अभ्यास लेख १८
गीत १ यहोवाचे गुण
‘सगळ्या पृथ्वीच्या दयाळू न्यायाधीशावर’ भरवसा ठेवा
“सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?”—उत्प. १८:२५.
या लेखात:
अनीतिमान लोकांच्या पुनरुत्थानाबद्दल यहोवाची दया आणि त्याचा न्याय कसा दिसून येतो याबद्दलची आपली समज वाढवा.
१. यहोवाने आब्राहामला दिलासा देणारी कोणती गोष्ट सांगितली?
अब्राहाम देवासोबत झालेलं बोलणं कधीच विसरला नाही. एका स्वर्गदूताद्वारे देवाने अब्राहामला सांगितलं, की तो सदोम आणि गमोरा या देशांचा पूर्णपणे नाश करून टाकेल. यामुळे विश्वासू अब्राहामला खूप काळजी वाटली. त्याने विचारलं: “तू खरंच दुष्टांसोबत नीतिमान लोकांचाही नाश करशील का? . . . सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?” म्हणून यहोवाने खूप धीराने त्याच्या मित्राला एक गोष्ट शिकवली. यामुळे आपल्या सगळ्यांनाच फायदा होतो आणि सांत्वन मिळतं. ती गोष्ट म्हणजे: यहोवा नीतिमान लोकांचा कधीच नाश करणार नाही. —उत्प. १८:२३-३३.
२. यहोवा नीतीने आणि दयेने न्याय करतो याची आपल्याला कशामुळे खातरी पटते?
२ यहोवा नीतीने आणि दयेने न्याय करतो हे आपण खातरीने का म्हणू शकतो? कारण आपल्याला माहीत आहे, की ‘यहोवा लोकांचं हृदय पाहतो.’ (१ शमु. १६:७) खरंतर, तो “प्रत्येक माणसाचं मन” ओळखू शकतो. (१ राजे ८:३९; १ इति. २८:९) ही खरंच एक जबरदस्त गोष्ट आहे. यहोवाचा न्याय आपल्या बुद्धिपलीकडे आहे आणि आपण ते कधीच समजू शकत नाही. त्यामुळे प्रेषित पौलने यहोवा देवाबद्दल जे म्हटलं ते अगदी योग्य आहे. त्याने म्हटलं, की यहोवाचे निर्णय आपल्या बुद्धिपलीकडे आहेत.—रोम. ११:३३.
३-४. आपल्या मनात कोणते प्रश्न येऊ शकतात आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (योहान ५:२८, २९)
३ असं असलं तरी कधीकधी आपल्या मनात अब्राहामसारखे प्रश्न येऊ शकतात. आपल्याला कदाचित असंही वाटू शकतं: ‘सदोम आणि गमोरामध्ये ज्या लोकांचा न्याय करण्यात आला त्यांना भविष्याबद्दल काही आशा आहे का? ज्या अनीतिमान लोकांना मेलेल्यांमधून उठवलं जाणार आहे, त्यात त्यांनाही उठवलं जाईल का?’—प्रे. कार्यं २४:१५.
४ पण त्याआधी आपल्याला पुनरुत्थानाबद्दल काय माहीत आहे हे आता आपण पाहू. अलीकडेच आपल्याला “जीवनाचं पुनरुत्थान” आणि “न्यायाचं पुनरुत्थान” a याबद्दल स्पष्ट समज मिळाली. (योहान ५:२८, २९ वाचा.) पण ही समज मिळाल्यामुळे इतर काही गोष्टींबद्दल असलेली आपली समजही बदलते. त्याबद्दल आपण या आणि पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत. पण सर्वात आधी आपण यहोवाच्या नीतिमान न्यायाबद्दल आपल्याला काय माहीत नाही हे पाहू या आणि मग काय माहीत आहे ते पाहू या.
आपल्याला काय माहीत नाही?
५. सदोम आणि गमोरामध्ये नाश झालेल्या लोकांबद्दल आधी आपण काय म्हटलं होतं?
५ गेल्या काळात आपल्या प्रकाशनांमध्ये यहोवा ज्यांना अनीतिमान समजतो त्यांच काय होईल याबद्दल चर्चा करण्यात आली होती. अशा अनीतिमान लोकांबद्दल, जसं की सदोम आणि गमोरामधल्या लोकांबद्दल आपण म्हटलं होतं, की त्यांना पुनरुत्थानाची आशा नाही. पण प्रार्थनापूर्वक आणखी अभ्यास केल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला, की आपण असं खरंच खातरीने म्हणू शकतो का?
६. यहोवाने अनीतिमान लोकांचा न्याय केल्याची कोणती उदाहरणं आहेत?
६ बायबलमध्ये असे बरेचसे अहवाल आहेत ज्यांमध्ये यहोवाने अनीतिमान लोकांचा न्याय केला. उदाहरणार्थ, जलप्रलयात असंख्य लोक मारले गेले. तसंच, वचन दिलेल्या देशात राहत असलेल्या सात राष्ट्रांमधल्या लोकांचा नाश करायला यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं. तसंच, त्याने एका स्वर्गदूताचा वापर करून एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिक मारले. (उत्प. ७:२३; अनु. ७:१-३; यश. ३७:३६, ३७) या सगळ्या घटनांमध्ये यहोवाने अनीतिमान लोकांचा कायमचा नाश केला आणि त्यांना आता पुनरुत्थानाची काहीच आशा नाही, असं आपल्याला म्हणता येईल का? असं म्हणायला बायबलमध्ये पुरेशी माहिती आहे का? नाही. बायबलमध्ये याबद्दल पुरेशी माहिती सांगितलेली नाही. चला याबद्दल आणखी जाणून घेऊ या.
७. जलप्रलयामुळे नाश झालेल्या लोकांबद्दल किंवा कनान देश काबीज करताना नाश झालेल्या लोकांबद्दल आपल्याला काय माहीत नाही? (चित्र पाहा.)
७ ज्यांचा नाश केला होता त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचा यहोवाने कसा न्याय केला असेल हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला हेही माहीत नाही की ज्यांचा नाश करण्यात आला त्यांना यहोवाबद्दल शिकून पश्चात्ताप करायची संधी मिळाली होती की नाही. जलप्रलयाच्या काळाबद्दल बायबल सांगतं, की नोहा “नीतिमत्त्वाचा प्रचारक” होता. (२ पेत्र २:५) पण त्यात असं म्हटलेलं नाही की भलंमोठं जहाज बांधत असताना नोहाने पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला भेटून प्रचार करायचा प्रयत्न केला. त्याच प्रकारे, कनानमधल्या राष्ट्रांच्या बाबतीतही आपल्याला हे माहीत नाही, की तिथल्या सर्व दुष्ट लोकांना यहोवाबद्दल शिकून जीवनात बदल करायची संधी मिळाली होती की नव्हती.
८. सदोम आणि गमोरामधल्या लोकांबद्दल आपल्याला कोणती गोष्ट माहीत नाही?
८ सदोम आणि गमोरामधल्या लोकांबद्दल काय? त्या लोकांमध्ये नीतिमान माणूस लोट राहत होता. पण लोटने त्या सगळ्यांना प्रचार केला की नाही हे आपल्याला माहीत नाही. हे खरंय की ते लोक दुष्ट होते. पण त्या सगळ्यांनाच योग्य आणि अयोग्य काय हे माहीत होतं का? लोटच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत संबंध ठेवण्यासाठी एक जमाव लोटच्या घरी आला, त्या घटनेचा विचार करा. बायबल म्हणतं, की त्या जमावात “तरुण मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत” सगळे लोक होते. (उत्प. १९:४; २ पेत्र २:७) आपला दयाळू देव यहोवाने त्यांपैकी प्रत्येकाला पुनरुत्थानाची आशा न देता मृत्यूदंड द्यायचं ठरवलं होतं असं आपण खातरीने म्हणू शकतो का? यहोवाने अब्राहामला म्हटलं होतं, की त्या शहरात दहासुद्धा नीतिमान लोक नाहीत. (उत्प. १८:३२) त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ते अनीतिमान होते. आणि म्हणून यहोवाने त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार ठरवून योग्य तेच केलं होतं. पण त्यांपैकी कोणीच ‘अनीतिमान लोकांच्या पुनरुत्थानात’ उठणार नाही असं आपण खातरीने म्हणू शकतो का? नाही.
९. शलमोनबद्दल आपल्याला काय माहीत नाही?
९ दुसरीकडे, आपण बायबलमध्ये अशा नीतिमान लोकांबद्दलही वाचतो जे नंतर अनीतिमान झाले. शलमोन राजाचंच उदाहरण घ्या. त्याला यहोवा देव कोण आहे आणि त्याची उपासना कशी केली पाहिजे, हे माहीत होतं. आणि त्याला यहोवाकडून भरभरून आशीर्वादही मिळाले होते. पण तरीसुद्धा तो नंतर खोट्या देवांची उपासना करू लागला. त्यामुळे यहोवाचा क्रोध भडकला आणि शलमोनच्या पापांमुळे संपूर्ण इस्राएल राष्ट्राला बऱ्याच शतकांपर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागले. हे खरंय की शास्त्रवचनांत म्हटलंय, की “शलमोन आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.” आणि त्या पूर्वजांमध्ये दावीद राजासारखे विश्वासू लोकसुद्धा होते. (१ राजे ११:५-९, ४३ तळटीप; २ राजे २३:१३) पण मग शलमोनला ज्या पद्धतीने पुरण्यात आलं त्यावरून त्याचं पुनरुत्थान होईल अशी खातरी मिळते का? बायबल याचं उत्तर देत नाही. तरी पण काही लोक म्हणतील की बायबलमध्ये तर म्हटलंय, की “जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे.” (रोम. ६:७) हो हे खरंय. पण याचा असा अर्थ होत नाही की मेलेल्या सगळ्यांचंच पुनरुत्थान होईल, जणू नवीन जीवन मिळवण्याचा त्यांना हक्कच आहे. कारण पुनरुत्थान ही देवाकडून एक प्रेमळ भेट आहे. आणि ही भेट, म्हणजे सर्वकाळ त्याची उपासना करण्याची संधी तो फक्त अशा लोकांनाच देतो ज्यांना द्यायची त्याची इच्छा आहे. (ईयो. १४:१३, १४; योहा. ६:४४) मग शलमोनला ही भेट मिळेल का? ते यहोवालाच माहीत; आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे मात्र नक्की माहीत आहे, की यहोवा जे योग्य आहे तेच करेल.
आपल्याला काय माहीत आहे?
१०. मानवांचा नाश करण्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? (यहेज्केल ३३:११) (चित्रसुद्धा पाहा.)
१० यहेज्केल ३३:११ वाचा. मानवांचा न्याय करण्याची वेळ येते तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे तो आपल्याला सांगतो. संदेष्टा यहेज्केलने जे लिहिलं त्याबद्दल प्रेषित पेत्रने देवाच्या प्रेरणेने असं म्हटलं: “कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही.” (२ पेत्र ३:९) दिलासा देणाऱ्या बायबलच्या या वचनामुळे आपल्याला माहीत आहे, की यहोवा कोणाचाही कायमचा नाश करायची घाई करत नाही. तो मुळातच एक दयाळू देव आहे. आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा तो दया दाखवतो.
११. कोणाचं पुनरुत्थान होणार नाही आणि आपण हे कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
११ ज्यांचं पुनरुत्थान होणार नाही अशा लोकांबद्दल आपल्याला काय माहीत आहे? बायबलमध्ये याची खूप कमी उदाहरणं आहेत. b उदाहरणार्थ, यहूदा इस्कर्योतचं पुनरुत्थान होणार नाही असं येशूने दाखवून दिलं. c (मार्क १४:२१; योहा. १७:१२) यहूदाने मुद्दामहून यहोवा देवाच्या आणि त्याच्या मुलाच्या विरुद्ध काम केलं. (मार्क ३:२९ आणि टेहळणी बुरूज०७ ८/१ १३ पाहा.) त्यासोबतच येशूने असंही म्हटलं की त्याचा विरोध करणारे काही धार्मिक पुढारी पुनरुत्थानाच्या आशेविनाच मरतील. (मत्त. २३:३३; योहा. १९:११) तसंच, प्रेषित पौलने सांगितलं की पश्चात्ताप न करणाऱ्या धर्मत्यागी लोकांचं पुनरुत्थान होणार नाही.—इब्री ६:४-८; १०:२९.
१२. यहोवाच्या दयेबद्दल आपल्याला काय माहीत आहे? उदाहरण द्या.
१२ पण यहोवाच्या दयेबद्दल आपल्याला काय माहीत आहे? “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही” हे त्याने कसं दाखवलं? ज्यांनी गंभीर पापं केली होती त्यांना यहोवाने दया कशी दाखवली याची काही उदाहरणं पाहा. दावीद राजाने व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं केली होती. पण दावीदने पश्चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला दया दाखवली आणि माफ केलं. (२ शमु. १२:१-१३) मनश्शे राजानेही आयुष्यभर दुष्ट कामं केली होती. पण त्याचं इतकं वाईट उदाहरण असतानासुद्धा जेव्हा त्याने पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला त्या पश्चात्तापाच्या आधारावर दया दाखवली आणि माफ केलं. (२ इति. ३३:९-१६) या उदाहरणांवरून आपल्याला कळतं, की जेव्हा यहोवाकडे दया दाखवण्यासाठी आधार असतो तेव्हा तो दया दाखवतो. आणि अशा लोकांचं तो नक्कीच पुनरुत्थान करेल. कारण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी पश्चात्ताप केला.
१३. (क) यहोवाने निनवेमधल्या लोकांना दया का दाखवली? (ख) येशूने नंतर निनवेमधल्या लोकांबद्दल काय म्हटलं?
१३ यहोवाने निनवेच्या लोकांना कशी दया दाखवली याबद्दलसुद्धा आपल्याला माहीत आहे. देवाने योनाला सांगितलं: “त्या शहरातल्या लोकांचा दुष्टपणा मी पाहिला आहे.” पण जेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यांना माफ केलं. तो योनापेक्षा कितीतरी जास्त दयाळू होता. देवाला आपल्या या चिडलेल्या संदेष्ट्याला याची आठवण करून द्यावी लागली, की निनवेच्या लोकांना ‘चांगल्यावाइटाचा फरकसुद्धा माहीत नाही.’ (योना १:१, २; ३:१०; ४:९-११) नंतर, येशूने त्यांचं उदाहरण देऊन लोकांना यहोवाच्या दयेबद्दल आणि न्यायाबद्दल शिकवलं. येशूने म्हटलं की पश्चात्ताप केल्यामुळे “न्यायाच्या वेळी निनवेचे लोक . . . उठतील.”—मत्त. १२:४१.
१४. निनवेच्या लोकांसाठी ‘न्यायाच्या पुनरुत्थानाचा’ काय अर्थ होतो?
१४ येशूने जेव्हा म्हटलं की निनवेचे लोक “न्यायाच्या” वेळी “उठतील,” तेव्हा तो कोणत्या न्यायाबद्दल बोलत होता? येशूने भविष्यात होणाऱ्या “न्यायाच्या पुनरुत्थानाबद्दल” सांगितलं होतं. (योहा. ५:२९) तो त्याच्या हजार वर्षांच्या राज्याबद्दल बोलत होता. तेव्हा “नीतिमान आणि अनीतिमान” अशा सगळ्या लोकांचं पुनरुत्थान होईल. (प्रे. कार्यं २४:१५) अनीतिमान लोकांसाठी हे “न्यायाचं पुनरुत्थान” असेल. म्हणजे पुनरुत्थान झाल्यावर ते शिकलेल्या गोष्टीप्रमाणे वागत आहेत की नाहीत, हे यहोवा आणि येशू पाहतील. जर समजा पुनरुत्थान झालेल्या निनवेमधल्या एका व्यक्तीने शुद्ध उपासनेला नकार दिला, तर त्याचा न्याय करून नाश केला जाईल. (यश. ६५:२०) पण यहोवाची विश्वासूपणे उपासना करायची निवड करणाऱ्या सगळ्यांचा न्याय केला जाईल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची संधी दिली जाईल!—दानी. १२:२.
१५. (क) सदोम आणि गमोरामध्ये नाश झालेल्या कुठल्याच व्यक्तीचं पुनरुत्थान होणार नाही असं आपण का म्हणू नये? (ख) यहूदा ७ मधल्या शब्दांचा आपण कसा अर्थ घेऊ शकतो? (“ यहूदाला काय म्हणायचं होतं?” ही चौकट पाहा.)
१५ सदोम आणि गमोराबद्दल बोलताना येशूने म्हटलं, की “न्यायाच्या दिवशी” त्याला नाकारणाऱ्या आणि त्याच्या शिकवणींना न मानणाऱ्या लोकांपेक्षा सदोम आणि गमोरामधल्या लोकांना सोपं जाईल. (मत्त. १०:१४, १५; ११:२३, २४; लूक १०:१२) त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? कदाचित आपल्याला असं वाटेल, की येशू इथे अतिशयोक्ती करत होता. पण निनवेच्या लोकांबद्दल बोलताना तो अतिशयोक्ती करत नव्हता. d उलट, असं दिसतं की येशूला तसंच म्हणायचं होतं. येशू दोन्ही वेळी ज्या ‘न्यायाच्या दिवसाबद्दल’ बोलला होता तो दिवस एकच आहे. निनवेच्या लोकांसारखं सदोम आणि गमोराच्या लोकांनीसुद्धा वाईट कामं केली होती. पण निनवेच्या लोकांकडे पश्चात्ताप करण्याची संधी होती. पुढे येशू ‘न्यायाच्या पुनरुत्थानाबद्दल’ बोलला. त्यात ‘वाईट कामं करणाऱ्यांचासुद्धा’ समावेश असेल. (योहा. ५:२९) त्यामुळे असं दिसून येतं, की सदोम आणि गमोरामधल्या लोकांना काही प्रमाणात आशा असू शकते. तसंच, त्यांच्यापैकी काही लोकांचं पुनरुत्थान होईल अशी शक्यता आहे. आणि त्यांना यहोवा आणि येशू ख्रिस्ताबद्दल शिकवण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळू शकते.
१६. एखाद्याचं पुनरुत्थान करण्याबद्दल यहोवा कसा निर्णय घेईल याबद्दल आपल्याला काय माहीत आहे? (यिर्मया १७:१०)
१६ यिर्मया १७:१० वाचा. या वचनातून यहोवा कसा न्याय करतो याबद्दल आपल्याला काय माहीत आहे हे कळतं. यहोवा नेहमी लोकांचं “हृदय पारखतो” आणि तो प्रत्येकाच्या मनातल्या खोल विचारांचं परीक्षण करतो. भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल बोलायचं झालं, तर नेहमीप्रमाणे ‘प्रत्येकाला त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देईल.’ जेव्हा गरज आहे तेव्हा तो ठाम राहील, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा तो दया दाखवेल. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला खातरीने माहीत नाही, तोपर्यंत अमुक एका व्यक्तीला पुनरुत्थानाची आशा नाही असा अंदाज आपण लावू नये.
सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करेल
१७. मेलेल्या लाखे-करोडो लोकांचं काय होईल?
१७ आदाम आणि हव्वाने सैतानासोबत मिळून यहोवाविरुद्ध बंड केलं, तेव्हापासून लाखो-करोडो लोकांचा मृत्यू झालाय. आपल्या ‘शेवटच्या शत्रूने, म्हणजे मृत्यूने’ मोजताही येणार नाही इतक्या लोकांचा बळी घेतलाय! (१ करिंथ. १५:२६) मग या लोकांना काही आशा आहे का? हो. ख्रिस्ताच्या विश्वासू अनुयायांपैकी काही ठराविक लोकांचं, म्हणजे १,४४,००० लोकांचं स्वर्गात अमर जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाईल. (प्रकटी. १४:१) तसंच, यहोवावर प्रेम करणाऱ्या विश्वासू स्त्री-पुरुषांच्या मोठ्या लोकसमुदायाचा ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानात’ समावेश असेल. आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या काळात आणि शेवटच्या परीक्षेत जर ते नीतिमान राहिले, तर त्यांना या पृथ्वीवर कायम जगण्याची संधी मिळेल. (दानी. १२:१३; इब्री १२:१) पण जे “अनीतिमान” आहेत अशांना हजार वर्षांच्या काळात त्यांचे मार्ग बदलण्याची आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्याची संधी दिली जाईल. या अनीतिमान लोकांमध्ये अशा लोकांचा समावेश होतो ज्यांनी यहोवाची सेवा कधीच केली नाही किंवा ज्यांनी ‘वाईट कामं केली’ होती. (लूक २३:४२, ४३) पण काही लोक इतके दुष्ट होते आणि यहोवाच्या व त्याच्या उद्देशांच्या विरुद्ध बंड करण्यासाठी इतके ठाम होते, की यहोवाने त्यांचं पुनरुत्थान न करण्याचा निर्णय घेतलाय.—लूक १२:४, ५.
१८-१९. (क) मेलेल्या लोकांच्या बाबतीत यहोवा योग्यच न्याय करेल याची आपण खातरी का बाळगू शकतो? (यशया ५५:८, ९) (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१८ आपण असं खातरीने म्हणू शकतो का, की लोकांचा न्याय करताना यहोवा नेहमी योग्य तेच करेल? हो! आधी सांगितल्याप्रमाणे अब्राहामला हे चांगल्या प्रकारे कळलं होतं, की यहोवा परिपूर्ण, सर्वात बुद्धिमान, दयाळू असा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” आहे. त्याने त्याच्या मुलाला प्रशिक्षण दिलंय आणि त्याच्यावर न्याय करायची जबाबदारी सोपवली आहे. (योहा. ५:२२) यहोवा आणि येशूला माणसाच्या मनात काय आहे हे ओळखता येतं. (मत्त. ९:४) त्यामुळे काहीही झालं तरी ते ‘योग्य तेच’ करतील!
१९ तर मग, योग्य काय आहे हे यहोवाला माहीत आहे या गोष्टीवरचा आपला भरवसा आणखी मजबूत करू या! न्याय करायला लागणारी पात्रता आपल्याकडे नाही, पण यहोवाकडे आहे! (यशया ५५:८, ९ वाचा.) म्हणून आपण असा पूर्ण भरवसा ठेवू या की यहोवा आणि त्याचा मुलगा न्याय करायचं सगळं काम योग्यपणेच करतील. कारण त्याचा मुलगा, आपल्या पित्याच्या न्यायाचं आणि दयेचं हुबेहूब अनुकरण करणारा योग्य असा राजा आहे! (यश. ११:३, ४) पण मोठ्या संकटाच्या वेळी यहोवा आणि येशू लोकांचा न्याय कसा करतील, याबद्दल आपण काय म्हणू शकतो? त्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही? आणि काय माहीत आहे? या सगळ्या प्रश्नांवर पुढच्या लेखात चर्चा केली जाईल.
गीत ५७ सर्व प्रकारच्या लोकांना संदेश सांगा!
b आदाम, हव्वा आणि काइनबद्दल १ जानेवारी २०१३ च्या टेहळणी बुरूज अंकातली पान १२ वरची तळटीप पाहा.
c योहान १७:१२ मध्ये ‘नाशाचा मुलगा’ असं जे म्हटलंय त्याचा अर्थ असा होतो, की यहूदा मेल्यानंतर त्याचं पुनरुत्थान होणार नाही तर त्याचा कायमचा नाश होईल.
d अतिशयोक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीवर जोर देण्यासाठी मुद्दामहून तिला खूप जास्त वाढवून किंवा मोठी करून सांगणं. पण इथे असं दिसतं, की येशू सदोम आणि गमोराच्या लोकांबद्दल बोलताना या अर्थाने बोलला नाही. आणि त्यामुळे ही अतिशयोक्ती नाही.