दानीएलाच्या पुस्तकाचा खुलासा!
दानीएलाच्या पुस्तकाचा खुलासा!
अधिवेशनातील उपस्थितांना दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) या अनावरण केलेल्या ३२० पानी नवीन पुस्तकाची प्रत घेण्याची केवढी उत्सुकता होती! या पुस्तकाविषयी त्यांना काय वाटले? काहींनी पुढीलप्रमाणे आपले मत व्यक्त केले.
“बाकीच्या तरुणांसारखं मलाही प्राचीन इतिहासाचा अभ्यास नकोसा वाटतो. म्हणून मला दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! हे पुस्तक मिळालं तेव्हा मला खरं पाहिलं तर इतका काही आनंद झाला नव्हता, पण मी म्हटलं वाचून पाहू या तरी. आणि वाचल्यानंतर माझं मत किती चुकीचं होतं हे मला कळालं. या आधी मी असं पुस्तक कधीच वाचलं नव्हतं. एकदा हातात घेतलं तर सोडावंसंच वाटत नाही! प्राचीन काळात घडलेल्या कुठल्यातरी घटनेविषयी मी वाचतेय असं मला वाटतंच नव्हतं. हे पुस्तक वाचताना मला पहिल्यांदा असं जाणवलं की मी अक्षरशः दानीएलाच्याच जागी आहे. आपल्या कुटुंबापासून दूर एखाद्या परक्या गावी गेल्यावर आणि आपल्या सचोटीची वारंवार परीक्षा झाल्यावर नेमका काय अनुभव येऊ शकतो याची कल्पना आता मला करता येते. या पुस्तकाबद्दल फार फार धन्यवाद.”—अन्या.
“आपल्या लोकांवर प्रभाव करणाऱ्या सर्व गोष्टी यहोवाच्या पूर्णपणे नियंत्रणात आहेत ही खात्री मला यातून मिळाली आणि त्याचा मला सर्वात जास्त फायदा झाला. दानीएलाचे त्याचप्रमाणे त्यानं खुलासा केलेल्या इतरांचे दृष्टान्त आणि स्वप्नं यांच्याद्वारे हे स्पष्ट होतं की, यहोवाने जसं उद्देशिलं आहे तसंच तो घडवून आणेल; त्यात किंचितही फेरफार होणार नाही. यामुळे नवीन जगाविषयी बायबलमध्ये आढळणाऱ्या भविष्यसूचक गोष्टींबद्दल आपली आशा बळकट होते.”—चेस्टर.
“तुम्ही दानीएलाचं अगदी हुबेहूब वर्णन केलंय आणि तेच मला सर्वात जास्त आवडलं. त्याच्या आचारविचारांचं तुम्ही ज्यातऱ्हेनं वर्णन केलं होतं ते वाचून मला असं वाटलं की मी त्याला चांगलं ओळखते. यहोवाला तो इतका का आवडला हे मी नीट समजू शकले. त्याच्यावर परीक्षा आणि छळप्रसंग आले तरी त्याला स्वतःची चिंता नव्हती तर यहोवा आणि त्याच्या उत्कृष्ट नावाविषयी सर्वात जास्त चिंता होती. हे सगळे मुद्दे तुम्ही इतक्या ठळकपणे मांडले म्हणून तुमचे आभार मानते.”—जॉय.
“आम्हाला अगदी हेच हवं होतं! दानीएलाचं पुस्तक आम्हा प्रत्येकालाच कसं लागू होतं हे यापूर्वी कधीच इतक्या स्पष्टरितीनं दाखवण्यात आलं नव्हतं. हे पुस्तक मिळालं तेव्हा त्याच संध्याकाळी मी ते वाचून काढलं; आणि वाचल्यावर मला यहोवाला प्रार्थना केल्याशिवाय राहावलं नाही.”—मार्क.
“आमच्या मुलांवरही याचा इतका प्रभाव होईल असं आम्ही कधीच अपेक्षिलं नव्हतं. आमची मुलं पाच आणि तीन वर्षांची आहेत. . . . बायबल कथांचं माझं पुस्तक यामध्ये माझ्या मुलांना दानीएल, हनन्या, मिशाएल आणि अजऱ्या यांच्या कथा फार आवडायच्या; पण दानीएलाची भविष्यवाणी या पुस्तकातल्या माहितीचा आमच्या मुलांवर इतका परिणाम होईल याची आम्ही अपेक्षाच केली नव्हती. आमची मुलं इतकी लहान आहेत तरी या तरुणांचे वृत्तान्त त्यांना नीट समजले आहेत असं आम्हाला वाटतं. आमच्या मुलांपुढं केवढा हा उत्तम आदर्श! तुमचं हे पुस्तक लाजवाब आहे! तुमची मनापासून आभारी आहे.”—बेथल.
“हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की त्या इब्री तरुणांवर परीक्षा आल्या तेव्हा जणू मीपण त्यांच्यासोबतच होते; आणि त्यामुळे मला माझ्या स्वतःच्या विश्वासाचे परीक्षण करून पाहायला उत्तेजन मिळालं. “तुम्हाला समजलं का?” या उजळणीच्या प्रश्नांमुळं त्या त्या अध्यायातली माहिती एकदम मनावर ठसत होती. आणखी एक उत्कृष्ट पुस्तक दिल्याबद्दल तुमचे फार आभार मानते.”—लिडिया.