व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे सेवक वृक्षासमान आहेत कोणत्या अर्थी?

देवाचे सेवक वृक्षासमान आहेत कोणत्या अर्थी?

देवाचे सेवक वृक्षासमान आहेत कोणत्या अर्थी?

बायबल तत्त्वांत रमणाऱ्‍या व त्यांना आपल्या जीवनात लागू करणाऱ्‍या व्यक्‍तीविषयी बोलताना स्तोत्रकर्त्याने म्हटले: “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:१-३) ही तुलना अगदी उचित का आहे?

वृक्षे अनेक वर्षे जगू शकतात. उदाहरणार्थ, भूमध्य क्षेत्रातील काही जैतुन वृक्षे एक ते दोन हजार वर्षांपूर्वीची आहेत, असे म्हटले जाते. तसेच, मध्य आफ्रिकातील बाओबाब वृक्षे अनेक वर्षे जगतात; तर कॅलिफोर्नियातील एक काटेरी पाईन वृक्ष ४,६०० वर्षांचे आहे असे मानले जाते. जंगलात, पूर्ण वाढलेली वृक्षे त्यांच्या सभोवतालच्या परिसरासाठी लाभदायक असतात. जसे की, उंच वृक्षांमुळे नव्याने वाढणाऱ्‍या झाडांना संरक्षक सावली मिळते शिवाय, उंच वृक्षांची पाने गळाल्यावर जमिनीला चांगले खत मिळते.

जगातील सर्वात उंच वृक्ष जंगलातच एकत्र वाढलेली दिसतात; प्रत्येक वृक्ष एकमेकाला आधार देतो. या वृक्षांची मुळे एकमेकांत गुंतलेली असल्यामुळे वादळ येते तेव्हा कुरणात एकट्याच उभ्या असलेल्या वृक्षाच्या तुलनेत ही सर्व वृक्षे मिळून वादळाचा सामना करू शकतात. एखाद्या वृक्षाच्या मोठमोठ्या मुळांमुळे त्या वृक्षाला मातीतून पुरेसे पाणी आणि पोषण प्राप्त करता येते. कधीकधी, एखाद्या वृक्षाची मुळे, वृक्षाची जितकी उंची आहे त्याच्या उंचीपेक्षाही खोल जाऊ शकतात किंवा वृक्षाचा जितका घेरा आहे त्याच्यापेक्षाही लांब पसरू शकतात.

प्रेषित पौलाने, ख्रिश्‍चनांनी “त्याच्यामध्ये [ख्रिस्तामध्ये] चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्‍वासात दृढ” झाले पाहिजे असे जेव्हा म्हटले तेव्हा कदाचित त्याने वृक्षाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला असावा. (कलस्सैकर २:६, ७) होय, ख्रिस्ती जर ख्रिस्तामध्ये पक्क्या रीतीने मुळावलेले असतील तरच ते विश्‍वासात ठाम राहू शकतात.—१ पेत्र २:२१.

आणखी इतर कोणत्या मार्गांनी देवाच्या सेवकांची तुलना वृक्षांशी करता येईल? एखाद्या वनराईतील वृक्षांना जवळपासच्या झाडांकडून आधार मिळतो तसेच ख्रिस्ती मंडळीत एकमेकांच्या निकट राहणाऱ्‍यांना सहविश्‍वासू बंधूभगिनींकडून आधार मिळतो. (गलतीकर ६:२) खोल व लांबवर पसरलेली आध्यात्मिक मुळे असलेले विश्‍वासू, प्रौढ ख्रिस्ती विश्‍वासात नव्यानेच आलेल्यांना मदत करतात, वादळासमान विरोधाच्या वेळी त्यांना आधार देतात. (रोमकर १:११, १२) नवे ख्रिस्ती देवाच्या अधिक अनुभवी सेवकांच्या संरक्षक “छायेत” बहरू शकतात. (रोमकर १५:१) आणि विश्‍वव्यापी ख्रिस्ती मंडळीचे सर्व सदस्य “धार्मिकतेचे वृक्ष” अर्थात अभिषिक्‍त शेष यांजकडून मिळणाऱ्‍या सकस आध्यात्मिक पोषणातून लाभ मिळवतात.—यशया ६१:३.

देवाच्या सर्व सेवकांना, “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल,” या यशया ६५:२२ मधील अभिवचनाची पूर्णता पाहण्याची आशा असणे खरोखरच किती आनंददायक आहे.

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Godo-Foto