पवित्र आत्म्याला मी माझा कैवारी केला आहे का?
पवित्र आत्म्याला मी माझा कैवारी केला आहे का?
तत्त्ववेत्त्यांना देवाचा पवित्र आत्मा म्हणजे काय आहे हे नेमके ठाऊक नाही. सामान्य लोकांचेही निरनिराळे समज आहेत. काहीजण म्हणतात की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, तर काहींचे आणखीन काही विचार आहेत. परंतु, आपण गोंधळून जाण्याची गरज नाही. कारण बायबलमध्ये पवित्र आत्मा नेमका काय आहे याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे. त्यात सांगितले आहे की पवित्र आत्मा व्यक्ती नसून देवाची प्रबळ, कार्यकारी शक्ती आहे; तिच्याद्वारे देव आपली इच्छा पूर्ण करतो.—स्तोत्र १०४:३०; प्रेषितांची कृत्ये २:३३; ४:३१; २ पेत्र १:२१.
देवाच्या इच्छा आणि उद्देशांना पूर्ण करण्यामध्ये पवित्र आत्मा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. म्हणूनच आपण त्याच्या मार्गदर्शनानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला आपण आपला कैवारी (अर्थात सहायक, मदतनीस) बनवले पाहिजे.
कैवारी कशाला?
येशूचे पृथ्वीवरील जीवन संपण्याआधी त्याने आपल्या शिष्यांना अशी हमी दिली की, “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी . . . देईल. अशासाठी की त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा राहावे.” नंतरही तो असे म्हणाला: “तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.”—योहान १४:१६, १७; १६:७.
“तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा” अशी सूचना देऊन येशूने आपल्या शिष्यांवर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली. (मत्तय २८:१९, २०) हे काही सोपे काम नव्हते कारण हे काम करताना त्यांना कडव्या विरोधाला सामोरे जावे लागणार होते.—मत्तय १०:२२, २३.
बाहेरच्या लोकांकडून तर विरोध होणारच होता पण मंडळीत देखील फूट पडणार होती. सा.यु. ५६ च्या सुमारास रोममधील ख्रिश्चनांना पौलाने लिहिले: “आता बंधुजनहो, मी तुम्हाला विनंती करितो की, तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरूद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.” (रोमकर १६:१७, १८) प्रेषितांच्या मृत्यूनंतर विरोध आणखी वाढणार होता. म्हणून पौलाने असा इशारा दिला: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.
या अडथळ्यांवर मात करण्यासाठी देवाची मदत लागणार होती. आणि ही मदत देवाने येशूद्वारे दिली. येशूच्या पुनरुत्थानानंतर, सा.यु. ३३, पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्याचे जवळजवळ १२० अनुयायी “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.”—प्रेषितांची कृत्ये १:१५; २:४.
त्या वेळी शिष्यांच्या लक्षात आले की, त्यांना मिळालेला पवित्र आत्मा हीच ती मदत होती जिच्याविषयी येशूने त्यांना वचन दिले होते. तेव्हा, “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल” या येशूच्या शब्दांचा खुलासा त्यांना झाला. (तिरपे वळण आमचे.) (योहान १४:२६) येशूने त्याला “कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा” असेही म्हटले होते.—योहान १५:२६.
पवित्र आत्मा कैवारी कसा?
हा आत्मा विविध पद्धतींनी कैवारी ठरणार होता. सर्वात पहिली गोष्ट, येशू म्हणाला होता की, हा आत्मा शिष्यांना त्याने सांगितलेल्या गोष्टींची आठवण करून देणार होता. याचा अर्थ योहान १६:१२-१४) थोडक्यात सांगायचे म्हणजे, हा आत्मा शिष्यांना सत्याची चांगली समज घडवून देणार होता. प्रेषित पौलाने नंतर असे लिहिले की, “देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.” (१ करिंथकर २:१०) हे अचूक ज्ञान इतरांना देता येण्यासाठी येशूच्या अभिषिक्त अनुयायांना स्वतःला ते आधी चांगले समजायला हवे होते.
फक्त त्याचे शब्द त्यांना आठवणार होते असे नाही. तर येशूने शिकवलेल्या गोष्टींचा गहन अर्थ आणि महत्त्व त्यांना समजण्यासाठी हा आत्मा त्यांची मदत करणार होता. (दुसरी गोष्ट म्हणजे, येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली आणि तीही नियमितपणे. पण प्रार्थनेत नेमके काय म्हणावे हे कळत नसल्यावर हा आत्मा त्यांच्या वतीने बोलणार होता किंवा त्यांना मदत करणार होता. “तसेच [आत्मा] आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो.”—रोमकर ८:२६.
तिसरी गोष्ट म्हणजे, पवित्र आत्मा येशूच्या शिष्यांना जाहीरपणे सत्याची घोषणा करण्यासाठी साहाय्य करणार होता. येशूने त्यांना असा इशारा दिला: “ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हाला फटके मारतील, आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करितील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हास सुचविले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.”—मत्तय १०:१७-२०.
पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीची खरी ओळख देण्यास मदत करणार होता आणि मंडळीच्या सदस्यांना जीवनात योग्य निर्णय घेण्यासही प्रेरणा देणार होता. या दोन गोष्टींची आपण आणखी सविस्तर चर्चा करू आणि त्याचे आज आपल्याकरता काय महत्त्व आहे ते पाहू या.
ओळखचिन्ह
यहुदी लोक देवाचे निवडलेले खास लोक होते आणि अनेक शतकांपासून मोशेच्या नियमशास्त्राधीन होते. पण त्यांनी येशूला मशीहा म्हणून नाकारल्यामुळे त्यांना देखील नाकारले जाईल असे येशू म्हणाला. तो म्हणाला: “‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४२, ४३) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हा ख्रिस्ताचे अनुयायी ‘फळ देणारे राष्ट्र’ बनले. तेव्हापासून, ही मंडळी देवाच्या दळणवळणाचे माध्यम बनली. देवाची कृपा आता वेगळ्या माध्यमाने दाखवली जाते हे लोकांना कळावे म्हणून देवाने एक स्पष्ट ओळखचिन्ह देऊ केले.
पेन्टेकॉस्टच्या दिवशी, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने शिष्य वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. या भाषा त्यांनी आधी कधीच शिकल्या नव्हत्या. त्यामुळे, पाहणारे लोक आश्चर्याने थक्क होऊन विचारू लागले: “आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?” (प्रेषितांची कृत्ये २:७, ८) अन्य भाषांमध्ये बोलत असलेले पाहून तसेच “प्रेषितांच्या हातून [घडणारी] पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे” पाहून सुमारे तीन हजार लोकांना याची खातरी पटली की देवाचा आत्मा खरोखरच कार्य करत होता.—प्रेषितांची कृत्ये २:४१, ४३.
तसेच, ख्रिस्ताच्या शिष्यांनी प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही ‘आत्म्याची फळे’ दाखवून आपण देवाचे सेवक आहोत हे स्पष्ट केले. (गलतीकर ५:२२, २३) प्रीती हा तर खऱ्या ख्रिस्ती मंडळीचा सर्वात प्रमुख गुण होता. येशूने असे सांगितले होते: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५.
सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारून त्याच्याद्वारे मिळणाऱ्या मदतीचा फायदा घेतला. आज ख्रिश्चनांना हे माहीत आहे की, पहिल्या शतकात देव मृतांचे पुनरुत्थान करत होता तसे तो आता करत नाही आणि चमत्कारही घडवून आणत नाही. म्हणूनच, देवाच्या आत्म्याच्या फळाद्वारे ते येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य असल्याची ओळख पटवतात.—१ करिंथकर १३:८.
व्यक्तिगत निर्णय घेण्यासाठी कैवारी
पवित्र आत्म्याच्या मदतीनेच बायबलचे लिखाण केले गेले आहे. त्यामुळे बायबलमधील गोष्टी ऐकायला आपण तयार होतो तेव्हा अक्षरशः पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन देत २ तीमथ्य ३:१६, १७) त्याच्या मदतीने आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. पण त्याची मदत आपण घेतो का?
असतो. (आपण एखाद्या उद्योगाची किंवा नोकरीची निवड करतो तेव्हा ती यहोवाच्या दृष्टिकोनांशी सुसंगत आहे का हे पाहण्यास पवित्र आत्मा आपल्याला मदत करील. कारण आपले काम हे बायबलमधील तत्त्वांच्या एकवाक्यतेत आणि ईश्वरशासित ध्येये गाठायला मदत होणारे असावयास हवे. नोकरीचा पगार किंवा नोकरीमुळे मिळणारे सन्मानाचे आणि महत्त्वाचे स्थान या गोष्टी खऱ्या तर इतक्या महत्त्वाच्या नाहीत. पण आपल्या नोकरीमुळे आपल्या दररोजच्या गरजा भागून ख्रिस्ती जबाबदाऱ्या पार पाडायला आपल्याकडे पुरेसा वेळ किंवा संधी आहे का हे जास्त महत्त्वाचे आहे.
आपले जीवन आरामदायी असावे असे वाटणे अगदी साहजिक आहे. यात काहीच गैर नाही. (उपदेशक २:२४; ११:९) त्यामुळे समतोल राखणारा ख्रिस्ती, विरंगुळ्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी मनोरंजन करील. पण त्याने आत्म्याच्या फळाच्या एकवाक्यतेत असलेलेच मनोरंजन निवडावे, “देहाची कर्मे” असलेले नव्हे. पौल म्हणतो: “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी.” आपण “पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे” देखील होऊ नये.—गलतीकर ५:१६-२६.
मित्रमैत्रिणींची निवड करतानाही हेच तत्त्व लागू होते. आपण फक्त वरवरचे स्वरूप किंवा संपत्ती पाहून मित्रमैत्रिणी निवडू नयेत तर त्यांची आध्यात्मिकता पाहून त्यांची निवड करणे सुज्ञपणाचे आहे. दावीदाच्या बाबतीत पाहू जाता, तो निश्चितच देवाचा मित्र होता कारण “दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे” असे देवाने म्हटले होते. (प्रेषितांची कृत्ये १३:२२) देवाने दावीदाचे बाह्य स्वरूप न पाहता त्याला इस्राएलचा राजा नियुक्त केले. कारण देवाचे तत्त्व असे होते: “मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.
बाह्यरूप पाहून किंवा संपत्ती पाहून केलेली मैत्री फार काळ टिकत नाही. रूप आणि धन जसे क्षणभंगुर आहे तशीच यावर आधारलेली मैत्रीही क्षणभंगुर ठरते. (नीतिसूत्रे १४:२०) म्हणून देवाच्या आत्म्याने प्रेरित केलेल्या वचनात म्हटले आहे की, अशांशी मैत्री करावी जे आपल्याला यहोवाची सेवा करण्यात मदत करतील. ते म्हणते की, घेण्यावर आपला जास्त जोर असू नये तर देण्यावर असावा कारण देण्यात जास्त धन्यता आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपल्या मित्रांना, आपण वेळ आणि जिव्हाळा या सर्वात मूल्यवान गोष्टी देऊ शकतो.
विवाहाचा विचार करणाऱ्या ख्रिश्चनासाठीसुद्धा बायबलमध्ये आत्म्याने प्रेरित केलेला सल्ला आहे. ते जणू म्हणते: ‘चेहरा किंवा रूप पाहून भाळू नका. तर पाय पाहा.’ काय? पाय? होय, पायच. या अर्थाने की, ज्या व्यक्तीला तुम्ही आपला जीवनसाथी बनविणार आहात ती व्यक्ती सुवार्ता सांगण्याचे यहोवाने सोपविलेले काम करण्यास आपल्या पायांचा उपयोग करत आहे का? असे पायच यहोवाच्या नजरेत मनोरम आहेत. तसेच, सत्याचा संदेश आणि शांतीच्या सुवार्तेच्या वहाणा त्या पायांमध्ये चढवल्या आहेत का? बायबल म्हणते: “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.”—यशया ५२:७; इफिसकर ६:१५.
आपण सध्या ‘शेवटल्या काळातल्या कठीण दिवसांमध्ये’ जगत असल्यामुळे देवाच्या इच्छेनुसार करण्यासाठी आपल्याला मदतीची नितांत गरज असते. (२ तीमथ्य ३:१) पहिल्या शतकात, कैवाऱ्याने अर्थात देवाच्या पवित्र आत्म्याने ख्रिश्चनांच्या कार्याला जबरदस्त पाठिंबा दिला; एवढेच नव्हे तर त्याने त्यांना व्यक्तिगत मदत देखील दिली. पवित्र आत्म्याद्वारे लिहिलेल्या देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केला तर आपणही पवित्र आत्म्याला आपला व्यक्तिगत कैवारी बनवू शकू. आपण तसा प्रयत्न केला आहे का?
[२३ पानांवरील चित्र]