मोठा प्रश्न पाश्चात्य नीतिशास्त्रासमोर आहे.” बायबल किती अचूकपणे म्हणते: “हृदय सर्वात कपटी व उद्विग्न आहे. त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९, NW) मग, कपटी आणि त्याचबरोबर उद्विग्न असलेल्या हृदयावर आपण भरवसा ठेवू का?
कबूल आहे, की देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांमध्ये देखील, नीतिमान जीवनशैली जगण्याची व व्यावहारिक आणि आदरणीय नैतिक तत्त्वप्रणाली विकसित करण्याची क्षमता असते. परंतु, सहसा त्यांच्या तत्त्वप्रणालीत रुजलेले श्रेष्ठ तत्त्व, बायबलमधील नैतिक दर्जांचे केवळ प्रतिबिंब असते. असे लोक देवाचे अस्तित्व नाकारत असले तरी, त्यांच्या विचारांवरून हे प्रकट होते, की देवाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करण्याची त्यांच्यामध्ये उपजत क्षमता आहे. यावरून, बायबल प्रकट करते त्याप्रमाणे, मानवजातीला ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण करण्यात आल्याचे सिद्ध होते. (उत्पत्ति १:२७; प्रेषितांची कृत्ये १७:२६-२८) प्रेषित पौलाने म्हटले: “ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात.”—रोमकर २:१५.
अर्थात, जे योग्य आहे ते माहीत असणे ही एक गोष्ट आहे आणि जे योग्य आहे ते करण्याची नैतिक शक्ती असणे ही दुसरी गोष्ट आहे. एखाद्याला ही आवश्यक असणारी नैतिक शक्ती कशी मिळू शकते? कार्य करण्याची प्रेरणा हृदयातून उत्पन्न होत असल्यामुळे, त्या व्यक्तीने बायबलचा लेखक यहोवा देव याच्याबद्दल प्रेम विकसित केले पाहिजे जेणेकरून तिला ती नैतिक शक्ती मिळू शकेल.—स्तोत्र २५:४, ५.
चांगले करण्याची शक्ती मिळवणे
देवावर प्रेम करण्यास शिकण्यातील पहिले पाऊल म्हणजे, त्याच्या आज्ञा किती तर्कशुद्ध व व्यावहारिक आहेत याचा अनुभव घेणे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) उदाहरणार्थ, बायबलमधील व्यावहारिक सल्ला, मद्य असलेली पेये प्राशन करावीत का, मादक पदार्थांचे सेवन करावे का किंवा विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवावेत का, हे ठरवताना योग्य व अयोग्य काय हे समजण्यासाठी तरुणांना मदत करेल. बायबल, विवाह झालेल्यांना आपल्यातील मतभेद कसे सोडवावेत यासंबंधाने मदत करते आणि मुलांचे संगोपन करण्याकरता पालकांसाठी मार्गदर्शन देखील पुरवते. * बायबलमधील नीतिस्तरांचे पालन केल्यास, तरुण व वृद्ध अशा दोघांना, मग त्यांची सामाजिक, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी फायदा होतो.
पोषक अन्न खाल्ल्याने जसे तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती मिळते तसेच देवाचे वचन वाचल्याने तुम्हाला त्याच्या दर्जांनुरूप जीवन जगण्याची शक्ती मिळेल. येशूने देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाला जीवन-रक्षक भाकरीची उपमा दिली. (मत्तय ४:४) त्याने असेही म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे . . . हेच माझे अन्न आहे.” (योहान ४:३४) देवाच्या वचनातून मिळणारे आध्यात्मिक अन्न सेवन केल्यामुळे येशू मोहांचा प्रतिकार करू शकला आणि सुज्ञ निर्णय घेऊ शकला.—लूक ४:१-१३.
सुरवातीला तुम्हाला देवाच्या वचनातील आध्यात्मिक अन्न खायला व त्याच्या दर्जांनुरूप चालायला कठीण वाटेल. पण तुम्हाला आठवत असेल, की तुम्ही लहान होता तेव्हा, तुमच्या आरोग्यासाठी चांगले असलेल्या अन्नाची चव तुम्हाला आवडत नव्हती. शक्ती मिळावी म्हणून सकस अन्न खायला तुम्हाला शिकावे लागले. तसेच, देवाच्या दर्जांबद्दल आवड निर्माण करायला तुम्हाला वेळ लागेल. पण तुम्ही जर हे आध्यात्मिक अन्न खात राहिलात तर कालांतराने तुम्हाला ते आवडू लागेल आणि तुम्ही आध्यात्मिक अर्थाने मजबूत व्हाल. (स्तोत्र ३४:८; २ तीमथ्य ३:१५-१७) तुम्ही यहोवावर भरवसा ठेवायला शिकाल आणि ‘सदाचाराने वागण्यास’ प्रवृत्त व्हाल.—स्तोत्र ३७:३.
तुम्हाला कदाचित, ज्योडीसारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही. तरीपण, प्रत्येक दिवशी तुम्हाला लहान-मोठे नैतिक निर्णय घ्यावे लागतात. म्हणूनच बायबल तुम्हाला असे आर्जवते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) यहोवावर भरवसा करण्यास शिकल्याने तुम्हाला फक्त आताच फायदा होणार नाही तर तुम्हाला अनंत जीवनाची संधी मिळू शकेल कारण यहोवा देवाच्या आज्ञा पाळण्याचा मार्ग जीवनाकडे जातो.—मत्तय ७:१३, १४.
[तळटीप]
^ परि. 18 या आणि अशा इतर महत्त्वपूर्ण विषयांवर बायबलमधील व्यावहारिक सल्ला, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे व कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकांत मिळतो.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
लोकमतावर अदृश्य शक्तीचा प्रभाव असू शकतो
[५ पानांवरील चित्रे]
विचारवंतांनी शतकानुशतके, योग्य व अयोग्य या विषयावर बराच वाद घातला आहे
सॉक्रेटीस
कांट
कन्फ्यूशियस
[चित्राचे श्रेय]
कांट: From the book The Historian’s History of the World; सॉक्रेटीस: From the book A General History for Colleges and High Schools; कन्फ्यूशियस: Sung Kyun Kwan University, Seoul, Korea
[७ पानांवरील चित्रे]
बायबल आपल्याला फक्त योग्य व अयोग्य यांच्यातला फरक समजण्यास मदत करत नाही तर जे योग्य आहे ते करण्याची प्रेरणा देखील देते