आपल्यावर दुःख का येतं? आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
आपण सगळे निर्माणकर्त्याची मुलं आहोत. आपण दुःखात आणि त्रासात असावं असं त्याला मुळीच वाटत नाही. पण तरीसुद्धा आपल्या जीवनात इतकं दुःख का आहे?
पहिल्या मानवी जोडप्यामुळे
“एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं.”—रोमकर ५:१२.
सुरुवातीला देवाने एका मानवी जोडप्याला बनवलं. त्यांचं नाव होतं आदाम आणि हव्वा. देवाने त्यांना अशा प्रकारे बनवलं होतं, की ते योग्य रितीने विचार करून चांगले निर्णय घेऊ शकत होते. तसंच, ते कधीही आजारी पडणार नव्हते, म्हातारे होणार नव्हते आणि मरणारही नव्हते. शिवाय, देवाने त्यांना राहण्यासाठी एक सुंदर बाग दिली होती. त्या बागेचं नाव होतं एदेन बाग. तिथल्या सगळ्या झाडांची फळं ते खाऊ शकत होते. ‘फक्त एका झाडाचं फळ खाऊ नका,’ असं देवाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आदाम आणि हव्वाने ते खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडून पाप केलं. (उत्पत्ती २:१५-१७; ३:१-१९) आज्ञा मोडल्यामुळे देवाने त्यांना त्या बागेतून बाहेर काढलं. त्यानंतर, त्यांचं जीवन दुःख आणि त्रासाने भरून गेलं. काही काळाने त्यांना मुलं झाली. आणि त्यांच्याही वाट्याला असंच जीवन आलं. ते सगळे म्हातारे होऊन मेले. (उत्पत्ती ३:२३; ५:५) आपणसुद्धा आदाम आणि हव्वापासूनच आलो आहोत, त्यामुळे आपणही आजारी पडतो, म्हातारे होतो आणि मरतो.
दुष्ट स्वर्गदूतांमुळे
“सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”—१ योहान ५:१९.
हजारो वर्षांआधी स्वर्गात देवाचा एक दूत होता. तो देवाच्या विरोधात गेला. पवित्र शास्त्रात त्याला सैतान असं म्हटलं आहे. (योहान ८:४४; प्रकटीकरण १२:९) काही काळानंतर, इतर काही स्वर्गदूतांनीही सैतानाला साथ दिली. पवित्र शास्त्रात त्यांना दुष्ट स्वर्गदूत म्हटलं आहे. लोकांनी देवावर विश्वास ठेवू नये म्हणून ते आपल्या शक्तीचा वापर करून वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना फसवतात. तसंच, ते बऱ्याच लोकांना चुकीच्या गोष्टीही करायला लावतात. (स्तोत्र १०६:३५-३८; १ तीमथ्य ४:१) सैतानाला आणि दुष्ट स्वर्गदूतांना लोकांना त्रास द्यायला आणि दुःखात पाहायला आवडतं.
स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे
“माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.”—गलतीकर ६:७.
आदाम आणि हव्वाकडून मिळालेल्या पापामुळे आणि सैतानामुळे आपल्याला वेगवेगळ्या दुःखांचा आणि त्रासांचा सामना करावा लागतो. पण काही वेळा लोक स्वतःहूनच आपल्यावर दुःख ओढवून घेतात. असं आपण का म्हणू शकतो? लोक जेव्हा वाईट कामं करतात किंवा चुकीचे निर्णय घेतात तेव्हा त्यांचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. पण तेच, लोक जेव्हा चांगली कामं करतात तेव्हा त्यांना चांगले परिणाम मिळतात. जसं की, एक माणूस जेव्हा प्रामाणिक राहतो, मेहनत करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो तेव्हा त्याचं कुटुंब आनंदी राहतं. पण जर एक माणूस जुगार खेळत असेल, खूप जास्त दारू पीत असेल, कामाला जात नसेल तर यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबाची फार वाईट अवस्था होऊ शकते. म्हणून देवाची अशी इच्छा आहे, की आपण चांगले निर्णय घ्यावेत आणि सुखाने आणि शांतीने जीवन जगावं. (स्तोत्र ११९:१६५) त्यामुळे त्याने दिलेले सल्ले आपण पाळले पाहिजेत.
आपण “शेवटच्या दिवसांत” जगत असल्यामुळे
‘शेवटच्या दिवसांत लोक फक्त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले असे असतील.’—२ तीमथ्य ३:१-५.
“शेवटच्या दिवसांत” असे लोक असतील हे पवित्र शास्त्रात आधीच सांगितलं होतं. या काळाबद्दल त्यात असंही म्हटलं आहे, की युद्धं होतील, मोठमोठे भूकंप होतील, ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील. (मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११) या सगळ्या गोष्टींमुळे मानवांना दुःखांचा आणि मरणाचा सामना करावा लागतो.