भारतात बायबल अभ्यासाद्वारे विश्वास मजबूत करणे
आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत
भारतात बायबल अभ्यासाद्वारे विश्वास मजबूत करणे
उत्तरेकडील गगनाला भिडणाऱ्या बर्फाळ हिमशिखरांपासून ते दक्षिणेकडील फेसाळ किनाऱ्यांच्या हिंदी महासागरापर्यंत विविधतेने नटलेला असा भारत देश. येथील लोकजीवन, हवामान, धर्म यांत देखील विविधता आढळते. भारताची एकूण लोकसंख्या शंभर कोटीपेक्षा अधिक आहे. त्यांपैकी ८३ टक्के हिंदू, ११ टक्के मुस्लिम तर बाकीचे ख्रिस्ती, शीख, बौद्ध व जैन धर्मीय आहेत. सर्वांना धर्माचे स्वातंत्र्य आहे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “धर्म हा भारतीय लोकांच्या नसानसात आहे.”
भारतात, २१,२०० यहोवाचे साक्षीदारही आहेत. हे साक्षीदार काटेकोरपणे आपल्या ख्रिस्ती विश्वासांचे पालन करतात. इतर देशांतील यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणेच यांनाही, देवाचे वचन, बायबलवर विश्वास ठेवण्यास लोकांना मदत करायला आवडते. (२ तीमथ्य ३:१६, १७) दक्षिण भारतातील चेन्नई येथे एका कुटुंबाला बायबल सत्याचे ज्ञान कसे प्राप्त झाले ते पाहा.
या कुटुंबातील सगळेजण कॅथलिक चर्चचे सदस्य होते. आणि चर्चच्या प्रत्येक कार्यात ते अगदी उत्साहाने भाग घ्यायचे. इतकेच नव्हे तर आपल्याला दृष्टांत दिसतात व निरनिराळ्या भाषा बोलण्याचे दान मिळाले आहे असा त्यांचा दावा होता. ते लोकांचे आजार देखील बरे करायचे. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना चर्चमध्ये व समाजामध्ये आदराचे स्थान होते. त्यांच्या कुटुंबातील काहींना लोक “स्वामी” म्हणायचे. एक दिवस यहोवाच्या साक्षीदाराने त्यांची भेट घेतली. आणि येशू ख्रिस्त हा देव नसून देवाचा पुत्र आहे, तसेच खऱ्या देवाचे नाव यहोवा आहे, व लवकरच या पृथ्वीला सुंदर बगीच्यासमान बनवण्याचा त्याचा उद्देश आहे हे त्याने त्यांना बायबलमधून दाखवले.—स्तोत्र ८३:१८; लूक २३:४३; योहान ३:१६.
या कुटुंबाला बायबलबद्दल आदर असल्यामुळे साक्षीदाराने बायबलमधून दाखवलेल्या सर्व गोष्टी त्यांना आवडल्या. ते नियमितरीत्या बायबलचा अभ्यास करायला तयार झाले. यामुळे चर्चमधील लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. पण या कुटुंबाने बायबल अभ्यास सोडला नाही. जसजसे त्यांचे बायबलचे ज्ञान वाढत गेले तसतसा त्यांचा विश्वास मजबूत होत गेला आणि त्यांनी सर्व खोट्या धार्मिक प्रथा सोडून दिल्या. आज, या कुटुंबातील आई, मुलगी आणि जावई आवेशी व बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार आहेत. आणि आई, तिला जमेल तेव्हा पायनियरींगही करते.
अडथळ्यांवर मात करणारा विश्वास
पंजाबच्या एका खेडेगावात सुंदर लाल नावाचा एक तरुण यहोवाचा साक्षीदार राहतो. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हे त्याच्याकरता एक आव्हान होते. आणि त्याकरता दृढ विश्वास आणि धैर्याची आवश्यकता होती. (मत्तय २४:१४) का? एक कारण म्हणजे त्याने कुटुंबाच्या आणि आपल्या गावच्या रितीरिवाजानुसार चालत आलेली अनेक ईश्वरांची भक्ती करण्याचे सोडून दिले होते. व तो आता एका खऱ्या देवाची अर्थात यहोवाची उपासना करत होता. आणि दुसरे कारण म्हणजे, त्याला पाय नव्हते.
सन १९९२ पर्यंत सुंदर लालचे जीवन सुरळीत चालले होते. एका दवाखान्यात तो डॉक्टरचा सहकारी म्हणून काम करत होता. पण एकदा, रेल्वे रूळ ओलांडत असताना तो अडखळून खाली पडला. इतक्यात जवळ आलेल्या ट्रेनखाली त्याचे मांडीपासून दोन्ही पाय कापले गेले. त्याचं तर जणू आयुष्य तिथंच थांबलं. तो इतका निराश झाला होता, की आत्महत्या करायचा विचारही त्याच्या मनात आला होता. त्याच्या कुटुंबाने त्याला आधार दिला खरा, पण
आपले आयुष्य आता अर्थहीन आहे असे त्याला सतत वाटत राहिले.मग एके दिवशी यहोवाच्या साक्षीदाराची सुंदर लालशी भेट झाली. त्याने त्याला बायबलमधून दाखवले की, देव लवकरच या पृथ्वीला सुंदर बगीचासमान बनवणार आहे, आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना उत्तम आरोग्य देणार आहे. हे ऐकून सुंदर लालने बायबलचा अभ्यास करण्याची तयारी दाखवली. एका वर्षात त्याने अभ्यास पूर्णही केला. त्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. आपल्या एका मित्राच्या सायकलवर मागे बसून तो सभेला गेला. जाताना त्याला खूप त्रास झाला खरा पण सभेच्या शेवटी त्याला वाटले, की आपल्या येण्याचे काही तरी सार्थक झाले. बायबलचा व्यक्तिगत अभ्यास करताना तो ज्या गोष्टी शिकला होता त्या गोष्टी किती सत्य आहेत हे त्याला पटले. देवाच्या वचनातील अभिवचनांवर विश्वास करणारे व बायबलच्या शिकवणींचे तंतोतंत पालन करणारे लोक त्याला या सभेत भेटले.
सुंदर लालही सुवार्तेचा प्रचार करू लागला, आणि १९९५ मध्ये त्याने बाप्तिस्मा घेतला. पाय नसल्यामुळे त्याला जमिनीवर फरफटत चालावे लागायचे, आणि तसाच तो घरोघरच्या प्रचार कार्यात भाग घ्यायचा. पण नंतर, त्याच्या आध्यात्मिक बांधवांनी त्याला एक तीन चाकी सायकल भेट दिली. आता त्याला इतरांची इतकी मदत लागत नाही. ख्रिस्ती सभांना जायला तो १२ किलोमीटरचा प्रवास एकटाच करतो. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, तो नियमितरीत्या सभांना जातो.
त्याने खऱ्या देवाला ओळखण्याकरता व त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता अनेक लोकांना मदत केली आहे. त्याने ज्यांचा अभ्यास घेतला अशा सात लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यालाच भेटलेल्या आणखी तीन लोकांचा इतर साक्षीदारांनी अभ्यास घेतला.
बायबल म्हणते: “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) पण जे “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” आहेत त्यांचा विश्वास, देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केल्यावर पक्का होऊ शकतो. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) त्यांना उज्ज्वल भवितव्याची आशाही मिळते. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवू लागले आहेत.
[३० पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
अफगानिस्तान
पाकिस्तान
नेपाळ
भूटान
चीन
बांगलादेश
म्यानमार
लाओस
थायलंड
व्हिएटनाम
कंबोडिया
श्रीलंका
भारत
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.