व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शवसंलेपन ख्रिश्‍चनांनी करावे का?

शवसंलेपन ख्रिश्‍चनांनी करावे का?

शवसंलेपन ख्रिश्‍चनांनी करावे का?

विश्‍वासू कुलपिता याकोब याची शेवटची घटका जवळ येत होती तेव्हा त्याने एक विनंती केली: ‘मला कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतात, एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा.’—उत्पत्ति ४९:२९-३१.

त्या काळी ईजिप्तमध्ये असलेल्या एका प्रथेचा उपयोग करून योसेफाने आपल्या पित्याची ही विनंती पूर्ण केली. त्याने “आपल्या सेवकातील वैद्यांस आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली.” उत्पत्ती ५० व्या अध्यायात आढळणाऱ्‍या वृत्तान्तानुसार वैद्यांना, अशाप्रकारे प्रेत तयार करायला परंपरेनुसार ४० दिवस लागले. याकोबाच्या शवाचे संलेपन केल्यामुळे, त्याच्या कुटुंबाच्या व ईजिप्तमधील इतर मान्यवर लोकांच्या मोठ्या आणि मंदगतीने प्रवास करणाऱ्‍या काफल्याला याकोबाचा देह हेब्रोन येथे दफन करण्यासाठी सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास करणे शक्य झाले.—उत्पत्ति ५०:१-१४.

याकोबाचे शवसंलेपन केलेले हे प्रेत सापडण्याची शक्यता आहे का? शक्यता फार कमी आहे. इस्राएलला पाण्याचा चांगला पुरवठा होता आणि यामुळे तेथे फार कमी प्रकारच्या पुरातनवस्तू मिळू शकतात. (निर्गम ३:८) धातूच्या आणि दगडाच्या प्राचीन वस्तू भरपूर प्रमाणात आहेत परंतु कापड, चामडे आणि संलेपन केलेले देह यांसारख्या नाजूक वस्तू तेथील दमटपणाचा आणि काळामुळे होणाऱ्‍या बदलांचा सामना करू शकल्या नाहीत.

शवसंलेपनाची ही प्रथा नेमकी आहे तरी काय? ती प्रथा का रूढ होती? ख्रिश्‍चनांमध्ये ती चालू शकते का?

प्रथेची सुरवात

शवसंलेपनाची प्रथा म्हणजे एखाद्या मानवाचे किंवा प्राण्याच्या प्रेताचे जतन करणे. ही प्रथा ईजिप्तमध्ये सुरू झाली परंतु प्राचीन काळातले अस्सिरियन, पर्शियन आणि सिथियन लोकांमध्येही ती रूढ होती. कदाचित वाळवंटाच्या वाळूत पुरले गेलेले व नैसर्गिकरित्या जतन झालेले देह सापडल्यामुळे पूर्वीच्या लोकांची जिज्ञासा वाढली असावी आणि शवसंलेपनाचे प्रयोग झाले असावेत. अशा पद्धतीने दफन केल्यामुळे दमटपणाचा आणि हवेचा प्रेतावर परिणाम झाला नसेल आणि त्यामुळे त्याची सडण्याची क्रिया मर्यादित राहिली असेल. काहीजण अशी कल्पना मांडतात की, ईजिप्तच्या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नेट्रोन (सोडियम कार्बोनेट) या अल्कलीत जतन झालेली प्रेते मिळाल्यावर शवसंलेपनाची प्रथा सुरू झाली.

मृत्यूनंतर काही तासांमध्ये सुरू होणाऱ्‍या सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक क्रियेत (ज्यामुळे प्रेत सडू लागते) अडथळा आणणे हे शवसंलेपन करणाऱ्‍याचे ध्येय असते. या क्रियेत अडथळा आणल्यास कुजणे थांबते किंवा निदान कुजण्याची गती बरीच कमी होते. त्यासाठी तीन गोष्टी आवश्‍यक असतात: प्रेत जिवंत असल्यासारख्या स्थितीत जतन करणे, कुजण्याची क्रिया थांबवणे आणि कीटकांच्या हल्ल्यापासून प्रेतास प्रतिरोधक बनवणे.

प्राचीन ईजिप्शियन लोक खासकरून धार्मिक कारणांसाठी आपल्या मृत लोकांचे शवसंलेपन करत होते. मरणोत्तर जीवनाबद्दल त्यांना असलेली कल्पना लौकिक जगाच्या संपर्कात राहण्याच्या इच्छेशी संलग्न होती. त्यांच्या शरीरांचा अनंतकाळापर्यंत उपयोग होत राहील आणि ती पुन्हा जिवंत केली जातील अशी त्यांची धारणा होती. शवसंलेपनाची प्रथा फार प्रचलित होती तरीपण त्या नेमक्या पद्धतीचे वर्णन करणारा ईजिप्शियन वृत्तान्त आजपर्यंत सापडलेला नाही. सा.यु.पू. पाचव्या शतकात ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याचा वृत्तान्त सर्वात उत्तम आहे. परंतु, अहवालानुसार हेरोडोटसने दिलेल्या निर्देशनांप्रमाणे करूनही तेच परिणाम मिळण्यात यश मिळालेले नाही.

ख्रिश्‍चनांनी करावे का?

याकोबाच्या शवाचे संलेपन वेगळे धार्मिक विश्‍वास असलेल्या लोकांनी पार पाडले. तरीही योसेफाने आपल्या पित्याचा देह वैद्यांच्या हाती सोपवला तेव्हा त्या काळी ईजिप्तमध्ये या प्रथेसोबत पार पाडल्या जाणाऱ्‍या प्रार्थना आणि विधी देखील केले जावेत अशी विनंती त्याने केली असावी हे शक्यच नाही. याकोबाचा आणि योसेफाचा विश्‍वास मजबूत होता. (इब्री लोकांस ११:२१, २२) याकोबाचे प्रेत जतन करण्याची आज्ञा यहोवाकडून मिळाली नाही हे स्पष्ट असले तरीही त्याविषयी शास्त्रवचनांमध्ये नापसंती व्यक्‍त करण्यात आलेली नाही. याकोबाचे शवसंलेपन करण्यात आले होते ते इस्राएल राष्ट्राकरता किंवा ख्रिस्ती मंडळीकरता उदाहरण म्हणून नाही. खरे तर, देवाच्या वचनात या विषयावर कोणत्याही विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. ईजिप्तमध्ये स्वतः योसेफाचे शवसंलेपन करण्यात आल्यावर या प्रथेचा शास्त्रवचनांमध्ये कोठेही उल्लेख आढळत नाही.—उत्पत्ति ५०:२६.

पॅलेस्टाईन येथील कबरांमध्ये सापडलेल्या दुरावस्थेतील मानवी प्रेतांवरून हे दिसून येते की, शवसंलेपनाची प्रथा इब्री लोकांमध्ये नव्हती—निदान प्रेताचे दीर्घकाळ जतन करण्यासाठी तरी ही प्रथा आचरली जात नव्हती. उदाहरणार्थ, लाजराचे शवसंलेपन करण्यात आले नव्हते. त्याला कापडात गुंडाळलेले असले तरीही जेव्हा त्याच्या कबरेवरील दगड बाजूला केला जात होता तेव्हा लोकांना काळजी वाटली होती. लाजरला मरून चार दिवस होऊन गेल्यामुळे, कबर उघडल्यावर घाण वास येईल अशी त्याच्या बहिणीला खात्री होती.—योहान ११:३८-४४.

येशू ख्रिस्ताचे शवसंलेपन करण्यात आले होते का? शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये याला पुरावा मिळत नाही. त्या वेळी, मृतदेहाचे दफन करण्याआधी त्यावर मसाले व सुगंधी तेल लावून तयार करण्याची यहुद्यांमध्ये प्रथा होती. उदाहरणार्थ, येशूच्या देहाकरता निकदेमाने भरपूर मात्रेत मसाले दिले होते. (योहान १९:३८-४२) इतके मसाले कशाला दिले असावेत? कदाचित येशूबद्दल त्याच्या मनात प्रेम व आदर असल्यामुळे तो इतका उदार झाला असावा. मसाल्यांचा उपयोग त्याचा देह जतन करण्यासाठी केला असावा असा निष्कर्ष काढायची गरज नाही.

मग, शवसंलेपनाच्या प्रथेबद्दल एखाद्या ख्रिश्‍चनाने विरोध करावा का? वास्तविक पाहता, शवसंलेपन म्हणजे जे अनिवार्य आहे त्यात विलंब घडवणे. आपण मातीतून आलो आहोत आणि मेल्यावर पुन्हा मातीत जातो. (उत्पत्ति ३:१९) पण मृत्यूपासून दफनविधीपर्यंत जास्त वेळ थांबावे लागत असल्यास? दूरदूरहून येणाऱ्‍या कुटुंबाच्या सदस्यांना आणि स्नेह्‍यांना मृत व्यक्‍तीला पाहायचे असल्यास साहजिकच काही अंशी प्रेताला जतन करून ठेवावे लागेल.

स्थानिक गरजांनुसार प्रेत जतन करावे लागत असेल किंवा कौटुंबिक सदस्यांची तशी इच्छा असेल तर शास्त्रवचनीय दृष्टीने चिंतेचे काही कारण नाही. कारण, मृतांस “काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) ते देवाच्या स्मरणात असल्यास, त्याच्या वचनयुक्‍त नवीन जगात त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल.—ईयोब १४:१३-१५; प्रेषितांची कृत्ये २४:१५; २ पेत्र ३:१३.

[३१ पानांवरील चौकट/चित्र]

शवसंलेपनाची प्रथा—तेव्हा आणि आता

प्राचीन ईजिप्तमध्ये, कुटुंबाच्या प्रतिष्ठेनुसार शवसंलेपनाच्या वेगवेगळ्या पद्धती अनुसरल्या जात होत्या. एखाद्या सुसंपन्‍न कुटुंबाने कदाचित पुढील पद्धत अनुसरली असावी:

एका धातूच्या सळईने नाकपुड्यातून मेंदू बाहेर काढला जाई. त्यानंतर, आवश्‍यक ते मसाले वापरून कवटीवर क्रिया केली जाई. नंतर हृदय आणि मूत्रपिंड वगळता बाकीचे सगळे आतले अवयव काढले जात. पोटाच्या आत पोहंचायला शरीरात छेद करणे आवश्‍यक होते परंतु हे पाप समजले जाई. त्यामुळे, शवसंलेपन करणारे ईजिप्शियन लोक शरीरात छेद करण्यासाठी एका कापणाऱ्‍याला बोलवत असत. आपले काम पूर्ण करून ती व्यक्‍ती लागलीच तेथून पळ काढत असे कारण अशा तथाकथित गुन्ह्यासाठी शाप दिला जात, दगडफेक करून त्याला शिक्षा दिली जात असे.

पोटातले सगळे अवयव काढून टाकल्यावर पोकळ झालेले पोट चांगले धुतले जात असे. इतिहासकार हेरोडोटसने लिहिले: “ऊद वगळता पोटात शुद्ध गंधरस, कॅसिया, व इतर सर्व प्रकारचे मसाले घालून ते पुन्हा शिवून घेतले जात.”

त्यानंतर, नेट्रोनमध्ये ७० दिवस शरीर भिजत ठेवून त्याला द्रवरहित करीत असत. मग, प्रेताला आंघोळ घालून एका विशिष्ट पद्धतीने कापडात गुंडाळले जात असे. त्या कापडावर राळेचा किंवा चिकट पदार्थाचा लेप दिला जाई आणि हे जतन केलेले प्रेत मानवी आकाराच्या सुशोभित शवपेटिकेत ठेवले जाई.

आज, केवळ काही तासांत शवसंलेपन केले जाऊ शकते. सहसा नसांमध्ये आणि रक्‍तवाहिन्यांमध्ये तसेच पोटाच्या व छातीच्या भागांमध्ये योग्य प्रमाणात जतन करणारे द्रव्य घालून हे केले जाते. कित्येक वर्षांमध्ये, अनेक द्रव्यांचा शोध लावून ती वापरण्यात आली आहेत. परंतु, खर्चाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने फॉर्मलडेहायईड हेच द्रव्य जतन करण्यासाठी सहसा वापरले जाते.

[चित्र]

राजा टुटेनखामेन याची सुवर्ण शवपेटी