काय बरोबर आणि काय चुकीचं: तुम्हाला निवड करावी लागेल
बरोबर काय आणि चुकीचं काय हे आपण कशाच्या आधारावर ठरवतो; तसंच आपण त्याप्रमाणे जगतो की नाही यावरून ठरेल की, पुढे आपण आनंदी होऊ की नाही. आणि ही गोष्ट यहोवा देवाला माहीत आहे. त्यामुळे आपण त्याच्या स्तरांनुसार जगावं अशी त्याची इच्छा आहे.
यहोवाला वाटतं की आपण शांतीने आणि आनंदाने जगावं.
“मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो. तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल! मग तुझी शांती नदीसारखी, आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.”—यशया ४८:१७, १८.
आपलं जीवन कसं असलं पाहिजे हे देवालाच सगळ्यात चांगलं माहीत आहे, कारण त्याने आपल्याला घडवलंय. आपण त्याचं ऐकावं आणि त्याप्रमाणे वागावं असं त्याला वाटतं. यामुळे आपलं भलं होईल. जेव्हा आपण देवाच्या आज्ञांनुसार चालू तेव्हा आपल्याला अशी शंका नसेल की आपण केलेली निवड बरोबर आहे की चुकीची आहे. आपण खातरी ठेवू शकतो की, आपण बरोबरच निवड केली आहे. आणि यामुळे आपण नेहमी शांतीने आणि आनंदाने राहू.
यहोवा आपल्याला अशा गोष्टी करायला सांगत नाही ज्या आपल्याला जमणार नाहीत.
“आज मी तुम्हाला देत असलेली आज्ञा तुमच्यासाठी कठीण नाही किंवा तुमच्यापासून फार दूरही नाही.”—अनुवाद ३०:११.
यहोवा वचन देतो की त्याच्या स्तरांनुसार जगणाऱ्यांना तो मदत करेल.
“कारण मी तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे, ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.’”—यशया ४१:१३.
बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल देवाच्या स्तरांप्रमाणे आपण जगू शकतो. कारण त्यासाठी तो आपल्याला मदत करेल. तो आपल्याला बायबलद्वारे मदत करू शकतो. त्यातून आपल्याला प्रोत्साहन आणि आशा मिळते.
बायबलच्या स्तरांनुसार जगल्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना हे जाणवलंय की, त्यांचं जीवन सुधारलंय. तेव्हा बायबलमध्ये कोणते चांगले सल्ले दिले आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या! हे बायबल आधारित माहितीपत्रक वाचू शकता. याची मोफत प्रत jw.org/mr वर मिळेल. या माहितीपत्रकात खाली दिलेले धडे दिलेत:
-
देव आपल्याला आनंदी राहायला कसं शिकवतो?
-
बायबल आपल्याला एक आशा देतं
-
बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?
तुम्ही जसजसा देवाच्या वचनाचा, म्हणजे बायबलचा अभ्यास कराल तसतसं तुम्हाला जाणवेल की, यातली माहिती जुनी नाही; तर ती “आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक” आहे. (स्तोत्र १११:८) खरंतर, जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, बायबलमधल्या नैतिक स्तरांनुसार जगणं. पण देव आपल्याला तसं करण्याची जबरदस्ती करत नाही. (अनुवाद ३०:१९, २०; यहोशवा २४:१५) ही निवड प्रत्येकाला स्वतः करावी लागेल.