६ मार्गांनी तुमच्या आरोग्याचे संरक्षण
६ मार्गांनी तुमच्या आरोग्याचे संरक्षण
विकसनशील देशांत आव्हान
आज खासकरून सुरक्षित पाणी मिळण्याची व घाण पाण्याचे विसर्जन करण्याची पुरेशी व्यवस्था नसणाऱ्या देशांतील पुष्कळ लोकांना स्वच्छता राखणे कठीण झाले आहे. पण स्वच्छ राहिल्याने बराच फायदा होतो. असा अंदाज लावला जातो, की लहान मुलांतील सर्व आजार आणि मृत्यू यांपैकी निम्मे, घाणेरडे हात व दूषित अन्न-पाण्यातून तोंडावाटे गेलेल्या जंतूंमुळे होतात. संयुक्त राष्ट्र बाल निधीच्या फॅक्ट्स फॉर लाईफ या प्रकाशनात पुढे सुचवलेल्या सूचनांचे पालन केल्यास पुष्कळ आजार, खासकरून अतिसार, टाळता येण्यासारखे आहेत.
१ मल विसर्जनाची सुरक्षित विल्हेवाट लावणे
विष्ठेत पुष्कळ जंतू आढळतात. रोग उत्पन्न करणारे जंतू पाण्यात व अन्नात शिरल्यास, हातांवर, भांड्यांवर किंवा अन्न तयार केल्या जाणाऱ्या व वाढल्या जाणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावर असल्यास, ते तोंडावाटे गिळले जाऊ शकतात व यामुळे आजार होऊ शकतात. अशा जंतूंचा प्रसार होण्याचे टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सर्व प्रकारच्या विष्ठेचे विसर्जन करणे. मानवी विष्ठा शौचालयातच गेली पाहिजे. घराजवळ, घराकडे जाणाऱ्या मार्गावर किंवा मुले खेळतात त्या ठिकाणी प्राण्यांची विष्ठा नाही याची खातरी करावी.
शौचालये उपलब्ध नाहीत तेथे विष्ठा लगेचच मातीत पुरावी. लक्षात ठेवा, की सर्व विष्ठेत, लहान बाळांच्या विष्ठेत देखील, रोगप्रसारक जंतू असतात. लहान मुलांची विष्ठा देखील शौचालयात टाकली जावी किंवा पुरली जावी.
वेळच्या वेळी शौचालये स्वच्छ करा. शौचालये फ्लश करून ती झाकून ठेवावीत.
२ हात धुवा
तुम्ही वेळच्या वेळी हात धुतले पाहिजेत. साबण व पाण्याने अथवा राख व पाण्याने हात धुतल्याने जंतू निघून जातात. फक्तच पाण्याने हात धुणे पुरेसे नाही—दोन्ही हात साबण अथवा राखेने एकमेकांवर चोळून धुतले पाहिजेत.
शौचास जाऊन आल्यावर व बाळाच्या अथवा मुलाच्या शौचानंतर त्याला स्वच्छ धुतल्यानंतर स्वतःचे हात धुणे अतिशय आवश्यक आहे. शिवाय, प्राण्यांना हात लावल्यानंतर,
अन्नाला शिवण्याआधी व मुलांना अन्न भरवण्याआधी देखील हात धुणे महत्त्वाचे आहे.हात धुतल्यामुळे, रोगांचा फैलाव करणाऱ्या जंतूंपासून संरक्षण होते. हे जंतू, डोळ्यांना दिसत नाहीत, सूक्ष्मदर्शकाखालीच दिसतात. ते विष्ठा, मूत्र, पाणी, माती, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस यांत असतात. या जंतूंना आपल्या शरीरात प्रवेश करू न देण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे आपले हात धुणे. तसेच, शौचालयाला जाताना पायात बूट घातल्यास, शौचालयाच्या जमिनीवर असलेल्या जंतूंना तुमच्या पायाच्या कातडीतून तुमच्या शरीरात प्रवेश करता येणार नाही.
मुलांना तोंडात हात घालायची सवय असते, त्यामुळे वेळच्या वेळी विशेषकरून शौचालयानंतर आणि जेवणाआधी त्यांचे हात धुवावेत. त्यांना आपले हात धुण्यास शिकवा तसेच मूत्रालये, शौचालये किंवा लोक शौचास जातात तेथे खेळू नये असे देखील शिकवा.
३ दररोज तोंड धुवा
डोळ्यांना संसर्ग होण्याचे टाळण्यासाठी, दररोज तोंड साबणाने व पाण्याने धुवा. मुलांचे देखील तोंड धुतले पाहिजे. तोंड स्वच्छ नसल्यास माश्या येऊन बसतात आणि माश्यांच्या अंगांवर जंतू असतात. या जंतूंमुळे डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो, अंधत्व देखील येऊ शकते.
आपल्या मुलांचे डोळे नियमित तपासा. निरोगी डोळे, पाणीदार व चकाकणारे असतात. मुलाचे डोळे, लाल किंवा सुजलेले वाटत असतील, किंवा डोळ्यांतून सारखेच पाणी येत असेल तर त्याला लगेच डॉक्टरकडे नेले पाहिजे.
४ नेहमी शुद्ध पाणी वापरा
जी कुटुंबे शुद्ध व जंतूविरहीत पाण्याचा उपयोग करतात त्यांना कमी आजार होतात. तुमचे पाणी, पक्क्या बांधलेल्या व देखभाल केलेल्या टाकीतून येत असेल किंवा अदूषित विहिरी अथवा झऱ्यांतून येत असेल तर त्याला स्वच्छ पाणी म्हणता येईल. तलाव, नद्या, उघड्या टाक्या किंवा विहिरी फार क्वचित स्वच्छ असतात, पण त्यातून येणारे पाणी उकळल्यास ते शुद्ध व सुरक्षित होऊ शकते.
विहिरी झाकलेल्या असाव्यात. पाणी गोळा करून ते साठवून ठेवण्याकरता वापरल्या जाणाऱ्या बादल्या, रश्या आणि कळशा नियमितरीत्या धुवून, जमिनीवर नव्हे तर स्वच्छ ठिकाणी ठेवाव्यात. पिण्याचे
पाणी जेथून आणले जाते तेथे व कुटुंबांचे राहण्याचे ठिकाण असते तेथे प्राणी असू नयेत. पाण्याजवळ कीटकनाशकांचा किंवा रसायनांचा उपयोग करू नका.घरामध्ये, पाणी स्वच्छ व झाकलेल्या भांड्यात साठवले पाहिजे. ज्या भांड्यात पाणी साठवले जाते त्याला नळ असला तर बरे. नळ नसल्यास, स्वच्छ डावाने किंवा कपाने पाणी घ्यावे. अशुद्ध हातांनी पिण्याच्या पाण्याला शिवू नये.
५ जंतूंपासून अन्न सुरक्षित ठेवणे
अन्न चांगल्याप्रकारे शिजवल्यास तुम्ही जंतूंचा नाश करू शकता. अन्न खासकरून मटण अथवा कोंबडीचे मांस पूर्ण शिजवले पाहिजे. कोमट अन्नात जंतू झपाट्याने वाढतात. यास्तव, अन्न तयार केल्यानंतर होता होईल तितक्या लवकर ते खाल्ले पाहिजे. तुम्हाला दोनपेक्षा अधिक तास अन्न ठेवावे लागणार असेल तर ते एकतर गरम अथवा थंड ठिकाणी ठेवायला विसरू नका. तसेच, तुम्हाला शिजवलेले अन्न दुसऱ्या वेळच्या जेवणापर्यंत ठेवायचे असेल तर ते झाकून ठेवा. यामुळे त्यांवर माश्या व कीटक फिरणार नाहीत. अन्न खाण्याआधी ते गरम करा.
आईचे दूध बालकांसाठी व मुलांसाठी सर्वात उत्तम व सुरक्षित दूध आहे. प्राण्यांच्या कच्च्या दुधापेक्षा उकळलेले ताजे किंवा जंतूरहित केलेले दूध सुरक्षित आहे. बाळाला बाटलीतून दूध द्यावयाचे असेल तर प्रत्येक वापराआधी उकळत्या पाण्याने बाटली धुवावी. कारण अशा बाटल्यांमध्ये अतिसाराचा आजार पसरविणारे जंतू असतात. बाळाला आईने अंगावर पाजणे, किंवा एखाद्या स्वच्छ कपात दूध देणे सर्वात उत्तम होय.
फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. लहान बाळांना व मुलांना त्या कच्च्या खायला देणार असाल तर त्या धुवून देणे विशेष महत्त्वाचे आहे.
६ घरातील सर्व कचरा फेकून द्या
माश्या, झुरळे, उंदीर, घुशी हे सर्व जंतूवाहक आहेत. हे प्राणी कचऱ्यात वाढतात. तुमच्या राहत्या ठिकाणी कचरा गोळा केला जात नसेल तर, तुमच्या घरातील कचरा तुम्ही एखाद्या खड्ड्यात टाकू शकता जेथे तुम्हाला तो दररोज पुरता येईल किंवा जाळता येईल. घर स्वच्छ ठेवा, घरात कचरा किंवा सांडपाणी ठेवू नका.
या सूचनांचे नियमित पालन केल्यास तुम्हाला दिसून येईल की या गोष्टींची तुम्हाला सवय पडेल. या गोष्टी करावयास कठीण नाहीत व त्यांसाठी जास्त पैसाही लागत नाही परंतु त्यांच्यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहील. (g०३ ९/२२)
[११ पानांवरील चित्र]
शौचालये किंवा मूत्रालये नाहीत तेथे मल लगेच गाडण्यात यावा
[११ पानांवरील चित्र]
वेळच्या वेळी हात धुवा
[१२, १३ पानांवरील चित्र]
आपले तोंड दररोज साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे
[१२ पानांवरील चित्रे]
शुद्ध पाणी वापरल्याने व जंतूंपासून पाणी सुरक्षित ठेवल्याने कुटुंबांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असेल
[१३ पानांवरील चित्र]
दुसऱ्या वेळेसाठी तुम्हाला अन्न ठेवावे लागणार असेल तर ते झाकून ठेवा
[१३ पानांवरील चित्र]
घरातील कचरा दररोज पुरण्यात यावा किंवा जाळण्यात यावा