व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक संभाषणे उभारणी करतात

आध्यात्मिक संभाषणे उभारणी करतात

आध्यात्मिक संभाषणे उभारणी करतात

“तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” इफिसकर ४:२९.

१, २. (अ) मानवी वाचाशक्‍ती इतकी मोलवान का आहे? (ब) यहोवाचे सेवक आपल्या जिव्हांचा कशाप्रकारे उपयोग करू इच्छितात?

“मानवी वाचा एक रहस्य आहे; देवाकडचे एक चमत्कारिक वरदान आहे,” असे शब्दकोषकार लुट्‌विक कोएलर यांनी म्हटले. कदाचित आपण या मोलवान देणगीची तितकी कदर करत नसू. (याकोब १:१७) पण पक्षाघाताचा झटका आल्यामुळे आपल्या एखाद्या जवळच्या माणसाची वाचाशक्‍ती जाते तेव्हा आपल्याला जाणीव होते की त्या व्यक्‍तीने किती मोलवान देणगी गमावली आहे. जोन नावाच्या एका स्त्रीच्या पतीला अलीकडेच पक्षाघाताचा झटका आला; त्या सांगतात, “आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो, सर्व सुखदुःखे एकमेकांना सांगायचो. त्या पूर्वीच्या गप्पागोष्टी मला खूप आठवतात.”

संभाषणांमुळे मैत्री अधिक पक्की होते, गैरसमज दूर करता येतात, निराश झालेल्यांना दिलासा देता येतो, विश्‍वासाला पुष्टी मिळू शकते आणि एकंदरीत जीवन अधिक सुखावह होऊ शकते; पण हे सारे आपोआप घडत नाही. सुज्ञ राजा शलमोन याने सांगितले: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) यहोवाचे सेवक या नात्याने आपली हीच इच्छा आहे की आपल्या संभाषणामुळे कोणाच्या भावना दुखावू नयेत, कोणाचे धैर्य खचू नये तर याउलट दुखावलेल्यांना सांत्वन आणि उभारी मिळावी. तसेच, आपण आपल्या वाचेचा उपयोग यहोवाची स्तुती करण्यासाठी करू इच्छितो, केवळ आपल्या जाहीर सेवाकार्यातच नव्हे तर आपल्या वैयक्‍तिक संभाषणांतही. स्तोत्रकर्त्याने एका भजनात म्हटले: “आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवितो, आणि तुझ्या नावाचे सर्व काळ उपकारस्मरण करितो.”—स्तोत्र ४४:८.

३, ४. (अ) आपण जे बोलतो त्या संदर्भात आपली सर्वांची सामान्य समस्या कोणती आहे? (ब) आपण काय बोलतो याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?

शिष्य याकोब अशी ताकीद देतो, “मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही.” तो आपल्याला आठवण करून देतो, की “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.” (याकोब ३:२,) आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. त्यामुळे आपले हेतू वाईट नसले तरीसुद्धा, आपली वाचा नेहमीच इतरांना उभारी देणारी किंवा जिच्यामुळे आपल्या निर्माणकर्त्याची स्तुती होईल अशी नसते. म्हणूनच, आपण काय बोलतो याकडे लक्ष देण्यास शिकले पाहिजे. शिवाय, येशूने म्हटले: “माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.” (मत्तय १२:३६, ३७) होय, खरा देव यहोवा आपल्या शब्दांकरता आपल्याला जबाबदार ठरवतो.

हानीकारक भाषण टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक संभाषणे करण्याची स्वतःला सवय लावून घेणे. आपण हे कशाप्रकारे करू शकतो, कोणकोणत्या विषयांवर आपण बोलू शकतो आणि उभारी देणाऱ्‍या संभाषणामुळे आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे या लेखात विचारात घेतले जाईल.

अंतःकरणाकडे लक्ष द्या

५. उभारी देणारी संभाषणे सुरू करण्यात अंतःकरणाची मुख्य भूमिका कोणत्या अर्थाने आहे?

इतरांना उभारी मिळेल अशाप्रकारचे संभाषण करण्याची सवय लावण्याकरता सर्वप्रथम आपण हे ओळखले पाहिजे की आपण जे बोलतो ते खरे तर, आपल्या अंतःकरणात काय आहे ते प्रकट करते. येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्तय १२:३४) दुसऱ्‍या शब्दांत, आपण अशाच विषयांवर बोलतो जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात. तेव्हा, आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘माझ्या संभाषणांतून माझ्या अंतःकरणाच्या स्थितीविषयी काय प्रकट होते? माझ्या कुटुंबियांसोबत अथवा सहविश्‍वासू बंधूभगिनींसोबत असताना माझी संभाषणे आध्यात्मिक विषयांवर असतात की ती सहसा खेळक्रीडा, कपडे, सिनेमा, खाणेपिणे, अलीकडे खरेदी केलेल्या वस्तू किंवा इतर क्षुल्लक विषयांवरच केंद्रित असतात?’ नकळत कदाचित आपले जीवन व विचार या दुय्यम गोष्टींवर केंद्रित झाले असतील. पण जीवनात खरोखर कशास प्राधान्य द्यावे याचा विचार करून आवश्‍यक फेरबदल केल्यास, आपली संभाषणे व जीवन देखील आपोआप सुधारेल.—फिलिप्पैकर १:१०.

६. मनन करण्याचा आपल्या संभाषणांशी कशाप्रकारे संबंध आहे?

आपल्या संभाषणांचा दर्जा सुधारण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उद्देशपूर्ण मनन. आध्यात्मिक विषयांवर विचार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयास केल्यास, आपण आपोआपच आध्यात्मिक विषयांवर बोलायला लागू. राजा दाविदाने या दोन गोष्टींमधला संबंध ओळखला होता. एका भजनात तो असे म्हणतो: “हे परमेश्‍वरा, . . . माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.” (स्तोत्र १९:१४) आणि स्तोत्रकर्ता आसाफ याने म्हटले: “मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” (स्तोत्र ७७:१२) देवाच्या वचनाविषयी मनःपूर्वक विचार करणारे अंतःकरण व मन आपोआपच प्रशंसास्पद संभाषण करण्यास स्फुरेल. यहोवाने शिकवलेल्या गोष्टी बोलल्याशिवाय यिर्मयाला राहावले नाही. (यिर्मया २०:९) आपण नियमितपणे आध्यात्मिक गोष्टींवर मनन केल्यास आपल्या बाबतीतही हेच घडेल.—१ तीमथ्य ४:१५.

७, ८. उभारी देणाऱ्‍या संभाषणांकरता कोणते विषय उपयुक्‍त आहेत?

एक उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम असल्यास उभारी देणारी संभाषणे सुरू करण्यास आपल्याला असंख्य विषय सापडतील. (फिलिप्पैकर ३:१६) संमेलने, अधिवेशने, मंडळीच्या सभा, चालू प्रकाशने, दैनंदिन वचन आणि त्यातील छापील विवेचने या सर्वांतून आपल्याला अशी अनेक आध्यात्मिक रत्ने आढळतात ज्यांविषयी आपण इतरांशी बोलू शकतो. (मत्तय १३:५२) शिवाय, आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यातील अनुभव देखील किती स्फुर्तीदायक ठरतील!

राजा शलमोन हा इस्राएलातील असंख्य वृक्षे, प्राणी, पक्षी आणि मत्स्य यांचा प्रशंसक होता. (१ राजे ४:३३) देवाच्या या निर्मितीकृत्यांविषयी बोलण्यास त्याला अत्यंत आनंद वाटत असे. आपणही त्याचे अनुकरण करू शकतो. यहोवाच्या सेवकांना विविध विषयांवर बोलण्यास आनंद वाटतो, पण आध्यात्मिक मनोवृत्तीच्या लोकांच्या संभाषणांत आध्यात्मिक विषय हमखास असतात.—१ करिंथकर २:१३.

“अशाच गोष्टींचे मनन करीत राहा”

९. पौल फिलिप्पैकरांना कोणता आदेश देतो?

विषय कोणतेही असले तरीसुद्धा, आपल्या संभाषणांतून इतरांना उभारी मिळण्याकरता आपली संभाषणे फिलिप्पै मंडळीला प्रेषित पौलाने दिलेल्या आदेशाच्या सामंजस्यात असली पाहिजेत. त्याने लिहिले: “ज्या सत्य, ज्या गंभीर, ज्या न्याय्य, ज्या शुद्ध, ज्या प्रशंसनीय, ज्या श्रवणीय, जो सद्‌गुण, जी स्तुति, अशाच गोष्टींचे मनन करीत राहा.” (फिलिप्पैकर ४:८, NW) पौलाने उल्लेख केलेले विषय इतके महत्त्वाचे आहेत की तो म्हणतो, “या गोष्टींचे मनन करीत राहा.” आपण आपली मने व अंतःकरणे या गोष्टींनी भरली पाहिजेत. तर मग पौलाने उल्लेखलेल्या या आठ गोष्टींकडे लक्ष दिल्याने आपली संभाषणे कशाप्रकारे सुधारतील हे आता आपण पाहूया.

१०. आपल्या संभाषणांत ज्या सत्य आहेत अशा गोष्टींचा समावेश कसा करता येईल?

१० सत्य गोष्टी म्हणजे काय? केवळ ज्या गोष्टी अचूक आहेत व ज्या खोट्या नाहीत अशाच गोष्टींना सत्य म्हणता येईल असे नाही. तर ज्या सात्विक व भरवशालायक आहेत अशा गोष्टींना ते सूचित करते, उदाहरणार्थ, देवाच्या वचनातील सत्य. त्याअर्थी जेव्हा आपण इतरांशी आपल्या मनाला स्पर्शून गेलेल्या बायबल सत्यांविषयी, ज्यांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळाले अशा भाषणांविषयी किंवा ज्यामुळे आपल्याला मदत मिळाली अशा शास्त्रवचनीय मार्गदर्शनाविषयी बोलतो तेव्हा आपण ज्या सत्य आहेत त्या गोष्टींविषयी बोलत असतो. दुसरीकडे पाहता, “जिला चुकीने विद्या” असे नाव दिले गेले आहे तिचा, अर्थात ज्यात केवळ सत्यतेचा आभास आहे अशा ज्ञानाचा अव्हेर करतो. (१ तीमथ्य ६:२०) तसेच चहाडी अथवा ज्यांची सत्यता पटवता येत नाही असे अनुभव देखील आपण पसरवण्याचे टाळतो.

११. कोणत्या गंभीर गोष्टींचा आपल्या संभाषणात आपण समावेश करू शकतो?

११ गंभीर गोष्टी अशा विषयांस सूचित करतात जे आदरणीय आणि महत्त्वाचे आहेत, क्षुल्लक अथवा अर्थहीन नाहीत. याचा अर्थ आपण आपल्या ख्रिस्ती सेवाकार्याविषयी, ज्यात आपण जगत आहोत त्या शेवटल्या काळाविषयी आणि उत्तम आचरणाच्या आवश्‍यकतेविषयी बोलू शकतो. अशा गंभीर बाबींविषयी आपण बोलतो तेव्हा आपण आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याच्या, आपली सचोटी कायम राखण्याच्या आणि सुवार्तेचा प्रचार करत राहण्याच्या आपल्या निर्धाराला बळ देत असतो. सेवाकार्यातील रोचक अनुभव आणि आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे दाखवणाऱ्‍या चालू घडामोडी आपल्याला स्फुर्तीदायक संभाषणांकरता बरेच विषय उपलब्ध करून देतात.—प्रेषितांची कृत्ये १४:२७; २ तीमथ्य ३:१-५.

१२. ज्या गोष्टी न्याय्य व शुद्ध आहेत अशा गोष्टींविषयी मनन करण्याचा पौलाचा सल्ला लक्षात घेऊन आपण काय टाळले पाहिजे?

१२ न्याय्य म्हणजे जे देवाच्या नजरेत योग्य आहे—त्याच्या दर्जांनुरूप आहे. शुद्ध गोष्टी पवित्र आचारविचारांस सूचित करतात. चहाडी, विचकट विनोद, किंवा लैंगिक गोष्टींचे अप्रत्यक्ष उल्लेख कधीही आपल्या संभाषणांत येऊ नयेत. (इफिसकर ५:३; कलस्सैकर ३:८) कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत, गप्पागोष्टी जेव्हा अशा विषयांकडे वळू लागतात तेव्हा ख्रिस्ती तेथून निघून जाण्याद्वारे सुज्ञता दाखवतात.

१३. प्रशंसनीय व श्रवणीय गोष्टींवर केंद्रित असलेल्या संभाषणांची उदाहरणे द्या.

१३ प्रशंसनीय गोष्टींविषयी विचार करण्याची शिफारस करताना पौल अशा विषयांबद्दल बोलत आहे की जे सुखदायक किंवा प्रशंसास्पद आहेत, जे इतरांच्या मनात तिरस्कार, कटुता किंवा स्पर्धा निर्माण करण्याऐवजी प्रीती उत्पन्‍न करतात. श्रवणीय गोष्टी अशा गोष्टींना सूचित करतात ज्या चांगल्या कीर्तीच्या आहेत. चांगल्या कीर्तीच्या गोष्टींमध्ये विश्‍वासू बंधू भगिनींच्या जीवनकथांचा समावेश होऊ शकतो; या कथा टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकांत नियमितपणे प्रकाशित होतात. विश्‍वासाला पुष्टी देणारे हे लेख वाचल्यावर तुम्हाला काय वाटले हे इतरांना तुम्ही सांगू शकता का? तसेच, इतरांच्या आध्यात्मिक सफलतेविषयी ऐकणेही किती प्रोत्साहनदायक आहे! अशाप्रकारची संभाषणे मंडळीतील प्रीती व ऐक्याला बढावा देतील.

१४. (अ) सद्‌गुण प्रदर्शित करण्यात कशाचा समावेश आहे? (ब) संभाषणात स्तुतिपात्र गोष्टींचा आपण कशाप्रकारे समावेश करू शकतो?

१४ पौल यानंतर, “जो सद्‌गुण” याविषयी बोलतो. सद्‌गुण चांगुलपणाला किंवा नैतिक गुणवत्तेला सूचित करतो. आपण जे काही बोलतो ते शास्त्रवचनीय तत्त्वांना धरून आहे आणि जे काही न्याय्य, शुद्ध आणि सद्‌गुणी आहे त्यापासून ते विचलित होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्तुति हा शब्द “स्तुतिपात्र” गोष्टींस सूचित करतो. जर एखादे भाषण तुम्हाला आवडले किंवा मंडळीत कोणाचे चांगले उदाहरण तुम्हाला दिसून आले तर त्याविषयी बोला—त्या व्यक्‍तीशी आणि इतरांशीही. प्रेषित पौल अनेकदा आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या उत्तम गुणांची प्रशंसा करत असे. (रोमकर १६:१२; फिलिप्पैकर २:१९-२२; फिलेमोन ४-७) आणि, अर्थातच, आपल्या निर्माणकर्त्याची हस्तकृती तर निश्‍चितच स्तुतिपात्र आहे. त्याच्या निर्मितीत आपल्याला उभारणीकारक संभाषणांकरता असंख्य विषय सापडतील.—नीतिसूत्रे ६:६-८; २०:१२; २६:२.

उभारणीकारक संभाषण करा

१५. शास्त्रातील कोणत्या आज्ञेनुसार पालकांवर आपल्या मुलांसोबत अर्थपूर्ण संभाषण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे?

१५ अनुवाद ६:६, ७ म्हणते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” या आज्ञेनुसार, आईवडिलांना आपल्या मुलांसोबत अर्थपूर्ण, आध्यात्मिक विषयांवर संभाषण करण्यास स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

१६, १७. ख्रिस्ती पालक यहोवा व अब्राहाम यांच्या उदाहरणांवरून काय शिकू शकतात?

१६ आपण कल्पना करू शकतो की पृथ्वीवर येण्याआधी येशूने या विशिष्ट नेमणुकीसंबंधी आपल्या स्वर्गीय पित्यासोबत कितीदा सविस्तर चर्चा केली असेल. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, “मी काय सांगावे व काय बोलावे ह्‍याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.” (योहान १२:४९; अनुवाद १८:१८) पुराणपुरुष अब्राहाम यानेही आपला पुत्र इसहाक याच्यासोबत संभाषण करण्यात कित्येक तास खर्च केले असतील व यहोवाने त्यांना व त्यांच्या पूर्वजांना कशाप्रकारे आशीर्वादित केले यासंबंधी सांगितले असावे. अशाप्रकारच्या संभाषणांमुळे येशू आणि इसहाक या दोघांनाही नम्रपणे देवाच्या इच्छेला अधीन होण्यास मदत मिळाली असावी.—उत्पत्ति २२:७-९; मत्तय २६:३९.

१७ आपल्या मुलांनाही उभारणीकारक संभाषणांची गरज आहे. आईवडिलांनी आपल्या व्यस्त नित्यक्रमांत आपल्या मुलांशी बोलण्याकरता वेळ काढलाच पाहिजे. दिवसातून निदान एकदातरी जेवणाकरता सर्वांनी एकत्र येण्याची सवय तुम्ही लावू शकता का? असे केल्यास, जेवताना आणि त्यानंतर कुटुंबाच्या आध्यात्मिक आरोग्याला पोषक ठरतील अशा उभारणीकारक संभाषणांकरता संधी मिळू शकेल.

१८. आईवडील व मुलांमध्ये उत्तम सुसंवाद असणे किती फायदेकारक आहे हे दाखवणारा एक अनुभव सांगा.

१८ आलेखांद्रो विशीत असलेला एक पायनियर आहे. १४ वर्षांचा असताना त्याच्या मनात किती शंका होत्या हे त्याला आठवते. तो म्हणतो: “शाळा सोबत्यांच्या व शिक्षकांच्या प्रभावामुळे मला देवाच्या अस्तित्वाविषयी आणि बायबलच्या विश्‍वासार्हतेविषयी बऱ्‍याच शंका होत्या. माझ्या आईवडिलांनी माझ्यासोबत तर्कवाद करण्याकरता कित्येक तास खर्च केले. या संभाषणांमुळे मला जीवनाच्या त्या कठीण वळणावर केवळ माझ्या मनातल्या शंकांपासून मुक्‍त होण्यासाठीच नव्हे, तर जीवनात उत्तम निर्णय घेण्यासाठीही मदत मिळाली.” आणि आज काय स्थिती आहे? आलेखांद्रो सांगतो: “अजूनही मी माझ्या आईवडिलांसोबतच राहतो. पण आमच्या व्यस्त दिनक्रमामुळे माझ्या वडिलांशी एकांतात बोलण्याची संधी सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे दर आठवड्यात एकदा त्यांच्या कामाच्या ठिकाणी मी जातो आणि आम्ही एकत्र मिळून जेवतो. त्यांच्यासोबतची ही संभाषणे मला अत्यंत महत्त्वाची वाटतात.”

१९. आपल्या सर्वांना आध्यात्मिक संभाषणांची का गरज आहे?

१९ आपल्या सहविश्‍वासू बांधवांसोबत आध्यात्मिक संभाषणे करण्याच्या संधींचीही आपण कदर करत नाही का? सभांमध्ये, क्षेत्र सेवाकार्यात, सामाजिक प्रसंगी किंवा एकत्र प्रवास करत असताना आपल्याला अशा संधी मिळू शकतात. रोममधील ख्रिस्ती बांधवांना भेटण्यास व त्यांच्याशी बोलण्यास पौल उत्सुक होता. त्याने त्यांना लिहिले, “तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्‍यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्‍निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोमकर १:११, १२) योहानस नावाच्या एका ख्रिस्ती वडिलांनी म्हटले: “सहविश्‍वासू ख्रिस्ती बाधंवांशी आध्यात्मिक संभाषण करणे ही एक अत्यावश्‍यक गरज आहे. ही संभाषणे हृदयास आनंद देतात आणि दैनंदिन तणाव सुसह्‍य करतात. मी सहसा वयस्क बांधवांना त्यांच्या जीवनातील अनुभवांविषयी व त्यांना विश्‍वासू राहण्यास कशामुळे मदत मिळाली आहे याविषयी विचारतो. आजवर मी अशा अनेक बांधवांशी हितगुज केले आहे आणि प्रत्येकाकडून ऐकलेले ज्ञानाचे बोल माझ्या जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवण्यास कारणीभूत ठरले आहेत.”

२०. एखादी व्यक्‍ती लाजाळू असल्यास काय करावे?

२० आध्यात्मिक विषयावर संभाषण सुरू करण्याचा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा समोरच्या व्यक्‍तीने चांगला प्रतिसाद न दिल्यास काय करावे? असे झाले तरीसुद्धा, प्रयत्न करण्याचे सोडू नका. पुढे कधीतरी चांगली संधी पाहून पुन्हा प्रयत्न करा. शलमोनाने लिहिले: “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” (नीतिसूत्रे २५:११) काहीजण स्वभावाने लाजाळू असतात, तेव्हा समजूतदारपणा दाखवा. “मनुष्याच्या मनांतील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो.” * (नीतिसूत्रे २०:५) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतरांच्या विपरीत मनोवृत्तीमुळे तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेलेल्या गोष्टी व्यक्‍त करण्याचे सोडू नका.

आध्यात्मिक संभाषणे हितकारक ठरतात

२१, २२. आध्यात्मिक संभाषणांमुळे कोणते फायदे होतात?

२१ “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९; रोमकर १०:१०) संभाषणांना योग्य दिशा देणे सोपे नाही, पण असे केल्यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. आध्यात्मिक संभाषणे आपल्याला आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यास आणि आपल्या बांधवांची उन्‍नती घडवून आणण्यास मदत करतात.

२२ तर मग, आपण आपली वाचाशक्‍ती अशारितीने उपयोगात आणू या की ज्यामुळे इतरांना उभारी मिळेल आणि देवाची स्तुती होईल. अशा संभाषणांमुळे आपल्याला समाधान मिळेल आणि इतरांनाही प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे यहोवाचे हृदय आनंदित होईल कारण तो आपल्या संभाषणांकडे लक्ष देतो आणि जेव्हा आपण आपल्या जिव्हांचा योग्य रितीने उपयोग करतो तेव्हा त्याचे मन आनंदित होते. (स्तोत्र १३९:४; नीतिसूत्रे २७:११) आपली संभाषणे आध्यात्मिक असतात तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा आपल्याला विसरणार नाही. आपल्या काळात यहोवाची सेवा करणाऱ्‍यांच्या संदर्भात बायबल म्हणते: “तेव्हा परमेश्‍वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्‍वराने कान देऊन ऐकले, व परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६; ४:५) आपली संभाषणे आध्यात्मिकरित्या उन्‍नतीकारक असावीत हे खरोखर किती महत्त्वाचे आहे!

[तळटीपा]

^ परि. 20 इस्राएलात काही विहिरी अतिशय खोल होत्या. गिबोन प्रदेशात पुरातत्त्ववेत्त्यांना जवळजवळ ८० फूट खोल असलेले एक मोठे सरोवर सापडले आहे. त्यात एक नागमोडी जिना देखील आहे ज्याच्या मदतीने लोक खालपर्यंत जाऊन पाणी काढू शकत होते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपली संभाषणे आपल्याविषयी काय प्रकट करतात?

• कोणत्या उभारणीकारक गोष्टींचा आपण आपल्या संभाषणांत समावेश करू शकतो?

• कौटुंबिक वर्तुळात आणि ख्रिस्ती मंडळीत, आपली संभाषणे कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात?

• उभारणीकारक संभाषणांमुळे कोणते फायदे होतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्रे]

उभारी देणारी संभाषणे. . .

“ज्या सत्य”

“ज्या गंभीर”

“ज्या प्रशंसनीय”

“ज्या श्रवणीय” अशाच गोष्टींवर केंद्रित असतात

[चित्राचे श्रेय]

Video cover, Stalin: U.S. Army photo; Creator book cover, Eagle Nebula: J. Hester and P. Scowen (AZ State Univ.), NASA

[१३ पानांवरील चित्र]

जेवणाची वेळ आध्यात्मिक संभाषणे करण्याची उत्तम वेळ आहे