तुम्हाला माहीत होतं का?
येशूचे कुष्ठरोग्यांशी वागणे उल्लेखनीय का आहे?
बायबल लिहिलं गेलं त्या काळात यहूदी लोकांना एका विशिष्ट प्रकारच्या कुष्ठरोगाची भीती होती. या भयानक संसर्गजन्य रोगामुळे व्यक्तीच्या मज्जातंतूंवर परिणाम व्हायचा आणि त्यामुळे तिचे अवयव कायमचे खराब आणि विद्रूप व्हायचे. कुष्ठरोगावर कोणताच उपचार सापडला नव्हता. ज्यांना हा रोग व्हायचा त्यांना इतरांच्या संपर्कात येऊ दिलं जायचं नाही. जर लोक कुष्ठरोग्यांच्या जवळ येत असले तर त्यांनी आधीच त्या लोकांना सावध केलं पाहिजे असा नियम होता.—लेवीय १३:४५, ४६.
देवाने दिलेल्या नियमशास्त्रात, कुष्ठरोग्यांसाठी काही नियम होते. पण यहूदी धार्मिक नेत्यांनी त्या नियमांपेक्षाही कठोर नियम बनवल्यामुळे, हा रोग झालेल्यांना जीवन जगणं कठीण होऊन जायचं. उदाहरणार्थ, रब्बी लोकांनी बनवलेल्या कायद्याप्रमाणे, कुष्ठरोग्यांपासून लोक ६ फूट लांब राहायचे. आणि जर वारा वाहत असेल तेव्हा तर त्यांच्यापासून १५० फूट लांब राहायचे. कुष्ठरोग्यांना “छावणीबाहेर” ठेवण्याबद्दल देवाच्या नियमशास्त्रात जे म्हटलं आहे, त्याचा अर्थ टॅलमूडचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांनी असा लावला की कुष्ठरोग्यांनी शहरांच्या भिंतीबाहेरच राहायला हवं. त्यामुळे एखाद्या रब्बीने जर एका कुष्ठरोग्याला शहरामध्ये पाहिलं तर तो त्याच्यावर दगडमार करून बोलायचा: “तुझ्या जागी परत जा, दुसऱ्या लोकांना अशुद्ध करू नकोस.”
येशू त्या धार्मिक नेत्यांपेक्षा खूप वेगळा होता! कुष्ठरोग्यांना हाकलून देण्याऐवजी, तो त्यांना स्पर्श करायला आणि त्यांना बरं करायलादेखील तयार होता.—मत्तय ८:३.
यहूदी धार्मिक नेते कोणत्या कारणांमुळे घटस्फोटाला मान्यता द्यायचे?
घटस्फोट या विषयावरून पहिल्या शतकातील धार्मिक नेत्यांमध्ये अनेक चर्चा आणि वाद व्हायचे. एके प्रसंगी, काही परूश्यांनी येशूला हा प्रश्न विचारला: “एखाद्या मनुष्याने, कोणत्याही कारणासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देणे कायदेशीर आहे का?”—मत्तय १९:३, सुबोधभाषांतर.
देवाने मोशेद्वारे लोकांना जे नियमशास्त्र दिलं त्यानुसार, एखाद्या माणसाला आपल्या पत्नीची “वागणूक अनुचित” वाटली, तर तो तिला घटस्फोट देऊ शकत होता. (अनुवाद २४:१) येशूच्या काळात, रब्बी लोकांमध्ये दोन विचारधारणेचे गट होते आणि ते नियमांचा वेगवेगळा अर्थ लावायचे. शम्मय या गटाचे लोक जास्त कडकपणे नियमांचा अर्थ लावायचे. त्यांनी या नियमाचा अर्थ असा लावला की “लैंगिक अनैतिकता” हे घटस्फोटाचं एकमेव कारण असू शकतं. हिलेल या दुसऱ्या गटाच्या लोकांनी या नियमाचा असा अर्थ लावला की एक पुरुष कोणत्याही कारणांसाठी, लग्नातील अगदी क्षुल्लक भांडणासाठी देखील आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकतो. आणि या घटस्फोटाला कायदेशीर मानलं जायचं. या गटानुसार, एका पत्नीकडून जेवणात काही कमीजास्त झालं किंवा तिच्या पतीला दुसरी एखादी सुंदर स्त्री आवडली तरी तो आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत होता.
परूश्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं येशूने काय उत्तर दिलं? तो अगदी स्पष्टपणे म्हणाला: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या [लैंगिक अनैतिकतेच्या] कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो.”—मत्तय १९:६, ९. (wp16-E No. 4)