देवाला तुमची काळजी आहे
बायबलमधून आपल्याला सगळ्यात चांगला सल्ला मिळू शकतो कारण ते देवाकडून आहे. हे खरंय, की बायबल आरोग्याबद्दल सल्ला देणारं पुस्तक नाही. असं असलं तरी दुःखाचे प्रसंग, अस्वस्थ करणारे विचार, नकारात्मक भावना आणि शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या यांचा सामना करण्यासाठी यात खूप उपयोगी आणि चांगला सल्ला दिलाय.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायबल सांगतं, की ज्याने आपल्याला घडवलंय तो यहोवा देव a आपले विचार आणि भावना इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपण कोणत्याही समस्येचा सामना करत असलो, तरी तो आपल्याला मदत करायला उत्सुक आहे. असं आपण का म्हणू शकतो? त्यासाठी बायबलमधल्या दिलासा देणाऱ्या या दोन ओळी पाहा:
“यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; मनाने खचलेल्यांना तो वाचवतो.”—स्तोत्र ३४:१८.
“मी तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे, ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.’”—यशया ४१:१३.
पण मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो? यहोवा बऱ्याच मार्गांनी आपल्याला मदत करतो आणि त्याला आपली खूप काळजी आहे. पुढच्या लेखांमधून तुम्हाला या गोष्टीची नक्कीच खात्री मिळेल.
a देवाचं नाव ‘यहोवा’ आहे असं बायबलमध्ये सांगितलंय.—स्तोत्र ८३:१८.