व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गुन्हेगारीच्या अंधारात आशेचा किरण

गुन्हेगारीच्या अंधारात आशेचा किरण

गुन्हेगारीच्या अंधारात आशेचा किरण

कॉस्टा कूलापीस यांच्याद्वारे कथित

तुरुंगातल्या माझ्या कोठडीच्या त्या भकास भितींवरून मी नजर फिरवली. त्याच क्षणी मी मनाशी खूणगाठ बांधली. कसंही करून बक्कळ पैसा मिळवायचा, या गुन्हेगार विश्‍वातून बाहेर पडायचं नी नव्यानं जीवन सुरू करायचं.

अगदी हताश, वैफल्यग्रस्त होऊन मी त्या कोठडीत बसलो होतो. आणि हळूहळू भूतकाळ माझ्या नजरेसमोर तरळू लागला. गेल्या एका वर्षात माझ्या ११ दोस्तांना एक एक करून मरणाला सामोरं जावं लागलं. एकाला खून केल्याबद्दल फाशी देण्यात आली, दुसऱ्‍यानं खुनाच्या आरोपाखाली चौकशी चालू असताना आत्महत्या केली, आणखी तिघांना ड्रग्समुळे जीवनास मुकावे लागले, तर एकदा भर रस्त्यात हाणामारी झाली आणि त्यातच माझे दोन मित्र जिवानिशी गेले. बाकीचे चौघं गाडीच्या अपघातात मारले गेले. याशिवाय, माझे आणखीन कितीतरी दोस्त जबर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात खितपत पडले होते.

या विचारांनी बेजार होऊन तुरुंगातल्या त्या अंधाऱ्‍या कोठडीत जो कोणता देव असेल त्याचा मी धावा केला. या गुन्हेगारीच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवावा अशी कळकळीची प्रार्थना मी त्या देवाला केली. आणि आश्‍चर्य म्हणजे मी अपेक्षाही केली नव्हती इतक्या लवकर मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. पण, या दरम्यान दोघातिघांवर जिवघेणा हल्ला केल्याच्या गंभीर आरोपातून मी कसातरी सुटलो. तितकेसे गंभीर नसलेले इतर आरोप कबूल केल्यामुळे हे शक्य झाले. त्यामुळे मला देण्यात आलेली शिक्षाही कमी झाली. पण, हे सर्व कसं घडलं? मला तुरुंगात का डांबण्यात आलं होतं? मी तुम्हाला सगळं सविस्तरच सांगतो.

दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरात १९४४ साली माझा जन्म झाला. तिथंच मी लहानाचा मोठाही झालो. पण, माझं बालपण केव्हाच हरपलं होतं. आणि घराचं घरपण मला कधीच अनुभवायला मिळालं नाही. बाबा स्वभावतःच गरम डोक्याचे. त्यातच ते बेसुमार प्यायचे. आणि प्यायल्यानंतर त्यांना आवरणं म्हणजे महाकठीण. शिवाय, त्यांना जुगारीचाही नाद. रागाच्या भरात ते आम्हा सगळ्यांना आणि खासकरून आईला शिवीगाळ करायचे, मारहाण करायचे. आणि या सर्वाचा परिणाम व्हायचा तोच झाला. बाहेरची मित्रमंडळी मला अधिक जवळची वाटू लागली.

गुन्हेगारीकडे कसा वळालो

रस्त्यावरच्या टपोरी पोरांसोबत मी हिंडू लागलो आणि लोकांना फसवण्याचं, ठकवण्याचं बाळकडू मला यांच्याचकडून मिळालं. वयाच्या आठव्या वर्षी शिकलेले दोन धडे मला अजूनही चांगले आठवतात. शेजारच्या घरातून खेळणी चोरताना पकडलो गेलो तेव्हा पहिला धडा मला शिकायला मिळाला. चोरी केल्याबद्दल बाबांनी मला बेदम मारलं. त्यावेळी त्यांनी दिलेली धमकी आजही माझ्या कानांत घुमते: “पुन्हा चोरी केलीस तर याद राख!” त्याच क्षणी मी निश्‍चय केला. चोरी सोडून देण्याचा नव्हे तर पुन्हा कधीच पकडले न जाण्याचा. ‘पुढच्या वेळी मी चोरलेल्या वस्तू लपवून ठेवीन, म्हणजे कुणालाच पत्ता लागणार नाही,’ असं त्यावेळी मी मनांत म्हटल्याचं मला अजूनही आठवतं.

दुसरा धडा शिकलो त्यासंदर्भातली घटना मात्र वेगळी होती. त्यावेळा मी शाळेत होतो. एकदा बायबलच्या तासाला आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं, की देवाला देखील एक नाव आहे. “देवाचं नाव यहोवा आहे.” हे ऐकून मी अवाकच राहिलो. बाई पुढे असंही म्हणाल्या, “त्याचा पुत्र येशू याच्यामार्फत आपण त्याला प्रार्थना केली तर तो आपली कोणतीही प्रार्थना ऐकतो.” ही गोष्ट माझ्या बालमनाला चाटून गेली. पण, गुन्हेगारीत भरकट जाण्यापासून या गोष्टीनं मला रोखलं नाही. खरं तर, हायस्कूलला जाण्याआधीच उचलेगिरी आणि घरफोडी करण्यात मी सराईत झालो होतो. शाळेतले माझे मित्रंही काही उपयोगाचे नव्हते. ते स्वतः देखील निरनिराळे गुन्हे केल्याबद्दल सुधारगृहात जाऊन आले होते.

वर्षामागून वर्ष सरत गेली आणि मी सराईत गुंड झालो. विसावं वर्ष पूर्ण होण्याआधीच लुटमारी, घडफोडी, गाड्या चोरी करणं, लोकांना मारहाण करणं असे असंख्य गुन्हे मी करून बसलो होतो. त्यावेळी मी टेक्निकल हायस्कूलच्या पहिल्या वर्षात शिकत होतो. पण, माझा बहुतेक वेळ पुलरुम आणि बारमध्येच जायचा; त्याशिवाय, वेश्‍यादलाल, वेश्‍या, गुंड यांनी सांगितलेली छोठीमोठी कामंही मी करायचो. अशाप्रकारे गुन्हेगारी विश्‍वात मी इतका वाहवत गेलो, की मला शिक्षण अर्ध्यातूनच सोडावं लागलं.

काही काळातच मी पाषाणहृदयी, क्रूर गुडांसोबत उठबस करू लागलो. त्यांच्याशी दगाफटका करणाऱ्‍या कुणाचेही हातपाय काढायला ते मागंपुढं पाहत नसत. एव्हाना मला पुरतं पटलं होतं, की शांत राहणं, केलेल्या गुन्ह्याचा टेंभा न मिरवणं आणि पैशाचा भपका न करणं यातच शहाणपण आहे. नाहीतर उगाच आपला गुन्हा जगजाहीर होऊन पोलिसांचं लक्ष वेधलं जाईल, किचकट चौकशा सुरू होतील; पण, त्याहून वाईट म्हणजे इतर गुंडांना याची खबर लागेल आणि मग लुटलेल्या मालातल्या हिश्‍शासाठी त्यांचा ससेमिरा सुरू होईल.

इतकी खबरदारी घेऊनसुद्धा बेकायदेशीर कारवायांत गुंतल्याच्या संशयावरून पोलिस कधीकधी माझ्यावर नजर ठेवत. पण, अशी एकही वस्तू मी जवळ ठेवत नसे ज्याच्यामुळे माझा गुन्हा पकडला जाईल किंवा माझ्यावर आरोप लावला जाईल. तितकी खबरदारी मी नेहमीच घेत असे. एकदा पहाटे तीन वाजता पोलिसांनी माझ्या घरावर धाड घातली. जवळच्याच एका होलसेलरच्या दुकानातून इलेक्ट्रोनिक वस्तूंची चोरी झाली होती. पोलिसांनी दोन वेळा माझ्या घराची झडती घेतली; पण, काहीच सापडलं नाही. माझ्या बोटांचे ठसे घेण्यासाठी मला पोलिस चौकीत नेण्यात आलं; पण त्याचाही पोलिसांना काही फायदा झाला नाही.

ड्रग्सच्या दुनियेत

वयाच्या १२ व्या वर्षापासूनच मी माइल्ड ड्रग्स घ्यायला सुरवात केली होती. त्याचा माझ्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आणि काही वेळा मी खूप ड्रग्स सेवन करायचो. याच काळादरम्यान गुन्हेगार विश्‍वाशी लागेबांधे असलेल्या एक डॉक्टराशी माझी गाठ पडली. आणि मी ड्रग्सचा चोरटा व्यापार करू लागलो. माझ्या लक्षात आलं, ड्रगच्या मोजक्या वितरकांना ड्रग्स सप्लाय करणं सगळ्यात सुरक्षित आहे; कारण हे काम मी अंधारात राहून करणार होतो. इतर जण पोलिसांच्या तावडीत सापडले असते, पण मी पोलिसांच्या हाती इतक्या सहजासहजी लागलो नसतो.

पण, ज्यांच्यासोबत मी ड्रग्सचा व्यापार करायचो त्यांपैकीच काही जण ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दगावले किंवा ड्रग्सच्या नशेत गंभीर अपराध करून बसले. एकदा तर माझ्या एका मित्रानं (?) एका मान्यवर डॉक्टरचा खून केला. या बातमीनं देशभरात खळबळ माजली होती. त्या दोस्तानं मग तो अपराध माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. खरे तर, पोलिस माझ्या घरी आले तोपर्यंत मला या प्रकरणाची खबर देखील नव्हती. पण पोलिसांना दरवाजावर पाहून मला धक्का बसला नाही कारण इतर गुन्ह्यांच्या संदर्भात त्यांच्या चकरा चालूच असायच्या.

एकदा मात्र मी अतिशय मूर्खपणा केला. त्या संपूर्ण आठवड्यात मी ड्रग्स आणि दारूनं मस्त झालो होतो. या नशेतच मी दोघा माणसांना बेदम मारलं. आमच्यात काही गैरसमज झाल्यामुळे रागाच्या भरात मी त्यांना मारलं होतं. दुसऱ्‍याच दिवशी सकाळी त्यांनी पोलिस चौकीत कंप्लेन केली आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मला गजाआड केलं. अशाप्रकारे माझी तुरुंगात रवानगी झाली.

आधी मालदार, मग सुधार

तुरुंगातून सुटल्यानंतर एका औषधाच्या कंपनीमध्ये स्टॉक कंट्रोलरची जागा रिकामी असल्याचं मला समजलं. मी लगेच अर्ज केला आणि या कामासाठी आपण योग्य आहोत हे कंपनीच्या मालकाला पटवूनही दिलं. शिवाय, त्याच कंपनीत कामाला असणाऱ्‍या माझ्या एका मित्रानं साहेबांना माझी शिफारस केली त्यामुळे मला ती नोकरी मिळाली. अमाप पैसा मिळवण्याचा आणि मग दूर कुठंतरी जाऊन नव्यानं जीवन सुरू करण्याचा हाच मार्ग आहे असा माझ्या मनात विचार आला. त्यामुळे या कामातल्या सर्व गोष्टी भराभर शिकून घेण्यात मी स्वतःला झोकून दिलं. रात्री उशिरापर्यंत बसून निरनिराळ्या औषधांची माहिती मी करून घेऊ लागलो. हाच एका नवीन जीवनाचा मार्ग आहे याची मला खात्री पटली होती.

पहिल्यांदा मालकाचं मन जिंकायचं आणि मग संधी मिळताच हात धुऊन घ्यायचा असं मी मनाशी ठरवलं. आणि मग संधी केव्हा मिळते याची मी वाट पाहू लागलो. काळ्या बाजारात कोणती औषधं सोन्याच्या भावानं विकली जातात हे मला ठाऊक होतं; तेव्हा, या औषधांचा भरपूर साठा चोरून विकायचा आणि रातोरात मालदार व्हायचं असा माझा बेत होता. शिवाय, गोदामातून औषधं चोरी केल्यानंतर आपण त्या घटनास्थळी नव्हतो हे सिद्ध करण्याची पूर्ण तजवीज मी केली होती. आणि त्यानंतर नव्या उमेदीनं नव्या जीवनाची सुरवात करण्याचं मी ठरवलं होतं.

शेवटी मला गोदामात हात मारण्याची संधी मिळालीच. त्यारात्री मी चोरपावलांनी गोदामात शिरलो आणि तिथं शेल्फवर ठेवलेली लाखो डॉलरची औषधं अधाशी डोळ्यांनी पाहू लागलो. हिंसा आणि गुन्हेगारीच्या विळख्यातून सुटण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर आहे असा विचार माझ्या मनात आला. पण, आयुष्यात पहिल्यांदाच माझा विवेक मला डिवचणी देऊ लागला. विवेक नावाचं काही आपल्यात आहे हे तर मी केव्हाच विसरून गेलो होतो. मग, अचानक हा विवेक कसा काय जागा झाला? त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो.

हा प्रसंग घडण्यापूर्वी जीवनाचा अर्थ काय या विषयावर माझी आणि माझ्या मॅनेजरची चर्चा झाली होती. बोलताबोलता मी म्हणालो शेवटी प्रार्थनाच कामी येते. त्यावर त्यानं विचारलं पण प्रार्थना कुणाला करावी. मी म्हणालो “देवाला.” “हो, पण कोणत्या देवाला. आज लोक अनेक देवांना प्रार्थना करतात. मग, आपण नेमक्या कोणत्या देवाला प्रार्थना केली पाहिजे?” मी म्हणालो: “सर्वसमर्थ देवाला.” “अगदी बरोबर, पण त्यालाही काहीतरी नाव असावं ना?” असं तो म्हणाला. “नाव?” असं प्रश्‍नार्थक चेहऱ्‍यानं मी त्याला विचारलं. त्यावर त्यानं खुलासा करत म्हटलं: “म्हणजे, जसं तुला आणि मला आणि हरएक व्यक्‍तीला एक नाव आहे तसं सर्वसमर्थ देवाला देखील एक नाव आहे.” त्याच्या बोलण्यात तथ्य आहे हे मला पटत होतं, पण मला त्याची चीडही येत होती. म्हणून मग मी रागातच म्हणालो: “हो ठिक आहे. काय आहे देवाचं नाव?” “सर्वसमर्थ देवाचं नाव आहे यहोवा!” त्यानं म्हटलं.

देवाचं हे नाव ऐकल्यावर अचानक गतकाळातला सगळा चित्रपट डोळ्यांपुढे सरकू लागला. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत असताना बाईंनी शिकवलेल्या त्या धड्याची मला आठवण झाली. मॅनेजरसोबत केलेल्या चर्चेतून माझ्या मनावर विलक्षण प्रभाव पडला होता. त्यानंतर कितीतरी वेळ बसून आम्ही या विषयावर चर्चा केली. दुसऱ्‍याच दिवशी त्यानं मला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते * हे पुस्तक दिलं. त्या रात्री पुस्तकाचं पान न्‌ पान मी वाचून काढलं आणि मला सत्य आणि जीवनाचा अर्थ गवसल्याची पूर्ण खात्री झाली. पुढचे दोन आठवडे, त्या अद्‌भुत निळ्या रंगाच्या पुस्तकातून आम्ही निरनिराळ्या विषयांवर मनसोक्‍त चर्चा केली.

त्यामुळे, गोदामातील अंधारात मी शांतपणे बसलो होतो तेव्हा औषधांची चोरी करून ती विकण्याचा माझा बेत चुकीचा आहे असं माझा विवेक मला सांगत होता. त्यावर मी गपचूप तिथून बाहेर पडलो आणि घरच्या रस्त्याला लागलो; पुन्हा कधीच चोरी न करण्याच्या निश्‍चयानं.

अंतर्बाह्‍य बदल

त्यानंतर नव्यानं जीवनाची सुरवात करण्याचा माझा विचार मी घरच्यांना बोलून दाखवला आणि बायबलमधून मी जे काही शिकत होतो ते देखील मी त्यांना सांगितलं. यावर बाबा इतके भडकले की ते मला घराबाहेर घालवून द्यायला निघाले. पण, माझा भाऊ जॉन मध्ये पडला म्हणून बरं झालं. तो बाबांना म्हणाला: “बाबा, आयुष्यात पहिल्यांदाच कॉस्टा असं काही करतोय ज्याचा संबंध गुन्हेगारीशी नाही आणि तुम्ही त्याला बाहेर घालवून द्यायला निघालात? मला तर याबद्दल आणखीन जाणून घ्यावसं वाटतंय.” त्यानंतर स्वतः जॉन माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार झाल्याचं पाहून मला आश्‍चर्याचा सुखद धक्काच बसला. त्या वेळेपासून माझ्याकडे येणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला मी ड्रग्स नव्हे सत्य पुस्तक देऊ लागलो! आणि काही काळातच याच पुस्तकातून मी ११ लोकांसोबत बायबल अभ्यास करू लागलो.

पुढे मला समजलं, की माझ्या कंपनीचा मॅनेजर यहोवाचा साक्षीदार नव्हता. त्याची बायको सुमारे १८ वर्षांपासून साक्षीदार होती; पण, याला मात्र सत्यात प्रगती करायला इतका वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे त्यानं एका अनुभवी साक्षीदाराला माझा बायबल अभ्यास घेण्यास सागितलं होतं. बायबलचा अभ्यास केल्यानं माझ्या लक्षात आलं, की मला जीवनात आणखीन खूप बदल करायचे आहेत; काही काळातच देवाच्या वचनातलं सत्य मला जगिक आचारविचारांपासून मुक्‍त करू लागलं.—योहान ८:३२.

काही दिवसांतच मी स्वतःत इतके बदल केले होते की माझा स्वतःवरच विश्‍वास बसत नव्हता. परंतु, त्यानंतर जीवनात मोठमोठे बदल करण्याचं आव्हान समोर आलं तेव्हा मला समजलं, की मी जर असाच बायबलच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगू लागलो तर देह आणि आत्मा यांच्यातल्या महासंघर्षाला मला सामोरं जावं लागेल. पण, त्याच वेळी माझ्या हेही लक्षात आलं, की मी पूर्वीसारखं जीवन जगत राहिलो तर माझ्यावर मृत्यू तरी ओढावेल किंवा मग मला उभं आयुष्य तुरुंगात काढावं लागेल. म्हणून मग, बराच विचार करून आणि कळकळीची प्रार्थना करून मी सत्याचा मार्ग निवडला. सहा महिन्यांनंतरच म्हणजे एप्रिल ४, १९७१ रोजी यहोवाला केलेल्या समर्पणाचं प्रतिक म्हणून मी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

योग्य मार्ग निवडण्याचे लाभ

आज मागे वळून पाहताना आणि गुन्हेगारीचा मार्ग सोडून दिल्यामुळे मला किती आशीर्वाद लाभले याचा विचार करताना मला भरून येतं. आयुष्यातल्या त्या खडतर काळात ज्या ११ लोकांसोबत मी बायबलचा अभ्यास केला त्यांपैकी ५ जण आज सत्यात आवेशानं काम करत आहेत. माझ्या आईनं देखील बायबल अभ्यास करून बाप्तिस्मा घेतला. अगदी शेवटपर्यंत म्हणजे १९९१ मध्ये तिचा मृत्यू झाला तोपर्यंत तिनं विश्‍वासूपणे देवाची सेवा केली. माझ्या दोन भावांनीसुद्धा यहोवाला आपलं जीवन समर्पण करून बाप्तिस्मा घेतला आणि आज ते दोघंही ख्रिस्ती मंडळीत वडील आहेत. यांशिवाय, मी माझ्या मावशीलासुद्धा सत्य शिकण्यास मदत केली; आणि गेल्या १५ वर्षांपासून ती देवाची पूर्ण-वेळ सेवा करत आहे.

पण, माझ्या कंपनीच्या मॅनेजरचं काय झालं? जीवनात मी किती बदल केलेत हे पाहून तो इतका प्रभावित झाला, की तोही बायबल सत्य मनावर घेऊ लागला. एका वर्षानंतर त्यानं देखील देवाला समर्पण करून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर बरीच वर्षं त्यानं प्रिटोरिआमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत ख्रिस्ती वडील म्हणून सेवा केली.

सध्या मी विवाहित आहे. एका समर्पित ख्रिस्ती बहिणीशी मी विवाह केला. पुढे १९७८ साली मी आणि माझी पत्नी लीओनी ऑस्ट्रेलियाला राहायला गेलो. तिथं आम्हाला दोन मुलं झाली. इलायजा आणि पॉल. आज कॅनबेरा या ऑस्ट्रेलियाच्या राजधानीच्या शहरातल्या एका ख्रिस्ती मंडळीत मी वडील म्हणून सेवा करत आहे. खरंच या सर्व काळात माझं कुटुंब एका आधारस्तंभासारखं माझ्या पाठीशी होतं. त्याचप्रमाणे दुःख आणि मृत्यूकडे नेणाऱ्‍या गुन्हेगारीच्या अर्थशून्य जीवनातून यहोवानं माझी सुटका केल्याबद्दल आणि सर्वांत मुख्य म्हणजे मला आणि माझ्या प्रिय जणांना एक शाश्‍वत आशा देऊन आमचं जीवन अर्थभरीत केल्याबद्दल मी दररोज यहोवाचे किती आभार मानतो!

[तळटीपा]

^ वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

[१८ पानांवरील चित्र]

मी बारा वर्षांचा असताना

[१८ पानांवरील चित्र]

माझी पत्नी आणि दोन मुलं यांच्यासोबत