मुख्य विषय | सर्वात चांगली भेट!
सर्वात चांगली भेट!
“प्रत्येक उत्तम देणगी व परिपूर्ण दान वरून, म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या पित्याकडून येते.” (याकोब १:१७) या शास्त्रवचनावरून आपल्याला कळतं, की स्वर्गात राहणारा आपला पिता म्हणजे यहोवा * देव खूप उदार आहे. देवाने मानवांना बऱ्याच भेटवस्तू दिल्या आहेत. पण त्यातली एक भेट ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ती कोणती? याचं उत्तर योहान ३:१६ या वचनातल्या येशूच्या शब्दांवरून मिळतं. त्यात म्हटलं आहे: “कारण देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”
देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला भेट म्हणून दिलं. आपल्याला मिळालेली ही सर्वात श्रेष्ठ भेट आहे. कारण यामुळे पाप, म्हातारपण आणि मरण यांच्या गुलामीतून आपली सुटका होणं शक्य झालं. (स्तोत्र ५१:५; योहान ८:३४) आपण स्वतः कितीही प्रयत्न केले, तरी या गुलामीतून सुटणं आपल्याला शक्य नाही. पण देवाने दाखवलेल्या महान प्रेमामुळे आपली सुटका होणं शक्य झालं आहे. यहोवा देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला खंडणी म्हणून देऊन आज्ञाधारक मानवांसाठी सर्वकाळाच्या जीवनाचा मार्ग खुला केला. पण खंडणी म्हणजे नेमकं काय? ती गरजेची का आहे? खंडणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो?
खंडणी म्हणजे गमावलेली गोष्ट परत मिळवण्यासाठी किंवा गुलामीतून सोडवण्यासाठी दिलेली रक्कम. बायबल म्हणतं, की आपल्या पहिल्या आईवडिलांना, म्हणजे आदाम आणि हव्वा यांना देवाने परिपूर्ण जीवन दिलं होतं. त्यांच्यात पाप नव्हतं. नंदनवन असलेल्या सुंदर पृथ्वीवर ते आणि त्यांना होणारी मुलं सदासर्वकाळ आनंदाने जगणार होती. (उत्पत्ति १:२६-२८) पण दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडली आणि त्यांनी सर्वकाही गमावलं. ते पापी बनले. याचा परिणाम काय झाला? बायबल याचं असं उत्तर देते: “एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) आपल्या मुलांना एक परिपूर्ण जीवन देण्याऐवजी, आदामने त्यांना पाप आणि मृत्यू या गोष्टी दिल्या.
खंडणीमध्ये आणखी एक गोष्ट सामील आहे. ती म्हणजे जे गमावलं आहे त्याच्या बरोबरीच्या मोलाची गोष्ट देणं. आदामने जेव्हा जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली, तेव्हा तो पापी बनला. त्याने आपलं परिपूर्ण मानवी जीवन गमावलं. त्यामुळे आदामची मुलंही पापाच्या आणि मृत्यूच्या गुलामीत गेली, असं बायबल म्हणतं. या गुलामीतून मुक्त होण्यासाठी दुसरं एक परिपूर्ण मानवी जीवन, बलिदान म्हणून देणं गरजेचं होतं. आणि ते परिपूर्ण मानवी जीवन होतं येशूचं. (रोमकर ५:१९; इफिसकर १:७) मानवजातीवर प्रेम असल्यामुळे देवाने खंडणीची तरतूद केली. आणि फक्त यामुळेच आदाम आणि हव्वा यांनी जे गमावलं होतं ते मिळवणं शक्य झालं. मानवजातीला नंदनवन असलेल्या पृथ्वीवर नेहमीसाठी जगण्याची आशा मिळाली.—प्रकटीकरण २१:३-५.
आपण पाहिलं की खंडणीमुळे कोणकोणत्या गोष्टी साध्य होतात. सर्वकाळाचं जीवन मिळणं देवाच्या खंडणीच्या भेटीमुळे शक्य होतं. यामुळे ही सर्वात श्रेष्ठ भेट ठरते यात काहीच शंका नाही. ही भेट एक “परिपूर्ण दान” आहे. मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की भेटवस्तू देताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता आपण पाहू, की देवाने आपल्याला खंडणीची भेट देताना त्या सर्व गोष्टी अप्रतिम रीत्या कशा लक्षात ठेवल्या आहेत. यामुळे आपल्याला या भेटीची कदर बाळगायला मदत होईल.
आपली इच्छा पूर्ण होते. प्रत्येक मानवामध्ये नेहमीसाठी जगण्याची इच्छा असते. आणि ही इच्छा नैसर्गिक आहे. (उपदेशक ३:११) पण आपण स्वतः कितीही प्रयत्न केले, तरी ही इच्छा पूर्ण करणं आपल्याला शक्य नाही. पण खंडणीमुळे हे शक्य आहे. बायबल म्हणतं: “पापाची मजुरी मृत्यू आहे, पण देवाचे कृपादान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचे जीवन हे आहे.”—रोमकर ६:२३.
आपली गरज पूर्ण होते. खंडणी देणं मानवांना शक्य नव्हतं. बायबलमध्ये म्हटलं आहे: “कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.” (स्तोत्र ४९:७) आणि यामुळेच पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सुटण्यासाठी आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे “ख्रिस्त येशूने आपल्या सुटकेसाठी भरलेल्या खंडणीद्वारे,” देवाने आपली नेमकी गरज पूर्ण केली.—रोमकर ३:२३, २४.
अगदी योग्य वेळी मिळालेली भेट. बायबल म्हणतं: “आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) आपण “पापी असतानाच” आपल्यासाठी खंडणी देण्यात आली. यावरून आपल्याला ही खात्री मिळते, की आपण पापी असूनही देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आज जरी आपल्याला पापाचे परिणाम भोगावे लागले, तरी खंडणीमुळे आपल्याकडे आशा आहे.
चांगला आणि निःस्वार्थ हेतू दिसून येतो. देवाने कोणत्या कारणामुळे आपल्या पुत्राला खंडणी म्हणून दिलं, हे आपल्याला बायबलमधून समजतं. त्यात म्हटलं आहे: “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावे. यावरूनच देवाचे आपल्यावरील प्रेम दिसून आले. प्रेम यातच आहे; आपण देवावर प्रेम केले असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केले; आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्चित्ताचे बलिदान म्हणून त्याने आपल्या पुत्राला पाठवले.”—१ योहान ४:९, १०.
मग आपण या सर्वश्रेष्ठ भेटीची कदर असल्याचं कसं दाखवू शकतो? योहान ३:१६ मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांवरून आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्यात म्हटलं आहे, की “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो” फक्त तोच वाचेल. विश्वास या गुणाबद्दल बायबल असं म्हणतं: “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे. (इब्री लोकांना ११:१) असा भरवसा असण्यासाठी अचूक ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही खंडणी हे “परिपूर्ण दान” देणाऱ्याबद्दल, म्हणजे यहोवा देवाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच, येशूच्या खंडणी बलिदानामुळे तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळावं, यासाठी काय करणं गरजेचं आहे हेसुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे.
या सर्व गोष्टी तुम्हाला www.jw.org या वेबसाईटवर असलेल्या माहितीचा अभ्यास केल्यामुळे समजतील. ही माहिती शास्त्रवचनांवर आधारित आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करायला आनंद होईल. आम्हाला खात्री आहे, की जेव्हा तुम्ही सर्वात श्रेष्ठ भेटीबद्दल जाणून घ्याल आणि त्याचे फायदे अनुभवाल, तेव्हा तुम्ही असं म्हणण्यासाठी नक्कीच प्रेरित व्हाल: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो!”—रोमकर ७:२५. ▪
^ परि. 3 यहोवा हे देवाचं नाव आहे असं बायबलमध्ये सांगितलं आहे.