संकटसमयी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा
संकटसमयी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा
“देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.”—स्तोत्र ४६:१.
१, २. (अ) देवावर आपला भरवसा आहे असा केवळ दावा करणे पुरेसे नाही हे कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होते? (ब) यहोवावर आपला भरवसा आहे असे केवळ म्हणण्यापेक्षा अधिक करण्याची का गरज आहे?
आपण देवावर भरवसा ठेवतो असा दावा करणे सोपे आहे. परंतु आपल्या कार्यांद्वारे ते दाखवणे तितके सोपे नाही. उदाहरणार्थ, “देवावर आमचा भरवसा आहे” हे वाक्य अमेरिकेच्या नोटांवर आणि नाण्यांवर कित्येक वर्षांपासून आहे. * १९५६ साली, यु.एस. काँग्रेसने, ते वाक्य अमेरिकेचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे असे जाहीर करणारा एक कायदा काढला. पण याउलट, पुष्कळ लोकांनी—केवळ त्याच देशात नव्हे तर जगभरात—देवावर भरवसा ठेवण्याऐवजी पैशावर व भौतिक संपत्तीवर अधिक भरवसा ठेवला आहे.—लूक १२:१६-२१.
२ खरे ख्रिस्ती या नात्याने, यहोवावर आपला भरवसा आहे असे केवळ म्हणणे आपल्यासाठी पुरेसे नाही. जसे “शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे” तसेच यहोवावर आपला भरवसा आहे असा कोणताही दावा कार्यांविना अर्थहीन आहे. (याकोब २:२६) आधीच्या लेखात, आपण पाहिले की, आपण यहोवाला प्रार्थना करतो, त्याच्या वचनातून मार्गदर्शन आणि त्याच्या संघटनेकडून निर्देशन मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण यहोवावर आपला भरवसा असल्याचे दाखवतो. संकटकाळी ही तीन पावले आपण कशाप्रकारे उचलू शकतो ते आता आपण पाहू या.
नोकरी सुटते किंवा पगार कमी असतो तेव्हा
३. या ‘कठीण दिवसात’ यहोवाच्या सेवकांना कोणत्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि देव आपल्याला मदत करू इच्छितो हे आपल्याला कसे ठाऊक आहे?
३ या ‘कठीण दिवसांमध्ये’ आम्हा ख्रिश्चनांसमोर इतर लोकांप्रमाणेच आर्थिक अडचणी येतात. (२ तीमथ्य ३:१) त्यामुळे, कदाचित आपली नोकरी अचानक सुटेल. किंवा नाइलाजास्तव कमी पगारात आपल्याला जास्त तास काम करावे लागेल. अशा परिस्थितींमध्ये, “आपल्या घरच्यांची तरतूद” करणे आपल्याकरता कठीण असेल. (१ तीमथ्य ५:८) अशा वेळी सर्वश्रेष्ठ देव आपली मदत करू इच्छितो का? जरूर करू इच्छितो! अर्थात, या व्यवस्थीकरणात आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणीत यहोवा आपल्याला सुरक्षा देत नाही. परंतु, त्याच्यावर आपला भरवसा असल्यास स्तोत्र ४६:१ मधील शब्द आपल्याबाबतीत खरे ठरतील: “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” परंतु, आर्थिक अडचणीत असताना यहोवावर आपला पूर्ण भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
४. आपल्यासमोर आर्थिक अडचणी येतात तेव्हा आपण कशासाठी प्रार्थना करावी आणि यहोवा अशा प्रार्थनांना उत्तर कसे देतो?
४ यहोवावरील आपला भरवसा दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याच्याजवळ प्रार्थना करणे. पण प्रार्थना कशासाठी? आर्थिक समस्येत असताना आपल्याला व्यावहारिक बुद्धीची सर्वात अधिक गरज असेल. असे असल्यास, त्याकरता प्रार्थना करा! यहोवाचे वचन अशी खात्री देते की, “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) होय, यहोवाजवळ बुद्धी—ज्ञान, समज आणि सूक्ष्मदृष्टी यांचा सदुपयोग करण्याची क्षमता—मागा जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि योग्य निवडी करू शकाल. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता आपल्याला ही शाश्वती देतो की, तो आपल्या या प्रार्थना ऐकेल. आपल्या संपूर्ण अंतःकरणाने जे त्यावर भरवसा ठेवतात त्यांचे मार्ग सरळ करण्यास तो सदोदित तयार असतो.—स्तोत्र ६५:२; नीतिसूत्रे ३:५, ६.
५, ६. (अ) आर्थिक दबावांचा सामना करतेवेळी आपण देवाच्या वचनातून मदत का प्राप्त करू शकतो? (ब) आपली नोकरी सुटलेली असल्यास चिंता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?
५ देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करणे हा यहोवावरील आपला भरवसा दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. बायबलमध्ये आढळणारे त्याचे सुज्ञ निर्बंध “अति भरवशालायक” आहेत. (स्तोत्र ९३:५, NW) १,९०० वर्षांपूर्वीच्या या प्रेरित पुस्तकात भरवशालायक सल्ला आहे आणि सूक्ष्म ज्ञान आहे ज्याने आर्थिक दबावांचा सामना करण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. बायबलमधील बुद्धीची काही उदाहरणे पाहा.
६ सुज्ञ राजा शलमोनाने अनेक वर्षांआधी असे निरीक्षण केले: “कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.” (उपदेशक ५:१२) आपल्या भौतिक वस्तूंची दुरुस्ती करण्यास, त्या साफ ठेवण्यास, नीटनेटके ठेवण्यास व त्यांचा सांभाळ करण्यास वेळ आणि पैसा लागतो. आपली नोकरी सुटलेली असताना आपण आपल्या जीवनशैलीचे पुन्हा परीक्षण करू शकतो आणि आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यांच्यामध्ये फरक करण्याचा प्रयत्न करू शकतो. चिंता कमी करण्यासाठी काही बदल करणे सुज्ञपणाचे असेल. उदाहरणार्थ, आपले राहणीमान साधे ठेवणे शक्य आहे का, कदाचित एखाद्या लहान घरात राहायला जाणे किंवा अनावश्यक भौतिक वस्तू कमी करणे शक्य आहे का?—मत्तय ६:२२.
७, ८. (अ) अपरिपूर्ण मानवांना भौतिक गोष्टींविषयी अनावश्यक काळजी करण्याची प्रवृत्ती असते याची आपल्याला जाणीव आहे हे येशूने कसे दाखवले? (तळटीप देखील पाहा.) (ब) अनावश्यक चिंता कशी टाळायची याविषयी येशूने कोणता सुज्ञपणाचा सल्ला दिला?
७ डोंगरावरील प्रवचनात येशूने सल्ला दिला: “आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका.” * (मत्तय ६:२५) येशूला ठाऊक होते की, अपरिपूर्ण मानवांना मूलभूत गरजा पूर्ण करण्याची साहजिकच चिंता लागून असते. मग अशा गोष्टींविषयी ‘चिंता न करणे’ कसे शक्य आहे? येशूने म्हटले, “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळविण्यास झटा.” आपल्यासमोर कोणत्याही समस्या आल्या तरी आपण यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे. आपण असे केल्यास, आपला स्वर्गीय पिता याच्याद्वारे आपल्याला आपल्या सर्व दैनिक गरजा “मिळतील.” या किंवा त्या मार्गाने तो आपली सोय करील.—मत्तय ६:३३.
८ येशूने हा पुढील सल्ला दिला: “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:३४) उद्या काय घडू शकेल याविषयी अनावश्यक चिंता करणे उचित नाही. एका विद्वानाने म्हटले: “वास्तविक भविष्य सहसा आपल्या भीतीदायक कल्पनांइतके वाईट नसते.” आपल्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या बायबलमधील सल्ल्याचे नम्रतेने पालन केल्याने आणि एका वेळी एका दिवसाची काळजी केल्याने अनावश्यक चिंता टाळायला मदत होईल.—१ पेत्र ५:६, ७.
९. आर्थिक अडचणीत सापडलेले असताना ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ प्रकाशनांत आपल्याला कोणती मदत मिळू शकते?
९ आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो तेव्हा ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ दिलेल्या प्रकाशनांतून मदत घेतल्यानेही आपण यहोवावरील आपला भरवसा दाखवू शकतो. (मत्तय २४:४५) वेळोवेळी, सावध राहा! नियतकालिकात आर्थिक अडचणींचा सामना करण्याविषयी उपयुक्त सल्ले देणारे काही लेख प्रकाशित झाले आहेत. ऑगस्ट ८, १९९१ (इंग्रजी) अंकातील “नोकरी नाही—यावर काय उपाय?” या लेखात व्यावहारिक असलेली आठ मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत ज्यांमुळे अनेकांना बेकार असताना आर्थिक आणि भावनिक स्थैर्य राखायला मदत मिळाली आहे. * अर्थात, ही मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेताना पैशाच्या खऱ्या महत्त्वाविषयी योग्य दृष्टिकोन राखला पाहिजे. याची चर्चा, त्याच अंकात प्रकाशित झालेल्या “पैशांहून अधिक महत्त्वाचे” या लेखात करण्यात आली होती.—उपदेशक ७:१२.
आरोग्य समस्यांनी पीडित असताना
१०. राजा दावीदाचे उदाहरण कसे दाखवून देते की, गंभीर आजारपण असतानाही यहोवावर भरवसा ठेवणे वास्तविकपणाचे आहे?
१० गंभीर आजार झालेला असतानाही यहोवावर भरवसा ठेवणे वास्तविकपणाचे आहे का? निश्चितच! यहोवाला आपल्या लोकांमधील आजारी जणांबद्दल कळवळा वाटतो. शिवाय, तो मदत करायला तयार आहे. उदाहरणार्थ, राजा दावीद पाहा. धार्मिक असलेल्या आजारी व्यक्तीसोबत यहोवा कसा व्यवहार करतो याविषयी त्याने लिहिले तेव्हा तो स्वतः गंभीररित्या आजारी असावा. तो म्हणाला: “तो [दीन मनुष्य] रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला संभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलितोस.” (स्तोत्र ४१:१, ३, ७, ८) दावीदाचा देवावर भरवसा कायम राहिला आणि शेवटी हा राजा आपल्या आजारपणातून बरा झाला. परंतु, आरोग्य समस्यांनी आपण पीडित असतो तेव्हा आपण देवावर भरवसा कसा दाखवू शकतो?
११. आजारपणाने पीडित असताना आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपण काय मागू शकतो?
११ आजाराने पीडित असताना यहोवावर आपला भरवसा आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे सहन करण्यासाठी प्रार्थनेद्वारे मदत मागणे. आपण त्याच्याजवळ ‘चातुर्याने’ कार्य करण्यासाठी मदत मागू शकतो जेणेकरून आपण आपल्या परिस्थितीनुसार थोडेफार आरोग्य प्राप्त करू शकू. (नीतिसूत्रे ३:२१) त्याचप्रमाणे आपल्या आजारपणाचा सामना करण्यासाठी सहनशीलता आणि धीर दाखवण्यासाठी आपली मदत करण्यासही आपण विनंती करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याला तग धरून राहायला मदत करण्यास आपण यहोवाला विनंती करू शकतो ज्यामुळे काहीही झाले तरी त्याला विश्वासू राहण्यास व आपला समतोल गमावू न देण्यास आपल्याला शक्ती मिळेल. (फिलिप्पैकर ४:१३) आपले सध्याचे जीवन टिकवण्यापेक्षाही देवाला विश्वासू राहणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपण आपली सचोटी राखली तर आपला महान प्रतिफळ देणारा आपल्याला सर्वकाळापर्यंत परिपूर्ण जीवन आणि आरोग्य देईल.—इब्री लोकांस ११:६.
१२. वैद्यकीय उपचार घेण्यासंबंधी कोणती शास्त्रवचनीय तत्त्वे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात?
१२ यहोवावर भरवसा असल्याने त्याचे वचन अर्थात बायबलमधून व्यावहारिक मार्गदर्शन मिळवण्यास आपल्याला प्रेरणा मिळते. शास्त्रवचनांमध्ये सापडणारी तत्त्वे आपल्याला वैद्यकीय उपचारांबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, ‘चेटूक’ करणे बायबलनुसार चुकीचे असल्याचे माहीत असल्यामुळे आपण जादूटोण्याने केलेली कोणतीही तपासणी किंवा उपचार करणार नाही. (गलतीकर ५:१९-२१; अनुवाद १८:१०-१२) बायबलमधील भरवशालायक बुद्धीचे आणखी एक उदाहरण पुढीलप्रमाणे आहे: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतिसूत्रे १४:१५) यास्तव, वैद्यकीय उपचार घेताना “प्रत्येक शब्दावर विश्वास” ठेवण्याऐवजी विश्वसनीय माहिती मिळवण्यात सुज्ञता आहे. अशाप्रकारे “सुबुद्धीने” वागल्याने वेगवेगळ्या पर्यायांचा नीट विचार करून योग्य निर्णय घेण्यास आपली मदत होते.—तीत २:१२.
१३, १४. (अ) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये आरोग्याविषयी कोणते माहितीपूर्ण लेख छापले गेले आहेत? (पृष्ठ १७ वरील पेटी पाहा.) (ब) जानेवारी २२, २००१ च्या सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकात जुनाट आजारांविषयी कोणता सल्ला देण्यात आला होता?
१३ विश्वासू दासाच्या प्रकाशनांचा शोध करूनही आपण यहोवावर आपला भरवसा प्रदर्शित करू शकतो. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये, अधूनमधून विविध आरोग्य समस्यांबद्दल व रोगांबद्दल माहितीपूर्ण लेख छापून आले आहेत. * काही वेळा, विविध विकार, दुखणी आणि दुर्बलतांचा यशस्वीरित्या सामना केलेल्या व्यक्तींच्या जीवन कथा या नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. शिवाय, काही लेखांमध्ये जुनाट आजारांचा सामना करण्यासंबंधी शास्त्रवचनीय सल्ले त्याचप्रमाणे व्यावहारिक उपदेश देण्यात आले आहेत.
१४ उदाहरणार्थ, सावध राहा! (इंग्रजी), जानेवारी २२, २००१ अंकात “आजारी असलेल्यांना सांत्वन” ही मुख्य लेखमाला सादर करण्यात आली होती. त्या लेखांमध्ये, उपयुक्त बायबल तत्त्वे त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून आजाराने पीडित असलेल्या माहितगार व्यक्तींच्या मुलाखतींमधून निवडलेली प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती. “तुमच्या आजाराचा यशस्वीरित्या सामना करणे—कशाप्रकारे?” या लेखात पुढील सल्ला देण्यात आला होता: आपल्या आजाराविषयी होता होईल तितके जाणून घ्यायचा प्रयत्न करा. (नीतिसूत्रे २४:५) व्यवहारिक ध्येये राखा त्याचप्रमाणे इतरांना मदत करण्याचीही ध्येये राखा, परंतु एक लक्षात असू द्या की, इतरजण जे करू शकतील ते कदाचित तुम्ही करू शकणार नाही. (प्रेषितांची कृत्ये २०:३५; गलतीकर ६:४) लोकांपासून दूर राहण्याचे टाळा. (नीतिसूत्रे १८:१) इतरजण तुम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांच्याकरता सुखावह ठरेल असे वागा. (नीतिसूत्रे १७:२२) पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाशी आणि मंडळीशी जवळचा नातेसंबंध ठेवा. (नहूम १:७; रोमकर १:११, १२) आपल्या संघटनेद्वारे यहोवा जे भरवशालायक मार्गदर्शन पुरवतो त्याबद्दल आपण कृतज्ञ नाही का?
देहस्वभावातील दुर्बलता कायम असते तेव्हा
१५. अपरिपूर्ण देहाच्या दुर्बलतेविरुद्धच्या संघर्षात प्रेषित पौल कशाप्रकारे सफल होऊ शकला आणि आपण कोणती शाश्वती बाळगू शकतो?
१५ प्रेषित पौलाने लिहिले: “माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही.” (रोमकर ७:१८) पौलाला स्वतःच्या अनुभवाने हे ठाऊक होते की, अपरिपूर्ण देहाच्या वासनांविरुद्धचा आणि दुर्बलतांविरुद्धचा संघर्ष अत्यंत कडा असू शकतो. परंतु, आपण सफल होऊ असा आत्मविश्वास देखील पौलाला होता. (१ करिंथकर ९:२६, २७) तो कसा? यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिल्याने. म्हणूनच पौल म्हणू शकला: “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२४, २५) आपल्याबद्दल काय? आपल्याला देखील देहस्वभावातील दुर्बलतांविरुद्ध संघर्ष करावा लागतो. अशा दुर्बलतांविरुद्ध संघर्ष करत असताना आत्मविश्वास गमावणे आणि आपण कधीच यशस्वी ठरणार नाही अशी खात्री वाटणे सोपे आहे. परंतु, पौलाप्रमाणे आपण केवळ आपल्या शक्तीवर नव्हे तर यहोवावर विसंबून राहिल्यास तो आपली मदत करेल.
१६. देहस्वभावातील दुर्बलता कायम राहते तेव्हा आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्या दुर्बलतेच्या पुन्हा आहारी गेल्यास आपण काय करावे?
१६ देहस्वभावातील एखादी दुर्बलता कायम राहते तेव्हा यहोवाला सतत विनवणी करण्याद्वारे आपला त्याच्यावर भरवसा आहे हे आपण दाखवतो. यहोवाच्या पवित्र आत्म्याकरता आपल्याला विनंती, नव्हे, काकुळतीने याचना करण्याची गरज आहे. (लूक ११:९-१३) आपण आत्म-संयमासाठी खास प्रार्थना करू शकतो जे देवाच्या आत्म्याचे फळ आहे. (गलतीकर ५:२२, २३) परंतु आपण पुन्हा त्या दुर्बलतेच्या आहारी जातो तेव्हा काय? तरीही आपण हार मानू नये. आपल्या दयाळु देवाकडे नम्रतेने प्रार्थना करण्याचे व त्याची क्षमा आणि मदत मागण्याचे आपण कधीही थांबवू नये. दोषी विवेकामुळे “भग्न व अनुतप्त” असलेल्या हृदयाला यहोवा कधीही झिडकारणार नाही किंवा त्यांपासून कधी दूर जाणार नाही. (स्तोत्र ५१:१७) आपण प्रामाणिक, पश्चात्तापी हृदयाने यहोवाकडे विनंती केल्यास तो आपल्याला परीक्षांचा प्रतिकार करण्यास मदत करेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
१७. (अ) आपण तोंड देत असलेल्या विशिष्ट दुर्बलतेविषयी यहोवाला काय वाटते याचा विचार करणे फायद्याचे का आहे? (ब) तापट स्वभावावर नियंत्रण ठेवण्याचा, तोंडावर ताबा ठेवण्याचा आणि अहितकर मनोरंजनाची इच्छा टाळण्याचा प्रयत्न करत असताना आपण कोणती शास्त्रवचने लक्षात ठेवू?
१७ आपण मदतीसाठी त्याच्या वचनाचा शोध करूनही यहोवावर आपला भरवसा आहे हे दाखवू शकतो. एखाद्या बायबल कॉन्कॉर्डन्सचा किंवा वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्सचा उपयोग करून, ‘मी ज्या दुर्बलतेवर मात मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्याविषयी यहोवाला कसे वाटते?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. याविषयी यहोवाला काय वाटते याचा विचार केल्याने त्याला संतुष्ट करण्याची आपली इच्छा आणखी बळकट होऊ शकते. अशाप्रकारे, आपण त्याच्यासारखा विचार करू लागू, त्याला घृणा असलेल्या गोष्टींची घृणा करू लागू. (स्तोत्र ९७:१०) काहींनी त्यांच्या विशिष्ट दुर्बलतेला लागू होणारी बायबलची वचने पाठ करून ठेवली आहेत आणि याचा त्यांना फायदा झाल्याचे आढळले आहे. तापट स्वभावावर नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत का? मग आपण नीतिसूत्रे १४:१७ आणि इफिसकर ४:३१ सारखी वचने पाठ करू शकतो. आपल्या तोंडावर ताबा ठेवणे आपल्याला कठीण जात आहे का? तर मग आपण नीतिसूत्रे १२:१८ आणि इफिसकर ४:२९ सारखी वचने पाठ करू शकतो. अहितकर मनोरंजनाकडे आपला कल असतो का? आपण इफिसकर ५:३ आणि कलस्सैकर ३:५ सारखी वचने पाठ करण्याचा प्रयत्न करू शकतो.
१८. आपल्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी वडिलांची मदत मागायला आपण का लाजू नये?
१८ मंडळीत आत्म्याने नियुक्त केलेल्या वडिलांकडून मदत मिळवणे हा यहोवावर विश्वास प्रदर्शित करण्याचा आणखी एक मार्ग आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) कारण या ‘मानवरूपी देणग्या’ म्हणजे यहोवाने आपल्या मेंढरांना सुरक्षित ठेवण्याकरता आणि त्याच्या मेंढरांची काळजी घेण्याकरता ख्रिस्ताद्वारे केलेली तरतूद आहेत. (इफिसकर ४:७, ८, ११-१४, NW) हे खरे की, एखाद्या दुर्बलतेचा सामना करताना मदत मागणे इतके सोपे नसेल. आपल्याला लाजल्यासारखे वाटू शकते आणि वडील आपल्याबद्दल काय विचार करतील अशी भीती वाटू शकते. परंतु, आपण मदत मागण्याचे धैर्य केल्याबद्दल हे आध्यात्मिकरित्या प्रौढ असलेले पुरुष निश्चितच आपला आदर करतील. शिवाय, वडीलजन कळपाशी व्यवहार करताना यहोवाचे गुण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. देवाच्या वचनातील त्यांचा सांत्वनदायी, व्यावहारिक सल्ला आपल्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी आपला निश्चय पक्का करण्यास पुरेसा असेल.—याकोब ५:१४-१६.
१९. (अ) या व्यवस्थीकरणातील जीवनाच्या व्यर्थतेचा उपयोग सैतान कशाप्रकारे करण्याचा प्रयत्न करतो? (ब) भरवशात काय सामील आहे आणि आपला पक्का निर्धार काय असावा?
१९ सैतानाला त्याचा वेळ फार कमी असल्याचे ठाऊक आहे हे कधीही विसरू नका. (प्रकटीकरण १२:१२) या जगातील जीवनाच्या व्यर्थतेमुळे आपण निराश व्हावे आणि हार मानावी अशी त्याची इच्छा आहे. रोमकर ८:३५-३९ येथील शब्दांवर आपला पूर्ण भरवसा असो. तेथे म्हटले आहे: “ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? . . . उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.” यहोवावरील भरवशाचे हे किती जबरदस्त विधान आहे. परंतु हा भरवसा केवळ एक भावना नाही. तर आपल्या दैनंदिन जीवनात जे जाणीवपूर्वक निर्णय आपण घेतो त्यांचा या भरवशात समावेश होतो. तर मग, आपण संकटकाळी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्याचा पक्का निर्धार करू या.
[तळटीपा]
^ परि. 1 यु.एस. टांकसाळ याला, नोव्हेंबर २०, १८६१ तारखेला पाठवलेल्या पत्रात, खजिना खात्याचे सचिव, सामन पी. चेस यांनी लिहिले: “कोणतेही राष्ट्र देवाच्या शक्तीविना शक्तिशाली असू शकत नाही, किंवा त्याच्या संरक्षणाविना सुरक्षित असू शकत नाही. देवावर आपल्या लोकांचा भरवसा आहे हे आपल्या राष्ट्राच्या नाण्यांवर घोषित करायला हवे.” परिणामस्वरूप, “देवावर आमचा भरवसा आहे” हे ब्रीदवाक्य १८६४ सालाच्या एका अमेरिकन नाण्यावर प्रथम आढळले.
^ परि. 7 येथे ज्या चिंतेविषयी सांगितले आहे ती “काळजीने वाटणारी भीती आहे, जिच्यामुळे जीवनातला सगळा आनंद नाहीसा होतो.” काही भाषांतरांमध्ये, “चिंता करीत बसू नका” किंवा “काळजी करू नका” असे म्हटले आहे; त्यांचा असा अर्थ होतो की, आपण चिंता किंवा काळजी करायला सुरवात करू नये. एका संदर्भात असे म्हटले आहे: “ग्रीक क्रियापदाचा काळ, वर्तमान आज्ञावाचक आहे ज्यावरून चालू असलेली एखादी क्रिया थांबवण्याचा आदेश सूचित होतो.”
^ परि. 9 ते आठ मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत: (१) गोंधळून जाऊ नका; (२) सकारात्मक विचार करा; (३) वेगळ्या पद्धतीच्या कामांबद्दल विचार करा; (४) इतरांचे नव्हे तर आपले अंथरूण पाहून पाय पसरा; (५) उधारीने वस्तू विकत घेण्याबाबतीत सावध असा; (६) कुटुंबातले ऐक्य टिकवून ठेवा; (७) आपला आत्म-सन्मान कायम ठेवा; आणि (८) बजेट तयार करा.
^ परि. 13 कोणता वैद्यकीय उपचार घ्यावा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे हे ओळखून ही बायबल-आधारित नियतकालिके कोणताही विशिष्ट उपचार घेण्यास उत्तेजन देत नाहीत. तर विशिष्ट आजारांवर किंवा विकारांवर चर्चा करणारे लेख वाचकांना वस्तुस्थितीची अद्ययावत माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली जातात.
तुम्हाला आठवते का?
• आर्थिक समस्यांचा सामना करत असताना यहोवावर आपला भरवसा असल्याचे आपण कसे प्रदर्शित करू शकतो?
• आरोग्य समस्यांनी पीडित असताना देवावर आपला भरवसा असल्याचे आपण कसे प्रदर्शित करू शकतो?
• देहस्वभावातील दुर्बलता असते तेव्हा यहोवावर आपण खरोखर विसंबून आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चौकट]
हे लेख तुम्हाला आठवतात का?
आपल्याला आरोग्य समस्या येतात तेव्हा ज्यांनी काही विकारांचा, आजारांचा किंवा दुर्बलतांचा यशस्वीरित्या सामना केला अशांचे अनुभव वाचणे उत्तेजनदायक ठरू शकते. पुढील काही लेख टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
नकारात्मक विचारसरणी आणि खिन्नतेचा सामना करण्यासंबंधी “माझ्या दुर्बलतांशी झुंजणे.”—टेहळणी बुरूज, (इंग्रजी) मे १, १९९०.
“लोखंडाचे फुफ्फुस देखील तिचे प्रचारकार्य थांबवू शकले नाही.”—सावध राहा!, (इंग्रजी) जानेवारी २२, १९९३.
पक्षाघातासंबंधी “एका गोळीने माझे जीवन बदलले.”—सावध राहा!, (इंग्रजी) ऑक्टोबर २२, १९९५.
भिन्न मनःस्थिती विकाराचा (बायपोलर डिसऑर्डर) सामना करण्यासंबंधी “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.”—टेहळणी बुरूज, डिसेंबर १, २०००.
मतिमंद स्थितीचा सामना करण्यासंबंधी “मूक दुनियेतून बाहेर येताना लॉइडा.”—सावध राहा!, (इंग्रजी) मे ८, २०००.
“एन्डोमेट्रियोसिसशी माझा संघर्ष.”—सावध राहा!, (इंग्रजी) जुलै २२, २०००.
“स्क्लेरोडर्माशी माझी झुंज.”—सावध राहा!, (इंग्रजी) ऑगस्ट ८, २००१.
“पोस्टपार्टम डिप्रेशनवर मी विजय मिळवला.”—सावध राहा!, (इंग्रजी) जुलै २२, २००२.
[१५ पानांवरील चित्र]
नोकरी सुटलेली असल्यास आपल्या जीवनशैलीचे पुन्हा परीक्षण करणे सुज्ञतेचे ठरेल
[१६ पानांवरील चित्र]
लॉइडाच्या कहाणीवरून यहोवावरील भरवशामुळे सहनशील राहायला मदत होते ते दिसून येते (पृष्ठ १७ वरील पेटी पाहा)
[१८ पानांवरील चित्र]
आपल्या दुर्बलतांवर मात करण्यासाठी मदत मागण्याची आपल्याला लाज वाटता कामा नये