तरुणांनो—सैतानाविरुद्ध दृढ उभे राहा
“सैतानाच्या डावपेचांविरुद्ध तुम्हाला स्थिर उभे राहता यावे म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.”—इफिस. ६:११.
१, २. (क) काही ख्रिस्ती तरुण सैतान आणि दुरात्म्यांविरुद्ध चाललेल्या लढाईत कशामुळे जिंकत आहेत? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) आपण कशावर चर्चा करणार आहोत?
प्रेषित पौलने ख्रिस्ती लोकांची तुलना सैनिकांशी केली. आपण एका युद्धात असून खरोखरच्या शत्रूंसोबत लढत आहोत. पण ते शत्रू मानव नसून सैतान आणि दुरात्मे आहेत. हजारो वर्षांपासून युद्ध लढत असल्यामुळे ते तरबेज योद्धा बनले आहेत. म्हणून आपल्याला कदाचित वाटेल की आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही आणि खासकरून तरुणांना तर हे अशक्यच वाटेल. पण तरुण अशा शक्तिशाली शत्रूंविरुद्ध युद्ध जिंकू शकतात का? हो, ते जिंकू शकतात आणि जिंकतही आहेत. असं करणं त्यांना कशामुळे शक्य झालं आहे? यहोवा देत असलेल्या शक्तीमुळे. त्यासोबतच चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झालेल्या सैनिकांसारखं, तरुण जण “देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण” करतात. यामुळे ते लढा द्यायला अगदी सुसज्ज होतात.—इफिसकर ६:१०-१२ वाचा.
२ पौलने जेव्हा या उदाहरणाचा उल्लेख केला, तेव्हा कदाचित तो एका रोमी सैनिकाने घातलेल्या युद्धाच्या शस्त्रसामग्रीबद्दल विचार करत असावा. (प्रे. कार्ये २८:१६) हे उदाहरण योग्य का आहे, याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच, या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतली प्रत्येक वस्तू धारण करण्याचे कोणते काही फायदे आणि समस्या आहेत याबद्दल तरुणांचं मतही आपण जाणून घेणार आहोत.
“सत्याचा पट्टा”
३, ४. बायबलमधलं सत्य हे रोमी सैनिक युद्धात घालणाऱ्या पट्ट्यासारखं कसं आहे?
३ इफिसकर ६:१४ वाचा. एका रोमी सैनिकाच्या युद्धात घालायच्या पट्ट्याला, धातूच्या पट्ट्या असायच्या. यामुळे सैनिकाची कंबर सुरक्षित राहायची आणि त्याने घातलेले जड कवच जागच्याजागी राहायचे. शिवाय, काही पट्ट्यांना तलवार आणि कट्यार अडकवण्यासाठी मजबूत कड्यांचीही सोय होती. हा पट्टा घट्ट बांधून एक सैनिक युद्धभूमीवर लढायला जाण्यासाठी अगदी आत्मविश्वासाने तयार असायचा.
४ त्या पट्ट्यासारखं देवाच्या वचनातली सत्यं खोट्या शिकवणींपासून आपलं रक्षण करतात. (योहा. ८:३१, ३२; १ योहा. ४:१) देवाच्या वचनातून शिकलेल्या सत्यांबद्दल आपलं प्रेम जितकं वाढेल, तितकं देवाच्या स्तरांनुसार जीवन जगणं किंवा “कवच” घालणं आपल्याला सोपं जाईल. (स्तो. १११:७, ८; १ योहा. ५:३) तसंच, ही सत्यं जितक्या चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ, तितक्या कुशलपणे आपल्या शत्रूंसमोर त्या सत्यांचं आपण समर्थन करू शकू.—१ पेत्र ३:१५.
५. आपण नेहमी खरं का बोललं पाहिजे?
५ देवाच्या वचनांत दिलेली सत्यं आपल्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे बायबलमध्ये दिलेल्या गोष्टींचं आपण पालन करतो आणि नेहमी खरं बोलतो. खोटं बोलणं हे सैतानाच्या यशस्वी हत्यारांपैकी एक आहे. खोटं बोलणारा आणि खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा या दोघांनाही यामुळे इजा पोहोचते. (योहा. ८:४४) म्हणून आपण अपरिपूर्ण असलो तरी आपण नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (इफिस. ४:२५) पण असं करणं कठीण जाऊ शकतं. १८ वर्षांची अबीगईल म्हणते: “खरं बोलणं कदाचित नेहमीच फायद्याचं वाटणार नाही; खासकरून खोटं बोलल्यामुळे एखाद्या मोठ्या समस्येतून आपली सुटका होणार असेल तेव्हा.” पण तरीही ती नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न का करते? याबद्दल ती म्हणते: “मी जेव्हा खरं बोलते तेव्हा यहोवासमोर मी शुद्ध विवेक ठेवू शकते. तसंच, मम्मी-पप्पा आणि मित्र-मैत्रिणी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतात.” २३ वर्षांची व्हिक्टोरिया म्हणते: “जेव्हा तुम्ही खरं बोलता आणि खंबीरपणे आपल्या विश्वासाचं समर्थन करता, तेव्हा कदाचित इतर जण तुम्हाला त्रास देतील. पण खरं बोलल्याने खूप फायदे होतात; म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो, यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ होतो आणि तुमच्यावर प्रेम असलेल्या लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटतो.” म्हणूनच “सत्याचा पट्टा” नेहमी घालणं खूप महत्त्वाचं आहे.
“नीतिमत्त्वाचे कवच”
६, ७. नीतिमत्त्वाची तुलना कवचाशी का केली आहे?
६ एका रोमी सैनिकाचे कवच सहसा लोखंडाच्या आडव्या लहान पट्ट्यांनी बनलेलं असायचं. त्या वाकवलेल्या असल्यामुळे कवच सैनिकाच्या छातीला अगदी घट्ट बसायचं. लोखंडी पट्ट्या चामड्याच्या पट्ट्यांना जोडलेल्या असून त्यांना धातूचे आकडे (हूक) आणि फासे (बक्कल) असायचे. सैनिकांच्या पूर्ण खांद्यावर आणखी लोखंडी पट्ट्या असून त्यादेखील चामड्याला जोडलेल्या असायच्या. कवचामुळे सैनिक जास्त हालचाल करू शकत नव्हता. तसंच, त्या पट्ट्या जागच्याजागी आहेत की नाहीत याची त्याला नेहमी खात्री करून घ्यावी लागायची. पण या कवचामुळे तलवारीच्या किंवा बाणाच्या टोकापासून त्याच्या हृदयाचं आणि इतर अवयवांचं रक्षण व्हायचं.
७ यहोवाच्या नीतिमान स्तरांची तुलना कवचाशी केली जाऊ शकते. कारण यामुळे आपल्या “अंतःकरणाचे” किंवा आपल्या आतल्या व्यक्तिमत्त्वाचं रक्षण होतं. (नीति. ४:२३) एक सैनिक आपल्या लोखंडी कवचाच्या बदल्यात कमजोर धातूने बनलेलं कवच कधीच घेणार नाही. त्याच प्रकारे, योग्यतेबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांच्या बदल्यात आपण स्वतःचे विचार स्वीकारणार नाही. कारण आपण आपल्या हृदयाचं रक्षण करण्याइतपत सुज्ञ नाही. (नीति. ३:५, ६) म्हणूनच, हे कवच आपल्या हृदयाचं रक्षण करत आहे की नाही, याचं आपण नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे.
८. आपण यहोवाच्या स्तरांचं पालन का केलं पाहिजे?
८ यहोवाच्या स्तरांमुळे तुमचं स्वातंत्र्य हिरावलं आहे किंवा त्यांमुळे तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत, असं तुम्हाला कधी वाटतं का? २१ वर्षांचा डॅनीयेल म्हणतो: “मी बायबलच्या स्तरांनुसार जगतो म्हणून टीचर आणि इतर मुलं माझी थट्टा करायचे. त्यामुळे थोड्या वेळासाठी माझा आत्मविश्वास कमजोर झाला होता आणि मी निराश झालो होतो.” मग डॅनीयेलला आता कसं वाटतं? तो म्हणतो: “हळूहळू मी यहोवाच्या स्तरांनुसार जगण्याचे फायदे अनुभवू लागलो. माझ्या काही मित्रांना ड्रग्सचं व्यसन लागलं, तर इतर काहींनी मध्येच शाळा सोडून दिली. त्यांची अशी दशा पाहून वाईट वाटतं. पण यहोवा आपली काळजी घेतो.” १५ वर्षांची मॅडीसन म्हणते: “माझ्या सोबत्यांना ज्या गोष्टी अगदी मजेशीर वाटतात किंवा आवडतात त्या नाकारून यहोवाच्या स्तरांनुसार जगण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो.” मग अशा वेळी ती काय करते? ती म्हणते: “मी नेहमी स्वतःला आठवण करून देते की मी यहोवाचं नाव धारण केलं आहे आणि प्रलोभन हे जणू सैतान करत असलेल्या हल्ल्यांसारखं आहे. मी जेव्हा या संघर्षात विजयी होते तेव्हा मला स्वतःबद्दल खूप बरं वाटतं.”
“शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी तुमची तयारी दाखवणारे जोडे पायांत घाला”
९-११. (क) ख्रिस्ती कोणते लाक्षणिक जोडे घालतात? (ख) आपल्याला प्रचार करणं सोपं जावं म्हणून आपण काय करू शकतो?
९ इफिसकर ६:१५ वाचा. एक रोमी सैनिक आपले जोडे घातल्याशिवाय युद्धभूमीवर जाऊ शकत नव्हता. सैनिक घालत असलेल्या जोड्यांचे तळवे चामड्याच्या तीन थरांनी बनलेले असून, खूप मजबूत असायचे. पण त्यासोबतच ते खूप आरामदायीही असायचे. यामुळे सैनिकाला आत्मविश्वासाने चालता यायचं आणि त्याला घसरून पडण्याची भीती नसायची.
१० जोडे घातल्यामुळे रोमी सैनिकाला युद्ध जिंकायला मदत व्हायची. त्याच प्रकारे, लाक्षणिक जोडे घातल्यामुळे आपल्याला “शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित” करायला मदत होते. (यश. ५२:७; रोम. १०:१५) पण कधीकधी प्रचार करण्यासाठी धैर्याची गरज असते. २० वर्षांचा रॉबर्टो * म्हणतो: “माझ्या वर्गसोबत्यांना प्रचार करण्याची मला भीती वाटायची. साक्ष देण्याची कदाचित लाज वाटत असल्यामुळे मी घाबरायचो. त्याबद्दल आता विचार केला की वाटतं, की मी तसा विचार करायला नको होता. पण आता मात्र मी आनंदाने माझ्या सोबत्यांना प्रचार करतो.”
११ अनेक ख्रिस्ती तरुणांनी अनुभवलं आहे, की आधीच तयारी केल्यामुळे त्यांना प्रचार करताना अवघडल्यासारखं वाटत नाही. तुम्ही तयारी कशी करू शकता? १६ वर्षांची जुलिया म्हणते: “मी स्कुलबॅगमध्ये साहित्य ठेवते. माझे वर्गसोबती जेव्हा आपली मतं व्यक्त करतात आणि आपल्या विश्वासांबद्दल बोलतात तेव्हा मी लक्षपूर्वक ऐकते. मग त्यांना कशी मदत करायची याबद्दल मी विचार करते. चांगली तयारी केल्यामुळे त्यांना खासकरून फायद्याच्या ठरतील, अशा गोष्टींबद्दल मला त्यांच्याशी चर्चा करता येते.” २३ वर्षांची मारिया म्हणते: “जर तुम्ही दयाळू आणि लक्ष देऊन ऐकणारे असाल तर तुमच्या सोबत्यांना कोणत्या समस्या आहेत याची तुम्हाला कल्पना येते. तरुणांसाठी असलेले सर्व लेख मी नेहमी वाचते. यामुळे माझ्या सोबत्यांना मदतीचं ठरेल असं बायबलमधून काहीतरी दाखवणं किंवा jw.org वरचे लेख दाखवणं मला शक्य होतं.” प्रचार करण्यासाठी तयारी करणं हे जणू असे “जोडे” घालण्यासारखं आहे जे तुमच्या पायांत अगदी व्यवस्थित बसतात.
“विश्वासाची मोठी ढाल”
१२, १३. सैतानाचे कोणते काही “जळते बाण” आहेत?
१२ इफिसकर ६:१६ वाचा. रोमी सैनिकाकडे एक मोठी आयताकृती ढाल असायची. यामुळे खांद्यापासून ते गुडघ्यांपर्यंत तो झाकला जायचा आणि तलवार, भाले आणि बाणांपासून त्याचं रक्षण व्हायचं.
१३ सैतान तुमच्यावर कोणते “जळते बाण” सोडू शकतो? कदाचित यहोवाबद्दल खोटं बोलून तो तुमच्यावर हल्ला करतो. यहोवाचं तुमच्यावर प्रेम नाही आणि कोणालाच तुमची पर्वा नाही असा तुम्ही विचार करावा, अशी सैतानाची इच्छा आहे. १९ वर्षांची आयडा म्हणते:
“मला बऱ्याचदा वाटतं की यहोवाशी माझं नातं घनिष्ठ नाही आणि त्याला माझा मित्र बनण्याची इच्छा नाही.” मग असं जेव्हा तिला वाटतं तेव्हा ती काय करते? “ख्रिस्ती सभांमुळे माझा विश्वास कमालीचा मजबूत होतो. आधी मी सभांमध्ये नुसतीच बसायचे, उत्तरं द्यायचे नाही. मला जे बोलायचं आहे ते कोणालाच ऐकायचं नाही असा मी विचार करायचे. पण आता मी सभांची तयारी करते आणि दोन किंवा तीन उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. असं करणं मला कठीण वाटतं. पण उत्तर दिल्यावर मला बरं वाटतं. आणि आपले बंधुभगिनीही खूप प्रोत्साहन देतात! सभांमधून परतल्यावर मला नेहमीच वाटतं की यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे.”१४. आयडाच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
१४ एका सैनिकाची ढाल नेहमी एकाच मापाची असायची. पण आयडाच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की विश्वास तसा नसतो. आपला विश्वास वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. ते आपल्यावर अवलंबून आहे. (मत्त. १४:३१; २ थेस्सलनी. १:३) म्हणूनच आपलं संरक्षण होण्यासाठी आपण विश्वासाच्या ढालीला मजबूत करत राहिलं पाहिजे.
“तारणाचा टोप”
१५, १६. आपली आशा एका टोपासारखी कशी आहे?
१५ इफिसकर ६:१७ वाचा. एक रोमी सैनिक आपल्या डोक्याचं, मानेचं आणि चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी नेहमी टोप घालायचा. सैनिकाला आपल्या हातात टोप धरून चालणं शक्य व्हावं, यासाठी काही टोपांना तशी सोयही करण्यात आली होती.
१६ ज्या प्रकारे, टोपामुळे एका सैनिकाच्या मेंदूचं रक्षण होतं, त्याच प्रकारे ‘तारणाच्या आशेमुळे’ आपल्या विचारांचं रक्षण होतं. (१ थेस्सलनी. ५:८; नीति. ३:२१) आशेमुळे आपल्याला देवाच्या अभिवचनांवर लक्ष केंद्रित करायला मदत होते. तसंच, समस्या आल्यावर आपण निराश होत नाही. (स्तो. २७:१, १४; प्रे. कार्ये २४:१५) पण जर आपल्या आशेने आपलं रक्षण करावं, अशी आपली इच्छा असेल तर आपल्यासाठी ती आशा खरी असायला हवी. आपण आपला “टोप” हातात न धरता तो डोक्यात घातला पाहिजे.
१७, १८. (क) आपला टोप काढण्यासाठी सैतान आपल्याला कसं फसवू शकतो? (ख) सैतान आपल्याला फसवू शकला नाही हे आपण कसं दाखवू शकतो?
१७ आपला टोप काढण्यासाठी सैतान आपल्याला कसं फसवू शकतो? त्याने येशूसोबत काय केलं याचा जरा विचार करा. येशू मानवजातीचा राजा बनेल ही गोष्ट सैतानाला माहीत होती. पण त्याआधी येशूला खूप त्रास सहन करून मृत्यूला सामोरं जावं लागणार होतं. त्यानंतर यहोवा येशूला राजा बनवत नाही तोपर्यंत त्याला थांबून राहावं लागणार होतं. त्यामुळे सैतानाने त्याला लवकर राजा बनण्याचं आमिष दाखवलं. सैतानाने येशूला वचन दिलं की जर त्याने फक्त एकदा त्याची उपासना केली तर तो लगेच जगाचा राजा बनू शकतो. (लूक ४:५-७) त्याच प्रकारे यहोवा आपल्याला नवीन जगात खूप चांगल्या गोष्टी देणार आहे हेही सैतानाला ठाऊक आहे. पण यहोवाचं नवीन जगाबद्दलचं अभिवचन पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आणि तोपर्यंत आपल्याला कदाचित खूप समस्यांचाही सामना करावा लागेल. म्हणून सैतान आपल्याला आताच आरामदायी आणि सुखदायी जीवन जगण्याचं आमिष दाखवतो. आपण देवाच्या राज्याला दुसऱ्या स्थानी ठेवून स्वतःच्या सुखसोयींचा आधी विचार करावा अशी त्याची इच्छा आहे.—मत्त. ६:३१-३३.
१८ बऱ्याच ख्रिस्ती तरुणांना फसवण्यात सैतान अपयशी ठरला आहे. उदाहरणार्थ, २० वर्षांची करीना म्हणते: “फक्त देवाचं राज्यच आपल्या सर्व समस्या सोडवू शकतं हे मला माहीत आहे.” या आशेमुळे तिच्या विचारांवर आणि कार्यांवर कसा परिणाम झाला आहे? या जगातल्या गोष्टी क्षणिक, तात्पुरत्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायला तिला मदत होते. या जगात स्वतःसाठी करियर घडवण्यात मेहनत करण्याऐवजी, करीना आपल्या वेळेचा आणि ताकदीचा उपयोग यहोवाच्या सेवेसाठी करते.
“आत्म्याची तलवार,” अर्थात देवाचे वचन
१९, २०. आपण देवाचं वचन आणखी कुशलपणे कसं हाताळू शकतो?
१९ रोमी सैनिक वापरत असलेल्या तलवारीची लांबी जवळपास ५० सेंटीमीटर (२० इंच) इतकी असायची. रोज सराव केल्यामुळे हे सैनिक तलवार चालवण्यात खूप तरबेज होते.
२० प्रेषित पौलने म्हटलं की देवाचं वचन तलवारीसारखं आहे आणि ते आपल्याला देवाने दिलं आहे. पण आपल्या विश्वासाचं समर्थन करण्यासाठी आणि स्वतःचे विचार सुधारण्यासाठी आपण याचा कुशलपणे वापर करायला शिकलं पाहिजे. (२ करिंथ. १०:४, ५; २ तीम. २:१५) हे आपण कसं करू शकतो? २१ वर्षांचा सबॅस्टियन म्हणतो: “बायबल वाचन करताना मी प्रत्येक अध्यायातलं एक वचन लिहून काढतो. अशा प्रकारे माझ्या आवडीच्या वचनाची मी एक यादी बनवली आहे.” यामुळे यहोवाचे विचार चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्याला मदत झाली आहे. आधी उल्लेख केलेला डॅनीयेल म्हणतो: “मी जेव्हा बायबल वाचन करतो तेव्हा सेवाकार्यात मदतीची ठरतील अशा वचनांची मी नोंद करतो. मी अनुभवलं आहे की आपलं बायबलबद्दलचं प्रेम आणि लोकांना मदत करण्यासाठी आपण घेत असलेली मेहनत ते पाहतात, तेव्हा ते चांगला प्रतिसाद देतात.”
२१. आपण सैतान आणि दुरात्म्यांना घाबरण्याची गरज का नाही?
२१ या लेखात दिलेल्या तरुणांच्या उदाहरणांवरून आपण शिकलो, की आपल्याला सैतान आणि दुरात्म्यांना घाबरण्याची गरज नाही. हे खरं आहे की ते शक्तिशाली आहेत पण यहोवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. शिवाय, ते कायमस्वरूपी जगणारही नाहीत. त्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान कैद केलं जाईल आणि त्या वेळी ते कोणालाही इजा पोहोचवू शकणार नाही. त्यानंतर त्यांचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१-३, ७-१०) आपण आपल्या शत्रूला, त्याच्या कुयुक्त्यांना, त्याच्या ध्येयाला ओळखतो. यहोवाच्या मदतीने आपण खंबीरपणे त्याचा सामना करू शकतो!
^ परि. 10 काही नावं बदलण्यात आली आहेत.