व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?

देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?

जर तुम्हाला एखाद्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर तिने कोणकोणत्या गोष्टी साध्य केल्या आहेत आणि तिला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं होतं हे जाणल्यामुळे तुम्हाला मदत होते. त्याच प्रकारे, जर तुम्हाला देवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर त्याने कोणकोणत्या गोष्टी साध्य केल्या आहेत हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. हे करत असताना तुम्हाला जाणून आश्‍चर्य होईल, की त्याने भूतकाळात अशा बऱ्‍याचशा गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे आपल्याला आज आणि भविष्यात फायदा होईल.

देवाने आपल्या भल्यासाठी सर्वकाही बनवलं

यहोवा देव हा महान सृष्टिकर्ता आहे. “जगाच्या निर्मितीपासूनच त्याचे अदृश्‍य गुण . . . त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून” येतात. (रोमकर १:२०) “ज्याने आपल्या सामर्थ्याने  पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे. आपल्या ज्ञानाचा  उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या  आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले.” (यिर्मया १०:१२, ईझी-टू-रीड व्हर्शन) सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टीदेखील पुरावा देतात की देवाचं आपल्यावर प्रेम आहे.

यहोवाने मानवांना आपल्या ‘प्रतिरूपात’ बनवल्यामुळे आपलं जीवन खूप समृद्ध झालं आहे. (उत्पत्ति १:२७) याचा अर्थ आपण काही प्रमाणात त्याच्यासारखे उत्कृष्ट गुण दाखवू शकतो. तसंच, त्याने आपल्याला त्याची मूल्यं आणि त्याचा दृष्टिकोन समजण्याची क्षमता दिली आहे. आपण जर त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन जास्त आनंदी आणि अर्थपूर्ण बनेल. त्यासोबतच, त्याने आपल्याला त्याच्याशी एक जवळचं नातं जोडण्याची क्षमताही दिली आहे.

देवाला आपल्याबद्दल काय वाटतं हे पृथ्वीला पाहून लक्षात येतं. बायबलच्या एका लेखकाने, पौलने देवाबद्दल म्हटलं, की “त्याने स्वतःविषयी साक्ष देण्याचे सोडले नाही. उलट, आकाशातून पाऊस व फलदायी ऋतू देऊन, अन्‍नधान्याने [आपल्याला] तृप्त करून आणि [आपली] मने आनंदाने भरून तो [आपल्याकरता] चांगल्या गोष्टी करत राहिला.” (प्रेषितांची कार्ये १४:१७) देवाने आपल्याला जिवंत राहण्यासाठी फक्‍त मूलभूत गोष्टीच दिल्या नाहीत, तर त्याने आपल्यासाठी मुबलक प्रमाणात आणि विविध प्रकारच्या गोष्टीही उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आपण जीवनाचा आनंद लुटू शकतो. पण त्याने आपल्यासाठी पुढे राखून ठेवलेल्या गोष्टींची ही तर फक्‍त एक झलक आहे.

मानवांना पृथ्वीवर सर्वकाळासाठी राहता यावं म्हणून यहोवाने पृथ्वी घडवली. बायबल म्हणतं: “पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे” आणि “त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली.” (स्तोत्र ११५:१६; यशया ४५:१८) पण त्याने पृथ्वी कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी आणि किती काळासाठी घडवली? बायबल म्हणतं: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”​—स्तोत्र ३७:२९.

यहोवाने पहिला पुरुष आणि स्त्री, म्हणजे आदाम आणि हव्वा यांना घडवलं आणि एका सुंदर बागेत ठेवलं. त्यांना त्या बागेची “मशागत व राखण” करायची होती. (उत्पत्ति २:८, १५) देवाने त्यांना दोन रोमांचक नेमणुकी दिल्या होत्या: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२८) आदाम-हव्वा यांच्याकडे पृथ्वीवर सर्वकाळ राहण्याची आशा होती. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि पृथ्वीचं वतन पावणाऱ्‍या नीतिमान लोकांपैकी एक असण्याची आशा गमावली. पण असं असलं, तरी त्यांच्या अशा वागण्यामुळे पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश बदलला नाही आणि याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी देवाने आणखीन कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत ते आपण पाहू.

देवाने आपल्याला लिखित वचन दिलं आहे

बायबलला देवाचं वचनदेखील म्हटलं आहे. यहोवाने आपल्याला बायबल का दिलं? पहिलं कारण म्हणजे, आपण त्याच्याविषयी जाणून घ्यावं यासाठी. (नीतिसूत्रे २:१-५) हे खरं आहे की देवाबद्दल असलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर बायबलमध्ये दिलेलं नाही. तसं पाहिलं, तर ते आपल्याला इतर कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. (उपदेशक ३:११) पण बायबलमध्ये जे काही दिलं आहे त्यामुळे आपल्याला देवाला जाणून घ्यायला मदत होते. तो लोकांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून आपल्याला समजतं की तो कसा आहे. त्याला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात यावरूनही आपल्याला त्याच्याबद्दल कळतं. (स्तोत्र १५:१-५) उपासना, नैतिकता आणि भौतिक गोष्टी यांबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे हेही बायबलमधून आपल्याला शिकायला मिळतं. बायबलमध्ये यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्याविषयी माहिती दिली आहे. येशूच्या शब्दांवरून आणि कार्यांवरून आपल्याला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी स्पष्टपणे समजायला मदत होते.​—योहान १४:९.

यहोवाने आपल्याला बायबल देण्याचं दुसरं कारण म्हणजे आपलं जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण कसं बनू शकतं हे आपण जाणून घ्यावं अशी त्याची इच्छा आहे. बायबलद्वारे यहोवा आपल्याला सांगतो की आपलं कुटुंब आनंदी कसं बनवावं, आपण समाधानी कसं असावं आणि चिंतेचा सामना कसा करावा. तसंच, बायबलमध्ये जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरंही दिली आहेत. जसं की, जीवनात इतकी दुःखं का आहेत? भविष्यात काय होणार आहे आणि देवाने आपला मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी काय केलं आहे? यांबद्दल या नियतकालिकेत पुढे चर्चा करण्यात आली आहे.

बायबलमध्ये दिलेल्या इतर गोष्टींवरूनही आपण म्हणू शकतो की या उल्लेखनीय पुस्तकाचा लेखक फक्‍त देवच असू शकतो. बायबल जवळपास ४० जणांनी १,६०० वर्षांच्या कालावधी दरम्यान लिहिलं. असं असलं तरी त्याचा मुख्य विषय एकच आहे, कारण त्याचा खरा लेखक देव आहे. (२ तीमथ्य ३:१६) बायबल वर्षानुवर्षं टिकून राहिलं आहे पण इतर कोणत्याही पुस्तकाबाबतीत असं घडलं नाही. याचा पुरावा आपल्याला प्राचीन काळातल्या बायबलच्या हजारो हस्तलिखितांतून मिळतो. इतकंच काय तर बायबलच्या भाषांतराला व वितरणाला बराच विरोध झाला. तसंच, लोकांनी ते वाचू नये यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात आले. पण तरी आज बायबल सर्वात जास्त वितरित आणि भाषांतरित झालेलं पुस्तक आहे. बायबल आज अस्तित्वात आहे यावरून आपल्याला पुरावा मिळतो की “देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”​—यशया ४०:८.

देव आपला उद्देश पूर्ण करण्याची हमी देतो

देव आपला उद्देश पूर्ण करेल याची हमी म्हणून त्याने आपल्यासाठी एक विशेष प्रबंध केला आहे. आधी उल्लेख केल्यानुसार देवाने मानवांना पृथ्वीवर सर्वकाळ राहण्यासाठी बनवलं होतं. पण आदामने देवाची आज्ञा मोडण्याची निवड करून पाप केलं. त्याने स्वतः तर सर्वकाळ जगण्याची संधी गमावली, पण त्याच्या भावी मुलांनाही ती संधी गमवावी लागली. कारण “ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) मानवांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण होणार नाही असं वाटू शकलं असतं. मग देवाने कोणतं पाऊल उचललं?

यहोवाने आपल्या गुणांनुसार कार्य केलं. त्याने न्यायीपणे आदाम-हव्वाला त्यांच्या कार्यांसाठी जबाबदार ठरवलं. पण भविष्यात होणाऱ्‍या त्यांच्या मुलांसाठी त्याने प्रेमळपणे एक प्रबंध केला. त्याने सुज्ञपणे त्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे ठरवलं आणि उद्‌भवलेल्या समस्येवर उपाय काढला व त्याबद्दल सांगितलंही. (उत्पत्ति ३:१५) त्यांना पापापासून आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी देवाने आपल्या पुत्राद्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे एक प्रबंध केला. यात कोणत्या गोष्टी सामील होत्या?

आदामने केलेल्या बंडाळीमुळे मानवांना त्याचे वाईट परिणाम सोसावे लागले. त्यांना यांपासून सोडवण्यासाठी यहोवाने येशूला या पृथ्वीवर पाठवलं. त्याने लोकांना जीवनाचा मार्ग शिकवला आणि “अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी” म्हणून दिलं. a (मत्तय २०:२८; योहान १४:६) येशू आदामसारखा परिपूर्ण होता, त्यामुळे तो आपला जीव खंडणी म्हणून देऊ शकत होता. पण एका बाबतीत तो आदामसारखा नव्हता. येशू आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत देवाला आज्ञाधारक राहिला. येशू पापी नसला तरी त्याला मृत्यू सहन करावा लागला. म्हणून यहोवाने त्याला स्वर्गातल्या जीवनासाठी पुन्हा जिवंत केलं. यामुळे आज्ञाधारक मानवांना आदाम जे देऊ शकला नाही ते येशू देऊ शकला. ते म्हणजे सर्वकाळाच्या जीवनाची आशा. “कारण जसे एका मनुष्याने आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसेच, एकाच मनुष्याच्या आज्ञापालनामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवले जाईल.” (रोमकर ५:१९) देवाने मानवांना पृथ्वीवर सर्वकाळ राहण्याचं जे वचन दिलं होतं ते तो येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे पूर्ण करेल.

आदामने आज्ञा मोडल्यामुळे उद्‌भवलेल्या समस्या यहोवाने ज्या प्रकारे सोडवल्या त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल खूपकाही शिकायला मिळतं. यहोवा आपला उद्देश कधीच अपूर्ण राहू देत नाही. तो कोणत्याही परिस्थितीत आपला उद्देश पूर्ण करतो. त्याचं वचन कधीच “विफल” होणार नाही. (यशया ५५:११) यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हेही आपल्याला कळतं. “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावे. यावरूनच देवाचे आपल्यावरील प्रेम दिसून आले. प्रेम यातच आहे; आपण देवावर प्रेम केले असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केले; आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्‍चित्ताचे बलिदान म्हणून त्याने आपल्या पुत्राला पाठवले.”​—१ योहान ४:९, १०.

देवाने “तर स्वतःच्या पुत्रालाही राखून ठेवले नाही, तर आपल्या सर्वांकरता त्याला अर्पण केले.” म्हणून आपल्याला खातरी आहे की देवाने अभिवचन दिलेल्या “इतर सर्व गोष्टीही [तो] आपल्याला देणार” आहे. (रोमकर ८:३२) देवाने आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करण्याचं अभिवचन दिलं आहे? चला, त्याबद्दल आपण पुढच्या लेखात वाचू या.

देवाने आपल्यासाठी काय केलं आहे? यहोवाने मानवांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्यासाठी बनवलं होतं. यहोवाबद्दल आपण जाणून घ्यावं म्हणून त्याने आपल्याला बायबल दिलं आहे. तसंच, त्याने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी बलिदानाचा प्रबंधही केला आहे. यामुळे त्याचा उद्देश पूर्ण होईल अशी आपल्याला हमी मिळते

a खंडणीबद्दल जास्त माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा २७ पाहा. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं असून ते www.jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे.