यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
“हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.”—स्तोत्र ५१:१०.
१, २. आपण आपल्या हृदयाविषयी का विचार केला पाहिजे?
तो उंचापुरा व देखणा होता. त्याला पाहून शमुवेल संदेष्टा इतका प्रभावित झाला की इशायच्या या सर्वात थोरल्या मुलालाच देवाने शौलानंतर राजा होण्याकरता निवडले आहे याची त्याला खात्री पटली. पण यहोवाने स्पष्ट सांगितले: “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. . . . मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” यहोवाने इशायच्या सर्वात धाकट्या मुलाला म्हणजे दाविदाला निवडले होते—तो त्याच्या “मनासारखा मनुष्य” होता.—१ शमुवेल १३:१४; १६:७.
२ परमेश्वर मानवाच्या हृदयात काय आहे हे पाहू शकतो; हे त्याने स्वतःच नंतर स्पष्ट केले: “प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो.” (यिर्मया १७:१०) होय, “परमेश्वर हृदये पारखितो.” (नीतिसूत्रे १७:३) पण मनुष्याच्या हृदयात यहोवा काय पारखतो? आणि आपले हृदय यहोवाच्या मनासारखे असावे म्हणून आपण काय करू शकतो?
‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण’
३, ४. बायबलमध्ये “हृदय” हा शब्द मुख्यतः कोणत्या अर्थाने वापरण्यात आला आहे? उदाहरणे द्या.
३ पवित्र शास्त्रात “हृदय” असे भाषांतर केलेले शब्द जवळजवळ एक हजार वेळा आढळतात. मराठी भाषांतरांत मात्र या शब्दासाठी सर्व ठिकाणी एक शब्द वापरलेला नसून, मन, अंतःकरण, चित्त असे वेगवेगळे शब्द वापरले आहेत. बहुतेक ठिकाणी, हिब्रू शब्द लाक्षणिक हृदयाच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ यहोवाने संदेष्टा मोशे याला सांगितले: “इस्राएल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे; ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे.” तद्नुसार “ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली” त्या सर्वांनी अर्पण आणले. (निर्गम २५:२; ३५:२१) स्पष्टपणे, प्रेरणा—एखादी कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करणारी आंतरिक शक्ती लाक्षणिक हृदयात समाविष्ट असणारा एक पैलू आहे. आपल्या लाक्षणिक हृदयातून आपल्या भावना व संवेदना, इच्छा व आकांक्षा देखील प्रकट होतात. हृदय संतापाने भडकू शकते, भीतीने कचरू शकते, दुःखाने बेजार किंवा आनंदाने प्रफुल्लित होऊ शकते. (स्तोत्र २७:३; ३९:३; योहान १६:२२; रोमकर ९:२) ते गर्विष्ठ किंवा लीन, प्रेमळ किंवा द्वेषपूर्ण असू शकते.—नीतिसूत्रे १६:५; मत्तय ११:२९; १ पेत्र १:२२.
४ त्यामुळे हिब्रू भाषेत, “हृदय” या शब्दाचा संबंध सहसा प्रेरणा व भावना यांसोबत जोडला जातो तर “मन” या शब्दाचा संबंध विचारशक्तीशी जोडला जातो. शास्त्रवचनांत, एकाच संदर्भाखाली हे दोन्ही शब्द आढळतात तेव्हा त्यांचा वरीलप्रमाणे अर्थ घेतला जावा. (मत्तय २२:३७; फिलिप्पैकर ४:७) पण बायबलमध्ये “हृदय” व “मन” हे शब्द अविभाज्यपणे जुळलेले आहेत. उदाहरणार्थ, मोशेने इस्राएली लोकांना असे उत्तेजन दिले: “आज हे आपल्या मनात [हिब्रू भाषेत, हृदयात] आठवा की . . . यहोवा खरा देव आहे,” आणि असे म्हणताना त्याने विचारशक्तीच्या संदर्भात हृदय हा शब्द वापरला. (अनुवाद ४:३९, NW) आपल्याविरुद्ध कारस्थाने रचणाऱ्या शास्त्र्यांना येशूने म्हटले: “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणिता?” (मत्तय ९:४) ‘विवेक,’ ‘ज्ञान’ आणि ‘विचार’ यांचाही कधीकधी हृदयाशी संबंध जोडला जातो. (१ राजे ३:१२; नीतिसूत्रे १५:१४; मार्क २:६) त्याअर्थी, लाक्षणिक हृदयात आपल्या बुद्धीचा म्हणजेच आपल्या विचारांचा व समजशक्तीचाही समावेश होऊ शकतो.
५. लाक्षणिक हृदय म्हणजे काय?
५ एका ग्रंथानुसार लाक्षणिक हृदय म्हणजे व्यक्तीचा “केंद्रीय भाग, अंतर्याम, अर्थात कार्ये, इच्छा, संवेदना, भावना, छंद, हेतू, विचार, समजुती, कल्पना, बुद्धी, ज्ञान, कौशल्य, विश्वास, युक्तिवाद, स्मृती आणि जाणीव यांतून प्रकट होणारा आंतरिक मनुष्य.” लाक्षणिक हृदय हे आपण आतून कसे आहोत याचे अर्थात, ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाचे’ प्रतिनिधीत्व करते. (१ पेत्र ३:४) यहोवा हेच पाहतो व पारखतो. म्हणूनच दावीद अशी प्रार्थना करू शकला: “हे देवा माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्र ५१:१०) आपण एक शुद्ध हृदय कसे संपादन करू शकतो?
देवाच्या वचनावर “हृदय लावा”
६. मवाबाच्या मैदानांत तळ ठोकलेले असताना, मोशेने इस्राएली लोकांना काय करण्यास आर्जवले?
६ प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याआधी, मवाबाच्या मैदानांत जमा झालेल्या इस्राएलपुत्रांना बोध करताना मोशेने म्हटले: “ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीदाखल सांगत आहे त्यांवर मन लावा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.” (अनुवाद ३२:४६, NW) इस्राएली लोकांना नियमशास्त्रातील सर्व गोष्टींकडे “लक्ष देण्यास” सांगण्यात आले होते. (नॉक्स) देवाच्या नियमांशी पूर्णपणे परिचित होण्याद्वारेच ते हे नियम आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबवू शकत होते.—अनुवाद ६:६-८.
७. देवाच्या वचनावर ‘मन लावण्यात’ काय समाविष्ट आहे?
७ शुद्ध हृदय संपादण्यासाठी आवश्यक असणारी पहिली गोष्ट म्हणजे देवाच्या इच्छेविषयी आणि उद्देशांविषयी अचूक ज्ञान मिळवणे. या ज्ञानाचा केवळ एक स्रोत आहे, अर्थात देवाचे प्रेरित वचन. (२ तीमथ्य ३:१६, १७) पण केवळ पुस्तकी ज्ञान मिळवल्याने आपल्याला यहोवाला संतोषविणारे हृदय संपादन करता येणार नाही. त्या ज्ञानाचा आपल्यावर अंतर्बाह्य परिणाम होण्यासाठी आपण शिकलेल्या गोष्टींवर मन लावले पाहिजे किंवा त्या “हृदयात घेतल्या पाहिजेत.” (अनुवाद ३२:४६, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन) हे आपल्याला कसे करता येईल? स्तोत्रकर्त्या दाविदाने याचा खुलासा केला: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.”—स्तोत्र १४३:५.
८. अभ्यास करताना आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करू शकतो?
८ आपण देखील यहोवाच्या कार्यावर कृतज्ञपणे मनन केले पाहिजे. बायबलचे किंवा बायबलवर आधारित प्रकाशनांचे वाचन करताना पुढील प्रश्नांवर आपण विचार केला पाहिजे: ‘यावरून मला यहोवाविषयी काय शिकायला मिळते? येथे यहोवाचे कोणते गुण दिसून येतात? यहोवाला काय आवडते व काय आवडत नाही या संदर्भात हा वृत्तान्त काय दाखवतो? यहोवाला आवडणाऱ्या मार्गाचे पालन केल्यामुळे काय परिणाम होतात व त्याउलट त्याला न आवडणाऱ्या मार्गाने चालल्यामुळे काय परिणाम होतात? माझ्या पूर्वीच्या ज्ञानाशी या माहितीचा संबंध कसा जोडता येईल?’
९. वैयक्तिक अभ्यास व मनन किती महत्त्वाचे आहे?
९ उद्देशपूर्ण अभ्यास व मनन करण्याच्या महत्त्वाची आपल्याला कशाप्रकारे जाणीव झाली याविषयी बत्तीस वर्षीय लिसा * म्हणते: “१९९४ साली माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर मी जवळजवळ दोन वर्षे सत्यात अतिशय उत्साही होते. मी सर्व ख्रिस्ती सभांना जात होते, दर महिन्यात क्षेत्र सेवेत ३० ते ४० तास खर्च करत होते आणि ख्रिस्ती बंधूभगिनींच्या संगतीचाही आनंद घेत होते. मग मी हळूहळू वाहवत जाऊ लागले. शेवटी तर मी इतक्या खालच्या पातळीला गेले की मी देवाचा नियम तोडला. पण मग माझे डोळे उघडले आणि मी माझा वाईट मार्ग सोडून देण्याचा निश्चय केला. यहोवाने माझा पश्चात्ताप स्वीकारला आणि मला पुन्हा स्वीकारले याबद्दल मला किती आनंद वाटतो! मी बऱ्याचदा विचार करते, की ‘मी अशी का वाहवत गेले?’ या प्रश्नाचं वारंवार मला हेच उत्तर मिळतं की मी उद्देशपूर्ण अभ्यास व मनन करण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. बायबलमधील सत्य माझ्या हृदयापर्यंत पोचलं नव्हतं. आतापासून पुढे अभ्यास व मनन यांना मी जीवनात नेहमी प्राधान्य देईन.” यहोवा, त्याचा पुत्र व त्याचे वचन यांबद्दल आपले ज्ञान वाढत जाण्यासोबतच अर्थपूर्ण चिंतन करण्यासाठीही वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे!
१०. वैयक्तिक अभ्यास व मनन करण्याकरता वेळ काढण्याची इतकी निकड का आहे?
१० सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अभ्यास व मनन करण्याकरता वेळ मिळणे तसे कठीणच आहे. पण आज ख्रिस्ती लोक एक सुरम्य प्रतिज्ञात देशाच्या—देवाच्या नीतिमान नव्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. (२ पेत्र ३:१३) लवकरच “मोठी बाबेल” हिचा नाश व यहोवाच्या लोकांवर ‘मागोगच्या गोगचा’ हल्ला यांसारख्या थरारक घटना घडणार आहेत. (प्रकटीकरण १७:१, २, ५, १५-१७; यहेज्केल ३८:१-४, १४-१६; ३९:२) भविष्यातील घटना कदाचित यहोवावर असलेल्या आपल्या प्रेमाची परीक्षा घेतील. तेव्हा, आताच वेळेचा सदुपयोग करून देवाच्या वचनावर मन लावण्याची अत्यंत निकडीची आवश्यकता आहे!—इफिसकर ५:१५, १६.
‘परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन करण्यासाठी मनाची तयारी करा’
११. आपल्या हृदयाची तुलना जमिनीशी कशी करता येईल?
११ लाक्षणिक हृदयाची तुलना जमिनीशी करता येते; या जमिनीतच सत्याचे बीज पेरले जाते. (मत्तय १३:१८-२३) चांगले पीक मिळण्याकरता सहसा जमिनीची मशागत करावी लागते. त्याचप्रकारे, आपले हृदय देवाच्या वचनाप्रती अधिक ग्रहणशील व्हावे म्हणून ते तयार करणे गरजेचे आहे. एज्रा याजकाने ‘परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा निश्चयच [“मनाची तयारी केली होती,” NW] केला होता.’ (एज्रा ७:१०) आपण मनाची तयारी कशी करू शकतो?
१२. अभ्यासाकरता आपल्या मनाची तयारी करण्याकरता आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?
१२ देवाच्या वचनाचे अध्ययन करण्यापूर्वी मनाची तयारी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मनःपूर्वक प्रार्थना करणे. खऱ्या उपासकांच्या ख्रिस्ती सभांची सुरवात व शेवट प्रार्थनांनी केला जातो. वैयक्तिक बायबल अभ्यासाला बसण्याआधी कळकळीची प्रार्थना करणे व त्यानंतर अभ्यासादरम्यान प्रार्थनापूर्वक मनोवृत्ती कायम ठेवणे योग्यच नाही का?
१३. यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करण्याकरता आपण काय केले पाहिजे?
१३ मुळावलेल्या कल्पना बाजूला सारण्याकरताही लाक्षणिक हृदयाची तयारी करणे आवश्यक आहे. येशूच्या काळातील धर्मपुढारी हेच करायला तयार नव्हते. (मत्तय १३:१५) दुसरीकडे पाहता येशूची आई मरिया हिने ऐकलेल्या सत्य गोष्टींच्या आधारावर आपल्या “अंतःकरणात” निष्कर्ष काढले. (लूक २:१९, ५१) ती येशूची विश्वासू शिष्या बनली. थुवातिरा येथील लुदिया नावाच्या स्त्रीने पौलाचे ऐकून घेतले आणि “तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.” तिने देखील सत्याचा स्वीकार केला. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५) आपण कधीही वैयक्तिक कल्पनांना किंवा प्रिय वाटणाऱ्या धर्म सिद्धान्तांना अवाजवीपणे चिकटून राहू नये. त्याउलट “देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो,” अशी मनोवृत्ती आपण बाळगली पाहिजे.—रोमकर ३:४.
१४. ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्याकरता आपण आपल्या मनाची तयारी कशी करू शकतो?
१४ ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्याकरता मनाची तयारी करणे खासकरून महत्त्वाचे आहे. कधीकधी आपले लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. जर आपण दिवसभर काय काय घडले किंवा उद्या काय काय करायचे आहे याविषयी विचार करत बसलो तर वक्ता जे बोलत आहे त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. जर सभांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा व्हावा असे आपल्याला वाटते तर मग आपण लक्ष देऊन ऐकण्याचा व शिकण्याचा दृढ निर्धार केला पाहिजे. सभेदरम्यान शास्त्रवचनांचा अर्थ समजावून सांगितला जातो; जर आपण तो समजून घेण्याचा मनाशी निश्चय केला तर आपल्याला त्याचा किती फायदा होईल!—नहेम्या ८:५-८, १२.
१५. नम्रतेमुळे आपण अधिक ग्रहणशील कसे होऊ शकतो?
१५ जमिनीत आवश्यक पोषक तत्त्वे घातल्यास ज्याप्रमाणे तिचा कस वाढवता येतो त्याचप्रमाणे नम्रता, आध्यात्मिक गोष्टींची भूक, विश्वासूपणा, देवाचे भय व प्रीती यांसारखे गुण विकसित केले तर आपल्या लाक्षणिक हृदयाची गुणवत्ताही वाढत जाईल. नम्रता आपल्या हृदयाला सौम्य व अधिक ग्रहणशील बनवते. यहूदाचा राजा योशिया याला यहोवाने म्हटले: “तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि . . . जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, . . . व माझ्यासमोर रडलास यामुळे मी तुझी विनंति ऐकली आहे.” (२ राजे २२:१९) योशियाचे हृदय नम्र व ग्रहणशील होते. नम्रतेमुळेच येशूच्या “निरक्षर व अज्ञानी” शिष्यांना, “ज्ञानी आणि विचारवंत” लोकांना न समजू शकलेली आध्यात्मिक सत्ये समजून त्यांचे पालन करता आले. (प्रेषितांची कृत्ये ४:१३; लूक १०:२१) यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करण्याचा प्रयत्न करत असताना आपणही “देवासमोर दीन” व्हावे.—एज्रा ८:२१.
१६. आध्यात्मिक अन्नाची भूक वाढवण्याकरता प्रयत्न का करावे लागतात?
१६ येशूने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असणारे धन्य.” (मत्तय ५:३, NW) आपल्याजवळ आध्यात्मिकतेची उपजत क्षमता आहे पण या दुष्ट जगाकडून येणाऱ्या दबावांमुळे किंवा आळशीपणासारख्या गुणांमुळे कदाचित आपली आध्यात्मिक गरजेची जाणीव मंदावू शकते. (मत्तय ४:४) आध्यात्मिक अन्नाची पुरेशी भूक निर्माण करणे आवश्यक आहे. सुरवातीला जरी आपल्याला बायबल वाचन व वैयक्तिक अभ्यास आनंददायक वाटला नाही तरीसुद्धा आपण तो करत राहिल्यास, हळूहळू ‘विद्या आपल्या जिवाला रम्य वाटेल’ आणि आपण अभ्यासाची उत्सुकतेने वाट पाहायला लागू.—नीतिसूत्रे २:१०, ११.
१७. (अ) यहोवा आपल्या पूर्ण भरवशास का पात्र आहे? (ब) आपण देवावर भरवसा कसा वाढवू शकतो?
१७ राजा शलमोन याने सल्ला दिला: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीतिसूत्रे ३:५) यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणारे हृदय हे जाणून असते की तो आपल्याकडून जी काही अपेक्षा करतो किंवा त्याच्या वचनाद्वारे जे काही मार्गदर्शन करतो ते नेहमी योग्यच असते. (यशया ४८:१७) यहोवा निश्चितच आपल्या पूर्ण भरवशास पात्र आहे. त्याच्या उद्देशानुसार सर्व काही घडवून आणण्यास तो समर्थ आहे. (यशया ४०:२६, २९) किंबहुना त्याच्या नावाचा शब्दशः अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा आहे; यामुळे, त्याने दिलेली सर्व अभिवचने पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे याविषयी आपला आत्मविश्वास वाढतो. तो ‘आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, व आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.’ (स्तोत्र १४५:१७) अर्थात, त्याच्यावर भरवसा विकसित करण्यासाठी, बायबलमधून आपण जे काही शिकतो त्याचे आपल्या वैयक्तिक जीवनात पालन करण्याद्वारे व त्यामुळे होणाऱ्या उत्तम परिणामांवर विचार करण्याद्वारे ‘परमेश्वर किती चांगला आहे याचा आपण अनुभव घेऊन पाहिला पाहिजे.’—स्तोत्र ३४:८.
१८. देवाचे भय आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाप्रती अधिक ग्रहणशील असण्यास कसे मदत करते?
१८ आपल्या हृदयास देवाच्या मार्गदर्शनाप्रती अधिक ग्रहणशील बनवणाऱ्या आणखी एका गुणाविषयी सांगताना शलमोनाने म्हटले: “परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.” (नीतिसूत्रे ३:७) प्राचीन इस्राएलाविषयी यहोवाने म्हटले: “त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.” (अनुवाद ५:२९) होय, जे देवाचे भय धरतात ते त्याच्या आज्ञांचे पालन करतात. ‘जे कोणी सात्विक चित्ताने [परमेश्वराशी] वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात आपले सामर्थ्य प्रगट करण्यास’ व जे त्यांच्या आज्ञांची अवहेलना करतात त्यांना शिक्षा देण्यास तो समर्थ आहे. (२ इतिहास १६:९) देवाला नाखूष करण्याची आदरयुक्त भीती आपल्या सर्व कृती, विचार व भावना यांवर नियंत्रण करो.
‘परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने प्रीति कर’
१९. यहोवाच्या मार्गदर्शनाप्रती आपले हृदय अधिक ग्रहणशील बनवण्यात प्रीतीची काय भूमिका आहे?
१९ इतर सर्व गुणांपेक्षा प्रीती हा असा गुण आहे जो आपल्या हृदयाला यहोवाच्या मार्गदर्शनाप्रती खऱ्या अर्थाने ग्रहणशील बनवतो. एखादी व्यक्ती पूर्ण हृदयाने देवावर प्रीती करते तेव्हा तिला देवाला कोणत्या गोष्टी आवडतात व कोणत्या आवडत नाहीत हे शिकून घेण्याची उत्सुकता वाटते. (१ योहान ५:३) येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) देवाच्या चांगुलपणाविषयी विचार करण्याची सवय लावण्याद्वारे, त्याच्याशी एका घनिष्ठ मित्राप्रमाणे नियमितपणे बोलण्याद्वारे आणि त्याच्याविषयी इतरांशी उत्साहीपणे बोलण्याद्वारे आपण देवाबद्दल आपली प्रीती अधिक वाढवू या.
२०. यहोवाच्या मनासारखे हृदय आपण कसे संपादन करू शकतो?
२० थोडक्यात उजळणी करू या: यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करण्याकरता देवाच्या वचनाला आपल्या आंतरिक व्यक्तीवर अर्थात हृदयातील गुप्त मनुष्यपणावर प्रभाव पाडू देणे समाविष्ट आहे. अर्थपूर्ण वैयक्तिक अभ्यास आणि कृतज्ञतापूर्वक मनन करणे अनिवार्य आहे. हे यशस्वीरित्या करण्याकरता हृदयाची तयारी केली पाहिजे: अर्थात आपल्या हृदयातून मुळावलेल्या कल्पना दूर करून आपल्याला अधिक ग्रहणशील बनवणाऱ्या गुणांनी आपले अंतःकरण भरले पाहिजे. होय, यहोवाच्या मदतीने आपण एक चांगले हृदय संपादन करू शकतो. पण आपल्या हृदयाचे रक्षण करण्याकरता आपण कोणती काळजी घेऊ शकतो?
[तळटीप]
^ नावे बदलण्यात आली आहेत.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• यहोवा ज्याचे परीक्षण करतो, ते लाक्षणिक हृदय म्हणजे नेमके काय?
• आपण देवाच्या वचनावर कशाप्रकारे ‘मन लावू’ शकतो?
• देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता आपण कशाप्रकारे आपल्या मनाची तयारी करू शकतो?
• ही माहिती विचारात घेतल्यानंतर तुम्हाला काय करण्याची प्रेरणा मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चित्र]
दावीद कृतज्ञतेने आध्यात्मिक गोष्टींविषयी मनन करीत होता. तुम्ही असे करता का?
[१८ पानांवरील चित्रे]
देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याआधी आपल्या मनाची तयारी करा