बायबलमधले वाक्यांश
खंडणीच्या आधी पापांची क्षमा
येशूने आपल्या रक्ताद्वारे जे खंडणी बलिदान दिलं, त्याच्या आधारावरच आपल्याला पापांची क्षमा होऊ शकते. (इफिस. १:७) तरीसुद्धा बायबल म्हणतं, की देवाने “पूर्वीच्या काळात घडलेल्या पापांची धीराने क्षमा” केली. म्हणजे येशूने खंडणी देण्याआधीच देवाने पापांची क्षमा केली. (रोम. ३:२५) पण यहोवा हे कसं करू शकत होता? आणि असं करणं त्याच्या न्यायिक स्तरांनुसार होतं का?
यहोवाने अशी भविष्यवाणी केली, की तो एक “संतती” पुरवेल आणि विश्वासू मानवांना वाचवण्यासाठी ही संतती खंडणी देईल. तेव्हा ही खंडणी जणू यहोवाच्या दृष्टिकोनातून तेव्हाच दिल्यासारखी होती. (उत्प. ३:१५; २२:१८) कारण यहोवाला या गोष्टीची पूर्ण खातरी होती, की पुढे त्याचा एकुलता एक मुलगा योग्य वेळ आल्यावर स्वतःहून त्याचं जीवन खंडणी म्हणून देईल. (गलती. ४:४; इब्री १०:७-१०) देवाचा प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर असताना खंडणी पुरवण्याआधीच येशूकडे एखाद्याच्या पापांची क्षमा करायचा अधिकार होता. अशा प्रकारे त्याने पुढे देण्यात येणाऱ्या बलिदानाचे फायदे विश्वासू लोकांना आधीच होऊ दिले.—मत्त. ९:२-६.