अभ्यास लेख ३९
आपली जवळची व्यक्ती यहोवाला सोडून जाते तेव्हा . . .
“त्यांनी कित्येकदा . . . त्याचं मन दुखावलं.”—स्तो. ७८:४०.
गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”
सारांश *
१. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत करण्यात येतं तेव्हा तिच्या कुटुंबातल्या इतर लोकांना कसं वाटतं?
तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे का? असेल, तर अशा वेळी खरंच खूप दुःख होतं. हिल्डा * नावाची बहीण म्हणते, की “आमच्या लग्नाच्या ४१ वर्षांनंतर जेव्हा माझे पती वारले तेव्हा मला असं वाटलं, की हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. पण जेव्हा माझ्या मुलाने यहोवाला आणि आपल्या बायको-मुलांना सोडून दिलं तेव्हा मला जाणवलं, की हे दुःख तर त्याहून वाईट आहे.”
२-३. एखादी व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा स्तोत्र ७८:४०, ४१ या वचनांनुसार त्याला कसं वाटतं?
२ यहोवाच्या स्वतःच्या कुटुंबातल्या काही स्वर्गदूतांनी जेव्हा त्याला सोडून दिलं तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल याचा विचार करा! (यहू. ६) इतकंच नाही, तर ज्या इस्राएली लोकांवर यहोवाने जिवापाड प्रेम केलं ते वारंवार त्याच्या विरोधात गेले. तेव्हासुद्धा त्याला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना करा! (स्तोत्र ७८:४०, ४१ वाचा.) त्यामुळे तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं तेव्हा यहोवालाही खूप दुःख होतं. तसंच, तुम्हाला कसं वाटतं हे तो समजू शकतो. आणि त्यासाठी लागणारा धीर आणि दिलासा तो नक्की तुम्हाला देईल.
३ पण तो मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर या लेखात चर्चा केली जाईल. तसंच, अशा समस्यांचा सामना करणाऱ्या मंडळीतल्या इतर भाऊबहिणींना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो याबद्दलही या लेखात आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण हे पाहू, की कोणते चुकीचे विचार आपण टाळले पाहिजेत.
स्वतःला दोष देऊ नका
४. जेव्हा मुलं यहोवाला सोडून देतात तेव्हा आईवडिलांना कसं वाटतं?
४ जेव्हा कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी यहोवाला सोडून देते तेव्हा सहसा आईवडील स्वतःलाच दोष देतात. त्यांना वाटतं, की मुलांना सत्यात
वाढवण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो. लूक नावाच्या एका भावाच्या मुलाला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं, तेव्हा त्याला कसं वाटलं त्याबद्दल तो म्हणतो: “मी स्वतःलाच दोष देत राहिलो. त्याबद्दल मला वाईट-वाईट स्वप्नं पडायची. त्या दुःखामुळे मी कधीकधी खूप रडायचो.” एलिझाबेथ नावाच्या बहिणीलासुद्धा अशाच दुःखाचा सामना करावा लागला. ती म्हणते, “एक आई म्हणून मी कुठे चुकले ते मला कळत नाही. माझ्या मुलाला यहोवावर प्रेम करायला शिकवण्यात मीच कमी पडले असं मला वाटायचं.”५. जेव्हा एखादी व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा दोष कोणाचा असतो?
५ एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, की यहोवाने प्रत्येकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. याचाच अर्थ, यहोवाची उपासना करायची की नाही हे प्रत्येक जण स्वतः ठरवू शकतो. काही मुलांच्या बाबतीत असं घडलं आहे, की आईवडिलांचं चांगलं उदाहरण समोर नसतानाही त्यांनी यहोवाची उपासना करायची निवड केली. तर काहींच्या बाबतीत असं घडलं, की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सत्यात खूप चांगलं वाढवलं होतं. पण नंतर ती मुलं यहोवाला सोडून गेली. यावरून दिसून येतं, की यहोवाची सेवा करायचा निर्णय हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. (यहो. २४:१५) त्यामुळे आईवडिलांनो, जेव्हा तुमचं मूल यहोवाला सोडून देतं तेव्हा स्वतःला दोष देऊ नका.
६. जेव्हा आई किंवा वडील यहोवाला सोडून देतात तेव्हा मुलांवर कसा परिणाम होतो?
६ काही वेळा आई किंवा वडील यहोवाला आणि कुटुंबालाही सोडून देतात. (स्तो. २७:१०) असं घडतं तेव्हा मुलांवर फार वाईट परिणाम होतो. कारण मुलांचं आईवडिलांवर खूप प्रेम असतं. एस्तरच्या वडिलांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा तिला कसं वाटलं याबद्दल ती म्हणते, “त्या वेळेस मी खूप रडायचे. कारण मला माहीत होतं, की त्यांनी स्वतःच यहोवाला सोडून द्यायचं ठरवलं होतं. ते काही नकळत सत्यापासून दूर जात होते असं नाही. माझं बाबांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना बहिष्कृत करण्यात आलं, तेव्हा मला सतत त्यांची काळजी वाटायची. काही वेळा तर मी खूप घाबरून जायचे.”
७. ज्या मुलांच्या आईला किंवा वडिलांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे त्या मुलांबद्दल यहोवाला कसं वाटतं?
७ मुलांनो, जर तुमच्या आईला किंवा वडिलांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं असेल, तर तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. आणि यहोवालाही तुमचं दुःख समजतं याची खातरी तुम्ही बाळगू शकता. यहोवा तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही त्याला विश्वासू राहता याचा त्याला खूप आनंद होतो. तुमच्याबद्दल आम्हालाही तसंच वाटतं. याशिवाय, तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा, की तुमच्या आईने किंवा वडिलांनी जो निर्णय घेतला आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. कारण आधी आपण पाहिलं होतं, की यहोवाने प्रत्येकाला निवड करायचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीचा भार वाहिला पाहिजे.—गलती. ६:५, तळटीप.
८. बहिष्कृत व्यक्ती यहोवाकडे परत येईपर्यंत कुटुंबातले इतर सदस्य काय करू शकतात? (“ यहोवाकडे परत या,” ही चौकटसुद्धा पाहा.)
८ आपली जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा आपल्याला ही आशा असते, की एक दिवस ती नक्की यहोवाकडे परत येईल. पण तोपर्यंत आपण आपला विश्वास मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबातल्या इतर व्यक्तींसमोर आणि कदाचित बहिष्कृत झालेल्या व्यक्तीसमोरही आपण एक चांगलं उदाहरण असेल. शिवाय, या दुःखाचा सामना करण्यासाठी लागणारं बळसुद्धा तुम्हाला मिळेल. तर आपला विश्वास मजबूत ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, ते आता आपण पाहू.
विश्वासात मजबूत राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
९. आपला विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (“ आपली जवळची व्यक्ती यहोवाला सोडून जाते तेव्हा ही वचनं आपल्याला धीर देऊ शकतात,” ही चौकटसुद्धा पाहा.)
९ नेहमीच्या आध्यात्मिक गोष्टी करत राहा. जसं की, रोज बायबल वाचा, त्यावर मनन करा आणि नियमितपणे सभांना हजर राहा. त्यामुळे तुमचा आणि कुटुंबातल्या इतर लोकांचा विश्वास मजबूत होईल. याचा जोॲनाला कसा फायदा झाला ते पाहा. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने सत्य सोडून दिलं होतं. पण ती म्हणते, “मी जेव्हा बायबलमध्ये अबीगईल, एस्तर, ईयोब, योसेफ आणि येशू अशा लोकांबद्दल वाचते, तेव्हा माझं मन खूप शांत होतं. त्यांच्या उदाहरणामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि मनातून नकारात्मक विचार काढायला मदत होते. शिवाय, JW ब्रॉडकास्टींगमधल्या खास गीतांमुळेसुद्धा मला खूप धीर मिळतो.”
१०. निराश करणारे विचार आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी स्तोत्र ३२:६-८ ही वचनं आपल्याला कशी मदत करू शकतात?
१० यहोवासमोर आपलं मन मोकळं करा. जेव्हा निराश करणारे विचार तुमच्या मनात येतात तेव्हा प्रार्थना करायचं सोडू नका. आपल्या परिस्थितीबद्दल यहोवा जसा विचार करतो तसा विचार करायला त्याच्याकडे मदत मागा. तसंच, ‘सखोल समज देण्यासाठी आणि ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे तो मार्ग दाखवण्यासाठी’ त्याला विनंती करा. (स्तोत्र ३२:६-८ वाचा.) तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे कदाचित तुम्हाला यहोवाला सांगता येणार नाही. पण यहोवाला तुमचं दुःख समजतं. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि तुम्ही त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करावं असं त्याला वाटतं.—निर्ग. ३४:६; स्तो. ६२:७, ८.
११. इब्री लोकांना १२:११ या वचनाप्रमाणे यहोवाने प्रेमळपणे लावलेली शिस्त बरोबरच आहे असा भरवसा आपण का ठेवू शकतो? (“ बहिष्कृत करणं ही शिस्त लावायची एक प्रेमळ व्यवस्था आहे,” ही चौकटसुद्धा पाहा.)
११ वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्या. कारण बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेवरून खरंतर यहोवाचं प्रेम दिसून येतं. या व्यवस्थेमुळे त्या व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची इब्री लोकांना १२:११ वाचा.) एखाद्याला बहिष्कृत करण्याचा वडिलांनी घेतलेला निर्णय बरोबर नाही असं काही जण म्हणतील. पण लक्षात ठेवा, की असं म्हणणारे लोक सहसा विषयाची एकच बाजू मांडत असतात. त्यामुळे आपण हा भरवसा ठेवला पाहिजे, की वडिलांनी जो काही निर्णय घेतला तो बायबलची तत्त्वं लक्षात ठेवूनच घेतला आहे. शिवाय, वडील “यहोवासाठी न्याय” करतात, हेसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे.—२ इति. १९:६.
संधी मिळते. आणि यामुळे त्याला आणि इतरांनाही फायदा होतो. (१२. बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेला पाठिंबा दिल्यामुळे काही जणांनी कोणते चांगले परिणाम अनुभवले आहेत?
१२ बहिष्कृत करण्याच्या बाबतीत वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला आपण पाठिंबा देतो, तेव्हा खरंतर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला यहोवाकडे परत यायला मदत करत असतो. आधी उल्लेख केलेली एलिझाबेथ म्हणते, “माझ्या मुलासोबत असलेले सगळे संबंध तोडून देणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण नंतर जेव्हा तो यहोवाकडे परत आला तेव्हा त्याने म्हटलं, की माझ्या बाबतीत वडिलांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. त्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळालं. यावरून मला हे समजलं, की यहोवा जेव्हा शिस्त लावतो तेव्हा आपलं भलंच होतं.” शिवाय, तिचे पती मार्क यांनीसुद्धा असं म्हटलं, “माझ्या मुलाने मला नंतर सांगितलं, की यहोवाकडे परत येण्याचं एक कारण म्हणजे आम्ही त्याच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडून दिले होते. आम्ही यहोवाचे खूप आभारी आहोत, की त्याने त्याची आज्ञा पाळायला आम्हाला मदत केली.”
१३. आपल्या दुःखातून सावरण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
१३ अशा भाऊबहिणींशी बोला जे तुम्हाला समजून घेतील. चांगलं उदाहरण असलेल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवा. ते तुम्हाला चांगल्या गोष्टींवर विचार करायला मदत करतील. (नीति. १२:२५; १७:१७) आधी उल्लेख केलेली जोॲना म्हणते, “मला खूप एकटं-एकटं वाटायचं. पण मला समजून घेतील अशा भाऊबहिणींशी मी बोलू लागले तेव्हा मला खूप बरं वाटू लागलं.” पण जर मंडळीतले काही भाऊबहीण असं काही बोलून गेले ज्यामुळे तुम्हाला आणखीनच वाईट वाटलं तर काय?
१४. आपण आपल्या भाऊबहिणींना समजून का घेतलं पाहिजे?
१४ आपल्या भाऊबहिणींना समजून घ्या. कधीकधी मंडळीतले काही जण मनाला लागेल असं काही तरी बोलून जातील. (याको. ३:२) कारण कदाचित अशा वेळी काय बोलायचं हे काही भाऊबहिणींना समजत नसेल. किंवा मग, ते नकळत असं काहीतरी बोलून जातील ज्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं. पण आपल्याला माहीत आहे, की आपण सगळेच चुका करतो. म्हणून प्रेषित पौलने दिलेला सल्ला आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याने म्हटलं: “कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१३) एक बहिणीच्या मुलाला बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्याबद्दल ती म्हणते: “मला धीर देताना काही भाऊबहीण नकळत असं काहीतरी बोलायचे ज्यामुळे मला वाईट वाटायचं. पण त्यांना माफ करायला यहोवाने मला मदत केली.” ज्यांना बहिष्कृत करण्यात आलं आहे त्यांच्या कुटुंबाला मंडळी कशी मदत करू शकते ते आता आपण पाहू या.
मंडळीतले भाऊबहीण कशी मदत करू शकतात?
१५. बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?
१५ बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाशी प्रेमाने आणि आपुलकीने वागा. मिरियमच्या भावाला जेव्हा मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा तिला सभांना जायला खूप
भीती वाटायची. ती म्हणते, की “लोक काय म्हणतील असं मला वाटायचं. पण असे कितीतरी भाऊबहीण होते ज्यांना माझ्या भावाबद्दल ऐकून माझ्यासारखंच खूप वाईट वाटत होतं. त्याच्याबद्दल ते कधीच वाईट बोलले नाहीत. त्यामुळे माझ्या दुःखात मी एकटीच आहे असं मला वाटलं नाही.” आणखीन एक बहीण म्हणते, “आमच्या मुलाला बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा बरेच भाऊबहीण आम्हाला धीर द्यायला आले. काहींनी नंतर आम्हाला सांगितलं, की त्या वेळी काय बोलावं हे त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे ते फक्त आमच्यासोबत रडले आणि काहींनी आम्हाला धीर देणारी पत्रं लिहिली. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यामुळे मला खूप मदत झाली.”१६. बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मंडळीतले भाऊबहीण कशा प्रकारे मदत करू शकतात?
१६ बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना आधार देत राहा. अशा वेळी खासकरून त्यांना तुमच्या प्रेमाची आणि धीराची खूप गरज असते. (इब्री १०:२४, २५) कारण काहींना असं जाणवलं आहे, की कधीकधी मंडळीतले काही जण त्यांच्याशी बोलायचंच सोडून देतात, जणू काय त्यांनासुद्धा बहिष्कृत करण्यात आलं आहे. पण आपण असं कधीच करू नये. ज्यांचे आईवडील यहोवाला सोडून गेले आहेत, त्या मुलांना खासकरून प्रोत्साहनाची आणि धीराची खूप गरज असते. मरीयाच्या पतीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि ते कुटुंबाला सोडून गेले त्या वेळी मंडळीतल्या भाऊबहिणींनी तिला कशी मदत केली त्याबद्दल ती म्हणते: “काही भाऊबहीण आमच्या घरी यायचे. ते आमच्यासाठी जेवण बनवायचे आणि मला कौटुंबिक उपासना घ्यायला मदत करायचे. त्यांनी माझं दुःख समजून घेतलं. आणि ते माझ्यासोबत रडायचे. लोक जेव्हा माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवायचे तेव्हा ते माझ्या बाजूने बोलायचे. त्यांनी खरंच मला खूप धीर दिला.”—रोम. १२:१३, १५.
१७. जे दुःखी आहेत त्यांचं सांत्वन करण्यासाठी वडील काय करू शकतात?
१७ ख्रिस्ती वडिलांनो, बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना धीर देण्यासाठी मिळेल त्या संधीचा उपयोग करा. त्यांचं सांत्वन करायची खास जबाबदारी तुमच्यावर आहे. (१ थेस्सलनी. ५:१४) त्यासाठी सभेच्या आधी आणि नंतर त्यांच्याशी बोलून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटा आणि त्यांच्यासोबत प्रार्थना करा. तसंच, त्यांच्यासोबत सेवाकार्यात काम करा किंवा तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठी त्यांनाही बोलवा. मेंढपाळ या नात्याने तुम्ही दुःखात असलेल्या यहोवाच्या मेंढरांशी प्रेमाने आणि दयाळूपणे वागलं पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे.—१ थेस्सलनी. २:७, ८.
आशा सोडू नका आणि यहोवावर भरवसा ठेवा
१८. २ पेत्र ३:९ या वचनानुसार जे यहोवाला सोडून गेले आहेत त्यांनी काय करावं असं त्याला वाटतं?
१८ “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची [यहोवाची] इच्छा नाही. तर सगळ्यांनी पश्चाताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९ वाचा.) एखाद्याने कितीही गंभीर पाप केलं, तरी त्याचं जीवन यहोवासाठी खूप मौल्यवान आहे. यहोवाने आपल्या सगळ्यांसाठी आणि त्या पापी व्यक्तीसाठीसुद्धा आपल्या प्रिय मुलाचं जीवन बलिदान म्हणून दिलं आहे. कारण यहोवाची अशी इच्छा आहे, की जे लोक त्याला सोडून गेले आहेत त्यांनी त्याच्याकडे परत यावं. आणि त्यासाठी तो त्यांना प्रेमाने मदत करतो. येशूने हरवलेल्या मुलाचं जे उदाहरण दिलं, त्यातल्या त्या मुलासारखं ते परत आपल्याकडे येतील अशी आशा तो बाळगतो. (लूक १५:११-३२) जे सत्य सोडून गेले होते त्यांच्यापैकी अनेक जण स्वर्गातल्या आपल्या प्रेमळ पित्याकडे परत आले आहेत. आणि मंडळीनेही त्यांना मोठ्या मनाने स्वीकारलं आहे. आधी उल्लेख केलेल्या एलिझाबेथच्या मुलाला मंडळीत परत घेण्यात आलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती म्हणते, “मी आशा सोडू नये म्हणून त्या वेळी ज्या-ज्या भाऊबहिणींनी मला धीर दिला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते.”
१९. आपण नेहमी यहोवावर भरवसा का ठेवू शकतो?
१९ आपण कायम यहोवावर भरवसा ठेवू शकतो. कारण तो आपल्याला जे काही करायला सांगतो त्यामुळे आपलंच भलं होतं. तो एक उदार आणि दयाळू पिता आहे. जे त्याची उपासना करतात, त्याच्यावर प्रेम करतात त्या सगळ्यांवर तो मनापासून प्रेम करतो. त्यामुळे तुमच्या दुःखाच्या काळात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही याची खातरी तुम्ही बाळगू शकता. (इब्री १३:५, ६) आधी उल्लेख केलेला मार्क म्हणतो, “यहोवाने आम्हाला कधीच सोडलं नाही. . . . दुःखाच्या काळात तो नेहमी आपल्यासोबत असतो.” भाऊबहिणींनो, यहोवा तुम्हालाही “असाधारण सामर्थ्य” देत राहील. (२ करिंथ. ४:७) हो, तुमची जवळची व्यक्ती जेव्हा यहोवाला सोडून देते तेव्हासुद्धा तुम्ही यहोवाला विश्वासू राहू शकता आणि ती व्यक्ती परत येईल अशी आशा बाळगू शकता.
गीत ३८ आपला भार यहोवावर टाक
^ परि. 5 आपली एखादी जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा खरंच खूप दुःख होतं. असं होतं तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे या लेखात सांगितलं आहे. तसंच, या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि यहोवासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबातले इतर लोक काय करू शकतात हेसुद्धा या लेखात सांगितलं आहे. इतकंच नाही, तर मंडळीतले भाऊबहीण अशा कुटुंबाला दिलासा आणि आधार कसा देऊ शकतात, हेही या लेखात आपण पाहणार आहोत.
^ परि. 1 या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.