अभ्यास लेख २१
‘जगाच्या बुद्धीमुळे’ फसू नका
“या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे.” —१ करिंथ. ३:१९.
गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने
सारांश *
१. देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं?
यहोवा देव आपला महान शिक्षक असल्यामुळे आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. (यश. ३०:२०, २१) आपल्याला “सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज” होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते देवाचं वचन आपल्याला पुरवतं. (२ तीम. ३:१७) बायबलच्या शिकवणींनुसार चालल्याने आपण ‘जगाच्या बुद्धीला’ बढावा देणाऱ्यांपेक्षा अधिक सुज्ञ बनतो.—१ करिंथ. ३:१९; स्तो. ११९:९७-१००.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ जगाची बुद्धी सहसा शारीरिक इच्छांना बढावा देत असल्यामुळे ती लोकांना हवीहवीशी वाटते. त्यामुळे आपल्यावर जगातल्या लोकांसारखा विचार करण्याचा आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा दबाव येतो. अशा वेळी यांचा विरोध करायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणूनच बायबल म्हणतं, की “मानवी परंपरांनुसार व जगाच्या प्राथमिक गोष्टींनुसार असलेले तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.” (कलस्सै. २:८) या लेखात आपण पाहणार आहोत, की प्रचलित झालेल्या दोन खोट्या किंवा निरर्थक अशा फसव्या गोष्टींचा उगम कसा झाला. या दोन्ही बाबतीत, जगाची बुद्धी कशी मूर्खपणाची आहे आणि देवाची बुद्धी जगातल्या सर्व गोष्टींपेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे हे आपण पाहणार आहोत.
नैतिकतेविषयी बदललेला दृष्टिकोन
३-४. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत अमेरिकेत नैतिकतेबद्दल लोकांच्या दृष्टिकोनात कोणते बदल झाले?
३ अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नैतिकतेबद्दल लोकांच्या दृष्टिकोनात खूप मोठा बदल झाला. बरेच लोक आधी असा विचार करायचे, की शारीरिक संबंध हे विवाहित जोडप्यांमध्येच असले पाहिजेत आणि असे विषय सर्वांसमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. पण याविषयांबाबतीत स्तर कमालीचे घसरले आणि अनैतिक गोष्टींत काहीच गैर नाही अशी विचारसरणी प्रचलित झाली.
४ १९२० ते १९२९ या काळाला “रोरींग ट्वेंटीझ” म्हणजे उफाळणारं विसावं शतक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पहिल्या महायुद्धात लोकांना खूपकाही सहन करावं लागलं होतं आणि त्यामुळे खासकरून १९२२ ते २ तीम. ३:४.
१९२९ या काळादरम्यान त्यांचं लक्ष सुखविलासावर आणि पैशांवर केंद्रित झालं. एका संशोधिकाचं म्हणणं आहे, की त्या काळादरम्यान “चित्रपट, नाटकं, गाणी, पुस्तकं आणि जाहिरात यांत भरपूर अश्लील गोष्टींचा समावेश करण्यात आला.” तसंच, त्या दशकात उत्तेजक नृत्यं आणि शालीन नसलेले कपडे यांना जास्त बढावा मिळाला. शेवटच्या काळाबद्दल बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलं होतं की लोक “चैनीची आवड असलेले” बनतील.—५. १९६० नंतर नैतिक स्तराविषयी असलेल्या जगाच्या दृष्टिकोनात कोणता बदल झाला?
५ १९६० नंतर अनेक गोष्टी बदलल्या. लग्नाशिवाय एकत्र राहणं, समलैंगिकता, घटस्फोट यांचं प्रमाण वाढलं. अनेक प्रकारच्या मनोरंजनामध्ये अश्लील गोष्टी अगदी उघडपणे दाखवल्या जाऊ लागल्या. याचा परिणाम आपण आताच्या काही दशकांमध्ये अनुभवू शकतो. एका लेखिकेने म्हटलं की लोक जेव्हा नैतिक स्तर सोडून वागतात तेव्हा खूपच वाईट परिणाम घडून येतात. यामुळे पालक एकत्र राहत नसलेली कुटुंबं, एकट्याने मुलांचं संगोपन करणारे पालक, भावनात्मक जखमा, पोर्नोग्राफीचं व्यसन आणि यांसारख्या गोष्टी वाढल्या आहेत. तसंच, आज लैंगिक संबंधांतून होणारा भयंकर रोग, जसं की एड्स जगभरात पसरला आहे. या सर्व गोष्टींवरून दिसून येतं की जग ज्याला चांगली जीवनशैली म्हणतं ती खरंच किती मूर्खपणाची आहे.—२ पेत्र २:१९.
६. लैंगिक संबंधाबद्दल असलेला जगाचा दृष्टिकोन सैतानाच्या उद्देशानुसार कसा आहे?
६ आज जगाचा लैंगिक संबंधाबद्दलचा दृष्टिकोन खरंतर सैतानाच्या उद्देशानुसार आहे. विवाह आणि लैंगिक संबंध या देवाने दिलेल्या भेटींचा लोक जेव्हा अनादर करतात तेव्हा सैतानाला नक्कीच खूप आनंद होतो. (इफिस. २:२) देवाने मानवांना मुलं होण्याची देणगी दिली आहे. पण लैंगिक अनैतिकता करून ते या भेटीला तुच्छ लेखतात. तसंच, यामुळे त्यांना सर्वकाळ जगण्याची संधीही कदाचित मिळणार नाही.—१ करिंथ. ६:९, १०.
नैतिकतेबद्दल बायबलचा दृष्टिकोन
७-८. लैंगिक संबंधाबद्दल बायबलचा दृष्टिकोन जगाच्या दृष्टिकोनापेक्षा लाख पटीने योग्य कसा आहे?
७ या जगाच्या बुद्धीनुसार चालणारे लोक बायबलच्या नैतिक स्तरांविषयी म्हणतात की ते व्यावहारिक नाहीत. असं करून ते त्यांची थट्टा करतात. असे लोक कदाचित विचारतील, ‘देवाने आपल्याला लैंगिक इच्छा दिली आहे तर मग तो आपल्याला ती इच्छा पूर्ण करू नका असं का सांगेल?’ खरंतर ते लोक एक चुकीची धारणा बाळगतात. ती म्हणजे ‘मानवाने आपल्या मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण केलीच पाहिजे.’ पण बायबलमध्ये असं सांगितलेलं नाही. उलट, त्यात म्हटलं आहे की आपण आपल्या प्रत्येक इच्छेच्या आहारी जाऊ नये. जे चुकीचं आहे त्याला लढा देण्याची क्षमता आपल्यात आहे. (कलस्सै. ३:५) तसंच, मानवांना त्यांच्या योग्य लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवाने त्यांना विवाहाची व्यवस्था देणगी म्हणून दिली आहे. (१ करिंथ. ७:८, ९) लैंगिक अनैतिकतेमुळे अनेकदा पस्तावा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पण विवाहाच्या व्यवस्थेत पती आणि पत्नी या दोषी भावनांशिवाय शारीरिक संबंधाचा आनंद अनुभवू शकतात.
८ जगाच्या बुद्धीच्या अगदी उलट बायबलमध्ये लैंगिक संबंधाबद्दल योग्य दृष्टिकोन दिला आहे. त्यात म्हटलं आहे की लैंगिक संबंधामुळे आनंद मिळू शकतो. (नीति. ५:१८, १९) असं असलं तरी बायबल म्हणतं: “तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर, पवित्रतेने व आदराने नियंत्रण ठेवता आले पाहिजे. देवाला न ओळखणाऱ्या विदेश्यांसारखे लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका.”—१ थेस्सलनी. ४:४, ५.
९. (क) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला यहोवाच्या सेवकांना देवाच्या सर्वश्रेष्ठ बुद्धीने चालण्याचं प्रोत्साहन कसं मिळालं? (ख) १ योहान २:१५, १६ या वचनांत कोणता सुज्ञ सल्ला दिला आहे? (ग) रोमकर १:२४-२७ या वचनांत दिल्याप्रमाणे आपण कोणत्या अनैतिक गोष्टी टाळल्या पाहिजेत?
९ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, “नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून” गेलेल्या लोकांच्या दृष्टिकोनामुळे, त्या काळातले यहोवाचे सेवक फसले नाहीत. (इफिस. ४:१९) ते यहोवाच्या स्तरांना जडून राहिले. १५ मे १९२६ च्या वॉचटॉवरमध्ये म्हटलं होतं की “एका पुरुषाने किंवा स्त्रीने विशेषकरून विरुद्धलिंगी व्यक्तीच्या बाबतीत आपल्या विचारांत आणि वागण्यात शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे.” त्या काळात अनेक गोष्टी प्रचलित होत्या, पण यहोवाचे लोक देवाच्या वचनातल्या सर्वश्रेष्ठ बुद्धीनुसार चालत होते. (१ योहान २:१५, १६ वाचा.) खरंच, देवाने आपल्याला त्याचं वचन दिलं आहे यासाठी आपण त्याचे मनापासून आभारी आहोत! तसंच, तो आपल्याला योग्य वेळी आध्यात्मिक अन्नं पुरवतो आणि यामुळे आपल्याला नैतिकतेबद्दल जगाच्या बुद्धीनुसार चालण्याचा विरोध करायला मदत होते. *—रोमकर १:२४-२७ वाचा.
स्वतःवर प्रेम करण्याबाबतीत बदललेला दृष्टिकोन
१०-११. शेवटच्या दिवसांबद्दल बायबलमध्ये कोणता इशारा देण्यात आला होता?
१० शेवटच्या दिवसांत लोक “स्वतःवर प्रेम करणारे” बनतील असा इशारा बायबलमध्ये देण्यात आला आहे. (२ तीम. ३:१, २) यामुळे हे जग स्वार्थी मनोवृत्तीला बढावा देतं याचं आपल्याला जरादेखील आश्चर्य होत नाही. एका संदर्भात म्हटलं आहे की १९७० च्या दशकात “यशस्वी जीवन कसं जगता येईल याविषयावर असलेली पुस्तकं मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागली.” काही पुस्तकांमध्ये म्हटलं होतं की “तुम्ही स्वतःला बदलण्याची किंवा तुमच्यात काही उणीवा आहेत असा विचार करण्याची गरज नाही.” उदाहरणार्थ, त्यांपैकी एका पुस्तकात असं म्हटलं होतं, की “स्वतःवर प्रेम करा कारण फक्त तुम्हीच जगातली सर्वात सुंदर, रोमांचक आणि मौल्यवान व्यक्ती आहात.” या पुस्तकात, एका व्यक्तीने कसं वागावं हे तिने स्वतः ठरवलं पाहिजे आणि तिला जे योग्य व सोयीस्कर वाटतं तेच तिने केलं पाहिजे असंदेखील म्हटलं होतं.
११ अशी वाक्य तुम्हाला ऐकल्यासारखी वाटतात का? सैतानाने हव्वाला असंच काहीतरी करायला प्रवृत्त केलं होतं. ती ‘देवासारखी बरेवाईट जाणणारी’ बनू शकते असं त्याने म्हटलं. (उत्प. ३:५) आज बऱ्याच लोकांना वाटतं की ते त्यांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत आणि बरोबर काय व चूक काय याबद्दल त्यांना कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही; अगदी देवाचीसुद्धा नाही. जसं की, आज लग्नाबद्दल असलेला लोकांचा दृष्टिकोन.
१२. जग विवाहबद्दलच्या कोणत्या दृष्टिकोनाला बढावा देतं?
१२ पती आणि पत्नीने एकमेकांना आदर दिला पाहिजे आणि त्यांनी लग्नात एकमेकांना दिलेलं वचन पाळलं पाहिजे असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. विवाहसोबत्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे असं त्यात प्रोत्साहन देण्यात आलं आहे. बायबल म्हणतं: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्प. २:२४) याच्या विपरीत जगाच्या बुद्धीमुळे प्रभावीत झालेल्या लोकांचं दुसरंच मत आहे. त्यांच्यानुसार विवाहसोबत्याने स्वतःच्याच गरजांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. घटस्फोटावर आधारित असलेल्या एका पुस्तकात म्हटलं आहे, की “काही देशांत लग्न करताना जोडपी, ‘आम्ही मरेपर्यंत एकमेकांना साथ देऊ’ अशी लोकांसमोर शपथ घेतात. पण बऱ्याच लोकांनी या शपथेच्या शब्दांत बदल केले आहेत. ते म्हणतात ‘आमचं एकमेकांवर प्रेम असेपर्यंत आम्ही एकमेकांना साथ देऊ.’ विवाह हे कायमस्वरुपाचं बंधन नाही असं लोकांना वाटत असल्यामुळे अगणित कुटुंबं विस्कळीत झाली आहेत आणि यामुळे बऱ्याच लोकांना भावनिक रीत्या इजा पोहोचल्या आहेत. यात काहीच शंका नाही की विवाहाचा अनादर करणारा जगाचा दृष्टिकोन खरंच मूर्खपणाचा आहे.
१३. यहोवाला गर्विष्ठ लोकांचा वीट येण्याचं एक कारण काय आहे?
१३ बायबल म्हणतं: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.” (नीति. १६:५) यहोवाला गर्विष्ठ लोकांचा वीट का येतो? याचं एक कारण म्हणजे, स्वतःविषयी प्रमाणाबाहेर प्रेम विकसित करणारे आणि अशा विचाराला बढावा देणारे लोक खरंतर सैतानासारखीच गर्विष्ठ वृत्ती बाळगतात. देवाने ज्याला सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरलं त्या येशूने आपल्याला दंडवत करावा आणि आपली उपासना करावी असा विचार सैतानाच्या मनात आला. यावरून कळतं की सैतान किती गर्विष्ठ बनला असेल. (मत्त. ४:८, ९; कलस्सै. १:१५, १६) गर्वाने फुगलेले लोक दाखवून देतात की त्यांचे मते ते बुद्धिमान असले, तरी खरं पाहता ते देवाच्या नजरेत मूर्ख आहेत.
स्वतःला महत्त्व देण्याविषयी बायबलचा दृष्टिकोन
१४. रोमकर १२:३ या वचनामुळे आपल्याला स्वतःबद्दल वाजवी दृष्टिकोन ठेवायला कशी मदत होते?
१४ बायबल आपल्याला स्वतःविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचं प्रोत्साहन देतं. त्यात म्हटलं आहे की काही प्रमाणात स्वतःवर प्रेम करणं चुकीचं नाही. येशूने म्हटलं: “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” याचा अर्थ, आपण आपल्या गरजांकडे वाजवी प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. (मत्त. १९:१९) असं असलं तरी, बायबल शिकवतं की आपण इतरांपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहोत असा विचार आपण करू नये. याउलट त्यात म्हटलं आहे: “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”—फिलिप्पै. २:३; रोमकर १२:३ वाचा.
१५. स्वतःला महत्त्व देण्याबद्दल बायबलमध्ये दिलेला सल्ला व्यावहारिक आहे असं तुम्हाला का वाटतं?
१५ आज हुशार किंवा शिक्षित मानले जाणारे पुष्कळ लोक स्वतःला महत्त्व देण्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याची थट्टा करतात. त्यांचं म्हणणं आहे की जर आपण इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं तर ते आपला फायदा उचलतील. पण खरं पाहता सैतानाच्या जगाने आत्मकेंद्रित मनोवृत्तीला बढावा दिल्यामुळे काय परिणाम झाले आहेत? तुम्हाला सगळीकडे काय पाहायला मिळतं? स्वार्थी लोक आनंदी आहेत का? त्यांची कुटुंबं सुखी आहेत का? त्यांचे भरवशालायक मित्र आहेत का? त्यांचं देवासोबत एक घनिष्ठ नातं आहे का? तुमच्या पाहण्यात जे आलं असेल त्यावरून तुम्हाला काय वाटतं, कोणत्या बुद्धीमुळे चांगले परिणाम घडून आले आहेत, जगाच्या की देवाच्या वचनात दिलेल्या?
१६-१७. आपण कशाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे आणि का?
१६ नावाजलेल्या बुद्धिमान लोकांच्या सल्ल्यानुसार वागणारे लोक, हरवलेल्या प्रवाशासारखे आहेत जो योग्य दिशेसाठी अशा सहप्रवाशाला विचारतो जो स्वतःदेखील हरवला आहे. येशूच्या काळात ज्यांना बुद्धिमान किंवा सुज्ञ मानलं जायचं त्यांच्याबद्दल त्याने म्हटलं: “ते आंधळे असून इतरांना मार्ग दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.” (मत्त. १५:१४) यावरून स्पष्टच होतं की देवाच्या नजरेत जगाची बुद्धी मूर्खपणाची आहे.
१७ बायबलमध्ये दिलेले सुज्ञ सल्ले हे “शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी” आहेत हे एकदा दोनदा नाही तर नेहमीच सिद्ध झालं आहे. (२ तीम. ३:१६) आपण यहोवाचे खरंच खूप आभारी आहोत की त्याने त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला जगाच्या बुद्धीपासून सुरक्षित ठेवलं आहे. (इफिस. ४:१४) तो पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नामुळे आपल्याला त्याच्या वचनात दिलेल्या स्तरांना जडून राहायला मदत होते. यहोवाने आपल्याला बायबलद्वारे सर्वात भरवशालायक बुद्धी आणि मार्गदर्शन दिलं आहे हा खरंच आपल्यासाठी एक बहुमान आहे!
गीत ३२ निर्भय व निश्चयी राहा!
^ परि. 5 आपल्याला भरवशालायक मार्गदर्शन फक्त यहोवा देवाकडून मिळतं यावर आपला भरवसा आणखी पक्का करण्यासाठी या लेखामुळे आपल्याला मदत होईल. तसंच, आपण या लेखात हेही पाहणार आहोत की जगाच्या बुद्धीनुसार चालल्याने वाईट परिणाम घडून येतात, पण देवाच्या वचनावर आधारलेल्या बुद्धीनुसार चालल्याने आपल्याला फायदा होतो.
^ परि. 9 उदाहरणार्थ, क्वेशन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क खंड १ अध्या. २४-२६, खंड २ अध्या. ४-५ आणि तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं प्रश्न ७ पृ. २१-२३ पाहा.
^ परि. 50 चित्रांचं वर्णन: लोक लग्न न करता एकत्र राहत होते आणि समलैंगिकता व घटस्फोटाचं प्रमाण वाढलं होतं त्या काळादरम्यान ते जोडपं एकमेकांना एकनिष्ठ राहिलं आणि त्याने सोबत प्रचार केला.
^ परि. 52 चित्रांचं वर्णन: काही वर्षांनंतर पती आपल्या आजारी पत्नीची काळजी घेतो. त्यांची मुलगीदेखील त्यांच्यासोबत आहे.
^ परि. 54 चित्रांचं वर्णन: आज ते जोडपं आनंदाने यहोवाची सेवा केल्याच्या आठवणी ताज्या करत आहेत. आता त्यांच्या मुलीचंही कुटुंब आहे आणि ते त्यांच्या आनंदात सहभागी होत आहे.