यहोवाचे मन आनंदित करणारे तरुण
यहोवाचे मन आनंदित करणारे तरुण
हे अभ्यास लेख खास यहोवाच्या साक्षीदारांतील तरुण सदस्यांना विचारात घेऊन लिहिण्यात आले होते. म्हणून आम्ही सर्व तरुणांना या लेखांचा विचारपूर्वक अभ्यास करून सभेत टेहळणी बुरूज अभ्यास घेतला जाईल तेव्हा अधिक सहभाग घेण्याचे प्रोत्साहन देऊ इच्छितो.
“माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीतिसूत्रे २७:११.
१, २. (अ) जगातल्या गोष्टींचे जिला आकर्षण वाटते ती व्यक्ती ख्रिस्ती म्हणवण्यास लायक नाही असे म्हणता येईल का, स्पष्ट करा. (रोमकर ७:२१) (ब) आसाफच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले? (पृष्ठ १३ वरील पेटी पाहा.)
तुम्ही कपड्यांची खरेदी करत आहात अशी कल्पना करा. दुकानात वेगवेगळे कपडे पाहात असताना, एक विशिष्ट कपडा तुम्हाला लगेच आवडतो. त्याचा रंग आणि स्टाईल तुम्हाला पसंत पडते आणि किंमतही अगदी वाजवी वाटते. पण मग तुम्ही जरा जवळून त्याचे निरीक्षण करता, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते. कापडाच्या कडांवर ते जीर्ण झाले आहे आणि शिवणही तितकी व्यवस्थित केलेली नाही. दिसायला आकर्षक असला तरी तो कपडा निम्न प्रतीचा आहे. अशा हलक्या दर्जाच्या मालाकरता तुम्ही पैसा खर्च कराल का?
२ एक ख्रिस्ती तरुण या नात्याने तुम्हाला कदाचित अशाच प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. त्या कपड्याप्रमाणेच या जगातील गोष्टी देखील पहिल्या नजरेत अतिशय आकर्षक वाटतील. उदाहरणार्थ, शाळेतील तुमचे सोबती पार्ट्यांमध्ये मौजमजा करत असतील, ड्रग्स व ड्रिंक्स घेत असतील, विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत फिरत असतील आणि विवाहाआधी शारीरिक संबंधही ठेवत असतील. त्यांची ही जीवनशैली, कधीकधी तुम्हाला आकर्षक वाटते का? त्यांना असलेले तथाकथित स्वातंत्र्य निदान काही प्रमाणात आपल्याला चाखायला मिळावे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला असे वाटत असल्यास, आपण मुळातच वाईट आहोत आणि आपली ख्रिस्ती म्हणवण्याची लायकी नाही अशा निष्कर्षावर येऊ नका. कारण, देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्या व्यक्तीलाही हे जग अतिशय मोहक वाटू शकते हे खुद्द बायबल कबूल करते.—२ तीमथ्य ४:१०.
३. (अ) जगातल्या गोष्टींच्या मागे लागणे का व्यर्थ आहे? (ब) जगिक गोष्टींच्या व्यर्थतेचे एका ख्रिस्ती व्यक्तीने कशाप्रकारे वर्णन केले?
३ पण, कपडा खरेदी करण्याआधी जसे तुम्ही त्याचे जवळून निरीक्षण केले तसेच या जगाकडे जवळून पाहा. विचार करा, ‘या जगाचा दर्जा आणि शिवण कशी आहे?’ बायबल म्हणते, की हे ‘जग नाहीसे होत आहे.’ (१ योहान २:१७) त्यातून मिळणारा सुखविलास काही झाले तरी तात्पुरताच आहे. शिवाय देवाला न आवडणाऱ्या वर्तणुकीमुळे मोठी किंमत मोजावी लागते. तेव्हा हा सौदा निश्चितच परवडणारा नाही. एक ख्रिस्ती मुलगी, तिच्याच शब्दांत सांगायचे तर ‘वाया घालवलेल्या तारुण्यामुळे भोगाव्या लागलेल्या यातनांविषयी’ सांगते. ती म्हणते: “दुरून या जगाची चमकधमक अतिशय आकर्षक वाटते. आणि इथे तुम्हाला असे भासवले जाते की कोणत्याही दुःखाच्या भीतीविना तुम्ही वाटेल ती मौजमजा करू शकता. अर्थातच, हे शक्य नाही. हे जग निव्वळ तुमचा उपयोग करून घेते आणि काम झाले की तुम्हाला फेकून देते.” * अशा हलक्या दर्जाच्या जीवनाकरता तुम्ही का म्हणून आपले तारुण्य वाया घालवावे?
“वाईटापासून” संरक्षण
४, ५. (अ) मृत्यूच्या काही काळाआधी येशूने यहोवाला प्रार्थनेत काय विनंती केली? (ब) ही विनंती योग्य का होती?
४ या व्यवस्थीकरणातून काहीही दर्जेदार मिळवण्यासारखे नाही हे जाणून यहोवाच्या साक्षीदारांतील तरुण या जगाची मैत्री टाळतात. (याकोब ४:४) तुम्ही या विश्वासू तरुणांपैकी आहात का? असाल, तर तुमची प्रशंसा केली पाहिजे. अर्थात मित्रमैत्रिणींच्या दबावाचा प्रतिकार करणे आणि इतरांपासून वेगळे राहणे सोपे नाही, पण तुमच्यासाठी मदत उपलब्ध आहे.
५ मृत्यू होण्याच्या काही काळाआधी येशूने आपल्या शिष्यांना “वाईटापासून राखावे” अशी यहोवाला विनंती केली. (योहान १७:१५) येशूने ही विनंती करण्यामागे एक खास कारण होते. त्याला माहीत होते, की त्याच्या अनुयायांना, मग त्यांचे वय काहीही असो, विश्वासूपणे चालत राहणे कठीण जाणार होते. का? कारण, येशूने स्वतःच कबूल केल्याप्रमाणे त्याच्या शिष्यांना एका शक्तिशाली, अदृश्य शत्रूला—‘दुष्टाला,’ अर्थात दियाबल सैतानाला तोंड द्यावे लागणार होते. बायबल म्हणते की हा दुष्ट आत्मिक प्राणी “कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
६. सैतानाला तरुणांबद्दल जराही सहानुभूती नाही हे आपल्याला कसे कळते?
६ सबंध इतिहासात, सैतानाने मानवांवर अतिशय क्रूर यातना आणून असुरी आनंद मिळवला आहे. ईयोब व त्याच्या कुटुंबावर त्याने आणलेल्या भयानक संकटांचा विचार करा. (ईयोब १:१३-१९; २:७) कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनकाळात घडलेल्या काही भयानक घटना आठवत असतील ज्या सैतानाच्या हिंसक आत्म्याचाच परिणाम असल्याचे स्पष्ट दिसून येते. दियाबल याच शोधात आहे की कोणाला गिळंकृत करावे आणि या बाबतीत तो तरुणांबद्दल अजिबात दयामाया दाखवत नाही. उदाहरणार्थ, सा.यु. पहिल्या शतकाच्या सुरवातीला हेरोदने बेथलेहेममधील दोन वर्षांहून कमी वयाच्या सर्व मुलांना ठार मारण्याचा कट रचला. (मत्तय २:१६) कदाचित सैतानानेच हेरोदला हे कृत्य करण्यास प्रवृत्त केले असावे; आणि हे सर्व त्याने यासाठी केले कारण जे मूल मोठे होऊन सैतानावर देवाचा न्यायदंड बजावणारा प्रतिज्ञात मशीहा बनणार होते त्याला तो जिवे मारू इच्छित होता! (उत्पत्ति ३:१५) स्पष्टपणे सैतानाला तरुणांबद्दल जराही सहानुभूती नाही. त्याचे एकच ध्येय आहे, शक्य तितक्या मनुष्यांना गिळंकृत करणे. आजच्या काळात तर हे खासकरून खरे आहे कारण सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर टाकण्यात आले आहे आणि तो “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त” झाला आहे.—प्रकटीकरण १२:९, १२.
७. (अ) यहोवा कशाप्रकारे सैतानापेक्षा अगदीच वेगळा आहे? (ब) तुमच्या जीवनातील आनंदाविषयी यहोवाच्या भावना काय आहेत?
लूक १:७८) तो स्वतःच प्रीतीचे रूप आहे. किंबहुना, हा महान गुण आपल्या निर्माणकर्त्यात इतका सामावलेला आहे की बायबल त्याच्याविषयी म्हणते: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) या व्यवस्थीकरणाच्या देवात आणि तुम्हाला ज्याची उपासना करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे त्या देवात किती मोठा फरक आहे! सैतान कोणाला गिळंकृत करावे याच्या शोधात असतो, तर यहोवाच्या बाबतीत पाहू जाता, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही.” (२ पेत्र ३:९) त्याच्या नजरेत प्रत्येक मानवाचे जीवन मोलवान आहे—तुमचे देखील. यहोवा आपल्या वचनात, तुम्ही या जगाचा भाग असू नये असे आर्जवतो तेव्हा तो तुमच्या जीवनातली मौज हिरावून घेऊ इच्छित नाही किंवा तुम्हाला स्वातंत्र्यापासून वंचित करू इच्छित नाही. (योहान १५:१९) उलट, तो वाईटापासून तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्यावर सतत लक्ष ठेवतो. तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला या जगातील क्षणभंगूर सुखांपेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी देऊ इच्छितो. त्याची इच्छा आहे की तुम्हाला “खरे जीवन” मिळावे, अर्थात परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन. (१ तीमथ्य ६:१७-१९) तुम्ही यशस्वी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे, आणि म्हणूनच त्या ध्येयापर्यंत पोचण्याकरता तो तुम्हाला प्रोत्साहन देतो. (१ तीमथ्य २:४) शिवाय, यहोवा तुम्हाला एक खास निमंत्रण देतो. ते कोणते?
७ “अतिशय संतप्त” असलेल्या सैतानाच्या अगदी उलट, यहोवा ‘परम दयेचा’ परमेश्वर आहे. (“माझे मन आनंदित कर”
८, ९. (अ) तुम्ही यहोवाला कोणती भेट देऊ शकता? (ब) ईयोबाच्या उदाहरणातून दिसून येते त्याप्रमाणे, सैतान कशाप्रकारे यहोवाची निंदा करतो?
८ तुम्ही कधी आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी काही भेटवस्तू खरेदी केली आहे का आणि मग ती वस्तू मिळाल्यावर त्या व्यक्तीला आश्चर्य आणि कृतज्ञतेच्या भावनांनी पुलकित झालेले पाहिले आहे का? कदाचित तुम्ही या व्यक्तीला कोणती वस्तू भेट देणे योग्य ठरेल याविषयी बराच वेळ विचार केला असेल. आता हा प्रश्न विचारात घ्या: निर्माणकर्ता यहोवा देव याला आपण कोणती भेट देऊ शकतो? ही कल्पनाही कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. साधारण मनुष्य सर्वसमर्थ देवाला काय देऊ शकतो? त्याच्याजवळ नाही, असे काय तुम्ही त्याला देऊ शकता? बायबल याचे उत्तर नीतिसूत्रे २७:११ या वचनात देते: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”
९ बायबलच्या तुमच्या अभ्यासातून तुम्हाला कदाचित माहीतच असेल, की यहोवाची निंदा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे. त्याचा असा दावा आहे की जे कोणी देवाची सेवा करतात ते प्रीतीने प्रेरित होऊन नव्हे तर स्वार्थबुद्धीने करतात. एका अर्थाने सैतान असे म्हणतो, की त्यांना थोड्या खडतर परिस्थितीतून जाऊ द्या मग पाहा ते लगेच खरी उपासना सोडून देतात की नाही. ईयोब या नीतिमान पुरुषाबद्दल सैतानाने यहोवाला काय म्हटले होते याकडे क्षणभर लक्ष द्या: “तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—ईयोब १:१०, ११.
१०. (अ) सैतानाने केवळ ईयोबाच्या सचोटीबद्दल शंका घेतली नाही हे आपल्याला कसे कळून येते? (ब) सार्वभौमत्वाच्या वादविषयात तुम्ही कशाप्रकारे गोवलेले आहात?
१० बायबलच्या अहवालातून दिसून येते त्याप्रमाणे, सैतानाने केवळ ईयोबाच्याच नव्हे तर देवाची सेवा करणाऱ्या सर्वांच्या एकनिष्ठतेबद्दल शंका घेतली, आणि यात तुमचाही समावेश आहे. किंबहुना, सर्वसामान्य मानवजातीबद्दल बोलताना सैतानाने यहोवाला असे म्हटले: “मनुष्य [फक्त ईयोब नव्हे, तर कोणीही] आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) या महत्त्वाच्या वादविषयात तुम्हाला आपली भूमिका दिसते का? नीतिसूत्रे २७:११ यात सूचित केल्याप्रमाणे यहोवा असे म्हणत आहे की तुम्ही त्याला काही देऊ शकता—अर्थात त्याची थट्टा करणाऱ्या सैतानाला उत्तर देण्याकरता एक आधार. कल्पना करा, सबंध विश्वाचा सार्वभौम तुम्हाला इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या वादविषयावर तुमचे वैयक्तिक उत्तर देण्याचे आवाहन करत आहे. ही तुमच्याकरता किती अद्भुत जबाबदारी आणि एक विशेषाधिकार आहे! यहोवा तुमच्याकडून जी अपेक्षा करतो ती तुम्ही पूर्ण करू शकता का? ईयोबाने केली. (ईयोब २:९, १०) त्याचप्रकारे येशूने आणि इतिहासातील इतर असंख्य जणांनी यहोवाची अपेक्षा पूर्ण केली; यात अनेक तरुणही सामील आहेत. (फिलिप्पैकर २:८; प्रकटीकरण ६:९) तुम्हीसुद्धा हेच करू शकता. पण विसरू नका, याबाबतीत तुम्ही दोन्ही पक्षात कदापि सामील होऊ शकत नाही. तुमच्या वागणुकीवरून तुम्ही दाखवाल की तुम्ही सैतानाच्या थट्टेला पाठिंबा देत आहात की यहोवाच्या प्रत्युत्तराला. तुम्ही कोणाचा पक्ष घ्याल?
यहोवाला तुमची काळजी आहे!
११, १२. तुम्ही यहोवाची सेवा करण्याचे निवडता की नाही यामुळे त्याला काही फरक पडतो का? स्पष्ट करा.
११ तुम्ही काय निवड करता यामुळे यहोवाला खरोखरच काही फरक पडतो का? आजपर्यंत ज्या असंख्य लोकांनी विश्वासूपणे सेवा केली आहे त्यांची उदाहरणे सैतानाला प्रत्युत्तर देण्याकरता पुरेशी नाहीत का? दियाबलाने असा दावा केला होता, की कोणीही यहोवाची सेवा प्रेमापोटी करत नाही, आणि त्याचा हा दावा खोटा असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे यात शंका नाही. तरीसुद्धा, यहोवाची इच्छा आहे की सार्वभौमत्वाच्या वादविषयात तुम्ही त्याचा पक्ष घ्यावा कारण त्याला व्यक्तिगतपणे तुमची काळजी आहे. येशूने म्हटले: “ह्या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.”—मत्तय १८:१४.
१२ यावरून हेच स्पष्ट होते की तुम्ही कोणता मार्ग निवडता याविषयी यहोवा देवाला आस्था आहे. केवळ आस्थाच नाही तर तुमच्या निर्णयांचा त्याच्यावर प्रभाव पडतो. बायबल स्पष्टपणे सांगते की यहोवाला भावना आहेत आणि मनुष्यांच्या चांगल्या अथवा वाईट कृत्यांमुळे त्याच्या भावनांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जेव्हा इस्राएल लोकांनी वारंवार विद्रोह केला तेव्हा यहोवाला “दुःख” झाले. (स्तोत्र ७८:४०, ४१) नोहाच्या काळातील जलप्रलयानंतर, “मानवांची दुष्टाई फार” झाली तेव्हा यहोवाच्या “चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६) याचा काय अर्थ होतो यावर विचार करा. तुम्ही चुकीचा मार्ग निवडल्यास, तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याला दुःखी होण्यास भाग पाडू शकता. पण याचा अर्थ देव भावनाविवश किंवा दुबळ्या मनाचा आहे असा नाही. उलट, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या कल्याणाची त्याला काळजी आहे. दुसरीकडे पाहता, जेव्हा तुम्ही योग्य ते करता तेव्हा यहोवाचे मन आनंदित होते. केवळ सैतानाला प्रत्युत्तर देता आल्यामुळे नव्हे तर आता तो तुम्हाला प्रतिफळ देऊ शकतो यामुळेही तो आनंदित होतो. आणि तो खरोखर तुम्हाला प्रतिफळ देऊ इच्छितो! (इब्री लोकांस ११:६) यहोवा देव किती प्रेमळ पिता आहे.
सध्या मिळणारे विपुल आशीर्वाद
१३. यहोवाची सेवा केल्याने आजही कोणते आशीर्वाद मिळतात?
१३ यहोवाची सेवा केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद केवळ भविष्यातच अनुभवण्याचे नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांतील अनेक तरुण आताही आनंदाने व समाधानाने आशीर्वादित झाले आहेत आणि यामागे चांगले कारण आहे. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात.” (स्तोत्र १९:८) आपल्याकरता काय सर्वात उत्तम ठरेल हे कोणत्याही मानवापेक्षा अधिक यहोवा जाणतो. संदेष्टा यशयाच्याद्वारे यहोवाने म्हटले: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.
१४. बायबलची तत्त्वे तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून कशी राखू शकतात?
१४ बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्याने तुम्हाला बरेच दुःख व निराशा टाळता येईल. उदाहरणार्थ, बायबल म्हणते की जे धनलोभी झाले आहेत त्यांनी “स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) तुमच्या सोबत्यांपैकी कोणी हे कटू सत्य अनुभवले आहे का? काही तरुणतरुणी बाजारातल्या सर्वात नवीन ब्रँडचे कपडे किंवा सर्वात अत्याधुनिक उपकरणे मिळवण्याच्या नादात स्वतःला मोठ्या कर्जात बुडवतात. आपली ऐपत नसताना अशा वस्तू खरेदी करणे व नंतर कित्येक वर्षांपर्यंत अवाजवी व्याजाच्या दराने त्यांची भरपाई करणे गुलामी करण्यासारखेच आहे!—नीतिसूत्रे २२:७.
१५. लैंगिक अनैतिकतेमुळे होणाऱ्या दुःखापासून बायबलची तत्त्वे कशाप्रकारे तुमचे रक्षण करू शकतात?
१५ लैंगिक अनैतिकतेच्या विषयावरही विचार करा. दर वर्षी सबंध जगात असंख्य अविवाहित किशोरवयीन मुली गर्भवती होतात. काहीजणी आपल्या मुलाला जन्म देतात, पण त्यांना या मुलाला लहानाचे मोठे करण्याची न इच्छा असते न ऐपत. इतरजणी गर्भपात करून घेतात, पण त्यांनाही मोठी किंमत द्यावी लागते कारण त्यांचा विवेक सतत त्यांना बोचणी करत राहतो. काही तरुण तरुणींना एड्ससारखे लैंगिकरित्या संक्रमित रोग होतात. अर्थात जे यहोवाला ओळखतात त्यांच्याकरता सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्यांचा यहोवासोबतचा सबंध बिघडतो. * (गलतीकर ५:१९-२१) म्हणूनच बायबल म्हणते: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.”—१ करिंथकर ६:१८.
‘आनंदी देवाची’ सेवा
१६. (अ) तुम्ही तुमच्या तारुण्याचा आनंद घ्यावा असेच यहोवाला वाटते हे आपण का म्हणू शकतो? (ब) यहोवा तुमच्या मार्गदर्शनाकरता सूचना का देतो?
१६ बायबल यहोवाचे वर्णन “आनंदी देव” या शब्दांत करते. (१ तीमथ्य १:११, NW) तुम्ही देखील आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. किंबहुना, खुद्द त्याचे वचन म्हणते: “आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो.” (उपदेशक ११:९) पण यहोवा सध्याच्या क्षणापलीकडे पाहतो आणि चांगल्या तशाच वाईट वागणुकीमुळे होणारे दीर्घकालीन परिणाम तो समजू शकतो. म्हणूनच तो तुम्हाला अशी आज्ञा करतो: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.”—उपदेशक १२:१.
१७, १८. एका ख्रिस्ती तरुणीने यहोवाची सेवा करताना मिळणारा आनंद कशाप्रकारे व्यक्त केला आणि तुम्हीही हा आनंद कसा मिळवू शकता?
१७ आज अनेक तरुण यहोवाच्या सेवेत मनःपूर्वक आनंद अनुभवत आहेत. उदाहरणार्थ, १५ वर्षांची लीना म्हणते: “मी मान वर करून जगू शकते. धूम्रपान आणि ड्रग्ससारख्या सवयी नसल्यामुळे मला सुदृढ शरीर लाभले आहे. मंडळीकडून मला मोलवान मार्गदर्शन मिळते जे सैतानाच्या भयंकर दबावाला तोंड देण्यास माझी मदत करते. राज्य सभागृहात लाभणाऱ्या सकारात्मक सहवासामुळे माझे मन आणि त्यामुळे चेहरा देखील प्रफुल्लित असतो. सर्वात उत्तम आशीर्वाद म्हणजे या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची अतुलनीय आशा माझ्याजवळ आहे.”
१८ लीनाप्रमाणेच, अनेक ख्रिस्ती तरुण विश्वासाकरता पूर्ण शक्तिनिशी लढा देत आहेत आणि असे केल्यामुळे ते आनंदित होतात. त्यांना याची जाणीव आहे की त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने आली तरीसुद्धा त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने उद्देशपूर्ण आहे आणि भविष्यात त्यांच्याकरता एक वास्तविक आशा आहे. हे आठवणीत ठेवून, तुमच्या कल्याणाची खरोखर चिंता करणाऱ्या देवाची सेवा करा. त्याचे मन आनंदित करा म्हणजे तो तुम्हाला आज आणि सदासर्वकाळ आनंदित करत राहील!”—स्तोत्र ५:११.
[तळटीपा]
^ परि. 3 “सत्याने मला माझे जीवन परत मिळवून दिले” हा सावध राहा!, ऑक्टोबर २२, १९९६ च्या इंग्रजी अंकातील लेख पाहा.
^ परि. 15 एक व्यक्ती पश्चात्ताप करते, चुकीचे कृत्य करण्याचे थांबवते आणि आपल्या पापाची कबूली देते तेव्हा यहोवा “भरपूर क्षमा करील” हे जाणणे सांत्वनदायक आहे.—यशया ५५:७.
तुम्हाला आठवते का?
• “वाईटापासून” अर्थात सैतानापासून तुम्हाला कोणता धोका संभवू शकतो?
• तुम्ही यहोवाचे मन कशाप्रकारे आनंदित करू शकता?
• यहोवाला तुमची काळजी आहे हे बायबल कशाप्रकारे दाखवते?
• यहोवाची सेवा केल्यामुळे कोणते काही आशीर्वाद प्राप्त होतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चौकट/चित्र]
एक नीतिमान मनुष्य थोडक्यात सावरतो
आसाफ हा प्राचीन इस्राएलातील यहोवाच्या मंदिरात सेवा करणारा एक प्रमुख लेवी संगीतकार होता. त्याने रचलेली गीते सार्वजनिक उपासनेतही वापरली जात. पण हे अनेक विशेषाधिकार असूनही काहीकाळ आसाफ आपल्या सोबत्यांच्या अधम आचरणाने आकर्षित झाला होता. देवाचे नियम मोडूनही ज्यांना कोणतेच वाईट परिणाम भोगावे लागत नाही, अशा लोकांचा त्याला हेवा वाटू लागला होता. आसाफाने नंतर या गोष्टीची कबूली देऊन म्हटले: “माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.”—स्तोत्र ७३:२, ३.
नंतर, आसाफाने देवाच्या मंदिरात जाऊन याविषयी प्रार्थना केली. त्याची आध्यात्मिक दृष्टी परत मिळाल्यानंतर त्याला जाणीव झाली की यहोवाला दुष्टाईची घृणा वाटते आणि कालांतराने दुष्ट व नीतिमान या दोघांनाही आपल्या कृत्यांचे फळ मिळेल. (स्तोत्र ७३:१७-२०; गलतीकर ६:७, ८) खरोखरच, दुष्ट लोक निसरड्या जागेवर उभे असतात. यहोवा या अधार्मिक व्यवस्थीकरणाचा नाश करेल तेव्हा तर त्यांचा नाश ठरलेलाच आहे.—प्रकटीकरण २१:८.
[१५ पानांवरील चित्रे]
यहोवा मनापासून तुमचे भले इच्छितो, पण सैतानाचे ध्येय तुम्हाला गिळंकृत करण्याचे आहे
[१६ पानांवरील चित्र]
अनेक तरुण, सहख्रिस्ती बांधवांसोबत यहोवाची सेवा करण्यात परम आनंद अनुभवत आहेत