व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

गीत ७ यहोवा आमचं बळ

सांत्वनासाठी यहोवाकडे पाहा!

सांत्वनासाठी यहोवाकडे पाहा!

“जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे, त्याची स्तुती असो.”२ करिंथ. १:३.

या लेखात:

यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांचं ज्या प्रकारे सांत्वन केलं त्यावरून काय शिकता येईल ते पाहा.

१. बंदिवासात असलेल्या यहुद्यांच्या परिस्थितीचं वर्णन करा.

 बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांची तुम्ही कल्पना करू शकता का? त्यांनी त्यांचा देश उद्ध्‌वस्त होताना पाहिला होता. त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे त्यांना परक्या देशात नेण्यात आलं. (२ इति. ३६:१५, १६, २०, २१) हे खरंय की बाबेलच्या बंदिवासात असलेल्या लोकांना त्यांची दररोजची कामं करायला काही प्रमाणात स्वातंत्र्य होतं. (यिर्म. २९:४-७) पण तरी त्यांचं जीवन काही सोपं नव्हतं. आणि अशा प्रकारचं जीवन त्यांनी स्वतःहून नक्कीच कधी निवडलं नसतं. मग त्यांना त्यांच्या या परिस्थितीबद्दल कसं वाटत होतं? बंदिवासात असलेल्या एका विश्‍वासू व्यक्‍तीने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “बाबेलमधल्या नद्यांच्या काठांवर बसून, आम्ही सीयोनच्या आठवणीने रडलो.” (स्तो. १३७:१) यावरून कळतं, की खचून गेलेल्या बंदिवानांना सांत्वनाची गरज होती. पण ते त्यांना कुठून मिळणार होतं?

२-३. (क) बंदिवासात असलेल्या यहुद्यांसाठी यहोवाने काय केलं? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवा “सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव” आहे. (२ करिंथ. १:३) तो एक प्रेमळ देव असल्यामुळे त्याच्याजवळ येणाऱ्‍या सगळ्यांचं सांत्वन करायला त्याला आनंद वाटतो. यहोवाला माहीत होतं की बंदिवासात असलेल्या काही लोकांना पश्‍चात्ताप होईल आणि ते त्याच्याकडे परत येतील. (यश. ५९:२०) त्यामुळे बंदिवासात जाण्याच्या १०० पेक्षा जास्त वर्षांआधी यहोवाने यशया संदेष्ट्याला त्याच्या नावाचं पुस्तक लिहायला प्रेरित केलं. यामागे काय उद्देश होता? यशयाने असं लिहिलं, “तुमचा देव म्हणतो: ‘सांत्वन करा! माझ्या लोकांचं सांत्वन करा!’” (यश. ४०:१) अशा प्रकारे, यशया संदेष्ट्याच्या लिखाणांचा वापर करून यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांना हवं असलेलं सांत्वन पुरवलं.

बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांप्रमाणेच आज आपल्यालाही वेळोवेळी सांत्वनाची गरज पडते. या लेखात, बंदिवासात असलेल्या यहुद्यांचं यहोवाने कोणत्या तीन मार्गांनी सांत्वन केलं हे आपण पाहणार आहोत. ते तीन मार्ग म्हणजे: (१) त्याने पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना माफ करायचं वचन दिलं, (२) त्याने त्याच्या लोकांना आशा दिली आणि (३) त्याने त्यांची भीती दूर करायला मदत केली. या मुद्द्‌यांवर चर्चा करत असताना यहोवाच्या सांत्वनदायक शब्दांवरून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याकडेही लक्ष द्या.

यहोवा दया दाखवून माफ करतो

४. यहोवाने दया किंवा करुणा कशी दाखवली? (यशया ५५:७)

यहोवा “खूप करुणामय असा पिता आहे.” (२ करिंथ. १:३) पश्‍चात्ताप करणाऱ्‍या बंदिवानांना त्याने माफ करायचं वचन दिलं तेव्हा त्याने हा गुण दाखवला. (यशया ५५:७ वाचा.) तो म्हणाला: “मी तुझ्यावर दया करीन, कारण माझं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकणारं आहे.” (यश. ५४:८) पण यहोवाने करुणा किंवा दया कशी दाखवली? यहुदी लोकांनी जे केलं होतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत होते. पण तरी यहोवाने त्यांना वचन दिलं की ते बाबेलच्या बंदिवासात कायम राहणार नाहीत. (यश. ४०:२) या शब्दांमुळे पश्‍चात्ताप करणाऱ्‍या लोकांना सांत्वन आणि आश्‍वासन नक्कीच मिळालं असेल!

५. यहोवा आपल्याला नक्की माफ करेल या गोष्टीची आपण बंदिवासात असलेल्या यहुद्यांपेक्षा जास्त खातरी का बाळगू शकतो?

आपण यातून काय शिकू शकतो? हेच की यहोवा त्याच्या सेवकांना मोठ्या मनाने क्षमा करायला तयार आहे. यहोवा आपल्याला माफ करेल या गोष्टीची आज आपण यहुद्यांपेक्षा जास्त खातरी बाळगू शकतो. का? कारण यहोवा कोणत्या आधारावर आपल्याला माफ करतो हे आपल्याला माहीत आहे. यशयाने भविष्यवाणी केल्याच्या शेकडो वर्षांनंतर, यहोवाने पश्‍चात्ताप करणाऱ्‍या सर्व पापी माणसांसाठी त्याच्या प्रिय मुलाला या पृथ्वीवर खंडणी द्यायला पाठवलं. या खंडणीमुळे आपली पापं ‘पुसून टाकण्यासाठी,’ म्हणजे पूर्णपणे खोडण्यासाठी एक आधार मिळाला. (प्रे. कार्यं ३:१९; यश. १:१८; इफिस. १:७) खरंच आपण ज्या देवाची सेवा करतो तो किती दयाळू आहे!

६. यहोवा किती करुणामय आहे यावर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

जर आपल्याला दोषीपणाच्या भावना सतावत असतील, तर यशया ५५:७ मध्ये दिलेल्या यहोवाच्या प्रेरित शब्दांमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं. आपल्यापैकी काही जणांना कदाचित पश्‍चात्ताप करूनसुद्धा दोषी असल्यासारखं वाटत असेल; खासकरून त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तेव्हा. पण जर आपण आपली पापं कबूल केली असतील आणि गरज असलेले बदल केले असतील, तर आपण याची खातरी बाळगू शकतो की यहोवाने आपल्याला माफ केलंय. आणि जेव्हा यहोवा माफ करतो, तेव्हा तो आपली पापं लक्षात ठेवत नाही. (यिर्मया ३१:३४ सोबत तुलना करा.) त्यामुळे आपण केलेल्या पापांवर जर यहोवा विचार करत नाही तर मग आपण का करावा? यहोवासाठी आपण आधी केलेली पापं महत्त्वाची नसून, आपण सध्या काय करतोय ते महत्त्वाचंय. (यहे. ३३:१४-१६) शिवाय, लवकरच आपला करुणामय पिता यहोवा आपल्याला भोगाव्या लागणाऱ्‍या चुकांचे परिणाम कायमचे दूर करेल.

यहोवासाठी आपण आधी केलेली पापं महत्त्वाची नसून, आपण सध्या काय करतोय ते महत्त्वाचं आहे (परिच्छेद ६ पाहा)


७. आपण जर आपलं पाप लपवत असू तर मदत घ्यायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे सोपं जाईल?

पण जर गंभीर पाप लपवल्यामुळे आपला विवेक आपल्याला दोष देत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी बायबल आपल्याला मंडळीतल्या वडिलांची मदत घ्यायचं प्रोत्साहन देतं. (याको. ५:१४, १५) हे खरंय, की पाप कबूल करणं सोपं नसतं. पण जर आपण पश्‍चात्ताप केला आणि हे लक्षात ठेवलं की यहोवाने ज्यांना नेमलंय ते त्याच्याप्रमाणेच आपल्याला दया दाखवायला तयार आहेत, तर आपल्याला त्यांची मदत घ्यायला सोपं जाईल. आर्थर a नावाच्या एका भावाला यहोवाच्या मदतीमुळे कसं सांत्वन मिळालं, हे पाहा. त्याने केलेल्या चुकीमुळे त्याचा विवेक त्याला खूप सतावत होता. तो म्हणतो: “जवळपास एक वर्ष मी पोर्नोग्राफी पाहत होतो. पण विवेकावर एक भाषण ऐकल्यानंतर मी माझं पाप माझ्या पत्नीजवळ आणि वडिलांजवळ कबूल केलं. त्यानंतर मला बरं वाटलं. पण अजूनही मी माझ्या पापाच्या ओझ्याखाली दबून होतो. तेव्हा वडिलांनी मला याची आठवण करून दिली की यहोवाने मला नाकारलेलं नाही. तो आपल्याला शिस्त लावतो कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे. त्यांच्या या प्रेमळ शब्दांमुळे माझ्या मनाला खूप बरं वाटलं आणि त्यामुळे मला माझे विचार बदलायला मदत झाली.” आज आर्थर एक पायनियर आणि सहायक सेवक म्हणून सेवा करतोय. आपण जर पश्‍चात्ताप केला, तर यहोवा आपल्याला दया दाखवायला तयार असतो. हे समजल्यामुळे आपल्याला खरंच किती सांत्वन मिळतं!

यहोवा आपल्याला आशा देतो

८. (क) यहोवाने बंदिवानांना कोणती आशा दिली होती? (ख) यशया ४०:२९-३१ प्रमाणे पश्‍चात्ताप करणाऱ्‍या यहुद्यांवर आशेचा काय परिणाम होणार होता?

मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर यहुदी बंदिवानांना पुढे कोणतीच आशा नव्हती. कारण महासत्ता असलेलं बाबेल शहर त्याच्या गुलामांना कधीच सोडत नव्हतं. (यश. १४:१७) पण यहोवाने त्याच्या लोकांना एक आशा दिली. त्याने वचन दिलं की तो त्याच्या लोकांची नक्की सुटका करेल. आणि कुठलीच गोष्ट त्याला रोखू शकणार नव्हती. (यश. ४४:२६; ५५:१२) यहोवाच्या नजरेत बाबेल हे धुळीच्या कणांसारखं होतं. (यश. ४०:१५) एक फुंकर मारताच ही धूळ उडून जाईल अशी त्यांची परिस्थिती होती. मग या आशेमुळे बंदिवानांवर काय परिणाम होणार होता? त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार होता. पण याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट घडणार होती. याबद्दल यशया संदेष्ट्याने लिहिलं: “यहोवाची आशा धरणाऱ्‍यांना नव्याने शक्‍ती मिळेल.” (यशया ४०:२९-३१ वाचा.) हो, या आशेमुळे त्यांना ताकद मिळणार होती. ते “गरुडांसारखे पंख पसरून उंच भरारी” घेणार होते.

९. यहोवा त्याची अभिवचनं नक्कीच पूर्ण करेल यावर बंदिवासात असलेले यहुदी का भरवसा ठेवू शकले?

यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांना त्याच्या अभिवचनांवर भरवसा ठेवण्याचं कारणही दिलं. ते कसं? त्यांना पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांबद्दल माहीत होतं. जसं की, बंदिवासात असलेल्या यहुद्यांना माहीत होतं, की अश्‍शूरने इस्राएलचं उत्तरेकडचं राज्य काबीज केलंय आणि तिथल्या लोकांना बंदिवासात नेलंय. (यश. ८:४) तसंच, बाबेलने यरुशलेमचा नाश करून तिथल्या लोकांना बंदिवासात नेलंय हेही त्यांनी पाहिलं होतं. (यश. ३९:५-७) शिवाय, बाबेलच्या राजाने सिद्‌कीया राजाला आंधळं करून बाबेलला नेलं होतं तेव्हा ते तिथे होते. (यिर्म. ३९:७; यहे. १२:१२, १३) यहोवाने जे-जे सांगितलेलं ते-ते पूर्ण झालं होतं. (यश. ४२:९; ४६:१०) या सगळ्या गोष्टींमुळे बंदिवासात असलेल्या यहुद्यांचा विश्‍वास आणखी मजबूत झाला असेल. त्यांना याची पक्की खातरी पटली असेल, की यहोवाने सुटकेचं जे अभिवचन दिलंय ते तो नक्कीच पूर्ण करेल!

१०. शेवटल्या दिवसांत आपली आशा पक्की करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

१० आपण यातून काय शिकू शकतो? जेव्हा आपल्याला निराश असल्यासारखं वाटतं तेव्हा आशेमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं आणि पुन्हा ताकद मिळवायला मदत होऊ शकते. आज आपण खूप कठीण काळात राहत आहोत आणि शक्‍तिशाली शत्रूंचा आपल्याला सामना करावा लागतोय. तरी आपण खचून जाऊ नये. कारण यहोवाने आपल्याला खरी शांती आणि सुरक्षा असलेल्या सर्वकाळच्या जीवनाची सुंदर आशा दिलेली आहे. म्हणून ही आशा आपल्या मनात अगदी पक्की असली पाहिजे. विचार करा: तुमच्या घराबाहेरचं दृश्‍य खूप सुंदर आहे, पण खिडकीच्या काचेवर धूळ साचल्यामुळे तुम्हाला ते स्पष्ट दिसत नाही. पण काच नीट पुसली तर ते सुंदर दृश्‍य तुम्हाला स्पष्टपणे पाहता येईल. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाची खिडकी स्वच्छ पुसली तर आपल्याला आपली आशा स्पष्टपणे दिसेल. म्हणजेच आपली आशा आणखी पक्की होईल. आपल्याला हे कसं करता येईल? नवीन जगात आपलं जीवन कसं असेल, याची कल्पना करण्यासाठी आपण नियमितपणे वेळ काढू शकतो. तसंच आपण आपल्या आशेबद्दल असलेले लेख वाचू शकतो, व्हिडिओ बघू शकतो आणि गाणी ऐकू शकतो. यासोबतच आपण ज्या अभिवचनांची आतुरतेने वाट पाहत आहोत, त्यांबद्दलही यहोवाशी प्रार्थनेत बोलू शकतो.

११. गंभीर आजार असलेल्या एका बहिणीला ताकद मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे मदत होते?

११ खूप गंभीर आजार असलेल्या जॉईस नावाच्या एका बहिणीला आशेमुळेच सांत्वन आणि बळ कसं मिळालं ते पाहा. ती म्हणते: “मला जेव्हा खूप निराश झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी माझं मन यहोवासमोर मोकळं करते. कारण मला माहीत असतं, की तो मला समजून घेऊ शकतो. आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून तो मला ‘असाधारण सामर्थ्य’ देतो.” (२ करिंथ. ४:७) तसंच, जॉईस नवीन जगाचीसुद्धा नेहमी कल्पना करते. तिथे देशातला एकही रहिवासी असं म्हणणार नाही की “मी आजारी आहे.” (यश. ३३:२४) आपणही जर तिच्यासारखंच यहोवासमोर आपलं मन मोकळं केलं आणि आपल्या आशेवर लक्ष लावलं, तर आपल्यालाही ताकद मिळू शकते.

१२. कोणत्या कारणांमुळे आपण यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ यहुदी बंदिवानांप्रमाणेच यहोवा आजही आपल्याला त्याच्या अभिवचनांवर भरवसा ठेवायची बरीच कारणं देतो. आज आपल्या दिवसांमध्ये पूर्ण होणाऱ्‍या भविष्यवाण्यांचाच विचार करा. उदाहरणार्थ, आपण एक अशी जागतिक महासत्ता बघतोय, जी ‘थोडीफार मजबूत आणि थोडीफार कमजोर’ आहे. (दानी. २:४२, ४३) तसंच, आपण ‘ठिकठिकाणी भूकंप होत असल्याचंही’ ऐकतोय. आणि “संपूर्ण जगात” साक्ष देण्याच्या एका कामातसुद्धा आपण सहभाग घेतोय. (मत्त. २४:७, १४) या आणि अशा बऱ्‍याच भविष्यवाण्यांमुळे यहोवाची सांत्वनदायक अभिवचनं पूर्ण होणार आहेत, यावरचा आपला भरवसा आणखी मजबूत होतो.

आज आपण ज्या भविष्यवाण्या पूर्ण होताना पाहत आहोत त्यांमुळे आपल्याला यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवण्याची कारणं मिळतात (परिच्छेद १२ पाहा)


यहोवा आपली भीती दूर करतो

१३. (क) सुटकेच्या वेळी यहुद्यांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागणार होता? (ख) यशया ४१:१०-१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाने बंदिवासात असलेल्यांचं सांत्वन कसं केलं?

१३ यहोवाने एक अद्‌भुत आशा देऊन यहुद्यांचं सांत्वन केलं असलं तरी त्याला माहीत होतं, की त्यांच्या सुटकेच्या वेळी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. यहोवाने आधीच सांगितलं होतं, की बंदिवासाच्या शेवटी एक शक्‍तिशाली राजा आजूबाजूच्या राष्ट्रांचा नाश करेल आणि बाबेलला धमकावेल. (यश. ४१:२-५) मग याबद्दल यहुद्यांना काळजी करायची गरज होती का? नाही. कारण यहोवाने खूप आधी त्याच्या लोकांचं सांत्वन करत म्हटलं होतं: “भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे.” (यशया ४१:१०-१३ वाचा.) यहोवाने जेव्हा म्हटलं, की “मी तुझा देव आहे,” तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? यहुद्यांनी त्याची उपासना केली पाहिजे याची तो त्यांना इथे आठवण करून देत होता का? नाही, तो त्यांना याची आठवण करून देत होता, की तो अजूनही त्यांच्या बाजूने आहे.—स्तो. ११८:६.

१४. यहोवाने आणखी कोणत्या मार्गाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांची भीती दूर केली?

१४ यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांना आपल्या असीम ताकदीची आणि बुद्धीचीही आठवण करून दिली. अशा प्रकारे त्याने त्यांची भीती दूर केली. त्याने त्यांना ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश पाहायला सांगितलं. त्याने म्हटलं, की त्याने फक्‍त ताऱ्‍यांची निर्मितीच केली नाही, तर तो त्यातल्या प्रत्येकाला नावाने ओळखतो. (यश. ४०:२५-२८) मग जर ताऱ्‍यांच्या बाबतीत हे खरंय, तर त्याला आपल्या प्रत्येक सेवकाचं नावसुद्धा नक्कीच माहीत असेल! आणि या ताऱ्‍यांना जर निर्माण करायची ताकद यहोवाकडे आहे, तर त्याच्या लोकांना मदत करायची ताकद त्याच्याकडे नसेल का? नक्कीच असेल. त्यामुळे यहुदी बंदिवानांना कुठल्याही गोष्टीची काळजी किंवा चिंता करायची गरज नव्हती.

१५. पुढे होणाऱ्‍या घटनांविषयी यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांना कसं तयार केलं?

१५ यहोवाने पुढे घडणार असलेल्या घटनांसाठीही त्याच्या लोकांना तयार केलं. यशया पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात देवाने त्याच्या लोकांना म्हटलं: “आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा, दारं लावून घ्या. देवाचा क्रोध शांत होईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) जेव्हा कोरेश राजाने बाबेलवर हल्ला केला तेव्हा यहुद्यांनी या सूचना लागू केल्या असाव्यात. एका प्राचीन ग्रीक इतिहासकाराने याविषयी असं म्हटलं, की जेव्हा कोरेश बाबेलमध्ये शिरला तेव्हा “त्याने [त्याच्या सैनिकांना] दाराबाहेर असलेल्या सगळ्यांना ठार मारायचा आदेश दिला.” या घटनेमुळे बाबेलमधले रहिवाशी किती घाबरले असतील याची कल्पना करा! पण बंदिवासातल्या यहुद्यांनी यहोवाच्या सूचनांचं पालन केल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

१६. भविष्याबद्दल आपल्याला जास्त चिंता करायची गरज का नाही? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ आपण यातून काय शिकू शकतो? लवकरच आपण मानवी इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना करणार आहोत. जेव्हा त्याची सुरुवात होईल तेव्हा लोक गोंधळून जातील आणि अक्षरशः घाबरून जातील. पण आपल्या बाबतीत तसं काही होणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे, की यहोवा आपला देव आहे. तसंच, “सुटकेची वेळ जवळ येत आहे,” हे माहीत असल्यामुळेही आपण खंबीर उभे राहू. (लूक २१:२८) जेव्हा राष्ट्रांचा समूह आपल्यावर हल्ला करेल तेव्हासुद्धा आपण खंबीरपणे उभे राहू. त्या वेळी यहोवा आपल्याला स्वर्गदूतांचं संरक्षण देण्यासोबतच जीवन वाचवणाऱ्‍या सूचनाही देईल. त्या वेळी या सूचना आपल्याला कशा कळवण्यात येतील? त्याबद्दल सध्यातरी आपल्याला काही माहीत नाही. पण कदाचित या सूचना आपल्याला आपल्या मंडळ्यांमधून मिळतील. एका अर्थाने त्या कदाचित आपल्यासाठी ‘आतल्या खोल्या’ असू शकतात. तिथेच आपल्याला सुरक्षित वाटेल. मग पुढे घडणाऱ्‍या घटनांसाठी आपण आत्ता तयारी कशी करू शकतो? त्यासाठी आपण आपल्या भाऊबहिणींसोबत एक मजबूत नातं जोडलं पाहिजे, संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन मनापासून पाळलं पाहिजे आणि यहोवाच संघटनेचं नेतृत्व करतोय याची आपल्याला खातरी असली पाहिजे.—इब्री १०:२४, २५; १३:१७.

यहोवाच्या ताकदीवर आणि आपल्याला वाचवण्याच्या त्याच्या क्षमतेवर विचार केल्यामुळे मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला घाबरण्याची गरज नसेल (परिच्छेद १६ पाहा) b


१७. तुम्ही यहोवाकडून सांत्वन कसं मिळवू शकता?

१७ बंदिवासातल्या यहुद्यांचं जीवन खूप कठीण होतं. म्हणून यहोवाने त्यांना सांत्वन दिलं. तो आपल्या बाबतीतही तसंच करेल. त्यामुळे उद्याचा दिवस काहीही घेऊन आला, तरी सांत्वनासाठी यहोवाकडे पाहत राहा, त्याच्या अपार दयेवर भरवसा ठेवा आणि आपली आशा जिवंत ठेवा. लक्षात असू द्या, की यहोवा तुमचा देव आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही.

गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b चित्राचं वर्णन: काही भाऊबहीण एकत्र आले आहेत. त्यांना यहोवाच्या ताकदीवर आणि जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलेल्या त्याच्या लोकांचं संरक्षण करण्याच्या क्षमतेवर पूर्ण भरवसा आहे.