आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण करा
आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण करा
“देवाजवळ पक्षपात नाही.”—रोमकर २:११.
१, २. (अ) सर्वसामान्यपणे कनानी लोकांसंबंधी यहोवाचा काय उद्देश होता? (ब) यहोवाने काय केले आणि यामुळे कोणते प्रश्न उपस्थित होतात?
इस्राएल लोकांनी सा.यु.पू. १४७३ साली मवाबाच्या मैदानात तळ ठोकला होता. मोशे बोलत असताना सबंध इस्राएल राष्ट्र लक्ष देऊन ऐकत होते. यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान होते. इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशातील सात शक्तिशाली कनानी देशांना पराजित करेल असा यहोवाचा संकल्प असल्याचे मोशेने घोषित केले. मोशेचे पुढील शब्द त्यांच्याकरता अत्यंत दिलासा देणारे होते: “तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करिशील”! इस्राएलांनी त्यांच्याशी कोणताही करार करू नये आणि ते दयामाया दाखवण्यास योग्य नव्हते असे त्यांना सांगण्यात आले होते.—अनुवाद १:१; ७:१, २.
२ पण, इस्राएलने हल्ला केलेल्या पहिल्या शहरातच यहोवाने एका कुटुंबाचा बचाव केला. आणखी चार शहरांच्या लोकांनाही देवाने संरक्षण दिले. असे त्याने का केले? या कनानी लोकांच्या बचावाशी संबंधित असलेल्या लक्षवेधक घटना आपल्याला यहोवाविषयी काय शिकवतात? आणि आपण त्याचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?
यहोवाची कीर्ती ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया
३, ४. इस्राएलच्या विजयगाथा ऐकून कनानच्या रहिवाशांवर कसा प्रभाव पडला?
३ प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याआधी इस्राएलने अरण्यात घालवलेल्या ४० वर्षांदरम्यान यहोवाने आपल्या लोकांचे संरक्षण केले व तो त्यांच्याकरता लढला. प्रतिज्ञात देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या अराद प्रदेशाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले. यहोवाच्या मदतीने इस्राएलने त्याचा व त्याच्या लोकांचा हर्मा येथे पराजय केला. (गणना २१:१-३) यानंतर इस्राएल लोकांनी अदोम देशाला वळसा घातला आणि उत्तरेकडची वाट धरून मृत समुद्राच्या ईशान्य प्रदेशात पोचले. पूर्वी मवाबी लोकांनी व्यापलेल्या या प्रदेशात आता अमोरी लोक राहात होते. अमोरी राजा सीहोन याने इस्राएल लोकांना आपल्या देशातून जाऊ देण्यास नकार दिला. आर्णोन खोऱ्याच्या उत्तरेकडे असलेल्या याहस येथे इस्राएल व राजा सीहोन यांच्यात लढाई झाली व त्यात सीहोन मारला गेला. (गणना २१:२३, २४; अनुवाद २:३०-३३) उत्तरेकडे आणखी पुढे गेल्यावर बाशान येथे राहणाऱ्या इतर अमोरी लोकांवर ओग राज्य करत होता. ओग अतिशय बलाढ्य असला तरीसुद्धा यहोवासमोर त्याचे काही चालले नाही. एद्रई येथे ओग मारला गेला. (गणना २१:३३-३५; अनुवाद ३:१-३, ११) या विजयगाथा तसेच ईजिप्तमधून इस्राएल लोक कशाप्रकारे बाहेर पडले याविषयीची माहिती कनानी लोकांना ऐकायला मिळाली तेव्हा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. *
४ यार्देन पार केल्यावर इस्राएलने पहिल्यांदा कनान देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी गिलगाल येथे तळ ठोकला. (यहोशवा ४:९-१९) काही अंतरावरच यरीहोचे तटबंदी शहर होते. रहाब या कनानी स्त्रीने यहोवाच्या कृत्यांविषयी जे ऐकले होते त्यामुळे तिला विश्वासाने कार्य करण्याची प्रेरणा प्राप्त झाली. परिणामस्वरूप, यहोवाने यरीहोचा नाश केला तेव्हा त्याने तिचा व तिच्या घराण्यातील लोकांचा बचाव केला.—यहोशवा २:१-१३; ६:१७, १८; याकोब २:२५.
५. गिबोनी लोकांनी एक युक्ती का योजली?
५ यानंतर इस्राएल लोक यार्देन नदीजवळील सखल प्रदेशांपासून देशाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराळ प्रदेशात चढत गेले. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार यहोशवाने आय शहराजवळ आपल्या सैन्याला दबा धरून बसवले. (यहोशवा, अध्याय ८) इस्राएलने आय शहरावर विजय मिळवल्याची बातमी ऐकल्यावर अनेक कनानी राजे इस्राएलविरुद्ध लढाई करण्यास एकत्र आले. (यहोशवा ९:१, २) पण जवळच्या गिबोन नामक हिव्वी शहराच्या रहिवाशांची मात्र वेगळी प्रतिक्रिया होती. यहोशवा ९:४ सांगते, की “तेव्हा आपल्यापरीने त्यांनीहि कपटाची युक्ति योजिली.” यहोवाने कशाप्रकारे इस्राएल लोकांना ईजिप्तमधून सोडवले होते, तसेच सीहोन व ओग यांचा कशाप्रकारे पराजय केला होता याविषयी राहाबप्रमाणे त्यांनी देखील ऐकले होते. (यहोशवा ९:६-१०) इस्राएल लोकांचा विरोध करण्यात अर्थ नाही हे गिबोनी लोकांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी गिबोनच्या व जवळपासच्या—कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम—या तीन शहरांच्या वतीने गिलगाल येथे यहोशवाकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवले. या लोकांनी यहोशवाला असे भासवले जणू ते दूर देशाहून आले होते. त्यांची युक्ती यशस्वी ठरली. यहोशवाने त्यांच्यासोबत एक करार केला आणि त्यांचे संरक्षण करण्याची हमी दिली. तीन दिवसांनंतर यहोशवा व इस्राएल लोकांना कळले की आपली फसवणूक करण्यात आली आहे. पण त्यांनी यहोवाची शपथ घेऊन करार केला होता त्यामुळे ते आपल्या शब्दाला जागले. (यहोशवा ९:१६-१९) यहोवाने याला संमती दिली का?
६. यहोशवाने गिबोनी लोकांशी केलेल्या कराराप्रती यहोवाची काय प्रतिक्रिया होती?
६ गिबोनी लोकांना इस्राएल लोकांसाठी, इतकेच नव्हे तर ‘यहोवाच्या वेदीसाठी’ लाकूडतोड्ये व पाणक्ये म्हणून सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. (यहोशवा ९:२१-२७) शिवाय, पाच अमोरी राजे व त्यांचे सैन्य गिबोनी लोकांविरुद्ध उठले तेव्हा यहोवाने आश्चर्यकारक रितीने हस्तक्षेप केला. यहोशवाच्या सैनिकांनी जितक्यांना मारले त्यापेक्षा अधिक शत्रू गारांच्या वर्षावामुळे ठार झाले. शत्रूंना पूर्णपणे पराजित करता यावे म्हणून यहोशवाने सूर्य व चंद्र काही काळ स्थिर राहावे अशी यहोवाला विनंती केली, ती देखील यहोवाने ऐकली. यहोशवाने म्हटले: “असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरहि आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.”—यहोशवा १०:१-१४.
७. पेत्राने कबूल केलेल्या कोणत्या सत्याची कनानी लोकांच्या बाबतीत प्रचिती आली?
७ कनानवासी राहाबने व तिच्या कुटुंबाने तसेच गिबोनी लोकांनी यहोवाचे भय मानून त्यानुसार कार्य केले. त्यांच्यासंबंधी जे घडले त्यावरून बऱ्याच काळानंतर ख्रिस्ती प्रेषित पेत्राने केलेल्या या विधानाची सत्यता शाबीत होते: “देव पक्षपाती नाही . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
अब्राहाम व इस्राएल यांच्यासोबत व्यवहार
८, ९. अब्राहामाशी व इस्राएल राष्ट्राशी यहोवाने केलेल्या व्यवहारांतून यहोवाचा निःपक्षपातीपणा कसा दिसून येतो?
८ शिष्य याकोब याने अब्राहामाला व त्याच्या वंशजांना देवाने दाखवलेली अपात्र कृपा आणि त्यांच्यासोबतचे त्याचे व्यवहार याकडे लक्ष वेधले. अब्राहामाच्या मूळ जातीमुळे नव्हे तर त्याच्या विश्वासामुळे तो यहोवा “देवाचा मित्र” ठरला. (याकोब २:२३) अब्राहामचा विश्वास व यहोवाबद्दल त्याचे प्रेम यांमुळे त्याच्या वंशजांना आशीर्वाद मिळाले. (२ इतिहास २०:७) यहोवाने अब्राहामाला वचन दिले: “मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धिच वृद्धि करून तुझी संतति आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन.” पण पुढच्या वचनात त्याला कोणती प्रतिज्ञा देण्यात आली याकडे लक्ष द्या: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति २२:१७, १८; रोमकर ४:१-८.
९ पक्षपात दाखवण्याऐवजी यहोवाने इस्राएलसोबत केलेल्या व्यवहारातून दाखवले की त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांकरता तो काय करू शकतो. त्याचे हे व्यवहार, त्याच्या विश्वासू सेवकांप्रती तो कशाप्रकारे एकनिष्ठ प्रीती व्यक्त करतो याचे उदाहरण आहेत. इस्राएल यहोवाचा “खास निधि” होता तरीसुद्धा इतर लोकांना देवाचा चांगुलपणा अनुभवण्यापासून वंचित ठेवण्यात आले असा याचा अर्थ होत नाही. (निर्गम १९:५; अनुवाद ७:६-८) हे खरे की, यहोवाने इस्राएलास इजिप्तच्या गुलामीतून सोडवले आणि त्याअर्थी असे घोषित केले की “भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला.” पण संदेष्टा आमोस आणि इतरांच्याद्वारे यहोवाने ‘सर्व राष्ट्रांकरता’ देखील एका अद्भुत भवितव्याची प्रतिज्ञा केली.—आमोस ३:२; ९:११, १२; यशया २:२-४.
येशू निःपक्षपाती शिक्षक
१०. निःपक्षपातीपणा दाखवण्यात येशूने कशाप्रकारे आपल्या पित्याचे अनुकरण केले?
१० पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान येशू, जो त्याच्या पित्याची हुबेहूब प्रतिकृती आहे, त्याने यहोवाच्याच निःपक्षपातीपणाचे अनुकरण केले. (इब्री लोकांस १:३) त्यावेळी त्याचा मुख्य हेतू ‘इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांना’ शोधण्याचा होता. पण असे असूनही त्याने विहिरीवर आलेल्या एका शोमरोनी स्त्रीला साक्ष देण्याचे टाळले नाही. (मत्तय १५:२४; योहान ४:७-३०) यहुदी नसलेल्या एका सेनाधिपतीच्या विनंतीवरून त्याने एक चमत्कार देखील केला. (लूक ७:१-१०) देवाच्या लोकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याव्यतिरिक्त त्याने हे सारे केले. येशूच्या शिष्यांनी देखील दूरदूरच्या क्षेत्रांत प्रचार केला. यावरून हे स्पष्ट झाले की एका व्यक्तीला विशिष्ट राष्ट्रात जन्म झाल्यामुळे नव्हे तर तिच्या मनोवृत्तीच्या आधारावर यहोवाचे आशीर्वाद मिळू शकतात. सत्यासाठी भुकेले असलेल्या नम्र व प्रामाणिक मनाच्या लोकांनी राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद दिला. याउलट जे गर्विष्ठ व अहंकारी होते त्यांनी येशूला व त्याच्या संदेशाला तुच्छ लेखले. येशूने म्हटले: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.” (लूक १०:२१) जेव्हा आपण इतरांशी प्रीती व विश्वास या गुणांच्या आधारावर व्यवहार करतो तेव्हा आपण निःपक्षपाती मनोवृत्तीने वागत असतो कारण अशाच प्रकारच्या वागणुकीला यहोवाची संमती आहे याची आपल्याला जाणीव असते.
११. सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीत कशाप्रकारे निःपक्षपातीपणा दाखवण्यात आला?
११ सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीत, यहुदी व गैर यहुदी लोकांना सारखेच महत्त्व होते. पौलाने या गोष्टीचा खुलासा केला: “सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांस गौरव, सन्मान व शांति ही मिळतील; कारण देवाजवळ पक्षपात नाही.” * (रोमकर २:१०, ११) यहोवाच्या अपात्र कृपेचा त्यांना फायदा मिळेल किंवा नाही हे कोणत्या राष्ट्रात त्यांचा जन्म झाला यावर नव्हे, तर त्यांच्या मनोवृत्तीवर म्हणजेच, यहोवाविषयी आणि त्याचा पुत्र येशू याच्या खंडणीद्वारे देऊ केलेल्या भवितव्याविषयी शिकल्यावर ते कशी प्रतिक्रिया दाखवतात यावर अवलंबून होते. (योहान ३:१६, ३६) पौलाने लिहिले: “जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे; परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हावयाची ती सुंता नव्हे तर अध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय.” मग “यहुदी” (अर्थात “यहूदाचा” म्हणजे ज्याची प्रशंसा किंवा स्तुती करण्यात आली) या संज्ञेशी संबंधित शब्दांचा अलंकारिक उपयोग करून पौल पुढे म्हणतो: “अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.” (रोमकर २:२८, २९) यहोवा कोणताही पक्षपात न करता प्रशंसा करतो. आपणही असे करतो का?
१२. प्रकटीकरण ७:९ कोणती आशा देऊ करते व कोणाला?
१२ नंतर एका दृष्टान्तात प्रेषित योहानाने विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांना ‘इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी शिक्का मारण्यात आलेल्या’ १,४४,००० लोकांपासून बनलेल्या एका आत्मिक राष्ट्राच्या रूपात चित्रित करण्यात आलेले पाहिले. यानंतर योहानाने “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला” पाहिला. (प्रकटीकरण ७:४, ९) अशा रितीने आधुनिक काळातील ख्रिस्ती मंडळीतून कोणत्याही राष्ट्राच्या किंवा भाषेच्या लोकांना वगळण्यात आलेले नाही. सर्व पार्श्वभूमीच्या लोकांना ‘मोठ्या लोकसमुदायातून’ बचावून नव्या जगात ‘जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यातून’ पिण्याची आशा आहे.—प्रकटीकरण ७:१४-१७.
सकारात्मक परिणाम
१३-१५. (अ) जातीय व सांस्कृतिक भेदांवर आपण कसा विजय मिळवू शकतो? (ब) मैत्रीपूर्ण व्यवहारामुळे मिळणाऱ्या फायद्यांची काही उदाहरणे द्या.
१३ एक चांगला पिता आपल्या मुलांना ओळखतो त्याप्रमाणे १ करिंथकर ९:१९-२३) ही गोष्ट परदेशात नेमणूक स्वीकारणाऱ्या मिशनऱ्यांच्या कार्यावरून स्पष्टपणे दिसून येते. हे मिशनरी त्या विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवतात आणि त्यामुळे स्थानिक मंडळ्यांमध्ये रुळायला त्यांना फार वेळ लागत नाही.—फिलिप्पैकर २:४.
यहोवा आपल्याला चांगल्याप्रकारे जाणतो. तसेच इतरांच्या संस्कृतीविषयी व पार्श्वभूमीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवून जेव्हा आपण त्यांना चांगल्यारितीने समजू लागतो तेव्हा आपले आपसातील भेद तितके महत्त्वाचे राहात नाहीत. जातीय भेदभाव नाहीसे होतात आणि मैत्रीचे व प्रेमाचे बंधन अधिक पक्के होते. एकतेची भावना वाढते. (१४ निःपक्षपाती असण्याचे सकारात्मक परिणाम अनेक देशांत दिसून आले आहेत. मुळात इथियोपियाचा असणारा आक्लीलू, ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरात अगदी एकाकी होता. आधुनिक युरोपच्या अनेक महानगरांत बऱ्याच लोकांनी अनुभवल्याप्रमाणे, येथेही इतर देशांच्या लोकांबद्दल सर्वसामान्यपणे फारशी आत्मीयता दाखवली जात नाही असे आक्लीलू याला आढळले आणि त्यामुळे त्याला एकटेपणा जास्तच प्रकर्षाने जाणवू लागला. पण यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात आक्लीलू एका ख्रिस्ती सभेला उपस्थित राहिला तेव्हा त्याला अगदीच वेगळा अनुभव आला! तेथे उपस्थित असणाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आणि लागलीच त्याला ते सर्वजण अगदी आपलेसे वाटू लागले. निर्माणकर्त्या देवाबद्दल ज्ञान व कृतज्ञता वाढवण्यात त्याने काही काळातच उल्लेखनीय प्रगती केली. लवकरच तो त्या जिल्ह्यात राज्याची सुवार्ता इतरांना सांगण्याच्या संधी शोधू लागला. एके दिवशी आक्लीलूसोबत सेवाकार्य करत असलेल्या बांधवाने त्याला त्याच्या जीवनाचे आता काय ध्येय आहे असे विचारले तेव्हा त्याने लगेच उत्तर दिले की आम्हारिक या आपल्या मातृभाषेच्या मंडळीसोबत सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे. स्थानिक इंग्रजी मंडळीच्या वडिलांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी आनंदाने आक्लीलूच्या मातृभाषेत एक जाहीर भाषण आयोजित केले. या जाहीर भाषणाकरता देण्यात आलेल्या निमंत्रणामुळे, ब्रिटनमध्ये संपन्न झालेल्या या पहिल्या आम्हारिक भाषेतील जाहीर सभेकरता कित्येक परदेशी व स्थानिक लोक एकत्र आले. आज एक आम्हारिक मंडळी उत्तम प्रगती करत आहे आणि या भागातील कित्येक इथियोपियन व इतर लोक या मंडळीसोबत कार्य करत आहेत. यहोवाचा पक्ष घेऊन ख्रिस्ती बाप्तिस्म्याद्वारे हे प्रदर्शित करण्यास कोणतीही गोष्ट एका व्यक्तीला रोखू शकत नाही असा अनेकांना येथे अनुभव आला आहे.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३६.
१५ प्रत्येक संस्कृतीच्या लोकांची वैशिष्ट्ये आणि पार्श्वभूमी भिन्न असते. यांवरून कोणाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवता येत नाही, तर या केवळ भिन्नता असतात. माल्टा द्वीपावर नव्यानेच समर्पण केलेल्या यहोवाच्या सेवकांचा बाप्तिस्मा होताना पाहून तेथील स्थानिक साक्षीदारांनी आपला आनंद मनमुरादपणे व्यक्त केला; आणि त्यांना साथ दिली ती ब्रिटनहून आलेल्या काही पाहुण्यांनी ज्यांचे डोळे ही आनंदी घटना पाहून नकळत पाणावले. दोन्ही गटांनी, अर्थात माल्टीझ व ब्रिटीश बांधवांनी आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या, आणि यहोवाबद्दल त्या सर्वांना असलेल्या उत्कट प्रीतीमुळे ख्रिस्ती बंधुत्वाचे बंधन अधिक मजबूत बनले.—स्तोत्र १३३:१; कलस्सैकर ३:१४.
पूर्वग्रहावर मात करणे
१६-१८. ख्रिस्ती मंडळीत पूर्वग्रह कशाप्रकारे मिटवता येतो यासंबंधी एक अनुभव सांगा.
१६ यहोवाबद्दल व आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल असलेले आपले प्रेम दिवसेंदिवस वाढते तसतसे आपण इतरांविषयी मत बनवताना यहोवाचे अधिकाधिक अनुकरण करू शकतो. विशिष्ट राष्ट्रांच्या, जातींच्या किंवा संस्कृतींच्या लोकांबद्दल
एकेकाळी आपल्याला असलेल्या पूर्वग्रहावर आपण मात करू शकतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात सेवा केलेल्या ॲल्बर्टचे उदाहरण पाहा; १९४२ साली सिंगापूरच्या पाडावानंतर जपानी लोकांनी त्याला बंदी बनवले. नंतर त्याने जवळजवळ तीन वर्षे क्वाई नदीवरच्या पुलाजवळ बांधण्यात आलेल्या ‘मृत्यू रुळावर’ बांधकाम केले. युद्ध संपल्यावर त्याची सुटका करण्यात आली तेव्हा त्याचे वजन फक्त ३२ किलो होते, त्याच्या जबड्याची आणि नाकाची हाडे तुटली होती आणि त्याला अतिसार, नायटा आणि मलेरिया झाला होता. त्याच्यासोबतच्या अनेक कैद्यांची स्थिती याहूनही वाईट होती आणि कित्येकजण जिवंत बचावू शकले नाहीत. ॲल्बर्टने पाहिलेल्या व अनुभवलेल्या अत्याचारामुळे १९४५ साली तो घरी अतिशय दुःखी व संतप्त होऊन परतला. देवाधर्मात त्याला मुळीच रस उरला नाही.१७ ॲल्बर्टची पत्नी आयरीन यहोवाची साक्षीदार बनली. तिच्या समाधानासाठी तो यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीत एक दोनदा सभांना उपस्थित राहिला. पूर्णवेळेच्या सेवेत असलेला पॉल नावाचा एक तरुण ॲल्बर्टसोबत बायबलचा अभ्यास करण्याकरता त्याच्याकडे येऊ लागला. लवकरच ॲल्बर्टला समजले की यहोवा प्रत्येक व्यक्तीकडे तिच्या अंतःकरणाच्या स्थितीनुसार पाहतो. त्याने आपले जीवन यहोवाला समर्पित केले व बाप्तिस्मा घेतला.
१८ कालांतराने पॉल लंडनला आला, त्याने जपानी भाषा शिकून घेतली आणि जपानी भाषेच्या मंडळीसोबत तो कार्य करू लागला. काही जपानी साक्षीदार लंडनला आले तेव्हा पॉलने आपल्या आधीच्या मंडळीला भेट देण्याकरता त्यांना नेण्याचे सुचवले. या बांधवांनी आठवण करून दिली की ॲल्बर्ट जपानी लोकांचा द्वेष करतो. ब्रिटनला परतल्यापासून त्याने कोणत्याही जपानी व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटण्याचे टाळले होते त्यामुळे बांधवांना काळजी वाटत होती की त्यांना भेटल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल. पण त्यांची काळजी व्यर्थ होती—कारण ॲल्बर्टने या पाहुण्यांचे निर्व्याज बंधुप्रेमाने स्वागत केले.—१ पेत्र ३:८, ९.
‘आपली अंतःकरणे विशाल करा’
१९. आपल्या मनात पक्षपाताचा थोडाही अंश असला तर प्रेषित पौलाचा कोणता सल्ला आपल्याकरता सहायक ठरू शकतो?
१९ बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले, “तोंड पाहून वागणे बरे नाही.” (नीतिसूत्रे २८:२१) ज्यांना आपण चांगल्याप्रकारे जाणतो त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणे साहजिक आहे. पण कधीकधी, ज्यांना आपण चांगले ओळखत नाही त्यांच्याविषयी आपण फारसे स्वारस्य दाखवत नाही. ही पक्षपाती मनोवृत्ती यहोवाच्या सेवकांना शोभत नाही. ‘आपली अंतःकरणे विशाल करा,’ या पौलाने दिलेल्या सुस्पष्ट सल्ल्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. होय, आपल्या अंतःकरणातील प्रीतीने सर्व पार्श्वभूमीच्या सहख्रिस्ती बांधवांना सामावून घेतले पाहिजे.—२ करिंथकर ६:१३.
२०. जीवनाच्या कोणकोणत्या क्षेत्रांत आपण आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण केले पाहिजे?
२० आपल्याला स्वर्गीय पाचारणाचा विशेषाधिकार मिळालेला असो किंवा पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा मिळालेली असो, पण निःपक्षपाती वृत्ती दाखवल्यामुळे आपण एक कळप, एका मेंढपाळाच्या एकतेचा आस्वाद घेऊ शकतो. (इफिसकर ४:४, ५, १६) आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्या ख्रिस्ती सेवेत, कुटुंबांत आणि मंडळीत किंबहुना जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात मदत होऊ शकते. ती कशी? पुढील लेखात या विषयावर चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
^ परि. 3 यहोवाची कीर्ती नंतर भक्तिपर गीतांचा विषय बनली.—स्तोत्र १३५:८-११; १३६:११-२०.
^ परि. 11 या ठिकाणी, “हेल्लेणी” हा शब्द सर्वसामान्यपणे विदेशी लोकांना सूचित करतो.—यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड १, पृष्ठ १००४ पाहा.
तुम्ही काय उत्तर द्याल?
• राहाब व गिबोनी लोकांप्रती यहोवाने निःपक्षपातीपणा कशाप्रकारे दाखवला?
• येशूने आपल्या शिकवणुकींत निःपक्षपातीपणा कसा दाखवला?
• आपल्याला विशिष्ट संस्कृतीच्या अथवा जातीच्या लोकांविषयी पूर्वग्रह असल्यास त्यावर मात करण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
इस्राएलने कनानवर विजय मिळवण्यास सुरवात केली
[१५ पानांवरील चित्र]
येशूने एका शोमरोनी स्त्रीला साक्ष देण्याची संधी दवडली नाही
[१६ पानांवरील चित्र]
ब्रिटनमध्ये एक आम्हारिक भाषेतील सभा
[१६ पानांवरील चित्र]
यहोवाबद्दल असलेल्या प्रीतीने ॲल्बर्टला आपल्या पूर्वग्रहावर मात करण्यास मदत केली