“इतकं प्रेम पाहून आमचं मन भरून आलं”
शनिवार, २५ एप्रिल २०१५. भारताच्या उत्तरेकडे अनेक डोंगर असलेल्या नेपाळ देशात ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप नेपाळची राजधानी काठमांडूच्या उत्तर पश्चिम दिशेला ८० किलोमीटर अंतरावर झाला. यामध्ये ८,५०० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. ही नेपाळमध्ये नोंद झालेली सर्वात भयानक नैसर्गिक विपत्ती होती. ५ लाखापेक्षा जास्त घरं उद्ध्वस्त झाली. नेपाळमध्ये २,२०० यहोवाचे साक्षीदार आहेत आणि जवळजवळ सर्वच भूकंप झालेल्या क्षेत्रात राहतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, या भूकंपात त्यांपैकी एका साक्षीदार स्त्रीचा आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला.
मिशेल नावाची साक्षीदार म्हणते, “ज्या वेळी भूकंप झाला तेव्हा त्या परिसरातल्या बहुतेक मंडळ्यांमध्ये ख्रिस्ती सभा चालू होत्या. जर भूकंप झाला असताना साक्षीदार आपआपल्या घरी असते, तर यापेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले असते.” जे सभांमध्ये होते त्यांचे प्राण का वाचले? याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सभागृहाची रचना. *
“आता आम्हाला त्याचा फायदा समजला!”
नेपाळमधल्या नवीन राज्य सभागृहांची रचना अशी करण्यात आली आहे की, ती भूकंपांचा प्रतिकार करू शकतील. राज्य सभागृहांच्या बांधकामात मदत करणारे मन बहादूर म्हणतात, “आम्हाला लोक नेहमी विचारतात की ‘इतक्या छोट्या इमारतींसाठी तुम्ही इतका भक्कम पाया का घालता?’ आता आम्हाला त्याचा फायदा समजला!” भूकंपानंतर नेपाळमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर देखरेख करणाऱ्या बांधवांनी, ही राज्य सभागृह भूकंपग्रस्त लोकांना राहण्यासाठी दिली. भूकंपानंतर देखील झटके बसत होते, पण यहोवाच्या साक्षीदारांना आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना या राज्य सभागृहांमध्ये सुरक्षित वाटत होतं.
प्रौढ ख्रिस्ती बांधवांनी लगेच मंडळीतल्या अशा सदस्यांना शोधायला सुरुवात केली, जे भूकंपामुळे हरवले होते. बबिता नावाची साक्षीदार म्हणते, “या प्रौढ बांधवांना स्वतःपेक्षा मंडळीची जास्त काळजी होती. इतकं प्रेम पाहून आमचं मन भरून आलं.” भूकंप झाल्याच्या तीन दिवसातच, नेपाळमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर देखरेख करणाऱ्या समितीच्या तीन सदस्यांनी, स्थानिक मंडळ्यांच्या कोणत्या गरजा आहेत आणि तिथल्या बांधवांना कोणती मदत हवी आहे, हे जाणून घेण्यासाठी विभागीय पर्यवेक्षकांसोबत मंडळ्यांना भेट द्यायला सुरुवात केली.
भूकंप झाल्याच्या सहा दिवसांनंतर साक्षीदारांच्या अमेरिकेतल्या जागतिक मुख्यालयातून गॅरी ब्रो आणि त्यांच्या पत्नी नेपाळला आल्या. वर सांगितलेल्या समितीतले बांधव रुबन म्हणतात, “काठमांडूच्या लोकांमध्ये उडालेला गोंधळ आणि भूकंपानंतर लागणारे झटके, यामुळे बंधू ब्रो इथं येऊ शकतील की नाही, याबद्दल आम्हाला शंका होती. पण, त्यांनी इथं येण्याचा निश्चय केला होता आणि ते आले! स्थानिक साक्षीदारांना त्यांना भेटल्यामुळे खूप आनंद झाला.”
आम्हाला आणखी जवळ आल्यासारखं वाटतं
नेपाळमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या ऑफिसमध्ये काम करणारे सिलास म्हणतात: “टेलिफोन सेवा परत सुरू झाल्या-झाल्या, ऑफिसमधला फोन रात्रंदिवस वाजू लागला. जगभरातल्या साक्षीदार बांधवांना आमच्याबद्दल काळजी लागली होती. जरी काही बांधव आम्हाला न समजणाऱ्या भाषांमध्ये बोलत होते, तरी त्यांच्या आवाजात आमच्याबद्दल असणारं प्रेम
आणि मदत करण्याची उत्सुकता आम्हाला जाणवत होती.”भूकंप झाल्यानंतर अनेक दिवस स्थानिक साक्षीदार, राज्य सभागृहात राहात असलेल्या लोकांसाठी जेवण घेऊन येत होते. इतकंच नव्हे तर एक विपत्ती मदतकार्य समिती स्थापन करण्यात आली आणि बाहेरच्या देशांमधून म्हणजे मुख्यतः बांग्लादेश, भारत आणि जपान या देशांतून लवकरच मदत येऊ लागली. काही दिवसातच युरोपमधून वैद्यकीय मदत देणाऱ्या साक्षीदारांचा गट नेपाळमध्ये आला. त्यांनी एका राज्य सभागृहातून मदत पुरवायला सुरुवात केली. ते लगेच कामाला लागले, त्यांनी भूकंपग्रस्तांची शारीरिक तपासणी तर केलीच पण त्यांना झालेल्या मानसिक आघातापासून सावरायलादेखील मदत केली.
या मदतीबद्दल अनेकांना कसं वाटलं, हे उत्तरा नावाच्या स्त्रीच्या बोलण्यावरून कळतं: “हा भूकंप फार भयंकर होता आणि आम्ही फार घाबरलो होतो. पण आता आम्हाला आमच्या आध्यात्मिक कुटुंबाच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटतं.” या भूकंपामुळे यहोवाच्या लोकांचं, यहोवावर आणि एकमेकांवर असलेलं प्रेम आणखी वाढलं आहे.
^ परि. 3 यहोवाचे साक्षीदार जिथं उपासनेसाठी एकत्र येतात त्याला राज्य सभागृह म्हणतात.