हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
दियाबलाचा असा दावा आहे की तो सर्व लोकांना देवाकडे पाठ फिरवण्यास लावू शकतो; आणि तो असे करण्यात यशस्वी ठरत आहे असे काही वेळा भासलेही असावे. हाबेल याच्या मृत्यूनंतर जवळजवळ पाच शतकांपर्यंत, यहोवाचा विश्वासू सेवक म्हणून कोणाचाही खास उल्लेख आढळत नाही. उलट, पापपूर्ण व अधार्मिक आचरण अगदी सर्वसामान्य बनले होते.
याच आध्यात्मिक अवनतीच्या काळात हनोख हयात होता. बायबलच्या कालगणनेनुसार त्याचा जन्म सा.यु.पू. ३४०४ साली झाला. आपल्या समकालीन लोकांप्रमाणे न होता, हनोख देवाला स्वीकारणीय होता. ख्रिस्ती लोकांकरता विश्वासाची अनुकरणीय उदाहरणे बनलेल्या यहोवाच्या सेवकांमध्ये प्रेषित पौलाने हनोखचाही उल्लेख केला. हनोख कोण होता? त्याला कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले असेल? त्याने ही आव्हाने कशी पेलली? आणि त्याच्या विश्वासूपणावरून आपण काय शिकू शकतो?
हनोखच्या काळाच्या जवळजवळ चार शतकांआधी, अनोशच्या काळात “लोक परमेश्वराचे नाव घेऊ लागले.” (उत्पत्ति ४:२६, NW) देवाच्या नावाचा उपयोग मनुष्याच्या इतिहासाच्या अगदी सुरवातीपासूनच होता. त्याअर्थी, अनोशच्या काळापासून लोक विश्वासाने, खऱ्या उपासनेकरता यहोवाचे नाव घेऊ लागले असे म्हणता येणार नाही. काही इब्री विद्वानांचे असे म्हणणे आहे की उत्पत्ति ४:२६ येथे खरे तर, अनोशच्या काळात लोक “परमेश्वराच्या नावाची विटंबना करू लागले” किंवा तेव्हापासून देवाच्या नावाची “विटंबना सुरू झाली” असे असले पाहिजे. कदाचित त्या काळात लोकांनी स्वतःला किंवा ज्यांच्याद्वारे ते देवाची उपासना करण्याचा दावा करत होते अशा इतर मानवांना यहोवाचे नाव देण्यास सुरवात केली असावी. किंवा त्यांनी आपल्या मूर्तींना त्याचे नाव दिले असावे.
“हनोख देवाबरोबर चालला”
हनोखच्या काळात सर्वत्र अधार्मिकतेचे वातावरण असूनही तो ‘खऱ्या देवाबरोबर, यहोवाबरोबर चालला.’ त्याचे पूर्वज शेथ, अनोश, केनान, महललेल आणि यारेद यांच्याविषयी असे म्हटलेले नाही. निश्चितच ते हनोखाप्रमाणे तितक्याच विश्वासूपणे देवाबरोबर चालले नाहीत; हनोखाच्या जीवनमार्गाने त्याला त्यांच्यापेक्षा वेगळे असल्याचे दाखवले.—उत्पत्ति ५:३-२७.
हनोख यहोवाबरोबर चालला या वाक्यांशावरून त्याचा देवासोबत घनिष्ट संबंध होता असे सूचित होते. असा संबंध, जो केवळ देवाच्या इच्छेनुरूप जीवन व्यतीत केल्यामुळे शक्य झाला. हनोखच्या उपासनेला यहोवाने संमती दिली. ग्रीक सेप्टुअजिंट यामध्ये तर असे म्हटले आहे की “हनोख देवाला संतोषवीत असे.” हेच प्रेषित पौलानेही म्हटले होते.—उत्पत्ति ५:२२; इब्री लोकांस ११:५.
यहोवासोबत हनोखच्या घनिष्ट संबंधाच्या मुळाशी होता त्याचा विश्वास. हनोखने देवाच्या ‘स्त्रीच्या’ प्रतिज्ञात ‘संततीवर’ विश्वास ठेवला असेल. हनोखचे आदामाशी वैयक्तिक संबंध असल्यास त्याच्याकडून कदाचित हनोखने, एदेन बागेत पहिल्या मानवी दांपत्याशी देवाने कशाप्रकारे व्यवहार केला हे जाणून घेतले असेल. देवाविषयी हनोखला असलेल्या ज्ञानाच्या आधारावर तो ‘त्याचा शोध झटून करणारा’ होऊ शकला.—उत्पत्ति ३:१५; इब्री लोकांस ११:६, १३.
हनोखच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्याबाबतीत म्हणा, यहोवाशी चांगला संबंध असण्याकरता त्याच्याविषयी केवळ ज्ञान असून चालत नाही. एखाद्या व्यक्तीशी आपले जवळचे
संबंध असतील तर साहजिकच आपले विचार व कृती त्या व्यक्तीच्या विचारांनी प्रभावित होत नाहीत का? ज्यांमुळे या व्यक्तीसोबत आपले संबंध बिघडू शकतील असे शब्द व कृती आपण आवर्जून टाळतो. तसेच, जीवनावर प्रभाव पाडणारे कोणतेही निर्णय घेण्याआधी, आपल्या मैत्रीवर या निर्णयाचा कसा प्रभाव पडेल याचा आपण विचार करत नाही का?त्याचप्रकारे, देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवायचा असेल तर आपल्या कृतींवर याचा नक्कीच परिणाम होईल. सर्वप्रथम त्याला काय पसंत आहे व नाही याविषयी अचूक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हे ज्ञान मिळाल्यावर आपण त्याच्या मार्गदर्शनानुसार चालले पाहिजे, अर्थात आपल्या विचारांतून व कृतींतून नेहमी त्याचे मन संतुष्ट करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.
होय, देवाबरोबर चालण्यासाठी आपण त्याला संतुष्ट केले पाहिजे. हेच हनोखने शेकडो वर्षे केले. देवासोबत “चालला” यातील इब्री क्रियापदाचे रूप एका वारंवार होणाऱ्या अखंड कृतीला सूचित करते. ‘देवाबरोबर चाललेला’ आणखी एक विश्वासू मनुष्य होता नोहा.—उत्पत्ति ६:९.
हनोखचे कुटुंब होते. त्याला पत्नी तसेच “मुलगे व मुली” होत्या. त्याच्या एका मुलाचे नाव मथुशलह होते. (उत्पत्ति ५:२१, २२) आपल्या घराण्याची चांगल्याप्रकारे देखभाल करण्यासाठी हनोखने निश्चितच आपल्या परीने होईल तितका प्रयत्न केलाच असेल. सर्वत्र अधार्मिकपणा असल्यामुळे साहजिकच देवाची सेवा करणे त्याला सोपे गेले नसेल. कदाचित नोहाचा पिता लामेख हा यहोवावर विश्वास ठेवणारा हनोखचा एकच समकालीन असावा. (उत्पत्ति ५:२८, २९) तरीसुद्धा हनोखने निर्भयपणे खरी उपासना केली.
देवाला विश्वासू राहण्याकरता हनोखला कशामुळे मदत झाली? निश्चितच त्याने यहोवाच्या नावाची विटंबना करणाऱ्यांसोबत किंवा देवाच्या उपासकांनी ज्यांच्या सहवासात राहू नये अशा कोणाशीही जवळीक केली नाही. प्रार्थनेद्वारे यहोवाकडे मदत मागितल्यामुळे, आपल्या निर्माणकर्त्याला आवडणार नाही असे काहीही न करण्याचा हनोखचा निर्धार अधिकच दृढ झाला असेल.
अधार्मिकांविरुद्ध भविष्यवाणी
आपल्या भोवती सर्वत्र अधार्मिक लोक असताना स्वतः उच्च नैतिक आदर्शांनुसार वागणे कठीणच आहे. पण यासोबत, हनोख या दुष्टांवर येणार असलेल्या नाशाचा यहूदा १४, १५.
न बदलणारा असा संदेश देखील घोषित करत होता. देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार हनोखने ही भविष्यवाणी घोषित केली: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”—या संदेशाचा त्या काळातील अनैतिक व देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांवर काय परिणाम झाला असावा? नक्कीच, या ज्वलंत संदेशामुळे हनोखने त्या लोकांचा रोष ओढवला असेल; त्यांनी त्याची थट्टा केली असेल, त्याला टोमणे मारले असतील व धमक्या दिल्या असतील. काहींनी तर त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला असेल. पण हनोख घाबरला नाही. धार्मिक हाबेलाला कशाप्रकारे मारण्यात आले हे त्याला माहीत होते आणि त्याच्याप्रमाणेच, कोणत्याही परिस्थितीत देवाची सेवा करण्याचा हनोखचा दृढनिश्चय होता.
“देवाने त्याला नेले”
कदाचित हनोखच्या जीवाला धोका असल्यामुळे “देवाने त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४) त्या निर्दयी शत्रूंच्या जुलमापासून यहोवाने आपल्या विश्वासू संदेष्ट्याला बचावले. प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले.” (इब्री लोकांस ११:५) बरेचजण म्हणतात की हनोख कधी मेलाच नाही—त्याला देवाने स्वर्गात नेले व तेथे तो जिवंत राहिला. पण येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले की “स्वर्गातून उतरलेला . . . जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीहि स्वर्गात चढून गेला नाही. स्वर्गात जाणाऱ्या सर्वांचा येशू “अग्रगामी” होता.—योहान ३:१३; इब्री लोकांस ६:१९, २०.
मग हनोखला नेमके काय झाले? ‘मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून लोकांतरी नेण्याचा’ कदाचित असा अर्थ असू शकतो की देवाने हनोखला भविष्यसूचक दृष्टान्ताच्या समाधीत घातले आणि त्याच अवस्थेत असताना त्याचे जीवन संपुष्टात आणले. यामुळे हनोखला वेदनारहित मृत्यू आला. मग “तो सापडला नाही,” कारण यहोवाने मोशेच्या मृतदेहाप्रमाणेच, हनोखच्या मृतदेहाची देखील विल्हेवाट लावली असावी.—अनुवाद ३४:५, ६.
हनोख ३६५ वर्षे जगला. त्याच्या काळातील बऱ्याच लोकांच्या तुलनेत त्याचे आयुष्य कमी होते. पण यहोवावर प्रीती करणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत त्याची विश्वासूपणे सेवा करणे. हनोखने विश्वासूपणे यहोवाची सेवा केली असे आपण म्हणू शकतो कारण, “लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.” हे यहोवाने हनोखला नेमके कसे कळवले ते शास्त्रवचनांत सांगितलेले नाही. पण मृत्यू होण्याआधी हनोखला देवाच्या संमतीची खात्री देण्यात आली आणि आपण खात्रीने म्हणू शकतो की पुनरुत्थानात यहोवा त्याची आठवण जरूर करेल.
हनोखच्या विश्वासाचे अनुकरण करा
देवाची सेवा करणाऱ्यांच्या विश्वासाचे आपण अनुकरण केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:७) हनोख त्याच्या विश्वासामुळेच देवाचा पहिला विश्वासू संदेष्टा म्हणून सेवा करू शकला. आपल्या या जगासारखेच हनोखच्या काळातील जग हिंसक, भ्रष्ट आणि अधार्मिक होते. हनोख मात्र वेगळा होता. त्याचा विश्वास खरा होता आणि देवाच्या उपासनेत त्याने आपल्याकरता कित्ता घालून दिला. होय, यहोवाने त्याला एक महत्त्वाचा न्यायदंड घोषित करण्याचे काम सोपवले होते, पण हे कार्य करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याने पुरवली. देवाने नेमलेले कार्य हनोखने निर्भयपणे पार पाडले आणि देवाने त्याच्या शत्रूंपासून त्याचे संरक्षण केले.
आपणही हनोखसारखाच विश्वास प्रकट केला तर यहोवा या शेवटल्या दिवसांत त्याचा संदेश घोषित करण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याला पुरवेल. तो आपल्याला निर्भयपणे विरोधाचा सामना करण्यास मदत करेल आणि आपली ईश्वरी भक्ती आपल्याला अधार्मिक लोकांपासून वेगळे शाबीत करेल. विश्वासामुळे आपण देवाबरोबर चालू शकू आणि त्याला संतोष वाटेल अशाप्रकारे आपण वागू शकू. (नीतिसूत्रे २७:११) विश्वासामुळेच धार्मिक हनोख एका अधार्मिक जगात यहोवाबरोबर चालू शकला, आणि आपणही असे करू शकतो.
[३० पानांवरील चौकट]
बायबलमध्ये हनोखच्या पुस्तकातील उतारे आहेत का?
हनोखचे पुस्तक बायबलच्या मूळ पुस्तकांच्या यादीत समाविष्ट नसलेले एक पुस्तक असून त्याच्या लेखकाविषयीही संभ्रम आहे. हे पुस्तक हनोखने लिहिले हा दावा खोटा आहे. कदाचित सा.यु.पू. दुसऱ्या आणि पहिल्या शतकांदरम्यान हे पुस्तक लिहिलेले असून यात अतिशयोक्तीची व अनैतिहासिक यहुदी कथा आहेत. हे अर्थातच उत्पत्तीच्या पुस्तकात हनोखविषयी दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारावर केलेले काल्पनिक विवरण आहे. देवाच्या प्रेरित वचनावर प्रीती करणाऱ्यांकरता या पुस्तकाची दखल न घेण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत.
बायबलमध्ये केवळ यहूदाच्या पुस्तकातच हनोखची ही भविष्यवाणी आढळते: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) बऱ्याच विद्वानांचे असे म्हणणे आहे की हनोखने त्याच्या काळातील अधार्मिकांविरुद्ध केलेली भविष्यवाणी थेट हनोखच्या पुस्तकातून उद्धृत केलेली आहे. पण यहूदाने बायबलच्या प्रेरित पुस्तकांच्या यादीत नसलेल्या एका अविश्वसनीय पुस्तकाचा आधार घेतला असेल का?
यहूदाला हनोखच्या या भविष्यवाणीविषयी कोठून माहिती मिळाली हे शास्त्रवचनांमध्ये स्पष्ट केलेले नाही. कदाचित त्याने एखाद्या सर्वपरिचित ग्रंथातून, जुन्या काळातील विश्वसनीय परंपरागत माहितीच्या आधारावर हे शब्द उद्धृत केले असावेत. याच आधारावर कदाचित पौलानेही फारोच्या दरबारात मोशेचा विरोध करणाऱ्या जादुगारांची नावे यान्नेस व यांब्रेस असल्याचे सांगितले; इतरत्र कोठेही त्यांची नावे आढळत नाही. जर हनोखचे पुस्तक लिहिणाऱ्याला त्याच्याविषयी कोणत्यातरी प्राचीन साहित्यावरून माहिती मिळाली तर मग यहूदाला ती मिळाली नसेल असे कशावरून म्हणता येईल? *—निर्गम ७:११, २२; २ तीमथ्य ३:८.
हनोखने अधार्मिकांना दिलेल्या संदेशाविषयी यहूदाला कोठून माहिती मिळाली ही बाब महत्त्वाची नाही. ही माहिती विश्वसनीय आहे असे आपण खात्रीने म्हणू शकतो कारण यहूदाने देवाच्या प्रेरणेने लिखाण केले. (२ तीमथ्य ३:१६) खरे नसलेले कोणतेही विधान करण्यापासून देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला रोखले.
[तळटीप]
^ शिष्य स्तेफन याने देखील बायबलमध्ये इतरत्र कोठेही न आढळणारी माहिती दिली. उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये मोशेला मिळालेले शिक्षण, इजिप्त सोडून जाताना तो ४० वर्षांचा असणे, मिद्यानातील त्याचा ४० वर्षांचा मुक्काम आणि मोशेचे नियमशास्त्र बहाल करण्यात स्वर्गदूतांची भूमिका.—प्रेषितांची कृत्ये ७:२२, २३, ३०, ३८.
[३१ पानांवरील चित्र]
हनोखने यहोवाचा संदेश निर्भयपणे घोषित केला