या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य कधी हिंसेला बळी पडले आहात का? तुम्हाला हिंसेचा सामना करावा लागेल, अशी तुम्हाला कधी भीती वाटते का? हिंसेबद्दल असं म्हटलं जातं की ती “जगभरात वाढत असलेली लोकांच्या आरोग्याशी निगडित समस्या” आहे. याची काही उदाहरणं पाहू या.
कौटुंबिक किंवा लैंगिक हिंसा: संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, “दर तीनपैकी एका स्त्रीने आपल्या आयुष्यात कधी न् कधी, आपल्या जोडीदाराकडून हिंसा सहन केली आहे. आणि असा अंदाज आहे की, जगभरात दर पाचपैकी एक स्त्री बलात्काराला किंवा बलात्काराच्या प्रयत्नाला बळी पडेल.”
सार्वजनिक ठिकाणी होणारी गुन्हेगारी: एका अहवालात असं म्हटलं आहे की, अमेरिकेत ३०,००० हिंसक टोळ्या गुन्हेगारी करत आहेत. तर लॅटिन अमेरिकेत, दर ३ पैकी १ व्यक्ती हिंसक गुन्ह्याला बळी पडली आहे.
खून: असा अंदाज आहे की २०१२ मध्ये जवळपास ५ लाख लोकांचा खून केला गेला. ही संख्या याच काळात युद्धात मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा अधिक आहे. दक्षिण आफ्रिका आणि मध्य अमेरिका इथं सरासरी खूनांची संख्या सर्वात जास्त आहे. ही संख्या जगातील खूनांच्या सरासरी संख्येपेक्षा चारपट आहे. लॅटिन अमेरिकेत एका वर्षात १,००,००० पेक्षा जास्त लोकांचे खून झाले. त्यातील फक्त ब्राझील या देशातच ही संख्या ५०,००० हजार इतकी होती. हिंसेवर आपल्याला कधी कायमचा तोडगा मिळेल का?
हिंसा कधी थांबवता येईल का?
हिंसा आज जगभर का पसरली आहे? याची अनेक कारणं सांगितली जातात, त्यात काही पुढील कारणंदेखील आहेत: सामाजिक आणि आर्थिक असमानतेमुळे वाढता तणाव, दुसऱ्यांच्या जीवाला तुच्छ लेखण्याची भावना, मद्याचा आणि ड्रग्सचा गैरवापर, मोठ्यांच्या हिंसक वागणूकीचा लहान मुलांवर होणारा प्रभाव, आणि परिणामांची पर्वा न करता हिंसक गुन्हेगारांचं वागणं.
जगाच्या काही देशात, हिंसेला आवर घालण्यात थोडीफार प्रगती झाली आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या सोंम पाउलू या ब्राझील मधल्या शहरात, खूनांची संख्या गेल्या दशकापेक्षा ८० टक्के कमी झाली. तरीदेखील या शहरात अनेक प्रकारचे हिंसक गुन्हे होत राहतात. आणि दर १,००,००० लोकांपैकी १० इतक्या खुनांची संख्या तिथं आहे. मग अशा हिंसेचा कायमचा नायनाट कसा करता येईल?
हिंसेवर कायमचा तोडगा काढायचा असेल तर लोकांचा दृष्टिकोन आणि वागणं यात बदल होणं आवश्यक आहे. हिंसक लोकांमध्ये बदल होण्यासाठी त्यांच्यातील गर्व, लोभ आणि स्वार्थीपणाच्या भावना दूर झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या जागी प्रेम, आदर आणि दुसऱ्यांसाठी काळजीच्या भावना आल्या पाहिजेत.
असा कायापालट करायला कोणती गोष्ट एका व्यक्तीला प्रेरित करेल? बायबलमध्ये याबद्दल काय शिकवलं आहे त्यावर विचार करा:
-
“देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.
-
“परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय”—नीतिसूत्रे ८:१३.
देवाबद्दल प्रेम आणि त्याला दुःखी करण्याचं भय या गोष्टी हिंसक व्यक्तींनादेखील आपल्या जीवनात बदल करण्यास प्रेरित करू
शकतात. फक्त वर-वरचे बदल नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट करण्यास त्यांना प्रेरित करतात. पण हे खरंच शक्य आहे का?आपण अॅलेक्सचे * उदाहरण पाहू या. त्याने अनेक वेळा मारहाण केल्यामुळे गेली १९ वर्षं ब्राझीलमध्ये तुरुंगवास भोगला. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केल्यानंतर तोदेखील २००० साली यहोवाचा साक्षीदार झाला. पण त्याने आपला हिंसक स्वभाव खरोखरी बदलला आहे का? अॅलेक्स म्हणतो: “देवाने मला पूर्णपणे क्षमा केल्यामुळे माझं त्याच्यावर प्रेम वाढलं आहे. यहोवासाठी प्रेम आणि कृतज्ञता यामुळे मला माझं जीवन बदलता आलं.” त्याने केलेल्या सर्व वाईट गोष्टींचा त्याला खूप पस्तावा आहे.
ब्राझीलमध्येच राहणारा सीजर हादेखील चोरी करायचा आणि दरोडे टाकायचा. त्याने अशी कामं १५ वर्षं केली. त्याने आपलं जीवन का बदललं? तुरुंगात असताना यहोवाचे साक्षीदार त्याला भेटले आणि त्यानेदेखील बायबलचा अभ्यास केला. सीजर म्हणतो: “आयुष्यात पहिल्यांदा माझ्या जीवनाला उद्देश मिळाला. मी देवावर प्रेम करायला आणि त्याचे भय मानायला शिकलो. मी जर पुन्हा वाईट काम करू लागलो तर यहोवाला दुःख होईल असं योग्य भय मानायला मी शिकलो. त्याने माझ्यावर केलेल्या दयेची मला आठवण आहे हे मला दाखवायचं होतं. या प्रेमाने आणि योग्य भयाने मला आपलं जीवन बदलायला प्रेरित केलं.”
या अनुभवांमधून आपण काय शिकतो? बायबलमुळे लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो, म्हणजेच बायबलमध्ये त्यांचे जीवन संपूर्णपणे बदलण्याची शक्ती आहे. (इफिसकर ४:२३) आधी आपण ज्या अॅलेक्सबद्दल वाचलं तो पुढे म्हणतो: “बायबलमधून मी शिकलेल्या गोष्टी स्वच्छ पाण्यासारख्या जणू माझ्या मनातून माझे वाईट विचार धुऊन काढत होत्या. मला वाटायचं हे विचार मी कधीच माझ्या मनातून काढू शकणार नाही.” बायबलमधील शुद्ध संदेश आपल्या मनामध्ये साठवल्यानं, आपल्या मनातील अशुद्ध विचार बाहेर फेकले जातात. देवाच्या वचनात आपल्याला शुद्ध करण्याची शक्ती आहे. (इफिसकर ५:२६) याचा परिणाम असा होतो की, क्रूर आणि स्वार्थी लोक आपलं जीवन बदलून दयाळू आणि शांत होतात. (रोमकर १२:१८) बायबलमधील तत्त्वं लागू केल्यानं त्यांना त्यांच्या जीवनात शांती अनुभवायला मिळते.—यशया ४८:१८.
आज जगातील २४० देशांमध्ये राहणाऱ्या ८० लाखापेक्षा जास्त यहोवाच्या साक्षीदारांना, हिंसेचा समूळ नाश करण्याची किल्ली सापडली आहे. वेगवेगळ्या वंशातले, सामाजिक स्तराचे आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे हे लोक, देवावर प्रेम करायला आणि त्याचे भय मानायला शिकले आहेत. त्यासोबतच ते एकमेकांवर प्रेम करायला आणि, जगभर असलेल्या आपल्या कुटुंबात शांतीने जगायलादेखील शिकले आहेत. (१ पेत्र ४:८) या जगातून हिंसा नाहीशी करता येईल याचं ते जिवंत उदाहरण आहेत.
हे जग लवकरच हिंसामुक्त होणार आहे!
बायबलमध्ये देवाने आपल्याला असं अभिवचन दिलं आहे की तो लवकरच, या पृथ्वीवरून हिंसा कायमची काढून टाकेल. आज या हिंसेने भरलेल्या जगावर, देवाचा न्यायनिवाडा करण्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाश करण्याचा “दिवस” येईल. (२ पेत्र ३:५-७) यापुढे हिंसक लोकांचा कुणाला त्रास होणार नाही. पण देव लवकरच पाऊल उचलेल आणि हिंसेचा समूळ नाश करेल यावर आपण विश्वास का ठेवू शकतो?
बायबलमध्ये म्हटलं आहे, देव हिंसा करणाऱ्यांचा द्वेष करतो. (स्तोत्र ११:५) आपल्या निर्माणकर्त्याला शांती आणि न्याय प्रिय आहेत. (स्तोत्र ३३:५; ३७:२८) म्हणूनच तो हिंसक लोकांचा लवकरच नाश करेल.
एक शांतीपूर्ण जग लवकरच या पृथ्वीवर येणार आहे. (स्तोत्र ३७:११; ७२:१४) अशा हिंसामुक्त जगात राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याबद्दल आणखी जाणून घ्या. (wp16-E No. 4)
^ परि. 14 काही नावं बदलण्यात आली आहेत